डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘साधना’तील रावसाहेब कसबे यांचे माहितीपूर्ण पण क्लिष्ट वाटणारे लेख वाचले, दोन विद्वानांतील कलहही त्यात जाणवतो. संस्कृतीच्या भौतिक व आध्यात्मिक या दोन मुख्य बाजूंच्या सद्य:स्थितीचा उल्लेख कसबे यांच्या लेखात नसल्यामुळे आढावा घेणारे हे पत्र लिहीत आहे. संस्कृती या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक विचारवंत, धर्मसंस्थापक, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ व सत्ताधीश आदी धुरीणांनी मानवाच्या सर्वांगीण हिताचा विचार आदिकालापासून केलेला आहे. त्यांच्या विचारमंथनाचे व प्रयत्नांचे संस्कृती हे फलित आहे. हे विचारमंथन मानवाच्या अंतापर्यंत चालणार आहे.

तुमच्या अंकात न आलेली बाजू

‘साधना’चा ‘आणीबाणी विशेषांक’ वाचला. आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील एक डाग आहे हे खरे, पण त्याकरता मी तत्कालीन विरोधी पक्षांना दोष देतो. भविष्यात तशी आणीबाणी यायची नाही, असे माझे मत आहे. तेव्हा तो विषय उगाळण्यात काही फायदा नाही, असेच मला वाटते. पण या प्रश्नाची चर्चा सतत चालूच आहे. आणखी दहा वर्षांनी कदाचित सुवर्ण-महोत्सव मनवला जाईल, म्हणून तुमच्या अंकात न आलेली बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

ही बाजू मी ‘वाङ्‌मयशोभा’ या आता अस्तंगत झालेल्या मासिकाच्या एप्रिल 1977 च्या अंकात मांडली होती. तेव्हा मी असेच म्हटले होते व आताही म्हणतो की, इंदिरा गांधींचे रीतसर निवडून आलेले सरकार असांविधानिक रीतीने पाडण्याचे विरोधकांनी जे प्रयत्न केले, त्याला इंदिरा गांधींनी ‘आणीबाणी’ हे उत्तर दिले. त्या उत्तरात असांविधानिकता होती, असे न्यायपालिकेने म्हटलेले नाही.

आणीबाणीचा विचार करताना तीन गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत.

1. आणीबाणीपूर्वी दोन-तीन वर्षे काय घडत होते?

2. इंदिरा गांधींचा पाडाव झाल्यावर 19 महिने काय घडले?

3. बहुनिंदित इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या, याचा अर्थ काय? आणीबाणीची पार्श्वभूमी 1973 च्या रेल्वेसंपात पाहायला पाहिजे, असे प्राणनाथ धर यांनी म्हटले आहे. तो संप सरकार उलथवण्यासाठीच होता, असे त्या संपाचे पुढारी जॉर्ज फर्नांडिस यांनीच म्हटले होते. तेव्हा ‘सरकारी कारभार ठप्प करण्याची कोणतीही योजना आखण्यात आली नव्हती.’ हे जेपींचे म्हणणे चूक आहे. बाबरी मशीद पाडण्याची कोणतीही योजना भाजपने आखली नव्हती, असे अडवाणींचे म्हणणे; पण त्यांच्याच चळवळीत सामील झालेल्यांनी ती पाडली ना? तुमच्या अंकातील शारदाप्रसादांच्या लेखात तर स्पष्ट म्हटले आहे की, ‘1970 नंतर त्यांनी (जेपींनी) संपूर्ण क्रांतीचा नारा दिला आणि गुजरात सरकार व नंतर केंद्र सरकार उखडून टाकण्यासाठी राजकारणात पुन्हा प्रवेश केला.’

हे प्रयत्न सनदशीर मार्गांनी चालले असते, तर काही प्रश्नच उद्‌भवला नसता. सन 1976 मध्ये लोकसभा निवडणुका होऊ घातल्या होत्या, पण विरोधकांना तोपर्यंत थांबायचे नव्हते. जयप्रकाशांचे आंदोलन तत्काळ इलाज करण्याची मागणी करणारे होते, असे शारदाप्रसादांनीच म्हटले आहे. आणि जेपींची भाषा पाहा- ‘वाटाघाटींनी प्रश्न सोडवण्याची पुरेशी संधी बिहार सरकारला देण्यात आली होती.’ ही भाषा कशी आहे, तर एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाला सांगावे, ‘पाहा, मी तुला संधी देत आहे; ठीक वागलास तर बरे, नाही तर...’

जेपींचीच भाषा पुन्हा सांगायची म्हणजे, 25 जून, 1975 रोजी दिल्लीत जी सभा ठरली होती; सत्याग्रह सुरू व्हायचा होता आणि जो देशभर पसरायचा होता; त्या सत्याग्रहाची मागणी अगदी ‘साधी’ होती. काय तर- ‘इंदिरा गांधींच्या निवडणूक याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा अखेरचा निवाडा येईपर्यंत इंदिरा गांधींनी पंतप्रधानपद सोडावे.’ किती ‘साधी’ मागणी! सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना दिलेले संरक्षण (सशर्त असले तरी) कुठेच गेले!

हा प्रश्न सामोपचाराने सुटणारच नव्हता. बिपिन चंद्रा या ज्येष्ठ इतिहासकाराने आणीबाणीसाठी इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीला जितके जबाबदार धरले आहे, तेवढेच जयप्रकाश नारायण यांच्या दुराग्रहालाही जबाबदार धरले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी सरकारला अल्टिमेटम देणे, ही काही लोकशाहीसंमत पद्धत नव्हे. भारतीय राज्यघटना आणि संसदीय राज्यपद्धती यांच्यात पंतप्रधानांकडे खूप अधिकार असतात; ते अधिकार वापरले नाहीत, म्हणून मनमोहनसिंग बावळट ठरतात. इंदिरा गांधींनी वापरला, तर त्या एकाधिकारशाही करणाऱ्या ठरतात! काय दैवदुर्विलास आहे!

तर, अशा या असांविधानिक आणि दुराग्रही विरोधाला मोडून टाकण्याकरता इंदिरा गांधींनी आणीबाणी हे सांविधानिक शस्त्र वापरले, चळवळ्यांना तुरुंगात टाकले आणि त्यांची वैचारिक रसद कापून टाकण्याचा प्रयत्न केला. झाले ते वाईट झाले, पण त्याकरता इंदिरा गांधींना दोषी ठरवता कामा नये.

या प्रकरणाची एक व्यावहारिक बाजूही लक्षात घ्यायला पाहिजे. समजा- इंदिरा गांधींचे प्रशासन अगदी रद्दी होते. ते उखडून टाकायचे म्हणजे दुसऱ्या चांगल्या प्रशासनाची व्यवस्था करायला नको का? आणीबाणी जाहीर होण्यापूर्वीच मी ‘वाङ्‌मयशोभे’च्या संपादकांना पत्र लिहिले होते की, एखाद्या माणसाचे हृदय खराब झाले असेल तर ते काढून टाकण्यापूर्वी दुसऱ्या  चांगल्या हृदयाची व्यवस्था करून ठेवायला नको का? जेपींनी काय केले? नुसता संपूर्ण क्रांतीचा नारा दिला, पुढची काहीच सोय केली नाही. आणि व्हायचे तेच झाले.

इंदिरा गांधींचा पाडाव झाला खरा, पण त्यांच्याजागी ठिगळे लावून तयार केलेले एक सरकार आले आणि ते स्वत:च्याच दुर्बलतेने 19 महिन्यांत पडले. जनतेने पूर्वीच्याच बहुनिंदित इंदिरा गांधींना पुन्हा पंतप्रधान बनवले. काय फायदा झाला या चार-पाच वर्षांच्या गदारोळाचा? असा गदारोळ पुन्हा होणार नाही, असे माझे मत आहे; कारण जेपींजवळ जे नैतिक बळ होते (त्यांची थोरवी मी मान्य करतोच), तसे बळ असणारा मनुष्य सरकारविरोधकांना सापडण्याची शक्यता जवळपास नाहीच.

सन 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी संसदेलाच धमकी देऊन पाहिली, ‘जनलोकपाल बिल पास करा, नाही तर...’; पण सरकारने तो हल्ला कुशलतेने परतवला आणि अण्णाही नंतर अडून बसले नाहीत. तेव्हा पुढे कधी आणीबाणी येईल, अशी शंका माझ्या मनात येत नाही. आपल्याकडील आणीबाणीसारखाच एक प्रकार फ्रान्समध्ये 1968 मध्ये झाला होता. त्याची कथाही वाचकांना रंजक वाटेल, त्यातून थोडा बोधही घेता येईल म्हणून लिहितो.

सन 1968 मध्ये पॅरिसस्थित एका विद्यापीठाने काय केले की, पुरुष विद्यार्थ्यांनी स्त्री-विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात केव्हा जावे-यावे, याबद्दल काही नियम केले. विद्यार्थ्यांना ते स्वातंत्र्यविरोधी वाटले आणि त्यांनी विद्यापीठ-सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलन सुरू केले. आंदोलनात अनेक मुद्यांची भर पडली. या आंदोलनाचा फायदा कामगार संघटनांनीही घेतला आणि त्यांनी फ्रान्सचे सगळे समाजजीवनच बंद पाडले. सरकारी कार्यालये बंद, रेल्वे-विमाने-रस्ते वाहतूक सगळे बंद. नवा माल न पोचल्यामुळे दुकानेही बंद पडायला लागली.

सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करून उभयपक्षी मान्य असणारे तोडगे काढले. पण नंतर कामगार संघटनांच्या युतीने घोषणा केली की, आम्हाला हे सरकारच नको. अध्यक्ष डी गॉल पेचात पडले. ते एक दिवस पॅरिसमधून गायब झाले. सरकारी गोटातून अशी माहिती बाहेर पडली की, त्यांनी फ्रान्समध्ये सैनिकी शासन लागू करण्याकरता सेनाप्रमुखांचा पाठिंबा मिळवला. प्रकटपणे त्यांनी एवढेच केले की, 31/5/1968 रोजी एका जाहीर सभेत खणखणीत घोषणा केली की, ‘मी काही फक्त कामगार आणि विद्यार्थी यांच्या मतांवर निवडून आलेलो नाही; संबंध फ्रेंच जनतेने मला निवडले आहे, तेव्हा मी विद्यार्थी-कामगार यांनी राजीनामा मागितला म्हणून मुळीच देणार नाही.’

सध्या एका वेगळ्या प्रकारचे संकट भारतीय लोकशाहीसमोर आहे. ते म्हणजे संसद आणि न्यायपालिका यांच्यामधील संघर्षाचे. आपल्या अंकात श्री.साळुंके यांनी त्यांचे एक धावते वर्णन केले आहे, पण त्यात एका कळीच्या मुद्यावर चर्चा नाहीये. प्रश्न असा की, 1950 च्या ‘वुई द पीपल’नी जी घटना तयार केली, त्यातला काही भाग चिरंतन आहे, त्यामुळे आजच्या ‘वुई द पीपल’ना त्यात बदल करण्याचा अधिकार नाही, हे न्यायपालिकेचे म्हणणे जनतेच्या सार्वभौमत्वाशी कितपत सुसंगत आहे? न्यायपालिका जर संसदेवर फार निर्बंध घालायला लागली, तर एक सांविधानिक पेच संभवतो.

लोकशाही बळकट करण्याकरता काय करता येईल, हा आजचा खरा प्रश्न आहे, हे संपादकांचे म्हणणे मला पूर्णपणे पटते. ‘कसेही करून सरकार उलथवून टाका’ अशा तत्त्वज्ञानाने तो प्रश्न सुटणार नाही.

भ. पां. पाटणकर, नागपूर,

दोन मुख्य बाजूंचा उल्लेख त्या लेखात नाही, म्हणून...

‘साधना’तील रावसाहेब कसबे यांचे माहितीपूर्ण पण क्लिष्ट वाटणारे लेख वाचले, दोन विद्वानांतील कलहही त्यात जाणवतो. संस्कृतीच्या भौतिक व आध्यात्मिक या दोन मुख्य बाजूंच्या सद्य:स्थितीचा उल्लेख कसबे यांच्या लेखात नसल्यामुळे आढावा घेणारे हे पत्र लिहीत आहे.

संस्कृती या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक विचारवंत, धर्मसंस्थापक, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ व सत्ताधीश आदी धुरीणांनी मानवाच्या सर्वांगीण हिताचा विचार आदिकालापासून केलेला आहे. त्यांच्या विचारमंथनाचे व प्रयत्नांचे संस्कृती हे फलित आहे. हे विचारमंथन मानवाच्या अंतापर्यंत चालणार आहे.

पाश्चात्त्य देशांनी निसर्गाचे अविरत व अथक संशोधन गेली 600 वर्षे करून भौतिक संस्कृती निर्माण केली आहे. तिला शास्त्रीय संशोधनाचा भक्कम आधार आहे. या संस्कृतीने जगातील सर्व मानवांना प्रभावित केले आहे. मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की, त्यात पाश्चात्त्य भौतिक संस्कृतीचे वर्चस्व जाणवत नाही. वंश, धर्म, भाषा, भौगोलिक स्थान इत्यादी मानवाची ओळख तिने पूर्णत: पुसून टाकली आहे. तथापि बरे-वाईट, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय इत्यादी मानवी वर्तनाचा निर्णय कोणतेही शास्त्र करू शकत नाही. या निर्णयांवरच मानवाचे आंतरिक समाधान अवलंबून असते. त्यासाठी आत्मनिष्ठ होऊन अंतर्यामाचा शोध घ्यावा लागतो. या शोधातून निर्माण झालेल्या संस्कृतीला आध्यात्मिक संस्कृती हे नाव देता येते.

भारतीय विचारवंत 5000 वर्षांपासून उपनिषदे, षड्‌दर्शने इत्यादी माध्यमांतून मनुष्याच्या अंतिम कल्याणाचा शोध घेत आहेत. या व्यासंगाला जीवनानुभवाचे विवेकीकरण असे  म्हणता येते. मनुष्याच्या अंतिम कल्याणाचे सर्वस्व मनुष्यातच आहे; त्यासाठी बाह्य जगातील ईश्वराच्या कृपेची अजिबात गरज नाही, असे गौतम बुद्धांनी कंठरवाने सांगितले. मनुष्याला स्वत:त योग्य बदल करून प्रमादरहित, स्वस्थ व प्रज्ञाशाली होता येते, हा बुद्धांचा मुख्य संदेश आहे. मेत्तसुत्तातील धम्मपदात हा संदेश आला आहे.

आज बौद्धधर्म सर्वांत जलद गतीने वाढणारा धर्म म्हणून ख्याती पावला आहे. स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आदी प्रभृतींनी कर्मयोगाधिष्ठित भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केले आहे; भारतीय आध्यात्मिक विचाराने जगातील सर्व विचारवंतांना प्रभावित केले आहे.

श्री. रा. नेने, पुणे,

एक किरण खूप ऊब देतो आहे...

मला तुमच्याविषयी वैयक्तिक लिहायचंय. परंतु पुढं कागद आणि हातात पेन अशा अवस्थेत बराच वेळ मी नुसता तसाच बसलोय. खरं म्हणजे तसाच नाही; पुन्हा एकदा जागृत झालेल्या विषण्णतेतून बाहेर येण्यासाठी स्वत:ला वेळ देतो आहे.

ती सुन्न करणारी सकाळ मन व्यापून राहिली आहे... आधी कुणाचा तरी फोन- घणाघात करणारा. मग अविश्वास. मग टीव्हीवरच्या बातम्या लावणं. ‘साधना’त जाण्याची तयारी करताना आपल्या कृतीचा जाणवत असलेला निरर्थकपणा. ‘साधना’च्या बरेच बाहेरपर्यंत अडवणारे पोलीस, न बोलता उभे पुष्कळ लोक. आपल्याला पुढं जाता येईल का- मीडिया सेंटरमध्ये, ही मनात शंका. पण पोलीस मला वाट करून देतात. मी कुणीच नाहीय, हे त्यांना माहीत नसल्यानं. गर्दीतून मी आत जातो. जागा तर नसतेच. जिन्याजवळ पोचतो आणि उभा राहतो सगळ्यांसारखा. निष्क्रिय वाट पाहत. ससूनमधून त्यांचं कलेवर आणलं जातंय, रस्त्यावरून अंत्ययात्रा आत्ताच सुरू झाली आहे. यायला वेळ लागतोय. सगळे नुसते उभे. गर्दी वाढतेय.

तुम्ही एवढा वेळ दिसला नव्हता. तुम्हीही ससूनच्या तिकडं असाल, असा माझा कयास. पण डॉक्टरांना ठेवण्यासाठी टेबल तयार करून ठेवलं होतं, तिथून अचानक तुम्ही वाट काढत जिन्याजवळून आत जाऊ लागलात. माझ्या समोरून तुम्ही पुढं होताना मला राहवलं नाही. अनोळखीपणाचा संकोच गळून पडला. तुमच्याविषयीचे त्या क्षणाचे माझ्या मनातील भाव नि:शब्दच थांबले. पण हात तुमच्या खांद्यावर गेलाच. त्या स्पर्शानं तुम्ही माझ्या डोळ्यांत पाहिलंत. पायाखालची जमीन सरकलेला मी तुम्हाला आधार द्यायचा प्रयत्न करू इच्छित होतो. क्षणभर थांबून, डोळ्यांची भाषा करून तुम्ही माझी ती इच्छा समजल्याचं दाखवलंत. त्या मौनाच्या भाषेतून मला हे नाही ऐकू आलं की, यांना तर आपण ओळखतही नाही.

कशासाठी मला तो स्पर्श द्यायचा होता? तीनच दिवसांपूर्वी ‘साधना’च्या पासष्टाव्या वर्धापनदिन समारंभात दाभोलकरांनी एस.एम.जोशी हॉलमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं, ‘साधना’चा पुढचा संपादक होण्यासाठी विनोद आता तयार झाला आहे आणि आजच, इतक्या लगेच एवढ्या निर्दयपणे समोर हा क्षण. विश्वस्त रीतसर निर्णय घेऊन विनोद संपादक होईलच; पण या- अगदी याच क्षणापासून त्याचं व्रत सुरू झालंय, हे झाकोळलेल्या मनालाही दिसत होतं. त्या स्पर्शाच्या निमिषात तरळून गेल्या सर्व संपादकांच्या प्रतिमा. साने गुरुजी नावाच्या महामानवापासून पासष्ट वर्षे बदलत राहिलेल्या व्रतस्थांच्या.

आता त्यांच्या मालिकेत हा मुलगा? याचं लेखन वाचलंय, भाषण ऐकलंय, संयोजन बघितलंय. शंका कशाला हवी मनात? तरीही... मनातला उरलेला हा ‘तरीही’. आणि प्रत्यक्ष दाभोलकरांचीच ही साक्षेपी निवड असताना? तरीही मनात हा ‘तरीही’. आणि या गोठून टाकणाऱ्या क्षणी माझा स्पर्श याला काय देणार? हा तर मला चेहऱ्यानंसुद्धा ओळखत नाही. पण मी तुमचा स्पर्श घेतला आहे, हे त्या खांद्यानं मला सांगितलं. त्याची त्याला गरजही नसेल कदाचित- असेल तो तेवढा भक्कम, याही क्षणी. पण या व्यक्तीच्या स्पर्शाचं मला मोल आहे, हे त्या खांद्यानं मला कळवलंय.

आणि पुढची ही दोन वर्षं- त्या क्षणानंतरची. खांदेपालट इतका सहज की, दाभोलकर असतानाच तो झाला होता असं वाटावं! दर आठवड्याचे सुंदर सुंदर अंक, विशेषांक. समाजाच्या सर्वांगाशी बोलणारे. वैचारिकतेची प्रगल्भता वाढवत ठेवणारे. प्रदेश, देश, विदेश इथं फिरवणारे. गावा-शहरातील वास्तव दाखवणारे. प्रयोगांवर प्रकाश टाकणारे. धर्मेच, अर्थेच- सगळं बोलणारे. अतिथी युवा-संपादकांना प्रोत्साहित करणारे. इतर भाषांतलं धन मराठीत आणणारे. लेखमालांच्या पुस्तकांच्या नवनव्या आवृत्ती काढायला लावणारे. वाचकांचे आवाज उंच करणारे, त्यांच्या मतांचे आतिथ्य पुन:पुन्हा करणारे- विशेषत: विरोधी मतांचे. ही सारी दाभोलकरांची अचूकता; की तुमचेच समर्थपणाचे, समर्पणाचे वैभव? एक किरण खूप ऊब देतो आहे. गुरुजींची धडपडणारी मुले अजूनसुद्धा जन्माला येतात.

अशोक वाडीकर, पुणे,

Tags: वाचक पत्रे प्रतिसाद vachak patre pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात