डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अलीकडील पाच-सहा वर्षांपासून ‘साधने’तील विविध लेख व मजकुराची निवड अतिशय चोखंदळपणे केली जाते. अंकामध्ये उपयुक्त व वाचकांची जिज्ञासा पूर्ण करणाऱ्या माहितीचा समावेश करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याकडे संपादकांचा कटाक्ष असतो. 15 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला, ‘साधना'चा वर्धापन दिन विशेषांक बेहद्द आवडला! अंकाच्या वार्षिक वर्गणीमूल्याच्या तुलनेत अंकाची उपयुक्तता अधिक वाटते.

ॲटम बाँब ही इष्टापत्ती? 

"ॲटम बाँब! विषारी वारसा की इष्टापत्ती?" हे डॉ. शरद अभ्यंकरांचे पत्र वाचले. "इष्टापत्ती" म्हणायचे का?

जपानने चीन, कोरिया व रशियावर आक्रमणे केली होती. त्यांचे सैनिक स्थानिक जनतेशी अतिशय क्रूरपणाने वागले. हे सगळे खरे आहे, पण त्यासाठी जपानी शहरांवर अ‍ॅटम बाँब टाकणे समर्थनीय ठरते का?

अभ्यंकरांना भेटलेल्या त्या वृद्धांनी गाईडसारख्यांनी विचार केला पाहिजे की, आपला सम्राट व काही मूठभर राजकारणी लोक इतरेजनांवर (आणि स्वकीयांवरही) अत्याचार करत होते, त्यावेळी आपण काय करत होतो? चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांना योग्य दिशा स्वीकारायला आपण भाग पाडायचे की, परकीय देशांनी विध्यंसकारी शस्त्रास्त्रे वापरली यात समाधान मानायचे?

युद्धबंदी करारामुळे काही काळ जपानला आपले सैन्य उभारता आले नाही. पण गेल्या काही वर्षांत त्यांनी सैन्य उभारणीला सुरुवात केली आहे. व जपानी जनता ते सर्व मान्य करते आहे. उद्या त्यांनी अ‍ॅटम बाँब बनवला, तर डॉ. अभ्यंकरांना कसे काय वाटेल?

जपान व जर्मनी यांच्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांची वृत्ती व विचारसरणी मानवजातीच्या हिताची नसून नुकसानकारक आहे. अशी ठाम भूमिका ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध प्राणपणाने लढणाऱ्या गांधी, नेहरू, आझादांनीही घेतली होती. मौलाना अबुल कलाम आझाद त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. म्हणून 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या सूत्राचा अवलंब करून आपल्या ब्रिटिश साम्राज्यविरोधी लढ्यात जर्मनी, जपानची मदत घ्यावी, हा सुभाषबाबूंचा विचार त्यांना मान्य नव्हता. देशांतर करून ब्रिटिश सैन्यातील भारतीयांची आझाद हिंद फौज उभारण्याचे धाडस तरी नेताजींनी दाखवले. गोळवलकर आणि मंडळी मात्र त्यावेळी ब्रिटिशांचा पराभव करू पाहणाऱ्या जर्मनीच्या पराक्रमाची वर्णने मिटक्या मारीत वाचत होती. “जपानने ब्रह्मदेशातून भारतावर चाल केल्यास आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही बंदुका हाती घेऊ,” असे नेहरू, आझाद म्हणत होते.

जर्मनी, जपानच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांची फॅसिस्ट विचारसरणी आणि अमेरिकेचा अ‍ॅटम बाँब यांपैकी कशालाही इष्टापत्ती न मानण्याचा विवेक डॉ. अभ्यंकरांसारखे तरुण मित्र बाळगतील, तो सुदिन ठरेल.

- पन्नालाल सुराणा, परांडा.

******

उपक्रम स्तुत्यच

उशीरा का होईना, पण आपल्या 58व्या वर्षारंभ अंकाचे अभिनंदन करण्याकरिता हे पत्र.

आपला कार्यक्रम स्तुत्य व मला वाटते, अशा त-हेचे मूल्यावलोकन करण्याचा प्रथमच प्रयत्न आहे. भारताचे अद्यापही (58 वर्षी) दोन चेहरे दिसत आहेत. जोरदार आर्थिक वाटचाल व सुबत्ता आणि दीनवाणे अप्रगत. अनेक मूलभूत प्रश्नांच्या गराड्यात डुचमळणारा देश.

हा केवळ राजकीय अपघात नाही. सार्वजनिक मनोवृत्ती बऱ्याच अंशी यास कारणीभूत आहे.

- रा. द. तुळपुळे, शुक्रवार पेठ, पुणे.

******

‘साधना’ची प्रयोगशीलता आवडते 

‘साधना’साठी पत्र लिहिण्याचा बऱ्याच दिवसाचा प्रयत्न आज सफल होत आहे. विनोद शिरसाठ यांचा सापेक्षतावाद यांवरील लेख वाचला, तेव्हा पत्र लिहिणार होतो. कारण तो लेख अतिशय आवडला. त्याचा गाभा हा वैज्ञानिक होता, परंतु उपयुक्तता ही कौटुंबिक आणि सामाजिक आहे असो.

आज पत्र लिहिण्यासाठी चार मुद्दे मी निवडले आहेत. तसा मी साधनाचा नवीन वाचक आहे.

1. साधनाच्या मुखपृष्ठावरील नवीन प्रयोग, विशिष्ट फोटो आणि पुस्तकांची मुखपृष्ठे आकर्षक वाटतात. वाचकांस विचार करायला लावतात. 15 ऑगस्टच्या विशेषांकाचे मुखपृष्ठ तर उत्तमच! रवी मुकुल यांनी उर्ध्वगामी बाण लाल रंगाने, तर अधोगामी बाण निळ्या रंगाने काढला आहे. त्यांना यामधून, "प्रगती ज्या पद्धतीने होत आहे ती धोकादायक आहे. रक्तरंजित करणार आहे. तर स्वातंत्र्यावरील प्रेम, माणुसकी आणि उदात्तता (भूतदया, अहिंसा) कमीकमी होत चालली आहे" असे तर सूचित करायचे नाही ना? 

2. विशेषांकामधील अनेक लेख उत्तम आहेत. अवधूत परळकर यांचा संपादकीय लेख, गेल्या 57 वर्षांत भारतामध्ये बरे, वाईट काय घडले, याची व्यवस्थित मांडणी वाचकांपुढे ठेवण्यात यशस्वी झाला आहे. वाचकांच्या नक्कीच ते पचनी पडले आहे. दत्तप्रसाद दाभोळकरांनी विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि त्याचे भान अचूकपणे टिपले, वाचकांपुढे साध्या भाषेत मांडले. प्रतिभा रानडे यांनी स्त्रियांच्या हक्काबरोबर, प्रगतीबरोबर त्यांच्यातील वाईट गुणांवर बोट ठेवले आहे.

‘भ्रष्टाचारातील महिलांचा सहभाग’ दाखवून. भारतामध्ये स्त्रियांचे स्थान करवित्या, निर्मात्या, घडवित्या असे असताना त्यांचे मार्गक्रमण चुकते आहे, हेच यातून सिद्ध होते आहे. पुरुषांइतक्याच स्त्रियाही निर्लज्जपणे हे सगळं करतात, याची नोंद इथे विचार करायला लावते. विनय हर्डीकर यांचा लेख 'खमक्या' झाला आहे. 'सन 2050 सालात, या देशाचा टर्न राऊंड' होण्याचा कूस वळविण्याचा. 'पॉलिटिकल इकॉनॉमी’मध्ये उत्कर्ष व समृद्धीची शक्यता निर्माण होण्याचा क्षण येणार आहे, हा आशावाद माझ्यासारख्यास निश्चित सुखावणारा आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी काय कमावले. यामध्ये भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी मध्यमवर्गीय लोकसंख्या जेमतेम दोन टक्के होती. दीड, दोन कोटींचा हा मध्यमवर्ग आता 25 ते 30% झालाय. त्याची संख्या आज तीस कोटींच्या आसपास आहे. 2010 सालापर्यंत ती 60 कोटी होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर 35 कोटी लोक आजही उपाशीपोटी वा अर्धपोटी झोपतात! हे गमावले आहे, हे वास्तव (चांगले आणि वाईट) आमच्यापुढे ठेवले ते उत्तमच झाले.

सुनिल तांबे यांनी वृत्तपत्रांचे रूप उघडे करून दाखवले, हे बरे झाले! एकूणच अंक हा अतिशय वाचनीय झाला आहे. जे लोक नेहमी ओरडतात, भारत अधोगतीला गेला आहे, आणि जे लोक बडबडतात भारत लवकरच महासत्ता बनत आहे. त्यांना सणसणीत चपराक देण्याचे काम या अंकाने केले आहे.

3. 'गोमाशी' आणि 'संशयात्मा' हा 20 ऑगस्ट 2005च्या अंकातील लेख अप्रतिम आहे. आज आम्हास विचार करायला वेळ नाही. तर पुनर्विचार करायला कुठला वेळ आला. आणि विचार करायचा तर कसा? कशाचा? हा प्रश्न आहेच! तेव्हा विचार कसा करावा, हे वा. म. जोशींनी स्वातंत्र्यपूर्व काळात शिकविले. त्यांच्यासारख्या अनेक विभूती होत्या म्हणून त्या काळातील आणि स्वातंत्र्य चळवळ काळातील लोक (सर्वच नाही) विचार करू शकले, कृती करू शकले. कदाचित हेच विचार आजही उपयुक्त ठरतील. हे लेखकाने यातून मांडले.

तसेच न्याय, नीती आणि ज्ञान याच्या स्वच्छ, निर्मळ व्याख्या देणारा सॉक्रेटिस आजच्या युवा पिढीपुढे आणण्याचे चांगले काम लेखकाने केले आहे. "जोपर्यंत देशातील लोक न्यायव्यवस्था मान्य करतात, मग ती चुकीची असली तरीही, जोपर्यंत न्यायपद्धत नागरिक सर्वानुमते बदलवीत नाहीत, तोपर्यंत तिचा आदर राखला पाहिजे.” असे 'न्याया’बाबत बोलणाऱ्या सॉक्रेटिसचा स्वतंत्र विचार करणे आणि ते व्यक्त करणे (अभिव्यक्ती स्वातंत्र्य). याबाबत जास्त काय सांगायचे? त्याने अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेले आजही किती मौलिक आहे, हे लेखातून जाणवते.

आज भारतात लोकशाही नांदते आहे. परंतु पूर्णत्वाने नांदत नाही. अशा वेळी एखादी व्यक्ती, घटक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ इच्छित असेल, तर त्यातील संभाव्य धोके, अडचणी काय असतात हे या लेखातून लेखकाने अगदी खंबीरपणे मांडले आहे.

लेखाचा सर्वात यशस्वितेचा मुद्दा म्हणजे सामाजिक, न्याय, स्वातंत्र्य या पद्धतीचा अवलंब करून जगणारा कुणी असेल, तर त्यास हा लेख वाचून बळ मिळतेच मिळते. मग त्यास म्हणावेसे वाटेल. "Yes! We are on right direction!"

साधनाकडून असेच Inspiration देणारे साहित्य वाचकांपुढे यावे आणि विचारांचे बाळकडू 'साधना’मधून मिळत रहावे यासाठी शुभेच्छा!

- प्रा. प्रल्हाद जायभाये, नाशिक.

******

वाचकांच्या सूचनांबाबत कार्यवाही करावी

अलीकडील पाच-सहा वर्षांपासून ‘साधने’तील विविध लेख व मजकुराची निवड अतिशय चोखंदळपणे केली जाते. अंकामध्ये उपयुक्त व वाचकांची जिज्ञासा पूर्ण करणाऱ्या माहितीचा समावेश करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याकडे संपादकांचा कटाक्ष असतो. 15 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला, ‘साधना'चा वर्धापन दिन विशेषांक बेहद्द आवडला! अंकाच्या वार्षिक वर्गणीमूल्याच्या तुलनेत अंकाची उपयुक्तता अधिक वाटते.

‘अतिथी संपादक' या अभिनव संकल्पनेमुळे साप्ताहिकाचे वेगळेपण जपले जात असल्याने या पद्धतीचा अवलंब करण्यास काहीच हरकत नाही. यातून भावी संपादक घडवले जातील. अंकात मांडण्यात आलेल्या संकल्पना व विचारांबाबत वाचकांनी मित्रमंडळी, आप्तजण इत्यादींना माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा करावी व त्यांना 'साधना’चे वर्गणीदार होण्याविषयी सुचवावे.

अंकासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाचा दर्जा सुधारावा, वेळोवेळी वाचकांनी केलेल्या सूचना संपादक व व्यवस्थापकांनी केवळ वाचून समाधान न मानता त्या दिशेने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न व्हावा, असे सुचवावेसे वाटते. 'साधना’च्या प्रगतीसाठी शुभेच्छा!

- सुहास पाटील, उत्तर, कोल्हापूर.

*****

कमावले, ‘गमावले.’ यात हे खटकले 

अर्थशास्त्र, शिक्षण, उद्योग, पर्यावरण, करमणूक व इतर अनेक महत्त्वाच्या विषयांचा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सखोल आढावा घेण्याचा प्रयत्न ‘साधना'च्या 58 व्या वर्षारंभीच्या अंकात केला असून, तो फार अभ्यासनीय आहे यात शंका नाही. प्रत्येक वाचकांस या विशेषांकातून नक्की वाचनीय मिळाले, हेच या प्रवासाचे यश! राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या विदारक स्थितीचे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केलेले वर्णन मनातील विचारांना मोकळी वाट करून देणारे वाटले. व्यापार उदीम जगतावरील मंगेश नाबर यांचे विचार व 'स्वातंत्र्योत्तर चित्रपट' हा मिलिंद चंपानेरकर यांचा लेख यांनी माझे लक्ष अधिक वेधून घेतले.

मुंबईसह वापी, अंकलेश्वर (गुजरात), हैद्राबाद, आत्ताचे छत्तीसगड, दिल्ली आसपास या ठिकाणी अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय असे फार महत्त्वाचे उद्योग कार्यरत होते. त्यामध्ये प्रामुख्याने रसायने, औषध निर्मिती (बल्क ड्रग्स), धातू (तांबे, लोखंड इत्यादी) शुद्धीकरण यांचे मोठे उद्योग समाविष्ट होते. विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण, बेलापूर व अंबरनाथ क्षेत्रात रसायने (रंग व डाईज), औषधे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे कारखाने 1970 ते 85 या काळात होते. यांमधील अनेक उद्योग आता बंद पडले असून, लाखो कामगार घरी बसलेले आहेत. हे जणू कमीच होते, म्हणूनच की काय! जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये भारतातील अनेक कंपन्यांनी (विशेषतः डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी यांसारख्या औषध कंपन्या) आपली उत्पादनकेंद्रे बांगलादेश, तैवान, इंडोनेशिया येथे हलवली आहेत. त्यामुळे या कंपन्यांना आपली उत्पादने प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कमी मनुष्यबळ वापरून पूर्वीपेक्षा कमी खर्चात करता येतात. आणि त्यांची आर्थिक उलाढाल जोमात चालू आहे. परिणामतः भारतातील कामगार बेकारीत लोटले जाऊन, परदेशी चलनात कमाई चालू राहिल्यामुळे या कंपन्या मालदार झाल्या आहेत. परंतु ज्या भारतात वरील उत्पादनाच्या विकासाची प्राथमिक कामे झाली, तेथे लाभ झालेला नाही. याउलट ज्यांच्या उत्पादनक्रियांना युरोप, अमेरिका इत्यादी प्रदेशांत पर्यावरणास धोका म्हणून बंदी आहे, पण अंतिम उत्पादन मात्र उपयोगी आहे, अशी उत्पादने या देशांसाठी भारताचेच पर्यावरण वेठीला धरून भारतात तयार केली जातात. यापेक्षा अधिक क्रूर थट्टा कोणती असेल? मंगेश नाबर यांना व्यापार उदिमांचा मंत्र सांगताना वरील धगधगत्या वस्तुस्थितीवर शोधक प्रकाश टाकणे, जरूरीचे होते असे वाटते. शेती व फळबागा यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामुळे जमिनीत खार साठून ती कालांतराने पूर्णपणे नापीक होण्याचा धोका असतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळून जैविक खते (बायो फर्टिलायझर) वापराने हा धोका काबूत येणे शक्य आहे. हा गंभीर प्रश्न 'प्रगती आणि पर्यावरण' या लेखातून अ. पां. देशपांडे यांना मांडता आला असता, असे वाटले.

‘स्वातंत्र्योत्तर चित्रपट' या विषयावरील मिलिंद चंपानेरकर यांचा प्रदीर्घ लेख चित्रपट विश्वासंबंधी वेगळ्या दिशेतून विचार करण्यास मदत करतो. 1950 ते 70, 1970 ते 85 व 85 पुढील कालखंडातील चित्रपटांच्या हाताळणीवरील विश्लेषण वाचनीय वाटले. या लेखात चंपानेरकरांनी केवळ हिंदी चित्रपटांचा आढावा का घेतला? हे कळत नाही! मराठी, बंगाली, चित्रपटांची याच काळातील वाटचाल वाचकांसमोर मांडण्याइतकी उल्लेखनीय वाटली नाही का? लेखाचे शीर्षक 'स्वातंत्र्योत्तर हिंदी चित्रपट' असते, तर हा प्रश्न करण्याचे कारण नव्हते. याच विशेषांकात इतरत्र सुनील कर्णिक यांनी आपल्या लेखात मराठी ग्रंथनिर्मितीविषयी नाराजीचा सूर काढला असला, तरी वेदना प्रामाणिक आहेत. परंतु चित्रपट क्षेत्रात भालजी पेंढारकर, राजा परांजपे, दादा कोंडके यांचे चित्रपट व हिंदी व मराठी चित्रपट विषय समर्थपणे हाताळणारे व्ही. शांताराम यांवर पुष्कळ लिहिण्यासारखे आहे, असे माझ्याप्रमाणे इतर वाचकांनाही वाटले असेल. खुद्द साने गुरुजींच्या 'साधना'मध्ये 'श्यामची आई’ चित्रपटास मिळालेल्या पहिल्या सुवर्णकमळ पारितोषिकाचा उल्लेख स्वातंत्र्योत्तर चित्रपटांचा आढावा घेताना नसावा, याची खंत तर सर्वांनाच वाटली असेल.

- डॉ. श्रीकांत परळकर, मुंबई.

******

‘आसू आणि हासू'

5 सप्टेंबर शिक्षक दिन, आमच्या शाळेत वेगळेपणाने, अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे ठरले. ही अभिनव पद्धत होती 'सृजन आनंदा’च्या लीला पाटील यांची. ती कल्पना अशी की, या दिवशी पालकांनी शिक्षकांची भूमिका पार पाडायची.

शिक्षणरूपी त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू म्हणजे विद्यार्थी, शिक्षक व पालक. हे तीन शिरोबिंदू सर्व शाळांत एकत्र येतात असे नाही. म्हणून पालकांना समाविष्ट करून घेण्याचा, त्यांच्या शाळेबद्दलच्या कल्पना जाणून घेण्याचा. हा प्रयत्न होता.

झाले, कार्यक्रम ठरला, नोटीस लावली. त्यानुसार निवडक पाच पालकांना तासिका देण्यात आल्या. सर्वच पालक या

उपक्रमाबद्दल उत्साही वाटत होते. या उत्साहात परिपाठांपासून 'वंदे मातरम्’ पर्यंत कामकाज पाहिले.

संध्याकाळी समारोपाचा कार्यक्रम होता. प्रत्येक पालक, शिक्षक प्रफुल्लित दिसत होता. कारण एक दिवस का होईना, शिक्षक होण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. त्यातील एका पालकाने तर याची तुलना ‘नायक' चित्रपटातील अनिल कपूरशी केली, पण मी म्हणालो, “ते ‘रील' लाईफ आहे, हे 'रियल' लाईफ आहे."

मनोगत व्यक्त करताना त्यातील एक पालक शिक्षक एक वाक्य बोलते न बोलते तोच रडू लागली. मुले शांत झाली, शिक्षक एकमेकांकडे पाहू लागले. पण त्या रडण्याचा, हूंदक्यांचा अर्थ मला कळला होता.

तो हुंदका होता त्या स्त्रीच्या दबलेल्या इच्छांचा, फुलण्यापूर्वीच मारल्या गेलेल्या भावनांचा, मनाच्या एका कोपऱ्यात राहिलेल्या महत्त्वाकांक्षांचा, लग्नापूर्वी स्वच्छंदी, हरहुन्नरी असलेली मुलगी, काहीतरी करून दाखविण्याची इच्छा असलेली मुलगी लग्नानंतरच्या बंधनांमुळे आपल्या भावना मारत जगते.

तिची इच्छा होती शिक्षिका बनण्याची आणि या उपक्रमामुळे त्या पालक शिक्षिकेचे शिक्षिका होण्याचे स्वप्न एक दिवस का होईना पूर्ण झाले होते.

त्यावेळी माझ्याही एका डोळ्यात ‘आसू' तर, दुसऱ्या डोळ्यात 'हासू' उभे राहिले. आसू होते आपल्या भारतातील स्त्रीच्या सोशिकतेच्या जिण्याचे आणि हासू होते ते त्या दबलेल्या भावनांना कोठेतरी वाट करून देण्यात आमचा उपक्रम यशस्वी ठरला त्याचे.

- संजय शामराव रेंदाळकर, इचलकरंजी.

******

पालकांचेच शिक्षण व्हायला हवे 

आपल्या अंकात येणारे श्री. रमेश पानसे यांचे बालशिक्षणविषयक लेख अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्या प्रती काढून त्या बालवाडीरूपी कोंडवाड्यात मुलांना सक्तीने डांबणाऱ्या पालकांना विनामूल्य वाटावयास हव्यात. श्री. पानसे यांच्या एका लेखात सांगितले होते की, 'चेतासंस्था व स्नायू यातील साहचर्य' वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांना लिहिणे शिकवू नये! आमच्या गावात ज्यूनिअर केजीच्या वर्गात 1 ते 100 आकडे अंकी व अक्षरी इंग्रजीतून लिहिण्यास लावणाऱ्या एका शाळेच्या मुख्य बाईंना मी हा लेख दाखवला. त्या म्हणाल्या, “हे मलाही माहीत आहे. पण आम्ही हे शिकवत नव्हतो, त्यावेळी इतर शाळेतील मुलांना एवढे करायला लावतात, मग तुम्हीच आमच्या मुलांना 'मागास' का ठेवता?” अशा तक्रारी करून पालकांनी मुले शाळेतून काढून नेली होती! म्हणजे मुलांच्या आधी पालकांचेच शिक्षण व्हायला हवे आहे.

- डॉ. शरद अभ्यंकर, वाई, जि. सातारा.

******

आमचा संकल्प

‘जीवन शाळा’ हा अभिनव प्रयोग आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वतीने ‘गावसखा’ कार्यकर्त्यांसाठी प्राथमिक स्तरावर भरीव शिक्षणासाठी पोषक मदत व प्रत्याभरण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन वर्ग पार पडले.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम तालुक्यांतील आठ गावांतून सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे.

जि. प. शाळांतून प्राथमिक शिक्षण दिले जाते. परंतु त्यात जिवंतपणा, सक्षमता व कष्टाला मोल देणारे काही असतेच असे नाही. त्यामुळे ‘गावसखा'तर्फे सकाळी व सायंकाळी, अर्थात शालेय वेळ सोडून नियमित शिक्षणच देण्याचे योजिले आहे. त्यामुळे विद्यार्थी घरी काहीही करीत नाही. शिक्षक परगावावरून जाणे, येणे करतो, म्हणून गावचाच 'गावसखा' प्राथमिक शिक्षण दर्जेदार करण्यास मदत करेल.

जीवन शाळा चार भिंतीच्या आड राहणार नाही. गावातील चौकात, समाज मंदिरात, मोकळ्या मैदानात पडवीत राहील. शाळेचे कार्य सर्वांच्या समक्ष घडेल.

नियमित शाळेला कोणतीही बाधा न करता सकाळ, सायंकाळी व सुट्टीच्या दिवशी एक तासाची किंवा मुलांना आवडेल त्या वेळेपर्यंत सदर शाळा चालेल.

निवडलेले गाव लहान असेल, मुलांचे शिक्षण तरी नीट व्हावे. लेखन, वाचन, गणित यावे. संस्कार, चांगल्या सवयी, स्वच्छता, टापटीप, रुजाव्यात. अशी इच्छा मनात धरून संस्थेने ध्येय ठेवले आहे.

संस्था यावरच थांबणार नाही. महिलांचे बचत गट, पुरुषांचे बचत गट, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, ग्रामसभेचे महत्त्व, गावाच्या समस्या व त्यावर सामूहिक पद्धतीने उपाययोजना यांवरदेखील ‘गावसखा' चिंतन करून निर्णय घेईल.

गावातील व्यसने, हागणदारीपासून मुक्ती, सिंचनाच्या सामूहिक व विनाअनुदानातून, श्रमांतून गावाच्या समस्यांची सोडवणूक ह्या कामांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.

मार्गदर्शन वर्गातून भाषा, गणित, इंग्रजी व संस्कारगीते यांवर जास्तीत जास्त मार्गदर्शन देण्यात आले.

- पी. बी. कानडे, कुरखेडा, गडचिरोली.

******

बारबाला आणि मनोरंजन

डान्स बार संबंधात बरीच चर्चा झाली आणि अखेर ही बंदी अस्तित्वात आली आहे. सर्वसाधारण जनतेला ही बंदी म्हणजे एक स्वागतार्ह घटना वाटत आहे. तसेच अशा प्रकारच्या कायदेशीर बंदीमुळे स्त्रीचा सामाजिक दर्जा घसरण्याला आळा बसेल, अशी आशा वाटते. या बंदीसंदर्भात, डान्स बारमध्ये जे ग्राहक जातात, त्यांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत. पण बातम्या आहेत की, आता डान्स बारऐवजी खाजगीरित्या बंगल्यांमधून वगैरे बारबालांचे कार्यक्रम घडवून आणले जात आहेत आणि त्याचाच आधार घेऊन बारचालक म्हणत आहेत की पहा, आमच्या बारमधून या बारबाला ग्राहकांपासून अंतर तरी राखून होत्या, आता ते अंतर नाहीसे झाले, तर त्यांचे शोषण अधिकच होईल. (म्हणजे शोषण होते हे मान्य आहे तर!) बारचालकच नव्हेत, तर बारबालाही या बंदीविरुद्ध असून कोर्टामध्ये लढाई देण्याची त्यांची तयारी सुरू असल्याच्याही बातम्या आहेत. हा त्यांच्या म्हणजे बारबालांच्या रोजीरोटीचा, म्हणजे जगण्याच्या हक्काचा प्रश्न आहे. असे एकूण या प्रकरणाला स्वरूप येत असल्यामुळे यात त्रयस्थ पार्टीला काही भूमिका घेता येणे अवघड असणार आहे. या एकूण प्रकारात बरेच तिढे अजूनही आहेत. पण जर मुंबईचे शांघाय होणार असेल, तर कोणी सांगावे, या बारबालांना अधिक पैसा, मिळेल. पूर्वीच्या काळी गणिका असत, वसंतसेना, आम्रपाली, चंद्रलेखा वगैरे. आणि त्यांच्या प्रासादात अभिजनवर्ग एकत्र येऊन तात्त्विक चर्चेबरोबर, नृत्य, गायन आदी कलांचा आस्वाद घेत. त्या आपल्या परंपरेचे पुनरुजीवन होऊ शकेल. या अभिजनांचे कुल, पवित्र व शुद्ध राखण्यासाठी गृहस्वामिनी असत, आणि गणिकांना पत्नीचा दर्जा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसे.

खरे, तर मनोरंजन करणे हा व्यवसाय, ज्याला सादरीकरणाची कला, परफॉर्मिंग आर्टस् म्हणतात, त्यासाठी उच्च प्रतीचे कलागुण अंगी असावे लागतात. त्या कलागुणांच्या विकासासाठी श्रम घ्यावे लागतात. तपस्या करावी लागते व गुरुचे मार्गदर्शन आवश्यक असते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अशी कला सादर करणारा कलावंत हा श्रोत्यांहून, प्रेक्षकांहून वरच्या दर्जाचा असतो आणि कला सादर करणाऱ्यांमध्ये आणि कलेचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये स्त्री, पुरुष हा भेद नसतो.

टीव्हीवर बारबालांच्या नृत्याचा जो प्रकार दाखवितात. त्यातून नेमका आनंद काय मिळतो, हेही लक्षात येत नाही. ना त्यात भांगड्याचा जोश, ना गरब्याचा ताल, ना लोकनृत्याचा जिवंतपणा. बारबालांचे नृत्य हे मनोरंजनाचे साधन नसून स्वतः बारबालाच मनोरंजनाचे साधन असतात. पुरुषप्रधान समाजाचेच हे प्रगटीकरण असते. स्त्रीचे स्थान दुय्यम हे सूत्र त्यात प्रभावी असते आणि आपले सामाजिक धार्मिक संस्कार इतके बळकट आहेत की, राज्यपालांच्या पदावरचा माणूससुद्धा म्हणतो की, वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी.

अशा वेळी महात्मा गांधींचे स्मरण झाल्याशिवाय रहात नाही. त्यांनी स्त्री, पुरुष समान आहेत, हे तर निःसंदिग्धपणे सांगितलेच, पण स्वतः प्रयोग करून सांगितले की, ब्रह्मचर्य पाळायचे ठरविले तर, पत्नीशेजारी झोपूनसुद्धा माणूस ब्रह्मचर्य पाळू शकतो. ते महात्मा होते. पण त्यांनी केलेले प्रयोग तर माणूसपणाचेच होते ना? स्त्रियांना भोगवस्तू न मानता माणूस म्हणून वागवावे, हाच संदेश त्यातून मिळतो. हा संदेश केवळ स्त्रियांना नसून पुरुषांनासुद्धा आहे. बघू या, कोर्टाच्या लढ्यात कायदा काय म्हणतो ते.

- सुलोचना वाणी, पिंपरी, पुणे.

******

'वंचितांचे शिक्षण' अंक आवडला 

'साधना' वंचितांचे शिक्षण हा विशेषांक वाचनात आला. शिक्षणाने जग जिंकता येते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. माझी माझ्या ठाकर समाजातील सर्व बांधवांना या लेखाद्वारे कळकळीची विनंती राहील, की आपण आपल्या मुलांना, पाल्यांना शिक्षण द्या. परंतु ते अर्धवट देऊ नका. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी, स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा विकास करण्याइतपत द्या.

शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या या समाजापर्यंत पोहचवण्यात अडचणी येतात. त्यांचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी सुशिक्षित व्हा. शिक्षण घेताना शासन कपडे, पाठ्यपुस्तके, उपस्थितीभत्ता, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, अशा विविध योजना राबवते. परंतु शिक्षणाअभावी त्याचा लाभ घेता येत नाही, त्यासाठी योग्य शिक्षण द्या, परिपूर्ण शिक्षण द्या.

माझे विचार व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे. मी अशा प्रकारच्या समाजाविषयीच्या लेखनाची खूप वाट पहात होतो. शिक्षणामध्ये अठरा वर्षें सेवा करीत असताना समाजाविषयी असणारी तळमळ, जिज्ञासा मला प्रकट करता आली नव्हती. 

आदिवासी समाजामध्ये ठाकर, म. कोळी, कातकरी या दुर्लक्षित समाजासाठी थोडे फार विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ सोडले तर, या समाजाविषयी अतिशय कमी प्रमाणात लेखन झाले आहे. समाजाच्या विकासासाठी ही एक उणीव होती. समाजाच्या जडणघडणीसाठी लेखन हवे होते. परंतु त्यासाठी कोणी धजावत नव्हते. समाजाला योग्य आणि निर्भीडपणे दिशा देणारी व्यक्ती आजही समाजात नाही. ही दुःखाची गोष्ट आहे. पहिल्यापासून डोंगरदऱ्यांत राहून शिकार करणे, भटकंती करणे या गोष्टींनी समाजाला दुबळे केले आहे. त्यावर मात करण्यासाठी माझ्या या आदिवासी समाजातील सुशिक्षितांना विनंती राहील की, आपण कुठेही काम करत असाल, प्रत्यक्ष समाजप्रबोधनासाठी पुढे येऊन, समाजाचा अभ्यास करून त्यांच्या अडचणी, उणीवा. यांचा अभ्यास करून या आदिवासी समाजाला योग्य न्याय देण्याचे काम आपण केले पाहिजे.

मी एक प्राथमिक शिक्षक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अकरावीचे शिक्षण चालू असताना मध्येच शाळा सोडावी लागली आणि तांत्रिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आय. टी. आय.चा अभ्यास पूर्ण केला. माझ्या घरच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नोकरीची आवश्यकता होती. नंतर डोंगराळ भागासाठी हंगामी शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. आणि अशातच माझे डी. एड.चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी करीत असताना कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, भावाचे, बहिणीचे शिक्षण केले.

मी स्वतः माझ्या जि. प.च्या शाळेत एक प्रशासक म्हणून काम करीत आहे. अतिशय प्रामाणिकपणे मिळालेला शिक्षणाचा वसा सांभाळत आहे. हे सांभाळत असताना काही उच्चभ्रू समाजाकडून योग्य अशी वागणूक मिळत नाही. हलक्या जातीचे, मागासलेपणाचे आदिवासी यांचा त्यांच्या मनावर झालेला पगडा अजूनही काही अंशी पहायला, अनुभवायला मिळतो. त्यामध्ये बराचसा फरक झालेला आहे. मी शाळेचे कामकाज तसेच मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष देत आहे. अतिदुर्गम भागात काम करताना समाजाकडून एक चांगला शिक्षक म्हणून मान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

माझ्या हातून गेल्या अठरा वर्षांच्या सेवेत अनेक गुणवान विद्यार्थी तयार झाले. इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, कामगार. या गोष्टी सांगताना, मला एक आत्मिक समाधान मिळते. कारण हे विद्यार्थी मला अधूनमधून केव्हातरी भेटतात. मी केलेल्या मार्गदर्शनाचे, शिक्षणाचे कौतुक करतात.

मला काही गोष्टी माझ्या आदिवासी समाजासाठी नमूद कराव्याशा वाटतात. त्या पुढीलप्रमाणे, मुलांना खूप शिक्षण द्या, की जे शिक्षण त्यांच्या आयुष्याला पुरेल. दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनाधीन होऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे अत्याधुनिक युगाचा विचार करा. समाजाचे प्रबोधन करा, वाईट गोष्टींचा त्याग करा. नवनवीन गोष्टी, तंत्रे, आचारविचार आत्मसात करा. समाजाचा अभ्यास करा. आपल्या समाजाला कमी लेखू नका. तो इतर समाजासारखाचा समजा. चांगल्या गोष्टींकडे जाण्यास प्रवृत्त करा. समाजाला मुख्य प्रवाहात आणा. मुलींना खूप शिकवा. त्यांना पुढे जाऊ द्या. या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी फक्त एकच हत्यार वापरा आणि ते म्हणजे 'शिक्षण'.

- चंद्रकांत श्रीपती काळे

गणेशनगर 1, चाकण, ता. खेड.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके