डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या लेखात जास्त खटकणारे भाष्य चंगळवादाविषयी आहे. समानता आणि विषमता, श्रीमंत व गरीब या परिस्थितीशी चंगळवाद संपूर्णपणे संबंधित असतोच असे नाही. द्वादशीवार चंगळवादाला नव्याने परिस्थिती सुधारलेल्यांच्या वाढीव उपभोगाच्या पातळीवर विचित्रपणे आणतात. या वाढीव उपभोगाने अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना मिळाली वा मिळते असे म्हणणे तर अति झाले.

कळत-नकळत, अप्रत्यक्ष बळ?

दि. १३ डिसेबर २०१४ च्या अंकातील सुरेश द्वादशीवार यांचा मन्वंतरचा उत्तरार्ध : ‘समता’ हा लेख वाचला. त्यांचे यापूर्वीचे ‘मन्वंतर’ पुस्तक सखोल चिंतन करणारे, विचारप्रवर्तक, प्रबोधन करणारे आहे. साधना साप्ताहिकात ते सातत्याने प्रदीर्घ, तपशीलवार वाचनीय लेख लिहितात, तरी ते कंटाळवाणे नसतात. दि. २९ नोव्हेंबरच्या अंकातील ‘सेक्युलॅरिझम’वरचा लेख अप्रतिम आहे. त्या लेखासंदर्भात ‘आवडले पत्र’ पाठवावे वाटले, पण राहून गेले. आता या ‘समता’विषयी मत कळवितो. विषय मोठा आहे आणि श्री.द्वादशीवार यांच्यासारख्या व्यासंगी श्रेष्ठाने लिहिले आहे, ते सारे ठीक आहे. सर्व क्षेत्रांत समानता आपण समजतो तशी, तेवढी येणार नाही व आणता येणार नाही; केवळ समानतेच्या (म्हणजे साम्यवादी व समाजवादी, अतिरेकी विचारसरणीच्या) नादी लागून जगात अत्याचार-हिंसाचार झाले हे सारे साधनाच्या अनेक वाचकांना माहीत आहे व मान्य आहे. पण तरीही विषमतेची दरी कमी होण्यासाठी ‘समते’ची कास मिळेल त्या मार्गाने धरली पाहिजे; अन्यथा ज्यांच्या हाती सत्ता आणि मत्ता आहे, ते आपल्या कर्तृत्वाचे नगारे वाजवत सुखेनैव शोषण करीत राहतील. पण आजकाल ‘समता’ शक्यच नाही, निसर्गाविरुद्ध आहे- असे म्हणण्याची फॅशन वाढत आहे व असे म्हणण्याला द्वादशीवार कळत-नकळत अप्रत्यक्ष बळ देत आहेत.

दुसरा मुद्दा- १९९१ नंतर खुलेपणा, उदारीकरण हे धोरण स्वीकारल्यानंतर पडलेल्या फरकांचा. पूर्वीच्या समाजवादी समाजरचनेत व मर्यादित भांडवलशाहीच्या मिश्र अर्थव्यवस्थेत आर्थिक वाढीचा दर वाढत नव्हता, तो १९९१ नंतर चांगलाच वाढला, हे बरेचसे खरे असले तरी संपूर्ण बरोबर नाही. एक तर या दोन्ही धोरणांच्या काळात, म्हणजे १९९१ च्या आधीही बरेच उद्योग-व्यावसायिक व संघटित नोकरशाही मजेत होती; कारण ते त्यांच्या वाट्याला बरेच काही ओढून घेत होते. १९९१ नंतर उदारीकरण, खासगीकरण (ह्यांचे अनेक लाभ झाले तरी) यामुळे उद्योगक्षेत्राची वाढ झाली आणि संघटित क्षेत्रातील नोकरशाहीसह उद्योगक्षेत्राला मिळणारे लाभ मोठ्या प्रमाणात वाढले. यावरून असे म्हणता येईल की, समतेच्या जास्त नादी न लागता खुलेपणा व उदारीकरण धोरण स्वीकारून आर्थिक वाढ झाली; पण विषमतावाढीवरचे नियंत्रण फार सैल सुटल्यामुळे समतेची पीछेहाटच झाली.

या लेखात जास्त खटकणारे भाष्य चंगळवादाविषयी आहे. समानता आणि विषमता, श्रीमंत व गरीब या परिस्थितीशी चंगळवाद संपूर्णपणे संबंधित असतोच असे नाही. द्वादशीवार चंगळवादाला नव्याने परिस्थिती सुधारलेल्यांच्या वाढीव उपभोगाच्या पातळीवर विचित्रपणे आणतात. या वाढीव उपभोगाने अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना मिळाली वा मिळते असे म्हणणे तर अति झाले. आमच्याबरोबरीने हे नवे, चंगळ करतात (कॉफी घेतात- हे उदाहरण तर साधे आहे, त्याऐवजी दारू ढोसतात- हे उदाहरण चंगळवादात जास्त बसेल.) म्हणणारे फार कमी आहेत. चंगळवाद हा चैनीशी संबंधित आहे. चैनीची वृत्ती, गरीब-मध्यम-श्रीमंतांना सर्वांना आज नाही, उद्या त्रासात आणते. म्हणून चंगळवाद हा त्याज्यच आहे. चंगळवादाचा अर्थ नव्याने परिस्थिती सुधारलेल्यांपुरता मर्यादित केला तर तो संतापजनक वाटेल; पण कर्जे काढून व वाढवून; हॉटेलिंग, मद्य, गाड्या, महागडे मोबाईल आणि काय काय करणाऱ्यांची वृत्ती व वर्तन चंगळवादी असते, आहे आणि हे त्याज्य आहे. ह्या साऱ्या समता-विषमता वगैरे चर्चा-ऊहापोहात आपण सोने, सोन्याचे दागिने, नको तेवढ्या गाड्या उडविणे (एकेका घरी गरज नसताना चार-चार गाड्या घेणे, बाळगणे- सोने, सुवर्णालंकार घेणे) यांचा विचार फारसा करत नाही. हे दोन्ही चंगळवादी चाळे समतोल आर्थिक विकासाला मारक ठरत आहेत. समतेचा विचार करताना या चंगळवादाला आवर घालायचा विचार करण्याची गरज आहे. समतेचाच विचार करायचा, तर अर्थव्यवस्थेत कृषिक्षेत्राला कष्टार्जित कमाई पुरेशी मिळत नाही याचाही विचार आला पाहिजे.

अरुण वि. कुकडे, नाशिक  

Tags: प्रतिसाद वाचक reader's opinion reader's letter pratisad vachak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके