डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

गांधींचे व्यक्तित्व व कार्य यांबद्दल अनेकांमध्ये मतभेद असू शकतात. काहींना ते आभाळाइतके मोठे वाटतात, तर काही जण त्यांना चक्क खलपुरुष मानतात. पण ते विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विरोधात होते, त्यांनी विकासाला सतत विरोधच केला, यंत्रांना- अगदी ट्रेनसारख्या उपयुक्त वाहतुकीच्या साधनांनाही त्यांनी विरोध केला. थोडक्यात म्हणजे- ते या बाबतीत अगदी कालबाह्य झालेले ‘मॉडेल’ होते, असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटू शकते. तरीही या अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालताना मी पहिले नाव गांधींचे घेत आहे, याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्यामागे निश्चित काही विचार आहे.

‘सर्व चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेने होते’, कार्ल मार्क्सने १८६३मध्ये केलेले हे विधान म्हणजे जगभरातील धर्मचिकित्सेची नांदी म्हणायला हवी. माणसांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा आणि त्यांच्या ऐहिक जीवनावर प्रभाव टाकणारा विचारव्यूह किंवा पद्धती म्हणून धर्माचे मानवी जीवनातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच मानवी जीवनाच्या कोणत्याही अंगाची चिकित्सा किंवा समीक्षा करण्याआधी धर्माची समीक्षा करणे आवश्यक आहे, असे मार्क्स मानतो. विवेकवादी विचारात म्हणूनच धर्मचिकित्सेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

असेच विलक्षण महत्त्व एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाला आले आहे. तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञान. विज्ञानाच्या आधाराशिवाय तंत्रज्ञानाचा उगम किंवा विकास अशक्य आहे. एका अर्थाने विज्ञान-तंत्रज्ञान हा या आधुनिकोत्तर युगाचा युगधर्म आहे. या युगाचा परवलीचा शब्द म्हणजे विकास. विकासाचे इंजिन म्हणजे तंत्रज्ञान. अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीतल्या जगड्‌व्याळ कंपनीच्या अब्जाधीश सीईओपासून धारावी किंवा मेळघाटात राहणाऱ्या भुकेकंगाल माणसांपर्यंत सर्वांनाच आज विकास हवा आहे. म्हणजे, त्यांच्या वाट्याला आला आहे त्यापेक्षा जास्त विकास हवा आहे. त्यासाठी हवे तंत्रज्ञान- तेही अत्याधुनिक, सर्वांत अद्ययावत्‌- लेटेस्ट- याबद्दल जगभरातील बहुसंख्य लोकांचे एकमत होऊ शकते.

एकोणिसाव्या शतकातील भारतात धर्माबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला स्थान नव्हते. अशा पाखंडी व्यक्तीला काय काय सहन करावे लागत होते, याविषयी इतिहासात अनेक दाखले आहेत. प्रश्न विचारणे हे आजही प्रचलित शिक्षणपद्धतीत महापाप मानले जाते. म्हणजे आपल्या समाजात विज्ञाननिष्ठा, वैज्ञानिक विचारपद्धती रूजली नाही; वाढली नाही. पण तरीही विज्ञानाच्या नावाचा मोठा दबदबा आहे, तंत्रज्ञानाचा तर आहेच आहे. म्हणून आज जर कोणी विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती म्हणजेच प्रगती आहे का, हे व असले प्रश्न विचारले तर अशा शंका घेणाऱ्या व्यक्तीला आपला समाज ‘संशयात्मा विनश्यति’ असेच म्हणत असणार, याबद्दल मात्र शंका घेण्याचे कारण नाही.

यासाठी उदाहरणे हवी तेवढी देता येतील. जैतापूरला आण्विक ऊर्जा केंद्र उभारू नये, म्हणून कित्येक वर्षे आंदोलन सुरू आहे. आपल्या देशात सिंचनासाठी मोठ्या धरणांचे तंत्रज्ञान योग्य नाही, म्हणून नर्मदेपासून टिहरीपर्यंतच्या धरणांच्या विरोधात आंदोलने झाली व आजही होत आहेत. शेतीच्या- विशेषतः अन्नधान्य पिकविण्याच्या क्षेत्रात जनुक-संस्कारित (जेनेटिकली मॉडिफाइड- जीएम) तंत्रज्ञानाचा वापर करणे घातक ठरेल, असे काही समूहांचे म्हणणे आहे. त्याऐवजी पारंपरिक/ नैसर्गिक, रसायनविरहित शेती करावी. असेही काही जण म्हणतात. कोणी पर्यावरण नष्ट होईल म्हणून पश्चिम घाटाच्या ‘विकासाला’ विरोध करतो, तर कोणी रासायनिक कारखाने प्रदूषण पसरवतात म्हणून त्यांच्यावर बंदीची मागणी करतो. कोणी वारेमाप जंगलतोड झाल्याने तापमान वाढेल अशी भीती व्यक्त करतो, तर कोणी गर्भलिंगनिदान करणाऱ्या तंत्रज्ञानामुळे स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळेल म्हणून त्यावर अंकुश ठेवण्याची मागणी करतो. या सर्वांबद्दल आपल्या समाजातील सत्ताधीशांचा, जागरूक घटकांचा, सुशिक्षितांचा किंवा सर्वसाधारण जनतेचा काय दृष्टिकोन असतो? काही प्रातिनिधिक मासले पाहू या-

- पर्यावरणाच्या गप्पा मारणारे विकासाचे शत्रू आहेत, विकसित देशांचे हस्तक आहेत. आम्ही विकास केलेला त्यांना पाहवत नाही.

 - तुम्ही चाखली ना आतापर्यंत विकासाची फळे? मग आता आमची वेळ आल्यावर तुमच्या पोटात का दुखते? आमचे पोट भरू द्या, मग पर्यावरणाचे पाहू.

- अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जे विरोध करतात, त्यांनी सरळ जंगलात जाऊन झोपडीत राहावे. आम्हाला काळाची चक्रे उलट फिरवायची नाहीत.

- तंत्रज्ञानामुळे कधी कधी नुकसान झाले आहे, हे खरे आहे; पण त्यात तंत्रज्ञानाची काय चूक? ते तर केवळ हत्यार आहे. त्याचा वापर कसा होतो, हे वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे.

 - हे बघा, टेक्नॉलॉजी वगैरे मोठ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचे, हे तज्ज्ञ लोकांचे काम आहे. इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये.

पण असे कितीही म्हटले तरी अशा ‘संशयात्म्यां’ची संख्या आपल्या देशात व जगभरात वाढतच आहे, ती वाढतच जाणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण आपल्यातल्या बहुसंख्यांना जो व जितका विकास हवा आहे, तेवढा करण्यासाठी आवश्यक संसाधनेच आपल्याकडे नाहीत, असे स्पष्ट होऊ लागले आहे. स्टीफन हॉकिंग्जसारखे प्रज्ञावंतदेखील पर्यावरण समतोल ढासळल्यामुळे पृथ्वी नष्ट होण्याच्या शक्यता बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे आपण या सर्व प्रश्नांना एकदाचे  भिडायला काय हरकत आहे? गेली दीडशे वर्षे विवेकवाद्यांनी जी धर्मसमीक्षा केली, त्यामुळे धर्मातील हीण नष्ट होण्यास मदतच झाली आहे. त्याचप्रमाणे विज्ञानाची समीक्षा केल्याने समाजाला व आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपण जे समज उराशी बाळगले आहेत, त्यांच्यात कितपत तथ्य आहे हे आपल्याला कळेल. मानवी समाजाच्या व एकूणच आपल्या विश्वाच्या भल्यासाठी नेमके काय केले पाहिजे, त्यासाठी विज्ञानतंत्रज्ञानाची दिशा कशी असली पाहिजे, हा बोधही आपल्याला त्यातून होऊ शकेल.

एकदा विषयाला तोंड फुटले, समीक्षा करायची ठरवलीच; तर अमका प्रश्न कसा विचारायचा, ह्याला अर्थ उरत नाही. आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे काही तरी ‘लई भारी’ असा समज आहे. म्हणून त्यावर सामान्य लोकांनी बोलायचे नाही; ते केवळ अतिशय बुद्धिमान लोकांचे राखीव कुरण आहे, असेही मानले जाते. त्यामुळे महाविद्यालयीन ‘शिक्षणासाठी विज्ञान’ किंवा ‘तंत्रज्ञान’ शाखा निवडणारे म्हणजे हुशार लोक (इतर जणू मठ्ठ!) असे गैरसमजही त्यातून फोफावतात. खरे तर आपल्या जगण्याशी संबंधित सर्व शारीरिक क्रिया या वैज्ञानिक नियमांनुसार घडत असतात. श्वास घेण्यापासून ते मोबाईल वापरण्यापर्यंत सर्व क्रियांमध्ये आपण वैज्ञानिक तत्त्वाचा किंवा तंत्रज्ञानातील शोधाचा वापर जाणता-अजाणता करीत असतो. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याच्या औचित्याबद्दल आपल्याला काही प्रश्न पडतही असतात. पण ते स्वतःशी किंवा इतरांसमोर उच्चारत नाही. या लेखमालेच्या निमित्ताने आपण सर्व मिळून असे अनेक प्रश्न विचारू आणि त्यांची उत्तरे सर्व मिळून शोधू. मला स्वतःला पडलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो-

विज्ञान म्हणजे काय?

तंत्रज्ञान यह कौन सी चक्की का आटा है?

विज्ञानाचा आशय म्हणजे तरी काय? तो नेहमीच प्रागतिक व स्वयंपूर्ण असतो का; की, विज्ञानाची निर्मिती करणाऱ्यांच्या पूर्वग्रहांचे- मूल्यांचे रंग त्यावर चढत असतात?

विज्ञानाची पद्धत म्हणजे नेमकी काय? सत्य शोधण्याची किंवा वास्तव जाणून घेण्याची ती एकमेव पद्धत आहे का? तिचे सामर्थ्य नेमके कशात आहे व तिच्या मर्यादा कोणत्या?

वैज्ञानिक निरीक्षणे करताना पूर्णपणे तटस्थ राहणे शक्य आहे का?

आजच्या साऱ्या शोधांचे बीज हिंदू धर्मग्रंथात आहे, हे खरे आहे का? पुष्पक विमान, प्लॅस्टिक सर्जरी (संदर्भ- गणेशजन्म), क्लोनिंग (संदर्भ : एका थेंबापासून हजारोंची निर्मिती सांगणाऱ्या पुराणकथा), टेस्ट ट्यूब बेबी (संदर्भ : मानवी शरीराबाहेर गर्भधारणा झाल्याच्या किती तरी ऋषींच्या जन्मकथा) या साऱ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी शोधल्या होत्या का? मग त्या लुप्त कशा झाल्या?

एवढे मोठे शोध पूर्वी लागले नसले, तरी आपले जे सांस्कृतिक संचित आहे- उदा. शेती, आहार-विहार- आरोग्य यांबद्दलच्या पारंपरिक समजुती किंवा ज्ञान- त्यांना वैज्ञानिक आधार आहे का? उदा.- पूर्वीच्या काळी पाऊस किती पडणार, केव्हा येणार याबद्दल पशू, पक्षी, किडे यांच्या हालचाली, वाऱ्याची दिशा इत्यादींवरून शेतकरी काही ठोकताळे बांधायचे; किंवा अमुक ऋतूत अमुक अन्न खाल्ल्यास ते बाधते, अशा समजुती होत्या. त्यांत काही तथ्य आहे का?

आयुर्वेद, लोकविद्या- उदा. पारंपरिक वस्त्रविद्या, धातुशास्त्र इत्यादी भारतीय शास्त्रांची काही तरी उपयुक्तता होती, हे खरे का? त्यांचा वैज्ञानिक आधार कोणता? आयुर्वेदातील पंचमहाभूते, त्रिदोष अशा कल्पना व आधुनिक आरोग्यशास्त्र यांच्यात काहीच सारखेपणा दिसत नाही. पण आयुर्वेदातील काही औषधींची उपयुक्तता आधुनिक शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेली आहे, याचा अर्थ काय?

तंत्रज्ञान हे नेहमी तटस्थ असते का व त्याचा वापर- गैरवापर केवळ करणाऱ्यावर अवलंबून असतो का? काही तंत्रज्ञान मुळातून समाज किंवा मानवजात किंवा विश्व यांच्यासाठी घातक असणे शक्य नाही का? (उदा.- संहारक अस्त्रे) तसेच काही तंत्रज्ञान विशिष्ट परिस्थितीत योग्य असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत ते अयोग्य किंवा हानिकारक असू शकेल का?

तंत्रज्ञानाची उपयुक्तता जर स्थळ-काळ-परिस्थितीवर अवलंबून असेल, तर मग भारताच्या आजच्या परिस्थितीत ‘समुचित तंत्रज्ञान’ कोणते असू शकते?

‘लोकविज्ञान’ व ‘प्रस्थापितांचे विज्ञान’ असा भेद करणे योग्य आहे का? ह्या दोहोंत काय फरक आहे?

विज्ञान-तंत्रज्ञानावर हक्क कोणाचा असतो? कोणाचा असायला हवा? स्वामित्व हक्क (पेटंट) ही नक्की काय गोष्ट आहे? त्यामुळे संशोधकांच्या हक्काचे रक्षण होते की कंपन्यांच्या? यात सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्कांना कोठे अवकाश आहे का?

विज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणत्या विषयावर संशोधन व्हावे, हे कोण व कसे ठरवितात? जे शोध लागतात, त्यांच्यापैकी किती समोर येतात व किती नष्ट होतात? त्याबद्दल निर्णय कोण घेतात?

प्रयोगशाळेपासून ग्राहकाच्या घरापर्यंत तंत्रज्ञान कसे पोहोचते? सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे शोध लागतात- उदा. गवताची झोपडी अग्निरोधक करणे सहज शक्य आहे; पण ते कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. याउलट, समाजाला घातक पण काही लोकांना भरपूर लाभ मिळवून देणारे तंत्रज्ञान (उदा. गर्भलिंगपरीक्षेसाठी घरोघरी जाणाऱ्या सोनोग्राफी व्हॅन्स) वेगाने पसरते. यामागील रहस्य कोणते?

पर्यावरणशास्त्र हे विज्ञान आहे का? त्याची विज्ञानतंत्रज्ञानाबद्दल काय भूमिका आहे? त्याचे निष्कर्ष बंधनकारक का मानले जात नाहीत?

विज्ञान व अध्यात्म यांच्यात काही नाते आहे का? असल्यास कोणते?

या यादीत तुम्हीही भर घालू शकता. या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाट पुसत, आपल्या निरीक्षणांची त्याला जोड देत आपण सोबत मार्गक्रमण करू शकतो. पण तरीही एक प्रश्न उरतोच- या सगळ्यात गांधी कुठून आले?

गांधींचे व्यक्तित्व व कार्य यांबद्दल अनेकांमध्ये मतभेद असू शकतात. काहींना ते आभाळाइतके मोठे वाटतात, तर काही जण त्यांना चक्क खलपुरुष मानतात. पण ते विज्ञानतंत्रज्ञानाच्या विरोधात होते, त्यांनी विकासाला सतत विरोधच केला, यंत्रांना- अगदी ट्रेनसारख्या उपयुक्त वाहतुकीच्या साधनांनाही त्यांनी विरोध केला. थोडक्यात म्हणजे- ते या बाबतीत अगदी कालबाह्य झालेले ‘मॉडेल’ होते, असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटू शकते. तरीही या अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालताना मी पहिले नाव गांधींचे घेत आहे, याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्यामागे निश्चित काही विचार आहे. मीसुद्धा आत्ता- आत्तापर्यंत साधारणतः तुमच्यासारखाच विचार करीत होतो. पण अलीकडे गांधींचे व त्यांच्याविषयी काही वाचन केले, काही विचार केला आणि मला काही वेगळ्या गोष्टी सापडल्या. त्या मी या लेखमालेत मांडेन. थोडक्यात, गांधी रूढ अर्थाने विज्ञानवादी नसले तरी त्यांनी आयुष्यभर अनेक क्षेत्रांत प्रयोग केले. मुख्य म्हणजे, त्यांनी कोणतीही बाब सहज स्वीकारली नाही. आपण ज्या अनेक गोष्टी आयुष्यात गृहीत धरतो, त्यांना गांधीनी प्रश्नांकित केले. म्हणजे प्रत्येक बाबतीत प्रश्न विचारणारा, प्रत्येक बाब आपल्या निकषांवर घासून मगच स्वीकारणारा हा माणूस होता. (प्रश्न विचारणे, नेमके प्रश्न विचारणे ही विज्ञानाची पहिली कसोटी आहे.) धर्मापासून अध्यात्मापर्यंत, ब्रह्मचर्यापासून राजकीय स्वातंत्र्यापर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांनी मूलभूत प्रश्न उभे केले. विज्ञान-तंत्रज्ञान व विकास या बाबींना प्रश्नांकित करणारा हा आद्य बंडखोर होता. शिवाय विकास, धर्म, राजकारण या सर्वांचा केंद्रबिंदू गरिबातला गरीब माणूस असायला हवा- हा महत्त्वाचा निकषही त्यानेच घालून दिला. म्हणून आजच्या संदर्भात विज्ञान-तंत्रज्ञानाचा लेखा-जोखा मांडताना त्यांचा भोज्यासारखा वापर करायला हरकत नसावी. अर्थात, आपला शोध हा आजच्या संदर्भात असणार आहे. म्हणून त्यांच्या चिकित्सेतला आपल्याला आवश्यक व योग्य वाटेल तेवढाच भाग आपण घेणार आहोत. शिवाय त्यांच्यानंतर अनेक विचारकांनी यासंदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, त्यांचाही परामर्श घेणार आहोत.

एका अर्थाने या लेखमालेच्या निमित्ताने आपण विज्ञानाचे तत्त्वज्ञान (Philosophy of Science) या जटिल (complicity) विषयाला हात घालणार आहोत. पण ही कोरडी तात्त्विक चर्चा ठरू नये; तिला आपल्या अनुभवांचा, आजच्या आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा आधार असेल असा आपण प्रयत्न करू या. चला तर मग, तुम्हाला कोणते प्रश्न पडताहेत याची मी वाट पाहतोय. आपला प्रतिसाद, शंका, सूचना पाठविण्यास विसरू नका.

Tags: कार्ल मार्क्स विज्ञान रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ समीक्षा... आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची? विज्ञानविवेक पर्यावरणशास्त्र गांधी सांस्कृतिक संचित तंत्रज्ञान विज्ञान व अध्यात्म पर्यावरणशास्त्र पेटंट स्वामित्व हक्क लोकविज्ञान प्रस्थापितांचे विज्ञान समुचित तंत्रज्ञान विज्ञान म्हणजे काय पर्यावरण समतोल स्टीफन हॉकिंग्ज जेनेटिकली मॉडिफाइड तंत्रज्ञान अत्याधुनिक विकास Inquisition of Religion Pragmatic outlook towards science Comprehensive Technology Analysis of religion Examination of Religion Envornmental Science Ravindra Rukmini Pandharinath Rational Science Advance Science Hi tech technology What is science? Science and Philosophy Mhatma Gandhi Religion review Lokvidnyan Prasthapitanche Vidnyan Samuchit Tantradnyan Development Environment Samiksha aani vidnyanan tantrdnyan Vidnyan Vivek stephen Hawking Patent Karl Marks genetically modified complicity Philosophy of Science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके