डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्माच्या नावाने दडपशाही करणाऱ्यांशी पहिला संघर्ष करावा लागला...

मला धर्मविषयक आकलन होण्यामध्ये गांधीजी, विनोबा, साने गुरुजी, सय्यद अमीन यांची खूप मदत झाली. धर्मग्रंथांमध्ये काही वेळेला क्लिष्टता असते, परस्परविरोधी वाटणारी विधानं असू शकतात. पण धर्माचा मानवतावादी अर्थ मला वरील सर्वांनी धर्माबद्दल जे लिहिले त्यातून समजायला मदत झाली आणि संस्थात्मक धर्माने केलेल्या शोषणाविरुद्ध लढायला मदत झाली.
सय्यद अमीन यांनी लिहिलेल्या महंमद पैगंबर यांच्या चरित्राने तर माझ्या मनावर खूप प्रभाव पडला. जेव्हा मी सामाजिक चळवळीत आले, तेव्हा पहिला संघर्ष धर्माच्या नावाने दडपशाही करणाऱ्यांशी करावा लागला आणि तोही जबरदस्त. त्या आधी माझ्या गावात एक तोंडी तलाकचं प्रकरण पाहिलं होतं. त्याचाही हादरा बसला होता. कारण त्या मुलीचा आक्रोश पाहवत नव्हता. तेव्हा एकीकडे धर्म मानवी मूल्य सांगतो, मग दुसरीकडे धर्माचंच नाव घेत असं का घडतं, याची खळबळ मनात उमटायला लागली होतीच.
 

धर्माची मला झालेली पहिली ओळख ही सांस्कृतिक होती आणि दुसरी ओळख नीतिमूल्ये, सांगणारी होती. मी मुसलमान आणि माझा धर्म इस्लाम असा आयडेंटिटीचा पदर आणि गरज अशा स्वरूपात धर्माची ओळख मला झालेली नाही किंवा माझ्या कुटुंबात ती अगदी ठासून करून दिली गेली नाही. साधंसुधं मुस्लीम शेतकरी कुटुंब आणि मिश्रित सांस्कृतिक जीवन. त्यामुळे जितक्या आनंदाने आम्ही रमज़ान ईद साजरी करायचो त्याच आनंदाने दिवाळीही!

धर्माबाबतही ‘मज़हब’ असा मृदू आणि सर्वसमावेशक शब्द वापरला जाई. मज़हब म्हणजे धर्म आणि कोणाचाही, कोणताही धर्म समंजसपणे समजून घ्यायची बाब. आमच्या कुटुंबात धर्मभावना आणि कर्मकांडाची सक्ती कधीच केली गेली नाही. धर्म म्हणजे अमुक एक कर्मकांड आणि ते तुम्ही केलंच पाहिजे, असं कधी आम्हांला सांगितलं गेलं नाही. ‘तुम्हांला वाटलं, तर तुम्ही नमाज पढा, रोजे करा, कुराण शरीफ वाचा’ असं आम्हांला स्वातंत्र्य होतं. आमचं कुटुंब हे एकत्र कुटुंब. सर्वच सख्ख्या चुलत भावाबहिणींचं आनंदी जीवन त्यात होतं.

‘कुराण वाचताना अर्थ समजून वाच’, हे मला कुराण शिकवणारे माझे गुरू रहीम देशमुख यांनी सांगितल्याने मी हिंदी-मराठी भाषांतही कुराण वाचले, तेव्हा त्यातील काही आयतींनी मनाला प्रभावित केलं. अर्थात विरोधाभासी आयतीही जाणवल्या. पण कुराणातली एक आयत- जी मला प्रभावित करून गेली ती प्रलयकाळाचं वर्णन करणारी-

‘जब सूर्य को लपेट लिया जाएगा, और तारे धुमिल पड़ जाएंगे और जब पहाड़ चलाए जाएंगे, और जब समुद्र उबलने लगेंगे, और जब जीवित गाड़ दी गई लड़की से पूछा जाएगा, किस गुनाह पर मार डाली गई, और जब कर्मपत्र खोले जाएंगे.’ (सूर-ए-तकवीर. 81:1 ते10) या आयतने मन थरारून गेले. जेव्हा अरब मुलींना जन्मल्यावर खड्ड्यात पुरून टाकत होते. तेव्हा इस्लामने त्याला मनाई केली. मोहम्मद पैगंबरांनी असं न करण्याचा उपदेश केला. ते त्या मुलींचे पथधर झाले.

आम्हांला लहानपणी ज्यांनी कुराण वाचायला शिकवलं ते पारंपरिक अर्थाने मौलाना नव्हते. पण धर्माचं ज्ञान असलेले होते. धर्मग्रंथाचं, धर्मभाषेचं, धर्मशास्त्राचं त्यांना पूर्ण ज्ञान होतं. त्यांची शिकवण्याची पद्धती फार छान होती. आम्हांला कुराण शिकवताना त्यांनी ‘मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना’ हेही शिकवलं. शिवाय हेही सांगितलं की, ‘केवळ शाब्दिक पठण करू नका, तर अर्थ समजून घेऊन कुराण वाचा. हिंदीत वाचा, मराठीत वाचा- काही हरकत नाही.’ त्यांनी हे असं सांगितल्यामुळे कुराण पठण हे आमच्यासाठी कर्मकांडाची गोष्ट ठरली नाही. शिवाय आपल्या संपत्तीचा काही भाग गरिबांसाठी ठेवला पाहिजे, हे आम्ही लहानपणापासून रमजान ईदच्या वेळी धान्याच्या स्वरूपात जकात काढून ठेवलेली आणि गरजूंना वाटलेली पाहिली आहे. शेतकरी कुटुंब म्हणून धान्याच्या स्वरूपात जकात असायची किंवा जेवायला बसण्यापूर्वी ‘उजवीकडची चाळीस आणि डावीकडची चाळीस घरं म्हणजे आपल्या शेजारी कोणी उपाशी नाही ना, यासाठी बघून घ्या!’ हेही धर्माने सांगितल्याचं ऐकलं होतं. यासोबतच गावातील कृषक समाज-संस्कृतीनेही ज्या धर्माची ओळख करून दिली, त्यात वारकरी पंथ आणि संतांनी अभंगांमधून सांगितलेल्या नीतितत्त्वांची ओळख झाली. त्यात संत तुकाराम म्हणतात-

               ‘वर्ण अभिमाने कोण जाले पावन

               ऐसे द्या सांगून मजपासी

               लतीफ मोमिन कबीर मुसलमान

               सेना न्हावी आणि विष्णुदास

               पिंजारी तो दादू कान्होपात्रा खोदू

               नामयाची जनी कोण तिचा भाव

               जेवी तिये सवे पंढरीराव’

हे फारच मनाला भिडलं. गावात होणारी कीर्तनं, आषाढी एकादशीसाठी वारीला जाणारे लोक, पहाडातल्या हाजीमलंगला जाणारा जथा, सूफी फकिरांचे दर्गे- त्यांना मानणारे हिंदू-मुस्लीम हा धर्म संस्कृतीचा परिचय होत गेला आणि जगण्याचा भाग बनला. अर्थातच या बहुजनांच्या संस्कृतीचा प्रभाव मनावर पडला.

मला धर्मविषयक आकलन होण्यामध्ये गांधीजी, विनोबा, साने गुरुजी, सय्यद अमीन यांची खूप मदत झाली. धर्मग्रंथांमध्ये काही वेळेला क्लिष्टता असते, परस्परविरोधी वाटणारी विधानं असू शकतात. पण धर्माचा मानवतावादी अर्थ मला वरील सर्वांनी धर्माबद्दल जे लिहिले त्यातून समजायला मदत झाली आणि संस्थात्मक धर्माने केलेल्या शोषणाविरुद्ध लढायला मदत झाली.

सय्यद अमीन यांनी लिहिलेल्या महंमद पैगंबर यांच्या चरित्राने तर माझ्या मनावर खूप प्रभाव पडला.

जेव्हा मी सामाजिक चळवळीत आले, तेव्हा पहिला संघर्ष धर्माच्या नावाने दडपशाही करणाऱ्यांशी करावा लागला आणि तोही जबरदस्त. त्या आधी माझ्या गावात एक तोंडी तलाकचं प्रकरण पाहिलं होतं. त्याचाही हादरा बसला होता. कारण त्या मुलीचा आक्रोश पाहवत नव्हता. तेव्हा एकीकडे धर्म मानवी मूल्य सांगतो, मग दुसरीकडे धर्माचंच नाव घेत असं का घडतं, याची खळबळ मनात उमटायला लागली होतीच. दुसरीकडे एक धर्मवचन ‘जुल्म करना अगर गुनाह है, तो जुल्म सहना भी गुनाह है’ हेही आठवत होतं. त्यामुळे धर्माचा हा गुंता समजून घेणं खूप आवश्यक वाटायला लागलं. त्याच वेळी चळवळीत धर्म संकल्पनेबाबत होणाऱ्या चर्चा- विशेषत: स्त्रियांचं शोषण करणारी आणि धर्माच्या नावाने पुढे रेटली जाणारी पितृसत्तात्मकता, धर्माच्याच नावाने पुढे रेटली जाणारी वर्णव्यवस्था व जातींची उतरंड, अस्पृश्यता उपयुक्त ठरल्या. मार्क्सने सांगितलेल्या ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ या विधानावर डाव्या पुरोगामी संघटनांची सहमती, ईश्वर या संकल्पनेला नकार- पण धर्म या संकल्पनेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली ती सोव्हिएत रशियात साम्यवादाचा पाडाव, भारतात ऐंशीच्या दशकात प्रबळ झालेल्या धर्मांध शक्ती आणि जगभरात धर्मांध शक्तींचे वाढत जाणे यामुळे. धर्माच्या नावाखाली हे सगळे घडत असले, तरी जगभरच मानव समाजाला धर्माचे आकर्षण का वाटावे, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समूहाशिवाय तो राहू शकत नाही. आणि धर्म हा सामुदायिक विचारतत्त्वावर अधिष्ठित आहे. एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी सहकार्य आणि मानवतेच्या तत्त्वांची आवश्यकता असते. मानव समाजाचे अस्तित्व आहे, तोपर्यंत त्यांची गरज असणारच आहे. त्यामुळे जगातला कोणताही धर्म पाहिला तर त्याचा पहिला भाग असतो, तो शाश्वत मूल्यांचा. दु:खितांचे दु:ख दूर करा, गरजवंतांना मदत करा, भूतदया इ. आणि याच्याच जोडीला धर्माचा दुसरा भाग असतो तो संस्थात्मक धर्माचा. यात समूहासोबत राहतानाचे आचार, विचार, नियम यांचा समावेश असतो. आणि या धर्मसंस्था कोणाच्या ताब्यात राहाव्यात याचे राजकारणच ईश्वर, धर्मग्रंथ यांच्या साह्याने सत्तेचे चालते. त्याचे एक रूप पुरोहितशाही, श्रेष्ठत्वाचे असते आणि दुसरे रूप पितृप्रधानतेचे असते, ज्यातून शोषण सुरू होते. जगातील सर्वांत जास्त समस्या संस्थात्मक धर्मातून निर्माण झाल्या आहेत, हे शोषणाच्या विरुद्ध आणि समतेसाठी व न्यायासाठी काम करताना सहजच लक्षात येते. मानव समाजात निर्माण झालेल्या मानवविरोधी वातावरणातून मार्ग काढण्यासाठी प्रेषित निर्माण झाले, असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे माणसं त्यांच्याकडे ओढली जातात. प्रेषितोत्तर काळात मात्र संस्थात्मक धर्म बळकट होत जातो, कर्मकांड आणि

श्रेष्ठ- कनिष्ठत्वाच्या परंपरा बळकट होत जातात. संस्थात्मक धर्मात पुरोहितशाही महत्त्वाची असते. सर्वसामान्य माणूस आणि परमेश्वर यांच्यात पुरोहित उभा राहतो.

भारतात शोषणाचा आधार असलेल्या धर्मसंस्थेला म.गौतम बुद्धांनी आव्हान दिलं. ज्या ईश्वराची गूढ कल्पना वापरून शोषण केले जाते, तो ईश्वर गौतम बुद्धांनी नाकारला, माणसामाणसांतले श्रेष्ठ-कनिष्ठत्व नाकारले, कर्मर्विपाक सिद्धान्त नाकारला, कर्मकांडापेक्षा नैतिक वर्तन अधिक श्रेष्ठ आहे, हे त्यांनी सांगितले.

पुढे महात्मा फुलेंनी पुरोहितशाहीवर आधारित धर्मसंस्थेला आव्हान दिले. ब्राह्मणी धर्माची त्यांनी कठोर चिकित्सा केली. शिवाय दोन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या. एक म्हणजे- धर्माच्या अभिमानाने मनुष्यजातीचे तुकडे पडले असून वैराचे बीज कायम रोवले गेले आहे. धर्माभिमानाने मनुष्यजातीचे रक्त अनेक वेळा वाहिले आहे. सर्व मानवांचे ऐक्य हे श्रेष्ठ सत्य आहे आणि या सत्याचा अपलाप व नाश धर्माभिमान करतो. धर्माभिमानाने मनुष्यजातीची प्रगती करावयाच्या ऐवजी तिचा महान अध:पात केला आहे.

दुसरी म्हणजे- म.फुले म्हणतात, जी धर्माभिमानाची गोष्ट तीच राष्ट्रवादाची किंवा देशाभिमानाची. देशाभिमानाने किंवा राष्ट्रवादाने एक मानवसंघ दुसऱ्या मानवसंघावर आक्रमणास नेहमी सज्ज राहतो. त्यामुळे धर्माभिमान आणि देशाभिमान या मनोगंडरूपी भावना नष्ट केल्या पाहिजेत. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माचे नवीन तत्त्वज्ञान सांगितले. ज्यात त्यांनी धर्मभेद आणि राष्ट्रभेद या ऐवजी विश्वबंधुत्व, स्वातंत्र्य, समता, न्याय यांची मांडणी केली. ईश्वराला त्यांनी ‘निर्मिक’ अशी संज्ञा दिली, जी अर्थपूर्ण आहे. भारताच्या संविधानात बऱ्याच अंशी आपल्याला सार्वजनिक सत्यधर्माचे प्रतिबिंब दिसते.

भारतातील अनेक समाजसुधारकांनी, प्रचलित धर्मसंस्था ही भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक अवनतीस कारण झाली आहे, म्हणून धार्मिक संस्था शुद्ध व अत्यंत व्यापक अशा तात्त्विक अधिष्ठानावर पुन्हा उभारल्या पाहिजेत; त्यामुळे भारतातील संकुचित व अनैतिक सामाजिक रूढी व रीतिरिवाज बदलण्यास योग्य अशी प्रेरणा मिळू शकेल, अशी भूमिका घेतली. त्यातून धर्मचिकित्सा सुरू झाली. गांधीजींनी धर्म न नाकारताही धर्मचिकित्सेची ही चळवळ अतिशय मानवीय पद्धतीने पुढे नेलेली दिसते. ते म्हणतात, ‘‘जर आपल्या धर्माला आंधळेपणाने चिकटून राहायचे नसेल आणि त्याविषयी मनापासूनची निष्ठा बाणवून घ्यायची असेल तर आपल्या धर्मात असलेल्या उणिवांची तीव्र जाणीव आपल्याला असलीच पाहिजे. त्या उणिवा दूर करण्याच्या खऱ्या उपायांविषयी उत्कटताही तितकीच असली पाहिजे.’’ त्यासाठी धर्म नाकारण्याची गरज नाही, हे आवर्जून सांगतानाच गांधीजी धर्मासंदर्भाने काही तत्त्वं सांगतात, ती म्हणजे धर्म हा बाह्य कर्मकांडात नाही, तो मनुष्यांतील सर्वोच्च वृत्तीच्या अंतरातून अधिकाधिक अनुशीलन करण्यात आहे.

वास्तविक धर्म हा आमच्या प्रत्येक कार्यात व्यापून राहिला पाहिजे.  येथे धर्माचा अर्थ एखादा कट्टर संप्रदाय असा नाही, विश्वाच्या नैतिक सुव्यवस्थेवर श्रद्धा असा त्याचा अर्थ आहे. ती सुव्यवस्था दृश्यमान नाही, म्हणून काही तिची वास्तविकता कमी होत नाही. हा धर्म हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती इत्यादींच्या अतीत आहे. तो त्या धर्माचा उच्छेद करत नाही, तर त्यांचा समन्वय करतो आणि त्यांना यथार्थ धर्म बनवतो. त्यामुळे या बुद्धिवंतांच्या युगात धर्माचे कोणतेही सूत्र जर सर्वमान्य व्हायचे असेल तर त्याला बुद्धीच्या आणि सार्वत्रिक न्यायभावनेच्या कठोर कसोटीवर पार पडावेच लागेल. जगातील धर्मग्रंथाचा एखाद्या चुकीच्या गोष्टीला पाठिंबा मिळू शकत असला तरीसुद्धा या कसोटीतून वगळले जाण्याचा हक्क तिला सांगता येणार नाही.

केवळ आपल्याच धर्मबांधवांशी बंधुभाव हा संकुचित बंधुभाव गांधीजींच्या दृष्टीने योग्य नाही. ते म्हणतात, ‘‘माझा धर्म आणि त्या धर्मातून निघालेली माझी देशभक्ती सर्व जीवमात्रांना आपले मानते. केवळ मानव म्हणून म्हटल्या जाणाऱ्या जीवांच्या बाबतीतच बंधुत्व किंवा एकरूपता मला अनुभवायची नसून जीवमात्र म्हणून जेवढे आहे, त्या सर्वांशी एकरूपता साधायची आहे.’’ हा बंधुभाव वर्णन करताना गांधीजी पुढे म्हणतात की, माझी देशभक्ती इतर किंवा स्वत:च्याही राष्ट्रातील लोकांच्या दु:खाची किंवा लुबाडणुकीची पायरी करून वर चढू पाहते तेव्हा तिचा धिक्कार करणे मी योग्य मानतो. माझी देशभक्ती सदैव जगातील मानव समाजाच्या अत्यंत व्यापक हिताशी निरपवादपणे जर सुसंगत राहिली नाही तर तिचे मूल्य शून्य आहे.

इथे मला ‘हुब्बुल वतन वलई ईमान’ हे इस्लाममधील नीतिवचन जे आठवतं ते सांगते, की देशप्रेम हा धर्मनिष्ठ किंवा ‘ईमान’चा भाग आहे. संत तुकाराम महाराजांचं ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ (विकासाच्या नावाने लाखो झाडांची कत्तल हे देशप्रेम असू शकतं का? असा प्रश्न निर्माण करणारा) अभंग आठवतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की, धर्माने माणसाचे दोन प्रकारचे संबंध निर्मिले, राखले आणि दृढ केले. ते दोन संबंध म्हणजे- माणसाचा माणसाशी संबंध आणि माणसाचा सृष्टीशी संबंध. या दोन संबंधांवरच मनुष्याचे जीवनसर्वस्व आकारलेले आहे. मनुष्याची संस्कृती या दोन संबंधांवर आधारलेली आहे. हे संबंध जितके चांगले होत जातात किंवा बिघडत जातात, त्या मानाने माणसाची संस्कृती उन्नत होते किंवा अवनत होते. आज आपण देश आणि जागतिक संदर्भात स्पष्टपणे हे बघू शकतो. तेव्हा गांधीजी धर्मतत्त्वातील बंधुभाव हा संकुचित न ठेवता विश्वव्यापक करत नेतात.

या सर्व पार्श्वभूमीवर धर्माचे तीन भाग दिसतात. एक म्हणजे- शाश्वत मानवी मूल्ये सांगणारा भाग, दुसरा म्हणजे- संस्थात्मक धर्म आणि तिसरा वैयक्तिक भाग. वैयक्तिक धर्म हा व्यक्तीच्या हृदयाचा धर्म असतो. देवतांची कृपा संपादन करता येणे, वा अवकृपेची भीती या संबंधी यात विचार नसतो. यात कर्मकांडाशिवाय, पुरोहित वर्गाशिवाय मनाने देवाशी संवाद साधता येतो, हा हृदयाचा हृदयाशी संबंध असतो.

झां झाक रूसो हा तत्त्वज्ञ म्हणतो, ‘‘धर्मतत्त्व कळायला शुद्ध मानवी हृदयच समर्थ आहे. शुद्ध मानवी हृदय म्हणजे अहंकारजन्य कामक्रोधादी मनोविकारांतून मुक्त असे हृदय होय. या हृदयाला ईश्वराचे सत्यत्व व अंतिम नीतितत्त्वांचे मूल्य कळण्यासाठी धर्मग्रंथांची गरज नाही.’’ रूसोचा हा सिद्धान्त नैसर्गिक धर्माचा सिद्धान्त मानला जातो.

गांधीजी हाच विचार पुढे नेताना म्हणतात, ‘‘धर्म हा व्यक्तीच्या चिंतनाचा भाग असावा’’ आणि असं म्हणताना ‘धर्म उंबऱ्याच्या आत असणं’ ही धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताना काही वेळा जी गल्लत केली जाते ती गांधीजींच्या भूमिकेत ती नाही. कारण उंबऱ्याच्या आत धर्म संस्थात्मक रूप धारण करूच शकतो. त्यामुळे धर्म हा व्यक्तीच्या चिंतनाचा विषय हवा, असं ते म्हणतात. यातून कर्मकांड आपसूक वगळले जाते. मूर्ती असो, नसो; धर्मस्थळ असो-नसो, धर्मग्रंथ असो-नसो; व्यक्ती धर्मचिंतन करू शकते. ईश्वराचं चिंतन करू शकते, संवाद साधू शकते आणि याला मध्यस्थाची गरज नाही. पुढे ते म्हणतात की, मी जर सर्वसत्ताधारी झालो, तर धर्म व राज्यसत्ता वेगवेगळी राहतील. माझा धर्म हा माझा व्यक्तिगत विषय आहे. राज्य हे लोकांच्या धर्मनिरपेक्ष योगक्षेत्राकडे, आरोग्याकडे, दळणवळण, परराष्ट्र संबंध वगैरे गोष्टींकडे लक्ष देईल

धर्माने मला काय दिले, याचा विचार करताना मला इस्लामने काय दिले? केवळ इतकाच विचार मी करू शकत नाही. माझ्या लहानपणी जशी मला इस्लामने नीतिमूल्ये दिली, तशीच वारकरी संप्रदायातील संतांनी दिली. कबीर, नानकांनी दिली. पंजाबचे सूफी संत बुल्लेशाह म्हणतात, ‘‘प्रेम की सदा एक नई बहार होती है, मैं वेदों के शब्दों से थक गया, कुरान पढ़ने से थक गया, प्रार्थना से मैं थक गया, सिजदे से मेरा माथा घीस गया, न मैंने हिंदुओं के तीर्थ में भगवान पाया ना मक्का हजपर जाने से, केवल जिसे प्रेम मिला उसे ही प्रकाश मिला.’’

गुरुनानक म्हणतात, ‘‘एक के बदले मुझे लाख जिव्हाएं होती और हर लाख बीस गुना होता, तो लाख बार मैं कहता और फिर मैं कहता हूं सारी दुनिया का स्वामी एक है।’’ वेदांमधील काही ऋचा नीतितत्त्वांच्या दृष्टीने मला आकर्षित करतात. त्यातलं एक उदाहरण म्हणजे-

अभयं मित्रादभयम्‌ मित्राद, अभयं ज्ञातादभयम्‌ परोक्षाद।

अभयं नक्त भयम्‌ दिवा न: सर्वा आशा मम मित्र भवंतु।

(त्याचा हिंदी अनुवाद असा आहे- न हमें मित्रोंसे भय  हो, न शत्रुओं से, न संबंधियों से डरें, न अन्य किसी से दबे, न दिन में हमे कुछ धड़का रहें न रात में क्या अच्छा हो, यदि समस्त संसारवाले मेरे मित्र हो जाएं।) अशाच काही ऋग्वेदातील ऋचा विनोबाजींनी भाषांतरीत केल्या आहेत. तेव्हा एकाच धर्माने नाही, इथल्या सर्व धर्मांनी, तत्त्वज्ञानाने, मानवतावादी परंपरेने मला बरंच काही दिलं आहे.

हे सर्व जरी असलं तरीही आज संस्थात्मक धर्माचा वापर करत आम धर्मांध शक्तींनी जगाला वेठीला धरलेलं आहे. देशात समाजांना लोकांना वेठीला धरलेलं आहे. जशी सर्वच धर्मांत नीतितत्त्वं सारखी आहेत, तसा सत्ताप्राप्तीसाठी धर्म वापरणाऱ्यांमध्येही सारखेपणा आहे.

केवळ सत्ताप्राप्तीसाठी- शिवाय आमच्या भयावह आणि असुरक्षित करणाऱ्या वातावरणामुळे, ऐहिक जीवनातील प्रश्न सोडवू शकतील अशा यंत्रणा, लोकशाही, धर्मनिरपेक्ष यंत्रणा क्रमाक्रमाने नष्ट करत नेल्या की समाज-समूहांना नियंत्रणात आणून बेलगाम सत्ता उपभोगता येते. अशा वेळी महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांनी सांगितलेला धर्मनिरपेक्ष लोकशाही हा तार्किक मार्ग ठरतो.   

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके