डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समाजकार्य : जीवनगौरव पुरस्कार । रयत शिक्षण संस्था
(चेअरमन : रावसाहेब शिंदे)

ग्रामीण, कष्टकरी, दलित, आदिवासी, महिला व बहुजन समाज यांना ‘ज्ञानाचा प्रकाश’ रयत शिक्षण संस्थेने दिला आहे. त्यामुळेच ही जनता शिक्षण घेऊन आज सामर्थ्यशाली झालेली आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ही जनता प्रभावीपणे कार्यरत आहे. समाजाची आज जी लक्षणीय प्रगती दिसून येते, त्या प्रगतीत रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञान देण्याच्या कामाचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचा बराचसा ग्रामीण भाग संस्थेच्या विविध शाखांमुळे व्यापला आहे. शैक्षणिक व्यापाचे वैभवशाली स्वरूप आज डोळ्यांत भरणारे आहे. बहुजनांचे अस्मिता जागविणारे हे सगळे संस्थेच्या कार्याचे भव्य-दिव्य रूप आहे.

‘‘भाऊराव, साबरमती आश्रमात मी जे करू इच्छित होतो- जे मला शक्य झाले नाही, ते या ठिकाणी करून दाखविण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. तुमच्या कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत.’’

मला वाटते, गांधीजींच्या या प्रतिक्रियेतून भाऊराव पाटलांच्या कार्याची महानता अतिशय प्रभावीपणे आविष्कारित होते. लक्ष्मीबाईसुद्धा या कार्याशी खूपच एकरूप झाल्या. ‘‘ही वसतिगृहातील सगळी पन्नास मुले ही माझीच मुले आहेत.’’ हे ‘तुम्हाला मुले किती?’ या लक्ष्मीबार्इंना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून, तसेच विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून आपले स्वत:चे मंगळसूत्र मोडण्यातून प्रचिती येते. या एकरूपतेची उंची इथेच थांबत नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांनी भाऊरावांकडे आपली अखेरची इच्छा व्यक्त केली. ती अशी की हरिजनांसह सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या अंत्यविधीच्या वेळी मला खांदा द्यावा. शैक्षणिक सेवाकार्याशी असलेल्या सर्वांचा त्याग करून स्वत:चा प्राणसुद्धा त्यासाठीच समर्पित करणे, असेच या समर्पणाचे वर्णन करावे लागेल.

सन 1937 च्या सुमारास भाऊराव पाटलांनी खेर मंत्रिमंडळाकडून व्हॉलंटरी शाळांच्या शिक्षणाची योजना संमत करून घेतली. त्यानुसार भाऊरावांची भ्रमंती गावोगाव सुरू झाली. खेड्यात जायचे, ‘‘तुम्हाला शाळा पाहिजे ना, मग शाळेला जागा द्या. तसेच मी सोबत शिक्षक आणलाय, त्याला राहायला जागा द्या.’’ शिक्षकाला खायला लागणाऱ्या धान्यासाठीदेखील ते गावाला आवाहन करीत. विशेषत: गावाच्या आया-बहिणींना भाऊरावांनी केलेले आवाहन हे वैशिष्ट्यपूर्ण असायचे. पहाटे जात्यावर दळायला बसताना पहिली एक मूठ माझ्या थैलीत टाका, असे त्यांचे आवाहन असे. आवाहनाला मनसोक्त प्रतिसाद मिळे. मूठ-मूठ म्हणता-म्हणता थैलीच्या थैली भरून धान्य जमा होत असे. शिक्षकाची खाण्याची गरज भागत असे. राहिलेले धान्य भाऊराव वसतिगृहांना पुरवीत असत. वसतिगृहासाठी त्यांनी असे धान्य स्वत:च्या खांद्यावरून वाहिले. शिक्षकाची किराणाची गरज ते किराणावाल्याला उधार किराणा द्यायला सांगून भागवीत असत. शिक्षणासाठी भाऊरावांनी प्रसंगी मुलेसुद्धा वसतिगृहाकडे नेताना खांद्यावर घेतली. अनवाणी पायांनी आणि उघड्या माथ्याने त्यांची ही खेडोपाडीची भ्रमंती ही चालू होती. व्हॉलंटरी शाळांना हा-हा म्हणता अमाप प्रतिसाद मिळाला. भाऊरावांच भ्रमंती झंझावातासारखी चालू होती. सन 1938-39 ते 1949-50 या दहा वर्षांच्या काळामध्ये भाऊरावांनी अशा 600 शाळा काढल्या. त्यांत 700 शिक्षक काम करीत होते आणि सुमारे 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिक्षकांना पगार म्हणून फारसे काही मिळतही नव्हते, कारण शासनाला या कामात लक्ष घालायला आणि बजेटची तरतूद करण्यात म्हणावे तेवढे स्वारस्य नव्हते. भाऊरावांनी या अनट्रेंड शिक्षकांना ट्रेन्ड होता यावे यासाठी स्वत: ट्रेनिंग कॉलेज काढून यशस्वीरीत्या चालविले. या शैक्षणिक कार्याला एका संस्थेचे कार्य असे म्हणून त्याचे वर्णन संकुचित करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भाग व्यापून राहिलेली अशी ही भाऊरावांनी उभारलेली शिक्षणासाठीची एक ‘लोकचळवळ’ होती. तिच्यामधला लोकांचा सहभाग आणि लोकांची उपक्रमशीलता ही ‘न भूतो न भविष्यति अशी होती. भाऊराव पाटलांनी हा एक जगावेगळा असा शिक्षणाचा अद्वितीय प्रयोग यशस्वीरीत्या आकाराला आणल होता. त्यालचे वर्णन असे करता येईल की, भाऊरावांच्या नेतृत्वाखाली लोकांनी उभी केलेली लोकांसाठीची आणि लोकांची अशी ‘शैक्षणिक चळवळ’ होती. माझ्या माहितीप्रमाणे, जगात असा लोकशिक्षणाचा झंझावती प्रयोग झालेला कोठे आढळत नाही.

गव्हर्नर जनरल आणि शिक्षक यांच्या तुलनेचा म. गांधींना बोलण्याच्या ओघात असा एक प्रश्न विचारण्यात आला होता- शिक्षकाला काय पगार द्यावा? त्याला गांधीजींनी असे उत्तर दिले होते, ‘‘शिक्षकाने खावे, प्यावे, जगावे आणि शिकवावे.’’ गांधीजींनी शिक्षकाची तुलना विद्यार्थ्यांच्या संदर्भात ‘मातारूपी शिक्षक’ अशी केली होती. गांधीजी अशा प्रयोगात स्वत: कितपत यशस्वी होऊ शकले, हा अभ्यासाचा विषय होऊ शकेल. मात्र मला वाटते, भाऊरावांचे वसतिगृह पाहून गांधीजींनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली तशीच प्रतिक्रिया भाऊरावांच्या 600 शाळांतील 700 शिक्षकांच्या दहा वर्षांतल्या योगदानातला प्रयोग पाहून व्यक्त केली असती.

शासनाच्या अदूरदर्शी धोरणामुळे या शाळा बंद करण्यात आल्या, नाही तर भाऊरावांनी खरोखर उभा मुंबई प्रांत व्यापून टाकला असता. भाऊरावांचे देदीप्यमान आणि अद्वितीय असे ‘ग्रामीण शैक्षणिक कार्य’ हे जगाच्या शैक्षणिक इतिहासाने सुवर्णाक्षरांत नोंद घ्यावे असे आहे.

भाऊरावांचे शैक्षणिक कार्य आता चांगल्यापैकी प्रसिद्धीला आले होते. देणग्यांचा आटापिटा करण्याचा काळ आता मागे पडल होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्याही सातत्याने वाढत होती. सातारा, सांगली भागातील गिरणी कामगार मुंबईत फार मोठ्या संख्येने होते. भाऊराव पाटील मुंबईला गेले की, कामगारांच्या प्रत्येकी रुपया-रुपयासारख्या देणग्यांचा ‘थेंबे थेंबे तळे साचे’ अशा तऱ्हेने त्यांच्यावर वर्षाव होई. ग्रामीण व दलित जनतेसाठी भाऊराव पाटील करत असलेला त्याग, घेत असलेल्या खस्ता आणि स्वत:च्या प्रपंचाची केलेली होळी या सर्वांचा प्रभाव जनमानसांवर अशा तऱ्हेने पडत होता की, भाऊरावांवर सर्वसामान्य जनांपासून तो सातारा, फलटण, ग्वाल्हेर, कोल्हापूर या राजे-महाराजांकडूनदेखील देणग्यांचा स्वेच्छेनेच वर्षावच होत होता. भाऊराव पाटलांचे ‘अण्णा’ आणि त्यानंतर अण्णांचे ‘कर्मवीर’ कधी झाले, याचा कोणालाच पत्ता लागला नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हा-हा म्हणता माध्यमिक शाळांची संख्या जशी वाढत गेली तशीच महाविद्यालयेदेखील उभी राहायला लागली. सन 1947 मध्ये सुरू केलेल्या सातारा येथील शिवाजी कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’चा डोळे दिपून टाकणारा प्रयोग भाऊरावांनी मोठ्या दूरदृष्टीने आणि दृढ निश्चयने राबविला. विद्यार्थ्यांना तेथे अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकाबरोबर खडी फोडण्याचेही वेळापत्रक असे. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ मि. कोप हे हा प्रयोग भारत भेटीत पाहून थक्कच झाले.

म.गांधीजींप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, संत गाडगेमहाराज आदी. अनेक थोरा-मोठ्यांनी रयत शिक्षण संस्थेला स्वत:हून भेटी दिल्या. भाऊरावांच्या या शैक्षणिक कामाचे औत्सुक्य इतके सर्वव्यापी होत गेले की, पुण्याच्या भेटीला त्या वेळचे रशियाचे पंतप्रधान ख्रुश्चेव्ह आणि अध्यक्ष बुलगानिन यांनी पुण्यामध्ये भाऊरावांची खास भेट घेतली. रशियासाठी फोटो काढून घेतला. इतकेच नाही, तर रशिया भेटीचेही भाऊरावांना आमंत्रण दिले. अमेरिकेचे शिक्षणतज्ज्ञ मि. कोप यांनी तर 1952 मध्येच कर्मवीरांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले होते. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेच्या या कार्याची दखल भारत सरकारनेही घेतली आणि राष्ट्रपतींनी त्यांचा दि. 26 जानेवारी 1959 रोजी ‘पद्‌मभूषण’ प्रदान करून गौरव केला. तसेच पुणे विद्यापीठानेदेखील त्यांना दि. 4 एप्रिल 1959 रोजी ‘डी. लिट.’ देऊन गौरविले.

रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची अखंड धुरा सुरुवातीपासून तो अखेरपर्यंत भाऊरावांनीच सर्वस्व पणाला लावून स्वत:च्या खांद्यावरच वाहिली. मात्र संस्था त्यांनी ‘स्वत:मय’ जाणीवपूर्वक होऊ दिली नाही. संस्थेला त्यांनी दिलेल्या नावाप्रमाणेच तिचे अंतर्बाह्य रूप ‘रयतमय’ असेच राहू दिले. ‘‘सत्ता, संपत्ती आणि मान यासाठी माणूस कोणते पाप करील, कोण जाणे?’’ हे उद्‌गार आहेत म. गांधीजींचे. भाऊरावांनी सत्तेला स्पर्शच केला नाही. असलेली स्वत:ची संपत्ती पत्नीच्या आणि मुलीच्या दागिन्यांसह त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठीच वापरून टाकली. स्वत:च्या प्रपंचीही होळी करून कफल्लकच राहिले. मान म्हणून म्हणावे, तर संस्थेच्या सर्व तऱ्हेच्या पदांपासून ते अलिप्त राहिले. इतकेच काय, पण संस्थेचे साधे सदस्यत्वही त्यांनी स्वीकारल्याचे कोठे आढळत नाही. त्यांची याबाबतची तुलना केवळ म. गांधीजी यांच्याशीच होऊ शकते. अंतर्बाह्य निरपेक्षपणे आणि केवळ कार्यासाठी समर्पण, दलित- गोरगरीब- ग्रामीण जनतेसाठीची आंतरिक तळमळ आणि रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या चळवळीत व कामांत जनसामान्यांचाच सहभाग यामुळेच रयत शिक्षण संस्थेला जनमानसातून प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. रयतमधलेच कित्येक विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेच्या जीवनभर सेवेची शपथ घेणारे म्हणून उत्स्फूर्तपणे पुढे आले.

त्या वेळच्या मुंबई सरकारने संस्थेची ‘ग्रँट’ अन्यायाने बंद केली, तरी भाऊराव डगमगले नाहीत. त्यांना लोकपाठिंबा आणि स्वत:च्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता. तशी लोकशक्तीही त्यांच्या पाठीशी उभी राहिली. रयत शिक्षण संस्था ही शिक्षणक्षेत्रातील लोकशिक्षणाची एक चळवळ म्हणूनच आजपर्यंत अस्तित्व ठेवून प्रभावीपणे पुढे चाललेली संस्था आहे. त्याग आणि समर्पण तसेच जनसामान्यांची कळकळ अशा तत्त्वावर संस्थेचा भक्कम पाया आधारित असल्याने ही चळवळ सातत्याने आधुनिक रूप घेऊन काळाच्या गरजेनुसार पुढे चालतच राहणार आहे, हे निश्चित. डार्विनने सांगितल्याप्रमाणे, ‘जो बदलत्या काळाला समर्थपणे सामोरा जातो, तो यशस्वीपणे टिकून पुढे चालत राहतो’; त्याप्रमाणे रयत शिक्षण संस्थादेखील यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

मा.स्व.यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य मा.नामदार शरदराव पवार यांचे सामर्थ्यशाली, द्रष्टे नेतृत्व संस्थेला लाभले आहे, हे संस्थेचे भाग्य. संस्था पूर्णपणे लोकशाही पद्धतीने कार्यरत आहे. संस्थेच्या हयातीत क्वचित अपवाद वगळता संस्थेचे कामकाज निवडणुका न होता सामंजस्याने व एकजुटीने चालते, हीदेखील संस्थेची मोठी शक्ती आहे. डॉ. आंबेडकरांना भावणारे बेकनच्या Knowledge is power या घोषवाक्याचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. म. फुलेंनीदेखील अविद्येमुळेच समाजाला अवकळा आल्याचे मूलभूत स्वरूपाचे निदान केले होते. ग्रामीण, कष्टकरी, दलित, आदिवासी, महिला व बहुजन समाज यांना ‘ज्ञानाचा प्रकाश’ रयत शिक्षण संस्थेने दिला आहे. त्यामुळेच ही जनता शिक्षण घेऊन आज सामर्थ्यशाली झालेली आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ही जनता प्रभावीपणे कार्यरत आहे. समाजाची आज जी लक्षणीय प्रगती दिसून येते, त्या प्रगतीत रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञान देण्याच्या कामाचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचा बराचसा ग्रामीण भाग संस्थेच्या विविध शाखांमुळे व्यापला आहे. शैक्षणिक व्यापाचे वैभवशाली स्वरूप आज डोळ्यांत भरणारे आहे. बहुजनांचे अस्मिता जागविणारे हे सगळे संस्थेच्या कार्याचे भव्य-दिव्य रूप आहे.

रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण, कष्टकरी, दलित, आदिवासी, महिला आणि एकूणच बहुजन समाज- यांना शिक्षण देण्याच्याकामी बहुमोल कामगिरी पार पाडलेली आहे, हे सर्वमान्य व्हावे. कर्मवीरांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक जबाबदारीची पूर्णतया जाणीव ठेवून संस्थेचे कार्य मनापासून करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि तसे ते यापुढेही करीत राहू, हे निश्चित. महाराष्ट्र फाउंडेशन आणि साधना ट्रस्ट या संस्थांनी पुरस्कार प्रदान करून रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा जो गौरव केलेला आहे, त्याबद्दल त्यांना संस्थेच्या वतीने मन:पूर्वक धन्यवाद!

Tags: शरद पवार शाहू महाराज लोकचळवळ रयत शिक्षण संस्था महात्मा गांधी अनिल पाटील कर्मवीर भाऊसाहेब पाटील रावसाहेब शिंदे Sharad Pawar Shahu Maharaj Lokchalaval Rayat Shikshan Sanstha Mahatma Gandhi Anil Patil Karmvir Bhausaheb Patil Raosaheb Shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रावसाहेब शिंदे

चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके