डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तू जे जे लिहिलं आहेस, ते एकीकडे फक्त तुझं व्यक्त होणं असलं, तरी दुसरीकडे थोड्याबहुत प्रमाणात बऱ्याच जणांच्या अनुभवाचा भाग असल्याचं नाकारता येणार नाही. (विशेषतः ‘घोळक्याबाहेरील’ मुलांच्या!) ‘शाळा नको’ किंवा ती नावडती असण्याची त्यातील बाजू, ही असाहजिक नाही वाटली मला. म्हणजे बघ ना- लहान असल्यापासून ते मोठे होत जाण्याच्या प्रवासात, कोणत्या न कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये, कित्येक गोष्टींच्या रोमँटीसिझमने आपण कधी न कधी गुरफटले जात असतो- कधी स्वतःहून तर कधी इतरांमुळे. वानगीदाखल प्रेम, पाउस, सखी, पहिला ‘अनुभव’ वगैरे पासून तर मग (प्रत्येकाचे) माझे यार-दोस्त, माझी आई, माझं (रम्य!) बालपण... ते माझ्या ‘शाळे’ पर्यंत नावं घेता येतील. या सगळ्या नॉस्टॅल्जिक करणाऱ्या ‘माझ्या’ आणि ‘सर्वांना भावणाऱ्या’ गोष्टी गोडगोड-छानछानच असाव्यात, त्यांच्या सुखद झुळुकींवर आपण नेहमीच स्वार व्हावं- हे एका मर्यादेपर्यंत कळू शकतं. मात्र ते प्रत्येकाच्या बाबतीत तसंच असतं, हे ‘गृहीतक’ तुझ्या लेखाने बाद ठरवलं- एवढे नक्की! त्याचं प्रत्यंतर लेखात जागोजागी येताना दिसतंही.

नकारात्मक विषय ठरवणारी मानसिकता

सुनील तांबे यांचा ‘शेती : पुरवठाप्रधान की मागणीप्रधान?’ हा 28 जानेवारीच्या अंकातील लेख अत्यंत चिंतनीय आहे. चंद्रपूरच्या साहित्य संमेलनात ‘समकालीन कृषिउद्योग आणि पर्यावरण यांचे पुरेसे चित्र मराठी साहित्यात प्रतिबिंबित होत नाही’ अशा नकारात्मक विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता. त्यामध्ये मी एक वक्ता होतो. कृषीला उद्योग ठरवून शेतकरी उद्योजक बनवायचा आणि पर्यावरणाची जबाबदारी त्याच्यावरच टाकायची, अशी हस्तिदंती मनोऱ्यातील मनोवृत्ती बुद्धिभेद करणारी आहे. प्रत्येक उद्योजकाला त्याच्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे. मग शेतकऱ्याला हा अधिकार का नाही? 1990 नंतरच्या ‘गॅट’ करारामुळे आणि ‘खाऊजा’ धोरणामुळे कोणते फायदे शेतीला मिळाले? पिढ्यान्‌पिढ्या तुकडे होऊन, नापिकी आणि दुष्काळ तसेच उत्पादनखर्च, मजुरी, खते इत्यादींच्या ओझ्याचा विचार न करता- शेतकऱ्याला कागदोपत्री उद्योजक ठरवायचे याला षड्‌यंत्रच म्हणावे नाही तर काय? 1990 नंतरची ग्रामीण दलित साहित्यिकांची पिढी उमेदीने आणि ताकदीने लिहिते आहे. त्यांनी कृषिविषयक सर्व प्रश्नांची, शेतकरी कर्जबाजारीपणाची आणि आत्महत्येच्या गर्तेत जाणाऱ्या प्रक्रियेची मीमांसा करत कथा, कविता, कादंबरी लिहिली आहे. त्याची उदाहरणे मी परिसंवादात सांगितली. परंतु अस्तित्वाचा, ग्रामीणतेचा, शोषणाचा, ग्रामीण प्रश्नांचा, खाऊजाच्या प्रभावाचा तसेच सावकारी आणि कृषिसंदर्भातील उत्पादकांच्या बाजारू वृत्तीचा, लुटमारीचा सगळा संदर्भ समर्थपणानं बोलीभाषांधून टिपणाऱ्या नव्या पिढीचे साहित्य वाचताच परिसंवादासाठी नकारात्मक विषय ठरवणारी मानसिकता कोणती असावी? रंगनाथ पठारे, राजन गवस, भास्कर चंदनशीव, बाबाराव मुसळे, सदानंद देशमुख, भारत काळे, रमेश इंगळे, विजय जावळे, उमेश मोहिते, कृष्णात खोत, अशोक कौतिक कोळी, गणेश आवटे, भीमराव वाघचौरे, प्रवीण बांदेकर, महेंद्र कदम, शंकर सखाराम, दिलीप भावसार, महेश मोरे, बालाजी इंगळे, सरदार जाधव, आनंद विंगकर, प्रकाश होळकर, लक्ष्मण महाडीक, संतोष पद्माकर पवार, केशव देशमुख, श्रीकांत देशमुख, प्रकाश किनगावकर, रवींद्र ठाकूर, अर्जुन व्हटकर, गोकुळ बागूल, मंगेश काळे, अरुण काळे, मन्या जोशी, दिनकर मनोहर, सतीश काळसेकर, निरंजन उजगरे, कैलास दौंड इत्यादी शेकडो लेखक-कवींच्या साहित्यात कृषिजाणिवा, प्रश्न, पर्यावरण आणि ग्रामीण संस्कृतीची उद्‌ध्वस्तता इत्यादींचे वास्तव, आणि संवेदनशील चित्रण थेट बोलींमधून चित्रित होते आहे. हे सर्व वाचले पाहिजे. साधनाचा 28 जानेवारीचा अंक त्यामुळेच खूप आवडला. मागणी-पुरवठ्याचे गणित सोडवण्याचा प्रश्न, या लेखातून मांडलेला आहे. माधव गाडगीळ, गोविंद तळवलकर, ज्ञानेश्वर मुळे यांचे लेखनही त्या दृष्टीने सम्यक्‌ विचार प्रदर्शित करणारे आहे. 4 फेब्रुवारी 2012 च्या अंकातील सुरेश द्वादशीवार आणि नरेंद्र लांजेवार यांचे विचारही त्याच दिशेने जातात. त्याच अंकातील उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे भाषणही उद्‌बोधक असून ‘पत्रकारिता आणि स्वयं आचारसंहिता’ याबाबतचे समर्पक चिंतन आहे. माध्यमांची नीतिमत्ता, व्यावसायिकता यांचे होणारे जीवनावरील आक्रमण याबाबतचे हे चिंतन मनाला सजग करणारे आहे.

किसन पाटील, जळगाव

 

साहित्य संस्था सुधारणा घडवून आणतील?

आपल्या साप्ताहिकाच्या 4 फेब्रुवारीच्या अंकातील नरेंद्र लांजेवार यांचा ‘साहित्यसंस्थाचे दीप उजळतील कसे?’ हा लेख समयोचित आणि विचारप्रवर्तक होता. किती साहित्यसंस्था हा लेख वाचून आपल्या उपक्रमात सुधारणा घडवून आणतील, किती जागृत वाचक सभासद, पालक, शिक्षण या दृष्टीने शासनावर, संस्थांवर दडपण आणतील हा कळीचा मुद्दा आहे. श्री.लांजेवार यांनी साहित्य संस्थांबद्दलची निरीक्षणे नोंदविली आहेत, ती आमच्यासारख्या छोट्या राज्यात (गोवा) पण सत्य आहेत. गेली दोन वर्षे मी या संस्थांना सुचवितो आहे की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विद्यार्थी- युवा साहित्यिक यांना पाठविण्याची योजना अंमलात आणावी. ज्या ठिकाणी संमेलने झाली नाहीत अशा ठिकाणी संमेलने घडवून आणण्याच्या बाबतीत पुढाकार घ्यावा. एकाच ठिकाणी सर्व कार्यक्रम करण्याऐवजी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी करावेत. परंतु या बाबतीत काहीही सुधारणा करण्यास साहित्य संस्थांतील मंडळी तयार नाहीत. श्री.लांजेवार यांनी सुचविलेला पूरक वाचनमालेचा उपाय इयत्ता पाचवीपासून, पदवी, पदव्युत्तर वर्गासाठी योग्य आहे. परंतु पाठ्यपुस्तकांचा अभ्यास म्हणजे परीक्षेचा अभ्यास- म्हणजे अवांतर वाचन करणे योग्य नाही, असे मानणाऱ्या महत्त्वाकांक्षी पालकांची मनोवृत्ती बदलायला हवी. बालपणापासून वाचनाची गोडी लावण्यासाठी वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके शाळांत उपलब्ध होतील यासाठी पालक-शिक्षक संघाने पुढाकार घ्यायला हवा. गावात समृद्ध ग्रंथालय उभे रहावे यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करायला हवेत. पुस्तकप्रदर्शनाचे उपक्रम सातत्याने आयोजित करायला हवेत.

कालिदास मराठे, गोवा.  

 

‘शाळा’ पाहिल्यावर...वाचल्यावर...

प्रिय संकल्प,

तुझा ‘साधना’तील 18 फेब्रुवारीचा लेख वाचला. आवडला मला. (आणि खरं सांगू का, थोडंसं वाईटसुद्धा वाटलं तो वाचून) जसा तू ‘शाळा’ कादंबरी आणि सिनेमा पुन्हापुन्हा वाचल्या-बघितल्याचा उल्लेख तुझ्या लेखात केलायस, तसाच मीसुद्धा तुझा लेख अराउन्ड तीन-चारदा वाचला. म्हणजे तो मला खूप जास्त आवडला किंवा मग तुझ्याच एखाद्या ‘हिरव्या पानाचं’ ते दीर्घ रूप असावं का? या कुतूहलामुळे मी तो पुन्हापुन्हा वाचला, असं एवढंच कारण त्याला नाही. तर त्यापलीकडे तुझा हा लेख, एव्हाना कित्येकांच्या मनात आणि आठवणींत घर करून बसलेल्या त्या पुस्तक आणि आत्ताच्या सिनेमांपेक्षासुद्धा काहीतरी वेगळं, थोडंसं अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारं चित्र समोर आणतो, म्हणूनसुद्धा वाचला.

तू जे जे लिहिलं आहेस, ते एकीकडे फक्त तुझं व्यक्त होणं असलं, तरी दुसरीकडे थोड्याबहुत प्रमाणात बऱ्याच जणांच्या अनुभवाचा भाग असल्याचं नाकारता येणार नाही. (विशेषतः ‘घोळक्याबाहेरील’ मुलांच्या!) ‘शाळा नको’ किंवा ती नावडती असण्याची त्यातील बाजू, ही असाहजिक नाही वाटली मला. म्हणजे बघ ना- लहान असल्यापासून ते मोठे होत जाण्याच्या प्रवासात, कोणत्या न कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये, कित्येक गोष्टींच्या रोमँटीसिझमने आपण कधी न कधी गुरफटले जात असतो- कधी स्वतःहून तर कधी इतरांमुळे. वानगीदाखल प्रेम, पाउस, सखी, पहिला ‘अनुभव’ वगैरे पासून तर मग (प्रत्येकाचे) माझे यार-दोस्त, माझी आई, माझं (रम्य!) बालपण... ते माझ्या ‘शाळे’ पर्यंत नावं घेता येतील. या सगळ्या नॉस्टॅल्जिक करणाऱ्या ‘माझ्या’ आणि ‘सर्वांना भावणाऱ्या’ गोष्टी गोडगोड-छानछानच असाव्यात, त्यांच्या सुखद झुळुकींवर आपण नेहमीच स्वार व्हावं- हे एका मर्यादेपर्यंत कळू शकतं. मात्र ते प्रत्येकाच्या बाबतीत तसंच असतं, हे ‘गृहीतक’ तुझ्या लेखाने बाद ठरवलं- एवढे नक्की! त्याचं प्रत्यंतर लेखात जागोजागी येताना दिसतंही.

‘शाळा’ कादंबरी काय किंवा मग सिनेमा काय- त्याचा शेवट हा नायकाला आणि वाचक-प्रेक्षकालाही हळूहळू एका भग्नतेकडे, एका उदासीनतेकडे नेताना दिसतो. सिनेाची तर रचनाच अशी आहे की, सुरुवात एका उत्साहपूर्ण वातावरणात व्हावी. तुझा लेख मात्र सतत एक अस्वथतेचा बाज जपत शेवटाकडे एक सुटकेचा, मोकळे झाल्याचा फील देतो. ‘शाळा’ या गोष्टीची एक ‘अनवॉन्टेड साईड’ त्यानिमित्ताने तू आम्हांला दाखवलीस. दुसरी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे लेखाची मूळ रचना जरी ‘नको ती शाळा’ अशा स्वरूपाची तू केलेली आहेस (किंवा तशी ती तुझ्या नकळत झाली असेल), तरीपण सुरुवातीच्या दोन पानांवर, अर्थात तुझ्या सातवी-आठवीपर्यंत असेल कदाचित- हीच रचना काहीशी सौम्य आणि खूपशी मनातल्या हळव्या कोपऱ्यात (की वर्गात) दडवलेल्या शाळेसाठीचीच वाटते. खरंच- एकीकडे शाळेबद्दल मनापासून असणारं प्रेम आणि दुसरीकडे तिथल्या त्या वातावरणामुळे- ओघाने येत गेलेला तो तिरस्कार-चटका लावून गेला.

शेवटचं पण महत्त्वाचं- आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, असणाऱ्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांचे बारकावे सहजतेने टिपणाऱ्या तुझ्या लेखनशैलीचं मला विशेष अप्रूप नेहमीच वाटतं... आत्ताच्या या ‘पर्सनल कम युनिव्हर्सल’ अनुभवाने त्यात भरच टाकली आहे.

स्वप्निल जोगी, पुणे

Tags: वाचक पत्रे प्रतिसाद प्रतिक्रिया feedback readers letters weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके