डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यंदाचा साधनाचा दिवाळी अंक खूपच दर्जेदार आहे. गोविंदराव तळवलकर यांच्यावरील खास विभाग तर अप्रतिम म्हणावा असाच आहे. त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांना वाटणारे कुतूहल पूर्णांशाने जरी नाही, तरी बरेच शमविण्यात डॉ.निरुपमा व सुषमा यशस्वी झाल्या आहेत. आता त्यांनी गोविंदरावांचे चरित्रच लिहिण्यास घ्यावे, असे मनापासून वाटते.

उपक्रम सफल झाल्याचे समाधान

आम्ही एक शाळा चालवतो. दूर खेड्यात. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भाग. कायम दुष्काळी. उपजीविकेसाठी ऊसतोडणी कामगार म्हणून पालकांचे दर वर्षी सहा ते आठ महिने स्थलांतर ठरलेले. आजी- आजोबांजवळ राहणाऱ्या मुलांची दुपारच्या डब्याचीच पंचाईत, तिथे होमवर्क किंवा अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम हे शहरी लाड न परवडणारे. पण मुलांना नेहमी काही तरी नवे देण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच या वर्षी मुलांना साधनाचा बालकुमार दिवाळी अंक दिवाळीच्या सुट्टीत वाचण्यासाठी द्यायचा ठरवलं. कल्पना सुचल्यानंतर लगेच अंमलबजावणी केली, अंक मागवले. नंतर लक्षात आले की- आपण अंक देऊ; पण दिवाळीच्या उत्सवी वातावरणात मुले अंक खरंच वाचतील, की पडेल कुठे तरी कोपऱ्यात? शिक्षकांमध्ये चर्चा झाली आणि एक युक्ती सुचली.

 प्रथम सर्व शिक्षकांनी तो अंक वाचून काढला. त्यावर रीतसर प्रश्नपत्रिका काढली. अगदी आमची शाळेतील परीक्षेची असते तशी. मुलांना बोलावून साधनाबद्दल माहिती दिली आणि कल्पना सांगितली. प्रत्येकाला एक दिवाळी अंक, एक प्रश्नपत्रिका आणि एक उत्तरपत्रिका दिली. दिवाळीच्या सुट्टीत संपूर्ण अंक वाचून त्यावरील प्रश्नपत्रिका सोडवणे बंधनकारक केले. आणि जो छान उत्तरे लिहील, त्याला बक्षीसही जाहीर केले.

त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. सर्व मुलांनी न चुकता पूर्ण अंक वाचून काढला. त्यावरील प्रश्नपत्रिकाही संपूर्ण सोडवली. शाळेच्या पहिल्या दिवशीच सगळ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिका जमा केल्या. शिक्षकांनी मुलांबरोबर अंकावर चर्चा केली. मुलांनी अंकात काय आवडले, ते सांगितले. त्यांना काय करता येईल याच्या काही गंभीर, तर काही गमतीशीर कल्पना सांगितल्या.

खरं म्हणजे मुलांनी अंक वाचला यातच आम्ही खूश होतो. त्यांनी प्रश्नपत्रिकाही छान सोडवल्या होत्या. पण  आमचा आनंद द्विगुणीत झाला, जेव्हा साधना साप्ताहिकाच्या संपादकांना आमचा उपक्रम सांगितला आणि त्यांनी शाळेला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. मुलांना तर आकाश ठेंगणे झाले. कारण दूरच्या खेड्यावरील शाळेत असे पाहुणे येणे अगदीच दुरापास्त. मुलांना पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देताना जो आनंद झाला, त्यापेक्षा जास्त आनंद पाहुण्यांनी मुलांशी साधलेल्या संवादाने झाला आणि उपक्रम सफल झाल्याचे समाधान मिळाले. आमची प्रश्नपत्रिका अशी होती.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती : वाचन प्रेरणादिन 2017 साधना बालकुमार दिवाळी अंक 2017 : वाचन व प्रश्नमंजूषा स्पर्धा

विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टीमध्ये संपूर्ण अंक वाचून खालील प्रश्नांची अचूक उत्तरे लिहावीत.

1. साधना साप्ताहिक कोणी व कधी सुरू केले?

2. साधना साप्ताहिकाचे सध्या संपादक कोण आहेत?

अ. भूगोलाचा धडा आणि त्सुनामी :

 1. त्सुनामी म्हणजे काय? त्सुनामीच्या लाटा कशा तयार होतात?

2. टिली स्मिथने लोकांचे प्राण कसे वाचवले?

3. अंदमान-निकोबार बेटांवरील आदिवासी कशामुळे वाचले होते?

ब. वाटरकॅन आणि रायन्स वेल :

1. जगात एकूण किती देश आहेत?

2. रायनने सुरुवातीला किती मदत गोळा केली व कशी?

3. रायनचे स्वागत करताना सर्व जण काय गात होते?

4. रायनला काय भेट मिळाली? त्याचे नाव काय होते?

क. स्वप्न आणि शाळा :

1. ककेन्या नटायाचे स्वप्न काय होते? व का?

2. ककेन्या नटायाच्या शाळेत आता किती मुली शिक्षण घेत आहेत?

ड. दुष्काळ आणि पवनचक्की :

 1. समुद्रकिनारा नसणाऱ्या देशाला काय म्हणतात? जगात सध्या असे किती देश आहेत?

2. विल्यमने पवनचक्कीसाठी कोणते साहित्य वापरले? त्याला ते कोठे मिळाले?

3. विल्यमने पहिली पवनचक्की बनवली, तेव्हा त्याचे वय किती होते?

इ. मलाला आणि मी :

1. मलालावर प्राणघातक हल्ला का झाला होता?

2. मलालाने मुलींच्या शिक्षणासाठी पहिला परदेश दौरा कोणत्या देशाचा केला?

3. मलाला व्हिडिओद्वारे जगाला कोणती विनंती करत होती?

ई. फूटपाथ आणि सिनेमा :

1. किशन श्रीकांतने वयाच्या नवव्या वर्षी काय केले?

2. नऊ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत किशनने किती चित्रपटांत काम केले होते?

3. आपल्या देशात चित्रपटासाठी सर्वोच्च परितोषिक कोणते?

फ. हा अंक वाचून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली?

राहुल रावसाहेब मोरे श्री समर्थ पब्लिक स्कूल, माणिकदौंडी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.   

धर्म, प्रांत, देश यांच्यापलीकडे...

साधना बालकुमार दिवाळी अंकामधील ‘वॉटरकॅन आणि रायन्स वेल’ हा लेख खूप आवडला. लेख वाचून साने गुरुजींच्या कथेतील धडपडणाऱ्या मुलांची आठवण झाली. मुलं खूप संवेदनशील असतात, संस्कार करता तसे ते घडतात व देशालाही घडवतात. मुलांवर चांगले संस्कार होण्याकरता आई-वडील तसेच शिक्षकांचा खूप मोठा सहभाग असतो, म्हणून तर आज जगामध्ये ‘नॅन्सी प्रेस्ट’ सारख्या शिक्षकांचे अभिमानाने नाव घेतले जाते.

रायनचे काम खूप प्रेरणादायी आहे. एखाद्या लहानशा खेड्यात केलेल्या कामाची दखल सारे जग कसे घेते याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. रायनने आपला धर्म, प्रांत, देश याच्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते कसे जपावे याची जाणीव करून दिली आहे. या लेखाचा समावेश पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात करायला हवा, हा लेख वाचून आपल्या देशातील मुले रायनसारखा विचार करतील व सामाजिक बांधिलकी जपतील.

महेश तारदाळे मु.पो.शेडशाळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

असा संपादक पुन्हा होणे नाही!

यंदाचा साधनाचा दिवाळी अंक खूपच दर्जेदार आहे. गोविंदराव तळवलकर यांच्यावरील खास विभाग तर अप्रतिम म्हणावा असाच आहे. त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांना वाटणारे कुतूहल पूर्णांशाने जरी नाही, तरी बरेच शमविण्यात डॉ.निरुपमा व सुषमा यशस्वी झाल्या आहेत. आता त्यांनी गोविंदरावांचे चरित्रच लिहिण्यास घ्यावे, असे मनापासून वाटते.

यानिमित्ताने गोविंदराव तळवलकर म.टा.चे संपादक म्हणून किती जबाबदारीने काम करीत होते, हे दर्शविणारा मला आलेला अनुभव सांगतो. साधारण 1980 ते 90 या दरम्यान म्हणजे जेव्हा माझी दोन्ही मुले लहान होती, तेव्हा मी बालकविता लिहीत असे. पुढे त्यांचा संग्रहही निघाला आणि त्याचे प्रकाशन वसंत बापट यांच्या हस्ते गारगोटी येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात झाले. त्यादरम्यान ‘लॉलिपॉप’ या शीर्षकाची एक कविता मी लिहिली होती. कवितेतील छोटा मुलगा लॉलिपॉप विकत घेऊ शकत नाही, म्हणून तो आपली हाताची तीन-चार बोटेच तोंडात घालून लॉलिपॉपसारखी चोखत राहतो, असे वर्णन होते.

बालकविता लिहिली की, मी नेहमीच प्रथम म.टा.कडे पाठवून देत असे. त्याप्रमाणे ही कविताही पाठवली होती. ती रविवारच्या ‘मैफल’मध्ये छापूनही आली. कवितेशेजारी एक छोटा मुलगा लॉलिपॉप चोखून खात आहे, असे चित्रही छापले होते. ते मला कवितेच्या अर्थाशी विसंगत वाटले. म्हणून मी म.टा.च्या संपादकांना पत्र लिहून तसे कळवले. काही दिवसांनी चित्रकार मुकुंद तळवलकर यांचे मला एक पत्र आले. ‘कामाच्या घाई- गडबडीत मी कवितेचा अर्थ लक्षात न घेता, नजरचुकीने तसे चित्र काढले आहे. यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेईन.’ असा मजकूर त्यामध्ये होता. म्हणजे माझे पत्र वाचूनच गोविंदराव थांबले नव्हते, तर ते त्यांनी चित्रकारांपर्यंत पोचविले होते आणि झालेल्या चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्त करावयास लावली होती. खरंच, दोघेही थोरच. असा संपादक पुन्हा होणे नाही!

श्रीकांत जोशी, गारगोटी, कोल्हापूर

त्यांना गांधींचे मोठेपण कळले नाही!

साधना दिवाळी अंकातील सर्व लेख वाचले. अत्यंत दर्जेदार अंक, त्यातील सुरेश द्वादशीवार यांचा लेख अधिक उच्च दर्जाचा आहे. अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. लेख वाचून एक विचार पुढे येतो की, महात्मा गांधींचे मोठेपण, हिंदुत्ववाद्यांनी ओळखले नाही. बॅ.सावरकर अंदमानमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांचे फार हाल झाले. त्यावेळी त्यांनी विनंतीअर्ज करून स्वत:च्या सुटकेची मागणी केली. महात्मा गांधी यांनी तेव्हा सावरकर यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, तसा ठरावही अ.भा.काँग्रेसच्या अधिवेशनात संमत करून घेतला. गांधींचे हे मोठेपण हिंदुत्वनिष्ठांना ओळखता आले नाही हे दुर्दैव.

रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना प्रथम ‘महात्मा’ म्हटले. तर सुभाषबाबू यांनी ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरव केला. या सर्व परिस्थितीचा विचार केला तर हिंदुत्ववाद्यांनी गांधींची हत्या करावयास नको होती. गांधींची हत्या झाली त्यामुळे गांधी जगात अधिक प्रसिद्ध झाले. आइन्स्टाईनला गांधींबद्दल प्रेम होते.

गांधींसारखा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला असे 100 वर्षांनी कुणाला खरे वाटणार नाही, असे त्यांचे उद्‌गार आहेत. गांधींच्या खुनाचा जीना यांनीही निषेध केला. फाळणी गांधींना मान्यच नव्हती. स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी गांधी नौखालीत हिंदू-मुसलमान दंगे शांत करण्यात गुंतलेले होते. एवढेच काय, पंडित नेहरू आणि वल्लभभाई यांनी त्यांना घेण्यासाठी गाडी पाठविली, तथापि ते गेले नाहीत. पिंपळाचे झाड हलले आणि पाने पडली ती भेट म्हणून नेहरूंना पाठविली.

‘बॅ.सावरकर गांधींच्या खुनाला जबाबदार नसतील, तथापि ते खून थांबवू शकले असते की नाही’ हा सुरेश द्वादशीवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे, असे मला वाटते.

 ना. सी. पाटील नाशिक रोड, नाशिक

Tags: प्रतिसाद वाचक पत्रे pratisad readers opinion readers letter weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके