डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लोकशाही पुन्हा स्थापन करणारे नेतेदेखील असेच. पंतप्रधानांनीदेखील निवेदन स्वीकारण्यास, नेत्यांना भेटण्यास नकार दिला. त्यांचे ठीक आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे नाही. परंतु कामगार नेते म्हणून जे ओळखले जात, आणि पूर्वी अशा तऱ्हेचा संप झाल्यावर तो दडपण्याचा प्रयत्न झाल्यास 'याचा परिणाम कामगारविश्वावर होईल’ असे म्हणणारेदेखील, मुख्यमंत्र्यांना चकार शब्द न बोलता फक्त कर्मचाऱ्यांनाच आवाहन करतात. याचा अर्थ काय?

कर्मचारी संपाबाबत

1]
संपावरील कर्मचारी सत्ताधारी नाहीत, संपत्तिवालेही नाहीत. त्यामुळे त्यांना सर्वजण उपदेशच देतील. याच वेळी पंतप्रधानांच्या पुणे भेटीच्या वेळी पंतप्रधानांनी (1) एक खोटे विधान केले. (मा. वसंतदादांनी आपल्याला त्यांची बाजू सांगितलेली नाही.) (2) गवई गटाच्या शिष्टमंडळाला सांगितले की, आंदोलने-निदर्शने थांबविल्याशिवाय मागण्यांबाबत विचार करणे शक्य नाही. (3) मास मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांना सावधगिरीचा उपाय म्हणून अटक केली. (4) कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलेले वाचणार नाही असे सांगितले. या व यासारख्या गोष्टी कोणत्या तत्त्वावर समर्थनीय आहेत?
-श्याम कुलकर्णी, उरण

----

2]
जनता पक्षाच्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी, त्याचप्रमाणे राज्यपालांनी ज्या हेतूने संपकऱ्यांना संप मागे घेण्यास सांगितले तो हेतू काय, हे स्पष्ट होत नाही. कोणीही कामगार संप एक गंमत म्हणून करत नसतो, व बुद्धिजीवी तर कधीही गंमतीखातर संप करणार नाहीत! ‘साधना’कारांनी या संपाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांना असे ठणकावयास हवे की संपकऱ्यांबरोबर त्वरित बोलणी करून जनतेला हालअपेष्टांतून वाचवावे.
- संजय भास्कर भाल्डे, धुळे

----

3] 
नऊ लाख कर्मचाऱ्यांनी एकजुटीने एवढा प्रचंड संप घडवून आणला, आणि त्यांच्या नेत्यांनी सतत मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची, वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली. परंतु कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याशिवाय बोलणी नाहीत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला. तेव्हा बोलणी करणारच नाही म्हणणारे मुख्यमंत्री हटवादी नाहीत तर कोण? असो. लोकशाही पुन्हा स्थापन करणारे नेतेदेखील असेच. पंतप्रधानांनीदेखील निवेदन स्वीकारण्यास, नेत्यांना भेटण्यास नकार दिला. त्यांचे ठीक आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे नाही. परंतु कामगार नेते म्हणून जे ओळखले जात, आणि पूर्वी अशा तऱ्हेचा संप झाल्यावर तो दडपण्याचा प्रयत्न झाल्यास 'याचा परिणाम कामगारविश्वावर होईल’ असे म्हणणारेदेखील, मुख्यमंत्र्यांना चकार शब्द न बोलता फक्त कर्मचाऱ्यांनाच आवाहन करतात. याचा अर्थ काय? वस्तुतः त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगायला हवे होते; तुम्ही मागण्या मान्य करा अथवा अमान्य; परंतु कामगार नेत्यांशी तुम्हाला बोलावे लागेल. 
-विवेक पंडित, मालाड

-----

4]
संप मागे घेतल्याशिवाय निवेदनाकडे पाहणारही नाही, ही भाषा लोकशाही असलेल्या देशात उपयोगाची नाही. कारण पंतप्रधान जनतेचा सर्वश्रेष्ठ सेवक आहे; मालक नाही. जनता हीच सर्वश्रेष्ठ आहे, हे जनता सरकारच्या पंतप्रधानांनी विसरू नये. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करणे नैतिकतेला धरून नाही म्हणणारे पंतप्रधान गुजरातमध्ये निवडणुका व्हाव्यात यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. कालपर्यंत विरोधी पक्षात असताना सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या संपांचे समर्थन करणारे सत्तेवर जाताच नैतिकतेच्या गप्पा मारीत आहेत! संपाची घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी पंतप्रधान व पक्षश्रेष्ठींनी काय केले, एका राज्यात बेमुदत संप चालू असताना केंद्रशासन मूग गिळून गप्प बसते, याचा अर्थ पात्रे बदलली व नाटक पूर्वीचेच चालू आहे!

जनता सरकार काँग्रेसच्याच मार्गाने जाणार असेल तर एक दिवस या देशातली लोकशाही संपुष्टात येईल. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास नष्ट होईल. आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती या देशात निर्माण होईल आणि याला जबाबदार जनता पक्ष राहील. जनता पक्षाने लोकशाही वाचवली हे इतिहास कधीही विसरणार नाही. परंतु सत्तेच्या मोहात जनता पक्ष अडकला तर लोक उपेक्षित राहतील. साधना हे पत्र छापील असा विश्वास आहे, कारण साधनेचा वैचारिक मतभेदावर विश्वास आहे.
-आर. के. मुधोळकर, नांदेड

-----

5] 
‘साधना’त संपाश्रमींना केलेले आवाहन अत्यंत सौजन्यपूर्ण, समयोचित तसेच कळकळीचे होते. पण जेथे राष्ट्रपती आदी मान्यवर नेत्यांची आवाहने अव्हेरली जातात, तेथे साधनेच्या आवाहनाला काय किंमत? राष्ट्रपतींचे आवाहन धुडकावून लावून नागरिकत्वाचा एक नवाच आदर्श समन्वय समितीने निर्माण केला आहे! राष्ट्रपती झाले तरी त्यांची प्रतिष्ठा किती ठेवायची, हे दाखवून दिले आहे! सामान्य नागरिकांना याबद्दल सखेद आश्चर्य वाटत आहे. शिक्षक-प्राध्यापकांच्या कोशात ‘छात्र', 'विद्यार्थी’ हे शब्दच नसावेत अशी शंका येण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण बनलो आहोत केवळ ’अर्थाचे दास'.
- ग. वि. अकोलकर, नाशिक

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके