डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझ्यासारख्या वाचकांनी यापूर्वी अनिल अवचट, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, ‘बदलता भारत’ लिहिणारे भानू काळे किंवा ‘33 लक्ष पाऊले’ हे पुस्तक लिहिणारे दि.बा.मोकाशी यांचे व इतरांचेही लिखाण वाचल्याने, मूळ प्रश्नाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न या शोधयात्रेच्या निमित्ताने झालेला दिसत नाही. या शोधयात्रेचा शेवटही तेवढासा भावनात्मक झालेला नाही. लेखासोबत ठिकठिकाणच्या प्रकाशचित्रांचाही खूप चांगला वापर करता आला असता, तो का केला गेला नाही, याचाही खुलासा या शोधयात्रेतून होत नाही.

आग्रह चुकीचा, पण टीका सद्‌हेतूने!

बाबा भांड हे मराठी विश्वातले एक सुजाण साहित्यिक आणि उत्तम प्रकाशक आहेत. त्यांनी ‘साधना’: बालकुमार दिवाळी अंकातील दासू वैद्य यांच्या ‘गावात एक पत्र आलं’ या चांगल्या कथेवर विकृत चित्रणाचा आरोप करावा हे विचित्र वाटले. (संदर्भ: साधना : 12 डिसेंबर 2009).

सामाजिक संघटनांबरोबर मी ग्रामीण भागात थोडाफार हिंडलोय. दासू वैद्य यांनी समाजाचं जे वर्णन केलंय ते अवास्तव आहे असं मला तरी वाटत नाही. आपलं दारिद्र्य, स्वच्छतेबाबतची बेपर्वाई, अंधश्रद्धा, अडाणीपण लपवून ठेवायची वृत्ती अनेकांत आढळते. ही वृत्ती समाजसुधारणेच्या कार्यात अडथळे निर्माण करते. मागे नर्गिसदत्त यांनी संसदेत निवेदन करून सत्यजित रायचे चित्रपट परदेशी प्रदर्शित करायला विरोध केला होता. देशाच्या दारिद्रयाचे प्रदर्शन परदेशी लोकांसमोर होता कामा नये, असं नर्गिसबार्इंचं म्हणणं होतं. बाबा भांड यांचं पत्र वाचताना मला त्या घटनेची आठवण झाली.

सद्य वास्तव मुलांसमोर यायलाच पाहिजे. चांगलं कोणतं, गैर कोणतं याची जाण अनेक मुलांपाशी असते. आणि नसेल तर तशी शिकवण त्यांना स्वतंत्रपणे दिली जावी. त्यासाठी साहित्यात कोणत्याही स्वरूपाची लपवाछपवी करायची गरज नाही. बाहेरील वास्तव सर्जनशीलपणे वाङ्‌मयातून परिणामकारकपणे मांडणं, हे साहित्यिकांचं प्रथम कर्तव्य आहे. बाबा भांड हे स्वत: आपल्या साहित्यातून आणि प्रकाशनांतून असे करीत आले आहेत. आमच्यासारख्मांना त्यांच्याविषयी वाटणारा आदर त्यातूनच जन्माला आला आहे.

दासूंच्या लेखनातील तपशीलात किरकोळ दोष असतील; काही ठिकाणी अतिशयोक्तीही असेल; मान्य...पण त्यांची भूमिका प्रामाणिक आहे, ग्रामीण सांस्कृतिक परिसर त्यांना जसा दिसतोय तसा मुलांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बाबा भांड यांनी बदललेली खेडी पाहिली असतील. आमच्या नजरेला काही ती पडलेली नाहीत. ग्रामीण भागांइतकाच अडाणीपणा आज शहरात आहे. आणि दिवसेंदिवस तो वाढतो आहे.

सत्यसाईबाबा थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुक्काम करू लागलेत, तथाकथित सुशिक्षित समाजातले हे भीषण शैक्षणिक-सांस्कृतिक दारिद्र्य आज विद्यार्थ्यांसमोर कोणीतरी ठेवायला पाहिजे.

असो... या पार्श्वभूमीवर बाबा भांड यांचा आग्रह मला चुकीचा वाटला. मात्र दासू वैद्य यांच्या लेखनावर त्यांनी केलेली टीका सद्‌हेतूने केली आहे हे मला जाणवलं. त्यांच्या आक्षेपासंदर्भात व्यक्त केलेल्या माझ्य़ा या मतांतरामागील सद्‌हेतू ते लक्षात घेतील, अशी आशा करतो.

- अवधूत परळकर, माहीम, मुंबई 26.

 

असत्य आणि अन्यायकारक विधान!

14 नोव्हेंबर 2009 च्या ‘साधना’ अंकात डॉ. द. ना. धनागरे यांचा विद्यापीठातील अध्यासनांबाबत एक विचारप्रवर्तक लेख आहे. या लेखात मी लिहिलेल्या ‘पुणे विद्यापीठाचा इतिहास’ या पुस्तकाचा दोनदा संदर्भ दिलेला आहे. मात्र पुढे त्यांनी एक विधान केलेले आहे. ‘‘आज कार्यरत असलेल्या 11 अध्यासनांपैकी, नामदेव अध्यासन सोडल्यास, कुठल्याही इतर अध्यासनांचा साधा नामोल्लेखसुद्धा पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 10 फेब्रुवारी 1999 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘अधिकृत इतिहासा’त आढळत नाही याचे आश्चर्य वाटते.’’ या विधानासंदर्भात प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. गंमत म्हणजे या विधानाच्या जेमतेम चार-पाच ओळी आधी स्वत: डॉ. धनागरे यांनीच लो.टिळक अध्यासनाबाबत माझ्या पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे! जिज्ञासू वाचकांनी कृपया माझ्य़ा पुस्तकातील पृ.108, 129, 136, 150, 152, 154, 155 आणि 156 वरील अध्यासनांचे उल्लेख पहावेत. नामदेव, ज्ञानेश्वर, टिळक, गांधी, सावरकर, हिराचंद नेमचंद, विखे पाटील अशा सात अध्यासनांचे हे नामोल्लेख पाहिले तर डॉ. धनागरे यांचे विधान असत्य आहे हे सिद्ध होते. त्यांनी हे हेतुपूर्वक केले असेल असे मला वाटत नाही, पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व संशोधकाकडून माझ्यावर नकळत का होईना अन्याय झाला हे निश्चित! पुस्तक प्रकाशित झाल्यावर स्थापन झालेल्या अध्यासनांचा पुस्तकात नामोल्लेख करण्याइतका भविष्यदर्शी मी नाही, हेही नम्रपणे नमूद करतो.

राजा दीक्षित, पुणे.

 

अध्यासनांचे फक्त नामोल्लेखच!

डॉ. राजा दीक्षितांनी ‘मी असत्य आणि अन्यायकारक विधान केल्याचा’ माझ्यावर आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात वेगवेगळ्या पृष्ठांवर सात अध्यासनांचा (ज्ञानेश्वर, नामदेव, सावरकर, विखे पाटील, टिळक, म.गांधी, हिराचंद नेमचंद) फक्त उल्लेख केला आहे. आणि फार तर ती कोणत्या वर्षी/ तारखांना स्थापन झाली किंवा त्यांचे उद्‌घाटन कोणी केले एवढाच तपशील दिला आहे. या सातपैकी दोन अध्यासनांच्या नामोल्लेखांची मी दखल घेतली होतीच, मात्र अध्यासनांच्या कामांचे स्वरूप कोणते? नेमलेल्या प्राध्यापकांची नावे, त्यांचे कार्य, अध्यासनांतर्गत केलेले संशोधन प्रकल्प, इतर उपक्रम, त्यासाठीचे निधीसंकलन, प्राध्यापकांच्या नेमणुकीपूर्वीची निवडप्रक्रिया, अध्यासनांच्या कामाचे ताळेबंद/अहवाल व्यवस्थापन परिषद आणि सिनेटसमोर ठेवले गेले होते किंवा नाही, अध्यासनांसाठी विद्यापीठाने स्वत:च्या निधीतून केलेली तरतूद, अध्यासने स्थापण्याबाबत अधिकार मंडळांमध्ये धोरणात्मक चर्चा झाली होती किंवा नाही, असे कुठलेच तपशील डॉ. दीक्षितांच्या पुस्तकात मिळत नाहीत, हे मला सुचवायचे होते. पण ‘नामोल्लेखसुद्धा नाही’ या माझ्या अभिप्रायाचा डॉ.दीक्षितांनी फारच शब्दश: अर्थ घेतला आहे असे दिसते. त्यांनी सात अध्यासनांचा ‘नामोल्लेख’ तेवढा केलाय हे मी मान्य करतो.

- द. ना. धनागरे, पुणे.

 

शोधयात्रा : अपूर्ण समाधानाची वास्तवकथा!

संवेदनशील लेखक राजा शिरगुप्पे यांनी ग्रामीण महाराष्ट्राची सद्य:स्थिती समजून घेण्यासाठी केलेल्या दहाजिल्ह्यांमधील शोधयात्रेचा सविस्तर वृत्तांत ‘साधना’च्या दिवाळी अंकात वाचला. हा वृत्तांत वाचताना राजा शिरगुप्पेंमधील लेखक-कलावंत हा तरल संवेदनशील पत्रकार असल्याचे जाणवत होते. परंतु माझ्यासारख्या युवा वाचकाला, ज्याने अजूनही संपूर्ण महाराष्ट्र जवळून पाहिला नाही त्याला, या शोधयात्रेमधून बरेच काही विषय हाती लागावेत अशी अपेक्षा होती. संपूर्ण वृत्तांत वाचून झाल्यावर मला मनापासून वाटले की, यातील जवळपास नव्वद टक्के चित्रण कोणत्याही एका जिल्ह्याला सहज लागू होईल. आज कोणताही एक जिल्हा डोळ्मांसमोर घेऊन त्या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील व शहरातील शिक्षणाची तुलना, रस्ते, वीज, पाणी, आर्थिक उत्पन्न, रोजगार, विकासाचा असमतोल, जनतेची वाचन तथा सांस्कृतिक भूक यामध्ये प्रचंड तफावत जाणवतेच. ग्रामीण महाराष्ट्राचे चित्रण करताना अनेक मुद्यांना या वृत्तांतामध्ये स्पर्शही झालेला दिसत नाही.

मुळात महाराष्ट्राचा जो असमतोल विकास आज दिसतो आहे, तोच या वृत्तांताचा मुख्य गाभा आहे.  हा असमतोल विकास का झाला, याची नेमकी कारणमीमांसा यात दिसत नाही. तसेच कोणत्या भागातील नेमके कोणते प्रश्न आज ऐरणीवर आहेत, ते कसे सोडविता येतील, यासाठी महाराष्ट्रातील सज्जन शक्तीने आज कोणते प्रयत्न करावयास हवेत, याचेही चित्र या शोधयात्रेतून समोर येत नाही. देशाचे, राज्याचे नाव माहीत असणे, स्वातंत्र्यदिन कधी येतो? भारत कुठे आहे? मुंबई बघितली का? जागतिकीकरण म्हणजे काय? महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव माहीत आहे का? गुजरातमधील दंगल... मुंबईमधील बाँबस्फोट... इत्यादींची माहिती रोजच्या जीवनमरणाची लढाई लढणाऱ्यांना माहीत ठेवण्याची आवश्यकता आहे का? (असेच काही प्रश्न: उत्तर देऊन पहा - संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या 106 व्यक्तींची नावे काय? महिला आपल्या कपाळावर कुंकू वर नि हळद खाली का लावतात?) माध्यमांमध्ये आपण काम करीत असल्याने आपणा सर्वांना हे प्रश्न माहीत असणे म्हणजे सामान्यज्ञान सजग असण्यासारखे आहे. पण ग्रामीण भागातील या व्यक्तींना जे माहीत आहे, त्याबाबतीत त्यांना बोलतं करणं हे खरं कौशल्य असतं. कारण त्यांच्याजवळ जी माहिती आहे, ती आपल्याजवळ नाही. उदा. गडचिरोली जिल्ह्यात झाडे, वने, त्यांच्याजवळची वनौषधी, शेतकऱ्यांनी पिढ्यान्‌पिढ्या जतन केलेले कृषितंत्रज्ञान, या बाबतीत आपण आजही अज्ञानी नाही का? आज त्या अर्थाने आपण सारेच कृषिनिरक्षर नाही का?

या शोधयात्रेतून कोणत्या जिल्ह्यात कोण कोण शिक्षणसम्राट आहेत, कोण कोण कसे कसे सहकारसम्राट आहेत?(जे चित्र बीड आणि बारामतीबाबत शिरगुप्पे यांनी चांगले दाखविले आहे.) आज महाराष्ट्राच्या विविध भागात शिक्षक,चपराशी ते बाबू यांचे नोकरीला लावण्याचे रेट काय आहेत? पश्चिम महाराष्ट्रातच मुलींचा जन्मदर कमी व विदर्भात का जास्त आहे? कोणत्या जिल्ह्यात कोणती जनआंदोलने उभी आहेत? कोणत्या भागात कुमारी मातांचे प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसतात? कोणत्या जिल्ह्यात कोणत्या लोकदेवतांच्या नावावर श्रद्धेचा बाजार भरतो? कोणकोणत्या जातीत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांत आजही किती हुंडा दिला जातो? पाणी अडविण्याचे चांगले प्रयोग कोणत्या जिल्ह्यात व चांगली माणसे अडविण्याचे राजकारण, समाजकारण कोणत्या जिल्ह्यात कसे व का चालते? विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी पॅकेजनंतरही आत्महत्या का करतो आहे? शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व का क्षीण झाले? ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांच्या मनात आज काय खलबते शिजत आहेत? गावोगावी बँका, पतसंस्था, शिक्षणसंस्था राजकारणी नेत्यांनी हाताशी धरून एक नवी वेठबिगारांची फौज कशी तयार केली आहे? जनआंदोलनांवरून ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास का उडत चालला आहे? ग्रामीण भागातील बोलीभाषा जतन करण्यासाठी कोण काम प्रयत्न करतो आहे? यासाठी काय केले पाहिजे? शहराचा- गावाचा विकास होतो म्हणजे खरंच या भागातील लोकांच्या चुलीवर सकस अन्न शिजते काय? यांच्या महिन्याच्या बजेटमध्ये दुधावर व आरोग्यावर किती खर्च असतो? पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्याने गळतीचे प्रमाण खरंच थांबले का? ग्रामीण भागातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये कोवळ्या मुलींवर अत्याचार करणारे कोण आहेत? देशाचे, राज्याचे नियोजन चुकीचे ठरले म्हणजे काय व ते कसे असावे? यावरही काही भाष्य असावयास हवे होते. म्हणजे मला वाटते, ग्रामीण महाराष्ट्राचे महानगरीय वाचकांना खऱ्य़ा अर्थाने वास्तव दर्शन झाले असते.

माझ्यासारख्या वाचकांनी यापूर्वी अनिल अवचट, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, ‘बदलता भारत’ लिहिणारे भानू काळे किंवा ‘33 लक्ष पाऊले’ हे पुस्तक लिहिणारे दि.बा.मोकाशी यांचे व इतरांचेही लिखाण वाचल्याने, मूळ प्रश्नाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न या शोधयात्रेच्या निमित्ताने झालेला दिसत नाही. या शोधयात्रेचा शेवटही तेवढासा भावनात्मक झालेला नाही. लेखासोबत ठिकठिकाणच्या प्रकाशचित्रांचाही खूप चांगला वापर करता आला असता, तो का केला गेला नाही, याचाही खुलासा या शोधयात्रेतून होत नाही.

आज सर्वच माध्यमे बाजारवादाचे समर्थन करू लागल्याने, ‘साधना’ या ध्येयनिष्ठ साप्ताहिकाला सामाजिक बांधिलकी दाखवून बदलत्या महाराष्ट्राचे ग्रामीण वास्तव महाराष्ट्राच्या पन्नाशीच्या निमित्ताने (राजा शिरगुप्पेंच्या लेखणीतून) मांडावे वाटले, हेही नसे थोडके. पण या शोधयात्रेतील सुटलेले दुवे साधनाला सहज साधता आले असते. राजा शिरगुप्पेंच्या लिखाणाला ते सहज साध्यही आहे. या शोधयात्रेसाठी राजा शिरगुप्पेंनी घेतलेली भ्रमंतीची मेहनत खरोखरच अभिनंदनीय आहे. परंतु साधनातील ही शोधयात्रा वाचताना पूर्ण समाधान मिळत नाही, ही प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदवीत आहे, कृपया गैरसमज नसावा...

नरेंद्र लांजेवार

ग्रंथपाल, भारत विद्यालय, बुलडाणा.

l_narendra2001@yahoo.com

 

अवास्तव अपेक्षा नको!

‘साधना’शी वर्षभरापासून जोडले गेलेले लेखक राजा शिरगुप्पे  यांनी  ‘भारतभ्रमण करून साधनासाठी लेखन’ करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा आम्ही त्यांना सांगितले, ‘भारतभ्रमण नंतर पाहू, पण तूर्त महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात भटकंती करून साधना दिवाळी अंकासाठी काही लिहा.’ याबाबत भटकंतीचा प्रदेश राजा शिरगुप्पे यांनी ठरवावा, पण जास्तीत जास्त 30 पानांचा लेख असावा आणि तो दीड महिन्यांत मिळावा. अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. त्यानुसार राजा शिरगुप्पेंनी एक महिनाभर भटकंती करून पंधरा दिवस लेखनासाठी देऊन तो 46 पानी लेख लिहिला. तो लेख हातांत आला तेव्हा आम्ही त्याचे शीर्षक अतिशय विचारपूर्वक दिले. ‘शोधयात्रा: ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची.’ या शीर्षकातून व त्यासोबतच्या संपादकीय निवेदनातून तो लेख कशावर आधारित आहे हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. शिवाय, राजा शिरगुप्पे यांनी ‘कोलंबसासारखं नाही,नामदेवासारखं’ या प्रास्ताविकात आणि ‘मी काम शिकलो?’ या समारोपात त्या शोधयात्रेची पार्श्वभूमी, तिचा उद्देश, तिच्या मर्यादा आणि काढलेले निष्कर्ष हे सर्व अतिशय नेमकेपणाने मांडलेले आहे. या प्रदीर्घ लेखाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे व कोणत्या चौकटीत तो वाचला जावा, हे स्पष्ट करण्यास ते पुरेसे आहे. त्यामुळे नरेंद्र लांजेवार या तरुण मित्राने वरील पत्रात व्यक्त केलेल्या अपेक्षा अवास्तव आहेत असे म्हणणे भाग आहे. नरेंद्र म्हणतो त्या प्रमाणे लिहायचे असेल तर एका व्यक्तीला काही वर्षे किंवा एखाद्या संस्थेला काही महिने काम करावे लागेल.

अशा अवास्तव अपेक्षांचे ओझे संवेदनशील लेखकावर लादले तर तो गुदमरून जाण्याची शक्यता असते; नरेंद्रनेच वरील पत्राची सुरुवात ‘‘संवेदनशील लेखक राजा शिरगुप्पे’’ अशी केली आहे, म्हणून हा खुलासा.

- संपादक ‘साधना’

Tags: निष्कर्ष शोधयात्रा उद्देश टीका शोधयात्रा लेख नरेंद्र लांजेवार संवेदनशील लेखक अपेक्षा अवास्तव राजा शिरगुप्पे Media Person Author Sensitive Narendra Lanjewar Raja Shirguppe मतांतरे अवधूत परळकर वास्तव लेखन लेखन टीका बाबा भांड दासू वैद्य Sadhana Balkumar diwali Ank Gavat Ek Patra Ala critic Baba Bhand Dasu Vaidya आक्षेप असत्य विधान लेख डॉ. द. ना धनागरे राजा दीक्षित Objection University Article D. N. Dhanagre Raja Dixit नामोल्लेख. अध्यासने विद्यापीठ राजा दिक्षीत द. ना. धनागरे Adhyasan Names university Raja Dixit D. N. Dhanagre weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके