डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

17 डिसेंबरच्या साधनातील गो. पु. देशपांडे यांचे ‘बीजभाषण’ वाचल्यावर लक्षात आले की,  या संपूर्ण भाषणात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा उल्लेख नाही. आणि हे फार खटकले. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्र्यांचे योगदान फार मोठे होते. आजही त्यांची नाटके प्रयोगक्षम व ताजी टवटवीत आहेत.

आमचा पाठिंबा मार्कंडेय काटजू यांना

‘प्रसारमाध्यमातील बहुतांश लोक कमी बौद्धिक क्षमतेचे आणि अर्थकारण,  इतिहास,  राजकारण,  साहित्य, तत्त्वज्ञान या ज्ञानशाखांबाबत गरीब आहेत’ या न्या. काटजू यांच्या विधानावर गदारोळ उडालेला आहे. मात्र त्यांचे विधान पूर्णपणे खरे आहे. जे या ज्ञानशाखांबाबत श्रीमंत किंवा ज्ञानी आहेत,  त्यांचा या विधानास आक्षेप नाही. ज्यांना या शाखांचे अपुरे ज्ञान आहे,  त्यांचाच आक्षेप  आहे. 10 व 17 डिसेंबरच्या साधनात प्रसिध्द झालेल्या दोन्ही लेखांतून त्यांची योग्यता व न्याय्य भूमिका लक्षात येते.

स्वातंत्र्य म्हणजे  स्वैराचार नव्हे,  हे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण या माध्यमावर टीका का केली,  हे काटजू यांनी स्पष्ट  केले आहे,  कोणताही विवेकी मनुष्य त्यांच्या मतांशी सहमत होईल. निरंकुश अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही नसतो,  हे काटजू यांनी स्पष्ट केलेच आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण जनतेला उत्तरदायी असतोच,  त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जनतेला  उत्तरदायी असावे ही काटजू यांची माफक व न्याय्य अपेक्षा आहे. खऱ्या करमणुकीसाठी 10 टक्के वेळ आणि शिक्षण- प्रबोधन यासाठी  90 टक्के वेळ द्यावयाचा असे ठरविण्याची वेळ आलेली आहे.

के.ए.पोतदार, पुणे.

-------------  

हिटलरचे गोडवे गायचे का?

17 डिसेंबरच्या अंकातील दीपंकर गुप्ता यांच्या लेखावर प्रतिक्रिया देणारे 7 जानेवारीच्या अंकातील स. ग. भिडे यांचे ‘खुली दाद देण्यास साधना कमी पडते’ हे पत्र वाचले.  या संदर्भात फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो. हिटलरच्या नावावर याहूनही मोठे विकासाचे प्रारूप आहे. त्यालाही दाद  द्यावयाची काय?  या देशातील सामाजिक सद्‌भाव घृणास्पदपणे धुळीला मिळवत एक महाभयानक हत्याकांड करणाऱ्या नरेंद्र मोदींना जर  हे कर्तृत्वाचे माप घालावयाचे असेल,  तर मग हिटलरचे पण गोडवे गायचे का?

बंडू सातारकर, सातारा

---------------

देवळे झालीत पिकनीक सेंटर्स  

24 डिसेंबरच्या साधनात अभय टिळक यांनी लिहिलेला ‘देव देऊळ व्यापारू’ हा लेख खुसखुशीत परंतु आपल्या भारतीय जीवन,  उद्योग, व्यापारी लोकांचा स्वभाव यांचे एक्सरेने परीक्षण करणारा आहे. त्यांच्या लेखामुळेच ‘देऊळ’ हा चित्रपट पाहण्याची इच्छा झाली.  ग्रामीण भागातील तरुण शहरामध्ये चकरा टाकतात व लखलखते दिवे, चकचकीत व झगझगीत रंगीबेरंगी कपडे घालणाऱ्या सुंदर  तरुणी दिसल्यावर ग्रामीण तरुण अक्षरश: दिवाना बनतो. हा बदल 1992 सालानंतर प्रामुख्याने भारतातच झाला आहे. शहरातील तरुणांना- तरुणींना ग्रामीण भागातील देवळेही पिकनीक सेंटर वाटत आहेत.

मनोहर जांभेकर, चिंचवड, पुणे  

--------------

अत्र्यांचे योगदान फार मोठे होते

17 डिसेंबरच्या साधनातील गो. पु. देशपांडे यांचे ‘बीजभाषण’ वाचल्यावर लक्षात आले की,  या संपूर्ण भाषणात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा उल्लेख नाही. आणि हे फार खटकले. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्र्यांचे योगदान फार मोठे होते. आजही त्यांची नाटके प्रयोगक्षम व ताजी टवटवीत आहेत.

 गोविंद अनंत कुलकर्णी, डोंबिवली, मुंबई

-----------------

बापूंचे कार्य हजारपट मोठे

3 डिसेंबरच्या ‘साधना’तील नरेंद्र चपळगावकर यांचा बापू काळदाते यांच्यावरील लेख भाववश करणारा आणि जुन्या स्मृतींना  उजाळा देणारा आहे. सत्तेचे राजकारण न करता समाजवादी वृत्तीने एसेसोबत व त्यांच्या आदर्शांनुसार कार्य करणारा सच्चा समाजवादी  आणि हाडाचा सेवादल कार्यकर्ता हीच बापूंची ओळख मला होती,  ती या लेखातून पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहे. आजच्या राजकारणात  मधु दंडवते आणि बापू काळदाते यांच्यासारखे उदाहरण दिसत नाही याची खंत वाटते. प्रसिध्दी माध्यमातून चमकोगिरी आणि आंदोलनातून उगीच स्वत:ला महान करायचे;  गांधी,  विवेकानंद,  शिवाजी वगैरे महान आदर्शांशी जोडून स्वत:ची फसवणूक करण्यापेक्षा बापू काळदातेंचे कार्य हजारपट मोठे वाटते. त्या लेखातील ‘पदाच्या अभिमानाचा लवलेशही आला नाही’ हे वाक्य हृदयात कोरून ठेवावेसे वाटते.

प्रा. किसन पाटील, जळगाव

Tags: प्रतिक्रिया वाचक पत्रे प्रतिसाद pratikriya feedback pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात