डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुलांना चित्र काढायला एक भिंत आरक्षित ठेवणारा, त्यांना आम जनतेच्या शाळेत घालणारा हा बाप आणि आपल्या सुनंदाला हर प्रकारे समजून घेऊन मदत करणारा नवरा, घरच्या नोकरांना मदतनीस म्हणून सहृदयतेने वागविणारा घरमालक : माझ्यातील पालक, पत्नी अन्‌ घरवालीला घडवू लागला. 

माझा मित्र ‘बाबा’

 दि.14 सप्टेंबरच्या ‘साधना’ अंकात सदा डुम्बरे यांची अनिल अवचट यांच्यावरील लेखांच्या पुस्तकाची प्रस्तावना वाचली आणि मला मी चार वर्षांपूर्वी 2015 मार्चला अनाहूतपणे ‘बाबा’ला धाडलेल्या ई-मेलची आठवण झाली. 50 वर्षांपूर्वी त्याची-माझी पहिली भेट झाली, ती एक 30 वर्षांची तरुण वाचक आणि 25 वर्षांचा तरुण लेखक यांची भेट होती. आणि मग अशाच नात्यातून आम्ही भेटत राहिलो. माझ्यासारख्या आपल्या हजारो वाचकांना बाबाने सामाजिक जाणीव दिली आणि जीवनाचा मार्ग दाखविला.

वाटले, साधनाच्या वाचकांना हा माझा उपद्‌व्याप आवडेल म्हणून ती मेल माझा मित्र ‘बाबा’ धाडीत आहे. (दुसऱ्याच दिवशी उलट मेलमध्ये ‘बाबा’ लिहिता झाला- ‘‘प्रिय प्रभा, किती छान लिहितेस! ओळखीचं माणूस आणि ओळख लागत नाही, अशी अवस्था झाली आहे माझी...’’ आणि सोबत मोबा.नं. पण दिला होता.)

याची माझी खूप जुनी ओळख. मी याला प्रथम भेटले ते कॉलेजात असताना, तेही त्याच्या पुस्तकातून- ‘पूर्णियाच्या प्रदेशा’तून बिहारमधील जमीनदारांच्या, कायदा आपल्या हातात घेणाऱ्या खासगी सेनेबद्दल वाचून असहाय शेतमजुरांबद्दल अनुकंपा तर दांडग्या व पिळवणूक करणाऱ्या जमीनदाराबद्दल चीड निर्माण झाली. माझ्या या मित्राने मला कित्येक दृष्टिआडच्या सृष्टीत नेले. फोडणीत हळद घालताना मला हळदीकाम करणाऱ्यांचे भाजलेले हात दिसू लागले. कधी गर्दच्या विळख्यात सापडलेली असहाय तरुणाई भेटली. अमेरिकेच्या टोलेजंग इमारतींचे गोडवे आपण नेहमीच ऐकतो; परंतु गरम इंजिनाच्या खोबडीत लपून, जीवावर उदार होऊन अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या काळ्या immigrant ची गोष्ट त्याच्या ‘अमेरिका, अमेरिका’मध्येच वाचायला मिळाली.

माझं मन बऱ्याच अंशी माझ्या या मित्राने असं संवेदनशील बनविलं. कालांतराने मीही संसारात पडले. मुले झाली आणि मला ह्याच्या अनुभव शेअर करण्याचा फायदा होऊ लागला. चांगले दही लागणे हे विरजण दुधात नीट मिसळण्यावर कसे अवलंबून आहे, भाजीची चव ती कशी छान मिळून येण्यात आहे- अशा अनेक छोट्या-छोट्या टिप्स मला या मित्राकडून मिळाल्या. एक साधी छोट्यांची गोष्ट, पण ती सांगता न येणाऱ्याला ह्याने बाप बनायला चक्क नालायक ठरविले. मुलांना चित्र काढायला एक भिंत आरक्षित ठेवणारा, त्यांना आम जनतेच्या शाळेत घालणारा हा बाप आणि आपल्या सुनंदाला हर प्रकारे समजून घेऊन मदत करणारा नवरा, घरच्या नोकरांना मदतनीस म्हणून सहृदयतेने वागविणारा घरमालक : माझ्यातील पालक, पत्नी अन्‌ घरवालीला घडवू लागला.

फुटलेली प्रश्नपत्रिका वर्गमित्राने देऊ केली असता ती बघायचे नाकारणारी त्याची मुलगी मला एक विश्वास देऊन गेली की, याने दाखविलेल्या रस्त्याने गेले तर माझी मुले पण सुसंस्कृत होतील. आणि माझा हा विश्वास सार्थ ठरला. दिल्लीला फिल्म फेस्टिव्हलदरम्यान बसमधून शेवटी उतरणारी प्रवासी होती माझी मुलगी. तिला त्रास देऊ बघणाऱ्या क्लीनरच्या कचाट्यातून ती पळाली. दुसऱ्या दिवशी झाल्या प्रकाराची चौकशी करणाऱ्या समितीपुढे तिने सांगितले, ‘त्याला चांगली समज देऊन सोडावे. त्याला शिक्षा देऊन एका गुन्हेगाराला जन्म देऊ नका.’ हा झाला एक प्रसंग.

दुसरा प्रसंग आहे माझा मुलगा बारावी शिकत असतानाचा. डिसेंबर 1984 च्या भोपाळ दुर्घटनेत जेव्हा सगळे तिथून दूर पळत होते, तेव्हा आपला अभ्यास बाजूला सारून तो Ham Radio Operator म्हणून मदत करण्यास धावला. माझा विश्वास बळावला. माझी मुले एक ‘सच्चा इन्सान’ बनली, याचा मला सार्थ अभिमान वाटला. अजूनही माझ्या निवृत्तीच्या काळात माझ्या या मित्राकडून मी काही ना काही शिकत असते. त्याचे ते पुणे (आता सावित्रीबाई फुले) विद्यापीठ परिसरात फिरणे. किडे-मुंग्यांच्या विश्वात रमणे, दगड-धोंड्यांत रस घेणे हे मला एक शिकवून गेले की, आयुष्यात बोअर होण्यासारखे किंवा जीवनाला विटण्यासारखे काही असत नाही.

जन्म मुंबईत गेल्यानंतर गेली काही वर्षे मी अधून-मधून कोकणातील गावी रमू लागले. निवृत्तीनंतर मी डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली अंनिसमधे काम करू लागले, त्यांच्या प्रेमादराला पात्र झाले. हा माझा मित्र डॉक्टरांचा इतक्या जवळचा मित्र आहे, हे मला ते गेल्यावरच कळले. आपल्याला सर्वांनी ‘ए बाबा’ असे एकेरीत संबोधणे त्याला आवडते, हे मी जाणून आहे.

प्रभा पुरोहित, मुंबई  

नाकर्तेपणा आणि धोरणशून्यता यावर शिक्कामोर्तब!

साधनामधील ‘अर्थवास्तवाचे उथळ आकलन नको’ हे (दि. 14 सप्टेंबर) अभय टिळक यांनी लिहिलेले संपादकीय वाचले. त्यात आजच्या घडीला देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक मंदीच्या पदराचे अनेक कंगोरे उलगडले असले तरी, सांप्रत ‘देशावर दाटलेले मंदीचे काळे ढग’ या परिप्रेक्ष्यात मोदी सरकार संवेदनशील आहे का? या प्रश्नाला प्रथम भिडावे लागेल.

काश्मीरशी निगडित अनुच्छेद 370 कलमांतील तरतुदींचा राष्ट्रीय ज्वर आणि राजकीय धुरळा कमी होऊन देशातील आर्थिक मंदीसदृश वातावरणाचे चटके जवळपास सर्वच क्षेत्रांना बसायला लागले आहेत. मोदी सरकारच्या कथित 2.0 राजवटीतील पहिल्या तिमाहीत देशाचा विकासदर 5 टक्के नोंदवला गेला असून, तो मोदी सरकारच्या गेल्या साडेपाच वर्षांच्या, तर देशातील मागील अठरा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जीडीपी मोजण्याची प्रमाणके आणि निकष बदलण्यात आले. आकडेवारी चुकीच्या पद्धतीने गोळा केल्यामुळे भारताचा वास्तव विकासदर मोदी सरकार दाखवत आहे तेवढा खरोखरच आहे का, असा आक्षेप अनेक अर्थविषयक अभ्यासकांनी उपस्थित केला होता.

आता तर तो 5 टक्क्यांपर्यंत घसरला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मजबूत सरकार म्हणजे राजकीय पातळीवर स्थैर्य, म्हणजेच पर्यायाने देशाची जलद गतीने विकासाकडे वाटचाल- असा जो काही बालिश राजकीय व आर्थिक (गैर)समज गेली पाच-सहा वर्षे देशात सत्ताधारी भाजपकडून हेतुपूर्वक पसरवला जात आहे, त्या समजाला यामुळे यथायोग्य सुरूंग लागला आहे.

देशांतर्गत मंदीसाठी मोदी सरकार व त्यांचे समर्थक आंतरराष्ट्रीय घडामोडींना जबाबदार धरत आहेत. पण हे समस्येचे सुलभीकरण करणे असून, देशवासीयांची दिशाभूल करणारेदेखील आहे. कारण 2008 मध्ये अवाढव्य लेहमन ब्रदर्स बँकेच्या पतनानंतर सबप्राईम क्रायसिस- मंदीच्या त्सुनामीतून- जागतिक पातळीवर तावून-सुलाखून निघालेल्या दोन प्रमुख अर्थव्यवस्था म्हणजे भारत आणि चीन. त्यामुळे देशातील आजच्या मंदीला आंतरराष्ट्रीय घडामोडी हे एकमेव कारण नसून, सरकारची आर्थिक धोरणांतील गोंधळावस्था हे मुख्य कारण आहे.

नेहमीच लोकानुयय करणाऱ्या सरकारला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो, हे वैश्विक सत्य मोदी सरकारने रिझर्व्ह बॅकेतील आपत्कालीन निधीपैकी 1.76 लाख कोटी निधीवर डल्ला मारून अधोरेखित केले आहे. जीडीपीची वाढ किंवा विकासदर हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा प्रमुख निदर्शक असतो. यावर देशाची अंतर्गत आणि जागतिक पत ठरत असते. तसेच मध्यवर्ती बँका विकासदरावर विसंबूनच आपल्या व्याजदरात वाढ किंवा कपात करत असतात. परदेशी गुंतवणूकदारांसाठी एखादा देश गुंतवणूक करण्यास योग्य आहे की अयोग्य, हे सदर देशाच्या विकासदरातूनच ढोबळ मानाने स्पष्ट होत असते.

जीडीपी वाढीसाठी ज्या महत्त्वाच्या निर्देशांकांचा आधार घेतला जातो, त्या आठ निकषांपैकी पाच म्हणजेच निम्यांहून अधिक क्षेत्रांतील निर्देशांकांत आज देश उतार व अनुत्साह अनुभवत आहे. देशाचा विकासदर हा केवळ देशाच्या प्रतिष्ठेचा निर्देशक नसतो, तर तो अर्थव्यवस्थेचा शक्तिमापकदेखील असतो. मनमोहनसिंग सरकारच्या दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाने डॉलरसमोर मान टाकली (58-60 रुपये प्रतिडॉलर), तेव्हा मोदींनी याचा संबंध थेट देशाच्या घसरत्या विकासदराशी जोडत याचा वापर मनमोहनसिंग यांच्या पुरुषत्वाशी आणि देशाच्या इभ्रतेशी-अस्मितेशी बेमालूमपणे सरमिसळ करण्यात केला होता. 

आज रुपयांची डॉलरसमोर (प्रतिडॉलर 72 रुपये) घसरगुंडी उडाली आहे, यावर मोदी काही ‘मन की बात’ करणार का? तर्काला तिलांजली देऊन देशवासीयांनी ‘अच्छे दिन’ची स्वप्ने आणखी किती दिवस रंगवत राहायची? मध्यंतरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन क्षेत्रातील मंदीमागे उबर-ओला जबाबदार असल्याचे अतार्किक  वक्तव्य केले होते. मग बांधकामक्षेत्रातील मंदीमागे प्रधानमंत्री आवास योजना (2022 पर्यंत 390 शहरांत 22 लाख घरे निर्माण केली जातील, या आशयाची जाहिरात) जबाबदार आहे, असे समजायचे का?

देशाचा विकास निर्देशांक मोजण्याच्या आठ निकषांपैकी पाच म्हणजेच निम्म्याहून अधिक क्षेत्रांत घसरण नोंदवली गेली आहे; तिथे तर उबर-ओला नाही ना? देशातील मंदीमागे सरकारची आर्थिक धोरणे- जसे की नोटाबंदी, सदोष जीएसटी करप्रणाली, कर, दहशतवाद, बिघडत चाललेले देशांतर्गत उद्योगस्नेही वातावरण इत्यादी कारणे जबाबदार आहेत. आपल्या अपयशामुळे किंवा नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या परिस्थितीसाठी आपण जेव्हा इतरांना जबाबदार धरत दोष देतो, तेव्हा एक प्रकारे आपण आपला नाकर्तेपणा आणि धोरणशून्यतेवर शिक्कामोर्तब करत असतो, हे संबंधितांनी सदोदित लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक सुधारणा आक्रमकपणे राबवाव्या लागतात. तसेच यास्तव सर्वप्रथम राजकीय फायद्याचा बळी द्यावा लागतो आणि यासाठी सरकारची तयारी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. अन्यथा, देशवासीयांसाठी आहेच राष्ट्रवाद आणि धार्मिक अस्मितांचा रतीब.

 बाळकृष्ण शिंदे, पुणे

उजर नव्हे उजूर?

दि. 14 ऑगस्टच्या अंकातील सुरेश द्वादशीवार यांचा नेहरूंवरील ‘काश्मीरचा लढा’ हा लेख वाचत होतो. त्यामध्ये त्यांनी पान 10 वरच्या पहिल्या परिच्छेदात वापरलेल्या ‘उजर’ या फार कमी वापरात असलेल्या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. सध्या अनुवाद आणि संपादनाचे काम सुरू असल्याने मराठी, इंग्लिश आणि उर्दू शब्दकोशाशी इतर वेळेपेक्षा जरा जास्तच संबंध येतोय. त्यामुळे कुतूहल म्हणून या शब्दाचा मागोवा घेतला. तसे वाक्य वाचताना त्या शब्दाचा अर्थ मला लागला होता, पण वा. गो. आपटेकृत मराठी शब्दरत्नाकर मध्ये शोध घेतला तेव्हा ‘उजर’ या शब्दाचा उत्कर्ष असा अर्थ आढळला. आणि उजूर या शब्दाचे आक्षेप, सबब (तुका 3010), काम आणि हक्क असे अर्थ आढळले. द्वादशीवारांच्या वाक्यात हक्क हा पर्यायी शब्द आपला सहज वाचता येतो, त्यामुळे तिथे उजर नव्हे उजूर हा शब्द योग्य आहे, हे लक्षात आले.

हा शोध घेताना मजा आली. वापरात नसलेल्या पण आगळ्या शब्दाकडे या निमित्ताने माझे लक्ष गेले. मला वाटतं, द्वादशीवारांनी तो कदाचित योग्य लिहिलाही असेल, एकदा सहज म्हणून तपासून पाहावे.

शेखर देशमुख, मुंबई

पूर्वीचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचलेले नसते!

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा ‘विवेकवाद’ हा लेख फारच वाचनीय आहे. अंनिस वार्तापत्र मासिक असो किंवा साधना असो, मी दाभोलकरांचे लेख पहिल्यांदा वाचत असे. मलासुद्धा प्रश्न पडतात, आपण कोण? आपण काय करणार? पण आपल्यावर आपण प्रयोग करू शकतो, त्यामुळे निराशा येत नाही. माझ्या जीवनात निराशा झाल्यास मी डॉ.दाभोलकरांना पत्र पाठवीत असे, त्याचे उत्तर ते आवर्जून देत असत, त्यामुळे माझी निराशा निघून जात असे.

याच अंकात दुसरा लेख रामचंद्र गुहा यांचा ‘मोदींकडून नेहरूंची नक्कल आणि वाजपेयींची फसवणूक’. सर्व बाजू मला समजल्या. पूर्वीच्या सरकारांनी काय केले, या बाजू समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मीडियाचा वापर होणे गरजेचे आहे. आपल्यावर, आपल्या मुलांवर ती वेळ येऊ नये असे हा लेख वाचताना वाटते. समाजात लोक चर्चा करताना सरकारची तारीफ करताना दिसतात, पण पूर्वीचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचलेले नसते आणि तरीही ते त्यांवर प्रतिक्रिया देतात.

गोवर्धन किसन गरड, बार्शी, जि.सोलापूर

मोलाची भूमिका घेणारे पुस्तक

गेल्या आठ ते दहा दिवसांच्या शोधानंतर ‘विज्ञान व समाज’ हे पुस्तक हाती आले. साधना प्रकाशनाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अप्रतिम पुस्तक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी या पुस्तकाने खूप मोलाची भूमिका घेतली आहे. अशीच अगणित पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी साधना प्रकाशनाला अगणित शुभेच्छा.

कामराज चाळक, गेवराई, जि. बीड   

Tags: पत्रे प्रतिसाद वाचकांची पत्रे vachakanchi patre letter reader's letters pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके