डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘छिन्नपत्रावली’ हा गुरुदेवांनी आपली पुतणी इंदिरा(कवींचे वडीलबंधू सत्येंद्रनाथ यांची कन्या) हिला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. कवींनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षापासून ते वयाच्या चौतिसाव्या वर्षांदरम्यान लिहिलेली ही पत्रे आहेत. इंदिरादेवींनी नंतर त्यांचे संपादन करून त्यातील वैयक्तिक भाग काढून टाकला आहे, म्हणून त्यांना(‘इंदिरादेवींनीच) ‘छिन्नपत्रावली’ असे नाव दिले आहे.

विनोद, चिंतन, निसर्गवर्णन आणि आपल्या गीतांची निर्मितिप्रक्रिया यांच्याबद्दल रवींद्रनाथांनी या पत्रांत लिहिले आहे. ही पत्रे प्रसन्न शैलीतील ललितलेख म्हणूनही वाचनीय आहेत. गुरुदेव टागोरांच्या जन्माला 150 वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, ‘छिन्नपत्रावली’तील निवडक पत्रे आम्ही या अंकापासून क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. मराठीत ही पत्रे पहिल्यांदाच प्रकाशित होत असून, विलास गिते यांनी ही पत्रे थेट बंगाली भाषेतूनच अनुवादित केली आहेत.

- संपादक

7 ऑक्टोबर 1894

...तुला मी जेवढी पत्रं लिहिली आहेत, त्यांच्यामध्ये माझ्या मनातल्या सगळ्या भावना ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या आहेत,तशा माझ्या अन्य कुठल्याही लेखनात झालेल्या नाहीत... तुला मी जेव्हा पत्र लिहितो, तेव्हा माझ्या मनात कधीही अशी शंकामेत नाही, की तुला माझं म्हणणं समजणार नाही, किंवा चुकीचं समजेल, किंवा त्यावर तू विश्वास ठेवणार नाहीस, किंवा ज्या गोष्टी माझ्या मते गहन सत्ये आहेत, त्यांना तू केवळ कविकल्पना समजशील. त्यामुळेच मी जे चिंतन करतो, ते अगदी तसेच सहजपणे तुला लिहून कळवू शकतो. जेव्हा मला वाटतं की, वाचक मला नीट ओळखणार नाहीत, माझ्या अनेक गोष्टी त्यांना अचूक समजणार नाही, किंवा त्या नम्रपणे समजून घेण्याचा प्रयत्नही ते करणार नाहीत, तसंच ज्या गोष्टी त्यांच्या मानसिकअनुभवाशी मेळ खाणार नाहीत, त्या गोष्टी ते माझ्यावर विश्वास ठेवून मान्य करणार नाहीत, तेव्हा मनातल्या भावना तेवढ्या सहज भाषेत प्रवाहित होत नाहीत; आणि जेवढ्या होतात, त्यांच्यामध्ये बराचसा भाग प्रकट होत नाही. यावरून मी ओळखू शकतो की माझं जे सर्वांत चांगलं प्रकटीकरण आहे, ते मी स्वत:च्या इच्छेनुसार कुणाला देऊ शकत नाही. माझ्यामध्ये जे सर्वांत गहनतम, उच्चतम, अंतरतम असं आहे, त्या माझ्या अतिताचं दान किंवा विक्रम करण्याची माझी क्षमता नाही. मी ठरवलं, प्रयत्न केले,तरीसुद्धा ते प्रकट होऊ शकत नाही- चोवीस तास मी ज्यांच्याबरोबर राहतो, त्यांच्या जवळसुद्धा आपल्या भावना व्यक्त करणं माझ्या क्षमतेपल्याडचं आहे... तुझा स्वभाव असा काही अकृत्रिम आहे, तुझ्यामध्ये अशी काही सत्यप्रियता आहे, की सत्य स्वत: होऊनच तुझ्याजवळ अगदी सहज प्रकट होतं. तो तुझा स्वत:चा गुण आहे. जर कुणा लेखकाचं सर्वोत्तम लेखन त्याच्या पत्रांमध्येच दिसत असेल, तर असं समजायला हवं, की ज्या व्यक्तीला ती पत्रं लिहिलेली आहेत, त्या व्यक्तीमध्येही पत्र लिहिण्याची क्षमता आहे. मी तर इतरही अनेक जणांना पत्रं लिहितो, परंतु कुणीही माझं संपूर्ण लेखन आकर्षित करून घेऊ शकलेलं नाही... तुझ्या अकृत्रिम स्वभावामध्ये एक साधी-सरळ निर्मलता आहे, सत्य तुझ्यामध्ये अव्याहतपणे प्रतिबिंबित होत असतं.

अनुवाद :  विलास गिते

Tags: letters to Indiradevi letters to Niece Bengali Translation Gurudev Rabindranath Tagor Translated Bengali letters Vilas Gite मराठी पत्रे अनुवादित बंगाली विलास गिते गुरूदेव टागोराची निवडक पत्रे निसर्गवर्णन चिंतन विनोद पुतणीला पत्रे इंदिरादेवी गुरूदेव टागोर छिन्नपत्रावली weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके