डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रथम गोंयचे दत्ता नायक यांचा ‘आह! अलास्का!’ लेख ‘वाह! नायक!’ असे म्हणण्यासारखा झाला असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही. पूर्वी आपल्या ‘साधने’त असे लेख ठिकठिकाणांहून यायचे. त्यांपैकी श्री.विश्वकर (कोईमुत्तूर), वामन कर्णिक (आसाम), निखिल शाळिग्राम (कोलकाता) यांच्या लेखांची आठवण आली.

नवे क्षितिज हुडकण्यासाठी सज्ज झाले आहे..

‘नंदिनी’ हा लेख प्रकाशित केल्याबद्दल ‘साधना’ची अत्यंत आभारी आहे. मोहिब कादरी यांनी मनाला स्पर्शून जाणाऱ्या शब्दांत तो लिहिला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

लेख वाचताना पुन्हा ते जीवन डोळ्यासंमोर जसेच्या तसे उभे राहिले. ते आनंदी जीवन, ती दुर्घटना, तो अतिरेक चलच्चित्रासारखा डोळ्यासमोरून जात होता. पुन्हा एकदा त्या पायवाटेवर मी चालतेय, असे वाटत राहिले. काही वर्षांपूर्वी अंकुशशिवाय जीवन नको म्हणणारी नंदिनी... अंकुशच्या स्वप्नांसाठी, प्रेमाच्या प्रीतीला सावरण्यासाठी, दुःखाला हृदयात साठवून कंबर कसलेली नंदिनी... मोहिबच्या शब्दांनी हरखून गेली.

जीवनातल्या सुख-दुःखाला तोंड देत, वेगवेगळ्या अडचणींतून मार्ग काढत कधी पडले, कधी स्वतःला सावरत ही वाट चालतेय. पण खरं सांगू? एकांत जगणं फार अवघड. ज्या वेळेस आपल्याला कुणाची जरुरत असते ना, तेव्हाचा तो एकटेपणा जीवघेणा असतो.

मी खूप नशीबवान आहे. मला खूप चांगले मित्र भेटले, ज्यांनी माझी हिम्मत हमेशा वाढवली. मी हार मानली होती. पण मोहिब, त्याचे वडील दादा, शिवाजी गायकवाड(अण्णा) यांनी कधी डोळे पुसून, तर कधी हसवून मला जगण्यासाठी प्रेरित केलं. जीवनाच्या या मार्गावर चालायला साथ दिली.

आपली तारीफ ऐकायला सर्वांनाच आवडते; पण एखाद्या व्यक्तीचे मन ओळखून, आपला अनमोल वेळ काढून माझ्यावर जो लेख लिहिला आहे आणि आपण तो प्रकाशित केला, त्यासाठी धन्यवाद हा शब्द खूप छोटा ठरेल.

ज्यांनी लेख वाचला आहे आणि ही प्रतिक्रिया वाचतील, त्या सर्व वाचकांना मी सांगू इच्छिते की- कितीही कठीण प्रसंग ओढवला, तरीही मी ध्येयापासून लांब गेले नाही. उलट, ध्येयच माझ्या जगण्याचा आधार झालं. मला माहिती आहे, माझ्यासारख्या अनेक महिला एकट्यानेच आयुष्याची लढाई लढताहेत. विशेषतः माझ्यासारख्या स्त्रियांना सांगू इच्छिते की अन्न, पाणी, हवा जगण्यासाठी जेवढे गरजेचे आहेत, तेवढेच उद्देश पण गरजेचे आहेत. या पुरुषसत्ताक समाजात आपलं अस्तित्व टिकवून, पोटाची खळगी आणि महागाईची मार या सर्वांना तोंड देणं खूप अवघड आहे. पण करावं लागेल, तेव्हाच कुणी तरी मोहिब कादरी दखल घेतील. आणि साधना साप्ताहिकात ते प्रसिद्ध होईल.

आपण लेख प्रकाशित करून माझ्या पुढच्या जीवनाला पुन्हा एक उद्देश दिलाय, पुन्हा एक नवे क्षितिज हुडकण्यासाठी मी सज्ज झाले आहे.

नंदिनी अंकुश गायकवाड  

 

बहुगुणी पानाचा रंगतदार विडा

सध्या मी अमेरिकेत आहे. आपला एकेक अंक आंतरजालावर वाचताना मुद्रित अंकाची खूप आठवण येते. पण म्हणतात ना, तसं- दुधाची तहान...!

आता लॅपटॉपच्या पडद्यावर weeklysadhana ही अक्षरे पूर्ण होण्यापूर्वी नव्या अंकाचे- १३मे२०१७चे मुखपृष्ठ झळकले. मुखपृष्ठावरील लेखांची शीर्षके पाहून मन प्रसन्न झाले आणि आतुरतेने अनुक्रमणिका काढून एकेका लेखाचे शीर्षक भराभर वाचत गेलो... आणि आजचा अंक काही विशेष आहे, हा अंदाज केला. एकेका लेख वाचत राहिलो आणि खरं सांगतो, ‘साधना’चा हा अंक आपण संपादकीयात म्हटलंय तसे सर्व लेख जुळून आलेत. आपण या अंकाला ‘मिनी विशेषांक’ म्हणून संबोधलेच. मी म्हणेन की, एखादा बहुगुणी पानाचा विडा रंगावा तसा हा अंक रंगतदार झाला आहे.

सर्वच लेख आवडले. सर्वांविषयी एक ओळ लिहायची झाली, तरी हे ई-पत्र लांबेल. तरी १-२ लेखांचे कौतुक आपल्या कानांवर घालतो.

प्रथम गोंयचे दत्ता नायक यांचा ‘आह! अलास्का!’ लेख ‘वाह! नायक!’ असे म्हणण्यासारखा झाला असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही. पूर्वी आपल्या ‘साधने’त असे लेख ठिकठिकाणांहून यायचे. त्यांपैकी श्री.विश्वकर (कोईमुत्तूर), वामन कर्णिक (आसाम), निखिल शाळिग्राम (कोलकाता) यांच्या लेखांची आठवण आली. कोईमतूर याऐवजी कोईमुत्तूर असा योग्य शब्द श्री. श्री.विश्वकर यांच्या लेखातून प्रथम समजला. निखिल यांनी ‘मुक्काम कोलकाता’ सदरातून कोलकाताची काही वैशिष्ट्ये सादर केली होती. तसे हे दत्ताभाऊ! यांनी मध्यंतरी पोर्तुगालची रोचक माहिती दिली होती; आजचा त्यांचा अलास्का भेटीचा सचित्र वृत्तांत तसाच वाचनीय आहे.

दुसरा लेख श्रीमती अंजली कीर्तने यांचा. त्यांनी दुर्गाबार्इंचे नाव काढताच हा लेख कसा असेल याची अटकळ बांधली, ती खरी निघाली. ‘भाषाप्रेमी’ हा दुर्गाबार्इंच्या अनेक पैलूंपैकी एक होता. त्या शाळेत शिकत असताना त्यांनी आपली शब्दसंपत्ती खुंटू नये म्हणून छोटासा शब्दकोश बनविला होता, हे वाचून मन भरून आले. संस्कृत, पाली आणि जर्मन या भाषा कशा शिकल्या, हे मुळातून वाचावे. इतर भारतीय भाषा त्यांना अवगत झाल्या होत्या. ‘स्टुडिओ’ या शब्दाला दुर्गाबार्इंनी ‘चित्रशाळा’ हा चपखल शब्द दिला... इत्यादी. सर्वच गोष्टींनी हा लेख तुमच्या या अंकाचे भूषण ठरावा असा आहे. अंजलीतार्इंना माझे विशेष आभार कळवावेत, कारण दुर्गाबाई हे आमचे दैवत होते. या लेखावर किती लिहू आणि किती नको, असे झाले आहे.

म्हटलं ना, या दोन लेखांच्या कौतुकानेच हे ई-पत्र भरून गेले. जाता-जाता: या अंकातील वाचकांचा पत्रव्यवहारही बोलका आहे. कुमार केतकरांच्या लेखावरील मतप्रदर्शन नेमके मुद्द्यांवर बोट ठेवणारे वाटले.

मंगेश नाबर  

Tags: वाचक पत्रे प्रतिसाद reader's opinion reader's letter weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात