डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पण दिल्ली गँगरेपमागे कोणतेच कारण नव्हते. खालची जात, उत्तान कपडे, धार्मिक तेढ, शहरापासून दूर सुनसान जागा वगैरे काही नसूनही हा भयंकर प्रकार घडला, विशेष म्हणजे हे लैंगिक अत्याचार, धैर्याने त्या तरुणीने पुन्हा पुन्हा सांगितले. तेव्हा असे पुन्हा घडू नये म्हणून मीडिया, सर्वसामान्य लोक, सत्ताधारी, राजकारणी या सर्वच स्तरांधून  वेगवेगळे उपाय पुढे येऊ लागले. पण हे सुचविलेले इलाजसुद्धा खूपदा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असेच असतात.

तुम हमारे कौन हो?

9 मार्च 2012 च्या ‘साधना’ अंकात ‘बस यूही लिखते रहना...’ या नावाचा पुस्तक परिचय प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पहिले वाक्य आहे, ‘अच्युत गोडबोले हे आज मराठी लोकांचे आयकॉन किंवा रोलमॉडेल आहेत.’ हा एकमुखी जाहीरनामा साधनेच्या वाचकांना खुपल्याशिवाय राहणार नाही. कारण साधनाचे ब्रीद आहे, ‘स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधनां। करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना।’ यानुसार वागून गेलेले आणि वागणारे अनेक ‘आयकॉन किंवा रोलमॉडेल’ साधनेच्या वाचकांनी पाहिलेले आहेत, आजही पाहत आहेत. प्रकाश आमटे, बंग पति-पत्नी इत्यादी आहेत. भूतकाळातही अनेक आहेत. ‘सत्याचे प्रयोग’ करणारे महात्मे होऊन गेले आहेत. त्यांनी त्यांच्या चुका उलगडून दाखवल्या आहेत. ‘श्यामची आई’मध्ये खोटे बोलणे उलगडून दाखवणारा श्याम आहे.

त्या सर्वांमध्ये हा नवा ‘आयकॉन किंवा रोलमॉडेल’ कसा काय समाविष्ट करावा? त्या जुन्या आयकॉन किंवा रोलमॉडेल्सनी अनासक्तीचे जे प्रयोग केले ते प्रयोग या नव्या आयकॉनने केलेले नाहीत. ‘बुद्ध को साम्राज्य व्यर्थ मालूपडा, हमने जो अपने मकान के आस-पास थोडीसी फेंसिंग कर रखी है, वह साम्राज्य मालू पडता है।’ या संदर्भात या पुस्तक परिचयातील पुढील वाक्य वाचावे. ‘हा माणूस, त्याची स्वत:ची धनसंचयाची गरज भागली, असे वाटल्यानंतर त्या क्षेत्रातून बाहेर पडू शकतो.’ (पान 30) ‘सत्याचे प्रयोग’ करणाऱ्या महात्म्याने सर्वस्वाचा त्याग करून कमरेला पंचा गुंडाळला. आणि ह्या पुस्तकपरिचयातला ‘आयकॉन’ स्वत:ची धनसंचयाची गरज भागल्यावर नोकरी सोडतो. त्या महात्म्याने खोट्या अशिलांची वकिली करणे नाकारले. आणि ह्या नव्या ‘आयकॉन’ने पटनी, सिंटेल, एल अँड टी, इन्फोटेक, आय.बी.एम.मध्ये झोकून देऊन काम केले. ह्या सगळ्या कंपन्या सदाचारी होत्या काय? त्या कंपन्यांचे ब्रीद ‘करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना।’ असे होते काय? तात्पर्य, पुस्तक परिचयकर्त्याच्या मते गोडबोले मराठी लोकांचे आयकॉन असतील, पण साधनेच्या लोकांचे असतील काय?

देवीदास बागूल, पुणे

कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याऐवजी

9 मार्चच्या ‘साधना’ अंकात 8 मार्चच्या निमित्ताने संपादकीय व दोन लेख आले आहेत. तसे यंदाचे 8 मार्च दिल्लीतील गँगरेपच्या निमित्ताने कधीच सुरू झाले होते. दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसमध्ये एका सुशिक्षित, निर्भय मुलीवर रस्त्यावरून बस धावत असताना चौघे पुरुष तिच्यावर हिंसक लैंगिक अत्याचार करतात. त्यानंतर तिला व तिच्या मित्राला बसमधून फेकून देतात. हे म्हणजे फारच झाले. हळहळ, संताप, सर्वदूर, सर्व थरांमध्ये विशेषत: कॉलेज युवक-युवतींना अनावर झाला होता. आणि म्हणून इथून पुढे तरी अशा घटना घडू नयेत यासाठी तळमळीचे प्रयत्न सुरू झाले.

अशीच लैंगिक हिंस्रता खैरलांजी प्रकरणाच्या वेळी होती, पण भोतमांगे कुटुंब दलित असून आत्मसन्मानाने वावरतेय हे वरिष्ठ जातींना सहन न झाल्याचा संबंध त्या वेळी त्या घटनेशी जोडला गेला. गुजरातमधील दंगलीच्या वेळी जे हिंसक लैंगिक अत्याचार स्त्रियांवर घडले त्यांचा संबंध गोध्रा हत्याकांड आणि धार्मिक तेढीशी जोडला गेला. या वेळी असा संबंध कशाशीच जोडता येत नव्हता.

असे नेहमीच घडत असते. शिवाय अशा टोकाच्या घटना आकस्मिक घडत नसतातच. मुळात त्यामागे स्त्रीचे दुय्यमत्व असते. कधी अगदी छोट्या गोष्टी असतात. म्हणजे आपल्या बायकोने बाहेर कोणाशी बोलता कामा नये येथपासून लग्नात हुंडा, मानपान झाला नाही म्हणून छळ, मूल होत नाही, किंवा मुलीच होतात म्हणून टाकून देणे वगैरे... प्रकार असतात.

पण दिल्ली गँगरेपमागे कोणतेच कारण नव्हते. खालची जात, उत्तान कपडे, धार्मिक तेढ, शहरापासून दूर सुनसान जागा वगैरे काही नसूनही हा भयंकर प्रकार घडला, विशेष म्हणजे हे लैंगिक अत्याचार, धैर्याने त्या तरुणीने पुन्हा पुन्हा सांगितले. तेव्हा असे पुन्हा घडू नये म्हणून मीडिया, सर्वसामान्य लोक, सत्ताधारी, राजकारणी या सर्वच स्तरांधून  वेगवेगळे उपाय पुढे येऊ लागले. पण हे सुचविलेले इलाजसुद्धा खूपदा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असेच असतात.

कारण स्त्री संरक्षित वस्तू आहे ही मानसिकता बदलेली नसते. मग आसारामबापू म्हणतात, अत्याचाऱ्याला भाऊ म्हणून संबोधले गेले असते तर असे झाले नसते, कोणी म्हणतात स्त्रियांनी सावध रहायला हवे. या सगळ्या उपायांत आता केंद्र सरकारने महिलांसाठी खास बँक उघडण्याचे ठरविले आहे, शिवाय स्त्रियांनी मदतीसाठी दिलेली हाक, पोलीस यंत्रणेकडे त्वरित कशी पोचविता येईल, यावर विचारविनिमय चालू आहे. कायद्यात काय बदल होणे आवश्यक आहे, त्याचाही विचार सुरू आहे. अर्थात हे सर्व होणे स्वागतार्हच आहे, पण मूळ दुखणे, स्त्रीचे समाजातील स्थान, जे रूढींनी, परंपरेने दुय्यम आहे, तिच्या जीवनातील सण, वार, उत्सव, तिच्या विवाहितपणाशी, सवाष्णपणाशी जोडले आहेत. त्यामुळे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला मान्यता नाही. जी व्यक्ती स्वतंत्र नाही तिचे संरक्षण कोण किती आणि का करणार?

प्रश्न स्त्रीच्या संरक्षणाचा नसून तिच्या अस्मितेचा, सन्मानाचा आहे. संरक्षणाने प्रश्न सुटत नसतात. जेव्हा स्त्रीला ‘सहन कर’ या उपदेशाऐवजी तू तुझा सन्मान करायला शीक हे सांगितले जाईल तेव्हा बदल घडू शकेल. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला वस्त्रे पुरवून संरक्षण करण्याऐवजी कृष्णाने दु:शासनाचे हात बधीर करून त्याला पुतळ्यासारखे स्तब्ध केले असते तर परिणाम वेगळा होऊ शकला असता. भारतीय समाजावरसुद्धा. असो.

गांधीजी म्हणाले होते, ‘महिला सर्वथैव पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. त्यांना जे हवे ते करण्याची मोकळीक आहे. अक्कलशून्य व कवडीमोल पुरुष केवळ अमानुष रूढी परंपरांमुळे त्यांच्यावर वर्चस्व गाजवीत आहेत.’ म्हणून स्त्री दुय्यम आहे या मानसिकतेतून स्त्री व पुरुषांनी बाहेर पडण्याचे उपाय शोधले पाहिजेत. या संदर्भात एका छोट्याशा सूचनेचा विचार व्हावा.

माननीय यदुनाथ थत्ते यांनी प्राथमिक शाळेपासून, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शपथेसंबंधात ‘प्रतिज्ञा’ ही पुस्तिका काढली आहे.... भारत माझा देश आहे... सर्व भारतीय माझे बांधव आहेत वगैरे... याच शपथेत एक वाक्य टाकावे म्हणजे ‘...भारत माझा देश आहे, माझ्या देशात स्त्री व पुरुष सर्वथैव समान आहेत...’ वगैरे... यातून कदाचित फार काही साध्य होणार नाही, पण लहान मुला-मुलींत कदाचित समानतेची भावना रुजेल, कदाचित पालक, मुलगा, मुलगी समान मानू शकतील..

सुलोचना वाणी, पिंपरी, पुणे  

मीडियाला देण्यासारखे आमच्याजवळ काही नाही

16 फेब्रुवारीच्या ‘साधना’ अंकात ‘जातिअंता’च्या संदर्भात एका उपेक्षित पण ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. जातिसंस्था धर्मातून व धर्म वंशपरंपरेतून जन्माला आल्या. समाजाला नियंत्रित व गतिहीन ठेवण्यासाठी जाति-धर्म एकेकाळी अस्तित्वात आले. परंतु राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहजीवनाला द्वेषमूलक छेद देण्यात जाती आणि धर्म यांनी कामगिरी बजावली. वंश, धर्म आणि जातिवर्चस्व हे कलहांना जन्म देतात, वरपांगी मात्र सांगितले जाते ‘आपण सर्व देवाची लेकरे।’

आम्ही आमच्या जिल्ह्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचे काम ‘माहेर’ या संस्थेद्वारे करतो. 2005 मध्ये या मंडळाची स्थापना निळुभाऊ फुले यांच्या हस्ते झाली. आंतरजातीय व आंतरधर्मीयांचा मोठा सात हजार लोकांचा मेळावा झाला. ‘माहेर’च्या संचालिका स्वत: शालिनी साळवे असून आम्ही आमच्या कन्यांचे विवाह आंतरजातीय व आंतरधर्मीय पद्धतीने केले. ते सुखी आहेत. शाहिरा शेख व शैलेश वाळके यांच्या मुलाचे नामकरण निळुभाऊंनी जाहीर केले. दुसरा विवाह यशोदा बोरकर (बौद्ध) व किशोर पोवनकर (समाजवादी कार्यकर्ते, हिंदू) यांचा, अशी पाचशे लग्ने झालेली आहेत.

दरवर्षी मेळावे होतात, गाजावाजा होत नाही. मीडियाला ‘देण्या’सारखे आमच्याजवळ काही नाही. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांकडून खूप विरोध होतो. कट्टरवाद्यांचा छुपा विरोध स्वाभाविक आहे. पण पुरोगामी म्हणविणारे राजकीय नेतेही जातीपातीचे पिंजरे मोडायला पुढे येत नाहीत याचे वाईट वाटते. लातूर व कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना आमची माहिती द्या. परिषदेच्या कामाचा अहवाल कळवायला सांगा. राज्यव्यापी परिषदही घेता येईल.

एकनाथ साळवे, मु.पो.दुधोली-बामणी, जि.चंद्रपूर  

Tags: वाचक पत्रे प्रतिसाद reader's opinion reader's letter pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात