डिजिटल अर्काईव्ह

आम्ही दोघी (तेव्हा वीस-एकवीस वर्षांच्या होतो.) मुस्लिम मोहल्ल्यांध्ये गेलो आणि मुस्लिम महिलांशी यासंबंधी बोललो. चित्रपटगृहाबाहेर ओढून काढून ज्यांची धिंड काढण्यात आली होती, अशा महिलांनाही भेटलो. एकूण मुस्लिम महिलांमध्ये सिनेमाबंदीच्या फतव्याविषयी तीव्र नाराजी नव्हती. पण पंचकमिट्यांना हा अधिकार आहे का आणि पंचकमिट्या ज्या पद्धतीने हा निर्णय राबवीत होत्या, त्याबद्दल त्या संतापाने बोलत होत्या. महिलांचं म्हणणं काय आहे, हे समजावून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी मुस्लिम समाजाने व्यासपीठ अर्थातच दिलं नव्हतं. त्यामुळे आम्ही या सर्व प्रतिक्रिया वर्तानपत्रांतून मांडायचं ठरवलं.

दि.2 ऑगस्ट 1981, रमझान ईदचा दिवस. जळगाव शहरातील शनिपेठ भागातील एका मुस्लिम मोहल्ल्यात मुस्लिम पंचायत कमिटीची एक बैठक झाली. या बैठकीत मुस्लिम पंचकमिटीने असा फतवा काढला की, ‘सध्या सिनेामुळे समाजात वाढत असलेली गुंडगिरी व सिनेमापासून होणारे कुसंस्कार टाळण्यासाठी आणि सिनेमातील गुंडगिरीमुळे आपापसात होणारी भांडणे व जातीय दंगे उद्‌भवू नयेत यासाठी आमच्या समाजातील महिलांना आम्ही सिनेमागृहात जाण्यासच बंदी घालत आहोत.’ याच पत्रकात नमूद करण्यात आले होते की, मुस्लिम पंचकमिटीच्या या निर्णयानंतर जर एखादी महिला सिनेमा पाहण्यास गेलेली आढळली, तर तिला 51 रुपयांपासून 151 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. तसेच तिच्या कुटुंबावर मुस्लिम समाजाकडून बहिष्कार टाकण्यात येईल. या निर्णयानंतर मुस्लिम महिला सिनेमाला गेल्याच, तर शोधून काढायचं कसं, तर त्या-त्या मोहल्ल्यातील तरुण मुलांनी सिनेमागृहांवर नजर ठेवायची आणि आपल्या मोहल्ल्यातील महिला सिनेमाला येताना दिसल्या, तर त्यांना रोखायचं, त्यांची नावं पंचकमिटीला सांगायची. अर्थातच, ही काहीही कामधंदा नसलेली मुलं होती. स्वत:चा काही रोजगार नसल्यामुळे दिवसभर टवाळक्या करणारी मुस्लिम मुलं यात उत्साहाने पुढे सरसावली आणि पानटपऱ्यांऐवजी सिनेमागृहांसमोर घोळक्याने उभी राहू लागली. हळूहळू या सिनेमाबंदीचं लोण पूर्ण जिल्हाभर पसरलं.

जळगाव शहरात तर लागोपाठ सर्व मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये तिथल्या प्रतिष्ठित मुस्लिम रहिवाशांनी बैठका घेऊन हा निर्णय घेतलाच; पण जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांच्या गावांत व छोट्या शहरांध्येही मुस्लिम समाजातील नेतृत्वाने सिनेमाबंदीचा फतवा काढला. अशा तऱ्हेने जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, रावेर, जामनेर या ठिकाणी व धुळे जिल्ह्यातील काही शहरांध्ये मुस्लिम महिलांसाठी सिनेमाबंदी लागू केल्याच्या बातम्या आल्या. शिवाय महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात विजापूर येथेही मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी केल्याची बातमी वर्तानपत्रात आली. मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी केल्याच्या निर्णयाची पत्रके मुस्लिम पंचकमिट्यांनी वर्तानपत्रांनाही दिली, तसेच समाजातही वाटली, जेणेकरून या निर्णयाची माहिती सर्वत्र व्हावी. ज्या मुस्लिम पंचकमिट्यांनी ठिकठिकाणी सिनेमाबंदीचा फतवा जाहीर केला, त्या पंचकमिट्यांचे सदस्य मुल्ला-मौलवी होते. शिवाय त्या-त्या भागातील तथाकथित समाजसेवक आणि राजकीय पक्षांचे सदस्य, नगरसेवक जास्त संख्येने होते. म्हणजे मशिदीच्या इमामांपासून राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांपर्यंतचे लोक या पंचकमिट्यांध्ये सदस्य होते. पण त्यांतील असे किती चारित्र्यवान होते? विशेष म्हणजे, एकही मुस्लिम स्त्री या कमिट्यांध्ये सदस्य नव्हती.

मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी करण्यात आल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत आल्या आणि त्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. त्यात सुशिक्षित मुस्लिम तरुणांच्या प्रतिक्रिया, तसेच मुस्लिमेतर समाजातून आलेल्या प्रतिक्रिया यांचा समावेश होता. मुस्लिम पंचकमिटीने महिलांना सिनेमाबंदी केल्याच्या निर्णयानंतरही काही मुस्लिम महिला सिनेमाला गेल्या, तेव्हा पंचकमिट्यांनी नेलेल्या तरुण मुस्लिम मुलांनी त्यांना चित्रपटगृहाबाहेर ओढून काढलं आणि त्यांची धिंड काढली. अशी आठ-दहा प्रकरणं घडली. जळगाव शहरात तरुणांध्ये कार्यशील असलेल्या छात्रयुवा संघर्ष वाहिनीच्या जळगाव येथील शाखेची सिनेमाबंदीच्या निर्णयासंबंधी बैठक झाली. या बैठकीत पंचकमिटीच्या फतव्यासंबंधी तसंच वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या प्रतिक्रियांसंबंधी चर्चा करण्यात आली. मी तेव्हा संघर्ष वाहिनीची सदस्य आणि पूर्णवेळ कार्यकर्ती होते. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, मी आणि संघर्ष वाहिनीची आणखी एक महिला सदस्य अरुणा तिवारी यांनी मुस्लिम मोहल्ल्यांध्ये जाऊन मुस्लिम महिलांच्या या संबंधीच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात.

आम्ही दोघी (तेव्हा वीस-एकवीस वर्षांच्या होतो.) मुस्लिम मोहल्ल्यांध्ये गेलो आणि मुस्लिम महिलांशी यासंबंधी बोललो. चित्रपटगृहाबाहेर ओढून काढून ज्यांची धिंड काढण्यात आली होती, अशा महिलांनाही भेटलो. एकूण मुस्लिम महिलांमध्ये सिनेमाबंदीच्या फतव्याविषयी तीव्र नाराजी नव्हती. पण पंचकमिट्यांना हा अधिकार आहे का आणि पंचकमिट्या ज्या पद्धतीने हा निर्णय राबवीत होत्या, त्याबद्दल त्या संतापाने बोलत होत्या. महिलांचं म्हणणं काय आहे, हे समजावून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी मुस्लिम समाजाने व्यासपीठ अर्थातच दिलं नव्हतं. त्यामुळे आम्ही या सर्व प्रतिक्रिया वर्तानपत्रांतून मांडायचं ठरवलं.

1. सर्व समाजाला, त्यातही महिलांना विश्वासात न घेता मुस्लिम पंचकमिटीने सिनेमाबंदीचा निर्णय कसा घेतला?
2. पंचकमिटीत एकही महिला सदस्य नसताना मुस्लिम महिलांसाठी सिनेमाबंदीचा निर्णय कसा घेण्यात आला?
3. सिनेमाबंदीसाठी जर इस्लामचा आधार पंचकमिटी घेत असेल आणि ‘वाईट गोष्टी बघू नका असे धर्म सांगतो’ अशी भूमिका घेत असेल, तर मग पुरुषांनाही सिनेमाबंदी का नको?
4. धर्माच्या नावाने पंचकमिटी समाजसुधारणेची भूमिका घेते, तर समाजात चाललेल्या सर्वच वाईट गोष्टींना विरोध करण्याची जबाबदारी पंचकमिटी का घेत नाही? उदा.- पंचकमिटीचे सदस्य असलेल्या लोकांचे वा त्यांच्या परिवारातील सदस्यांचे जुगाराचे अड्डे, दारूच्या भट्‌ट्या आहेत. काही सदस्यांवर चोरीचे, भ्रष्टाचाराचे, छेडछाडीचे आरोप आहेत. त्यांना सुधारण्यासाठी फतवा काढण्याची पंचकमिटीला गरज का वाटत नाही?
5. सिनेमा बघण्याने वाईट संस्कार होत असतील तर ते केवळ स्त्रियांवरच नाही, तर पुरुषांवरही होत असणार. मग पंचकमिटी पुरुषांनाही सिनेमाबंदीचा फतवा का काढत नाही?

6. भारताच्या संविधानाने भारतीय नागरिकांना मनोरंजनाचा अधिकार दिला आहे. तेव्हा पंचकमिटी असे फतवे काढून हा अधिकार हिरावून घेऊ शकते काय?
7. मुस्लिम महिलांना चित्रपटगृहाबाहेर ओढून काढून, अपमानास्पद वागणूक देऊन बहिष्कृत करण्याचा अधिकार पंचकमिटीला आहे का?
8. त्याच काळात दारू प्यायल्याने बंगळुरु येथे 25 लोक मृत्यू पावले. त्या दारू दुकानाचा मालक सय्यद अमीर सुलतान हा मुस्लिम आहे. पंचकमिटीने त्याचा निषेध का केला नाही?
9. पंचकमिटी म्हणते, इथे इस्लामी सत्ता नसल्याने आजही मुस्लिम महिला व्यासपीठाने सांगितलेल्या गोष्टी अमलात आणू शकत नाहीत; तेव्हा पंचकमिटी कायदा हातात घेऊन मुस्लिम महिलांना सिनेमा बघितला म्हणून दंड करणे, धिंड काढणे, बहिष्कृत करणे हे तरी कसे करू शकते?

वर्तमानपत्रांतून मुस्लिम महिला व्यासपीठाकडून हे मुद्दे मांडले गेले. त्यामुळे सुशिक्षित मुस्लिम तरुण, समंजस मुस्लिम नागरिक यांचा पाठिंबा आम्हाला मिळायला लागला आणि बेकायदा सिनेमाबंदीसंबंधी रोज वर्तमानपत्रात पत्रे येऊ लागली. अशा रीतीने मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी विरोधात समर्थन मिळू लागले. दि.14 फेब्रुवारी 1982 रोजी, रेहाना शेख नावाच्या मुस्लिम महिलेवर हल्ला करण्यात आला. ती तिच्या पतीसोबत सिनेमा बघायला गेली होती. सिनेमा बघून परतत असताना तिच्या मोहल्ल्यातील सय्यद अकीलने ज्याला पंचकमिटीचा आश्रय होता- विचारले की, ‘सिनेमाबंदी असताना तू सिनेमा बघायला का गेलीस?’ रेहाना म्हणाली, ‘‘मी माझ्या पतीसोबत गेले होते आणि इस्लाम म्हणतो, पतीची आज्ञा पाळा.’’ तिच्या या उत्तरामुळे सय्यद अकील रागावला आणि त्याने रेहाना व तिच्या पतीवर हल्ला केला. त्यात रेहानाचा पती सलीम याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आणि रेहानाचा ओठ कापला गेला. मुस्लिम महिला व्यासपीठाने या घटनेचा निषेध तर केलाच, पण मुस्लिम महिलांच्या बैठकाही वाढवल्या. मुस्लिम मोहल्ल्यांध्ये संपर्क सुरू केला. भुसावळ शहरातील मुस्लिम महिलांच्या सभेलाही उपस्थित राहून एकजूट जाहीर केली. एक मुस्लिम भगिनी म्हणाली, ‘‘ये लोग सिर्फ मुर्गीयोंको मार सकते है, उन बिल्लोंको नहीं मार सकते, जिनके मुँहमे खून लगा है।’’ इतकी राजकीय सामाजिक समज त्यांची होती. त्या आपली अभिव्यक्ती स्वत:च्या भाषेत करीत होत्या.

मग मुस्लिम महिला समितीच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, 1982 च्या 8 मार्चला जागतिक महिलादिनी सिनेमाबंदीविरुद्ध आंदोलन करायचं. त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करायला सुरुवात केली. त्यात असं ठरलं : ‘‘सिनेमाबंदी विरोधात हा ‘सत्याग्रह’ असेल. आम्ही शांतपणाने, कोणालाही आक्रमकपणाने विरोध न करता सिनेमाबंदी झुगारून देऊ. हा सत्याग्रह आम्ही करू, कारण आमचीच एक भगिनी रेहाना हिच्यावर हल्ला झाला आहे. ज्या सिनेमामुळे तिच्यावर हल्ला झाला, तोच सिनेमा आम्ही प्रतीकात्मक स्वरूपात पाहू. आम्ही सिनेागृहापर्यंत जाऊ. सिनेमाबंदी आम्ही झुगारून लावतो आहोत, हे जाहीर करू आणि परत येऊ.’’ त्यानंतर रेहानाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला नेले, तेव्हा पोलिसांनी फारसे सहकार्य दिले नाही, कारण पंचकमिटीमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक होते. मग सिनेमाबंदीच्या विरोधात आम्ही सत्याग्रह करणार आहोत अशी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर वातावरण तापत गेलं. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या दिवशी म्हणजे 8 मार्च 1982 रोजी पोलिसांना बंदोबस्त ठेवावाच लागला, कारण वातावरणात तणाव होता. आम्हाला धमक्या येणं सुरू झालं, दगडफेक इत्यादी प्रकार सुरू झाले. तेव्हा तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं, ‘‘तुम्ही सामाजिक शांतता भंग करीत आहात, त्यामुळे तुम्हाला मी ‘वॉर्निंग’ देत आहे.’’

मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाच्या आंदोलनात अनेक वेळा हा अनुभव आलेला आहे की, प्रशासन मुस्लिम सुधारकांना तंबी देते आणि मुस्लिम गुंडांना पाठीशी घालते. या सर्व विरोधानंतरही वेगवेगळ्या मुस्लिम मोहल्ल्यांत बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र सिनेमागृहवाले तिकिटं द्यायला तयार होईनात. त्यांना भीती वाटत होती. त्या वेळी आम्हाला अंमळनेर येथील जनता पक्षाचे माजी आमदार श्री.गुलाबराव पाटील यांनी मदत केली आणि तिकिटांची रक्कम स्वत: भरून आम्हाला तिकिटं काढून दिली. दि. 8 मार्चला मोहल्ल्या-मोहल्ल्यातून मुस्लिम स्त्रिया आल्या. जवळपास 200 स्त्रिया बाहेर निघाल्या. मात्र रस्त्यात झालेली दगडफेक आणि दहशतीमुळे केवळ 80 स्त्रिया चित्रपटगृहापर्यंत पोचल्या. त्या सर्वांनी सिनेमा प्रतीकात्मक रूपात पाहिला आणि सिनेमाबंदी झुगारून दिल्याचं घोषित केलं. या सत्याग्रहाची बातमी सर्व वर्तमानपत्रांनी दिली. मराठीतील अनेक वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहिले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेही अग्रलेख लिहिला. मात्र सत्याग्रहात सहभागी झालेल्या महिलांना धमक्या, छळ, दहशतवाद इत्यादींना तोंड द्यावं लागलं. त्यासंबंधी आम्ही पुन्हा जाहीर वाच्यता केली आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ग.प्र.प्रधान यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रा.सु.गवई यांनी ‘ही सिनेमाबंदी अवैधानिक आहे’ असे सांगितले. मग सत्याग्रही महिलांना संरक्षण मिळावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यामुळे त्या वेळचे गृहराज्यमंत्री डॉ.श्रीकांत जिचकार यांना तसं आश्वासन द्यावं लागलं. त्यानंतर पंचकमिट्या आपोआपच निष्क्रिय झाल्या.

रेहानावर हल्ला करणाऱ्या सय्यद अकीलला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये लागू असलेल्या सिनेमाबंदीच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं झाली. कर्नाटकात प्रा.नजमा बांगी यांनी निषेध नोंदवला आणि मग अन्य शहरांतील मुस्लिम महिलांवरील सिनेमाबंदी उठवली गेली. देशभरातून अभिनंदन आणि समर्थन करणारी जी पत्रं आली, त्यात जास्त पत्रं मुस्लिम तरुण-तरुणींची होती. अगदी काश्मीरच्या युवकांची पत्रंही त्यांत होती. मात्र सिनेमाबंदी आंदोलनानंतर दहशतही खूप वाढली. मी कोणाची मुलगी वगैरेचा शोध पंचकमिटीच्या लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला. शिवाय, छात्रयुवा संघर्षवाहिनीच्या कार्यालयावर रात्रीच्या वेळी दगडफेक केली गेली. प्रचंड दहशत आणि धमक्या यामुंळे सर्वसामान्य मुस्लिम महिलांवरही दडपण आलं. मला सरकारने पोलीस संरक्षण दिलं. त्यातून मी लवकरच सुटका करून घेतली. मात्र मुस्लिम महिलांमध्ये काम करण्याबाबत माझ्या मनातील विचारचक्र त्यानंतर वेगाने फिरू लागलं. त्यानंतर मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास आला. अर्थात दहशतीमुळे पुढे काम वाढायला अडचणी खूप आल्या, पण सिनेमाबंदीसारखे फतवे पुन्हा काढता येणार नाहीत, हे पंचकमिट्या आणि तथाकथित नेते यांना पुरेपूर उमगलं.

Tags: रझिया पटेल मुस्लीम महिला सिनेमा बंदी चित्रपटगृह फिल्म महिला सिनेमा आंदोलन सिनेमा theater raziya patel rajiya patel banned film cinemabandhi Cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल ( 30 लेख )
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी