डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

याशिवाय ‘कांदा’ हा सर्व हवामानांत, सर्व प्रकृतीच्या माणसांना चालतो, पचतो व शरीरास आवश्यक असे गुणधर्म असलेला आहे; म्हणूनही त्याची जागा, जीवनावश्यक वस्तूतच आहे, असली पाहिजे!

श्री.तांबे व श्री.बागूल यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे असे मला म्हणावयाचे आहे. मी नाशिकचा रहिवासी, नागरिक आहे.

खेल खेल में

कोणे एके काळी आमच्या आयुष्यात खेळाला फार महत्त्व होते. लहान मुलं तर खेळायचीच, पण तरुण मुलंसुद्धा खेळायची.

सगळ्यांचा सोपा खेळ म्हणजे पळापळी. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी थकूनभागून परतायचं. रात्रीचं जेवण झालं की तरणीबांड मुलं एकत्र जमत. चांदणं पडलेलं असायचं आणि मग कोणावर तरी राज्य देऊन शिवाशिवीसाठी मुलं धूम ठोकत. त्यात काही कच्चे लिंबू असत. त्यांना नाही पकडायचं. ह्या खेळात कोण जिंकलं, कोण हारलं, असा हिशोब नसायचा.

कधी कुठे हुतूतू, कुठे आट्यापाट्या, कुठे खो खो, कुठे लंगडी. आंधळी कोशिंबीर तर हवीच हवी. खेळून झाल्यावर झालंगेलं विसरायचं. ज्यानं त्यानं आपापल्या घरी जायचं. कोणी किती धावा काढल्या आणि कोणी शतक काढलं याचा हिशेब ठेवत नसत. हिशोबाचं काम करायला कोणाकडे वेळच नव्हता. आपण बरे आपले काम बरे.

पण तो काळ गेला. आता नुसतं खेळून काय उपयोग? त्याचं रेकॉर्ड ठेवायला हवं. त्यावर बातमी यायला हवी. ती बातमी वाचायला हवी. म्हणजे मग पेपरवाल्यांचा पेपर खपेल. त्या पेपरांची रद्दी होईल. की लगेच दुसऱ्या दिवशी ताजा पेपर! वाचा आणि रद्दीत टाका.

नव्या दिवसासाठी नवा पेपर हवा. त्यासाठी कागद हवा. मग कागदाच्या निर्मितीसाठी झाडे तोडा. जंगलेच्या जंगले कापा. सगळे उजाड करा. पण खेळा. सगळ्यांनी नाही, निवडकांनी खेळावे. इतरांनी बघे व्हावे, किंवा वाचक व्हावे.

मी वाचक होऊन वाचत होतो. अचानक पुढील ओळी वाचल्या. ‘‘विजेता बनणं हे खेळाडूचं उद्दिष्ट असतं; असायलाच हवं. नाही तर मग नुसतं वेळ घालवणं, यापेक्षा खेळाला वेगळं काही महत्त्व द्यायचं कारणच नाही.’’ (लेखक : आ.श्री.केतकर, साधना : 28 जुलै 2012).

फार फार वर्षांपूर्वी ‘विजेता बनणं हे खेळाडूचं उद्दिष्ट’ नव्हतं. असं काही उद्दिष्ट असतं ही गोष्टच लोकांच्या गावी नव्हती. नुसतं खेळायचं एवढीच गोष्ट त्यांच्या गावी होती. ‘‘म्हणूनच आम्ही ह्या जगाला परमात्म्याची लीला म्हणतो. सृष्टीपेक्षाही सुंदर शब्द आहे तो, लीला, प्ले. कारण खेळामध्ये अहंकार नसतो.

‘आमच्यात अहंकार अवतरतो आणि जेव्हा खेळात अहंकार येतो, तेव्हा खेळ हा काम होतो, मग तो खेळ राहत नाही. आम्ही तर खेळतानासुद्धा अहंकारी होतो. दोनजण पत्ते खेळतानासुद्धा अक्कडबाज होतात. हार-जीतच्या भावनेने आम्ही त्रस्त होतो. मग तो खेळ नाही राहिला. ते एक काम झाले, त्याची दुकानदारी झाली. ‘खेळ तोपर्यंतच आहे, जोवर माझ्यात मीचा उगम होत नाही. लीला चालली आहे. हार झाली, तरी ठीक आहे; जय झाला, तरी ठीक आहे. काही विशेष फरक पडत नाही. हां, कधीकधी असेही होते. कधी बाप मुलाशी खेळत असतो, तेव्हा अशी अवस्था होते. कारण मुलाशी खेळताना अहंकारी होणे बापालासुद्धा मूर्खपणा वाटतो. मग तो पराजित होण्याची, जिंकण्याची पर्वा करत नाही. कित्येकदा तर तो स्वत:च हार स्वीकारतो, नाहीतर मुलगा जिंकणार कसा? स्वत:हून भुईसपाट होतो, मुलाला छातीवर बसवून घेतो. मुलगा खदखदा हासत सुटतो. आणि मुलाच्या विजयाने बाप खुशीने फुगतो- पराजित होऊनसुद्धा! याला खेळ म्हणतात. म्हणायचे.’

पण आ.श्री.केतकरांनी पुढच्या वाक्यात म्हटले आहे की, ‘विजेता ठरतो तो स्पर्धांत. या स्पर्धा अगदी शहर, जिल्हा, राज्य,

विभागीय पातळीवर असतात आणि त्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक.’ नंतर अखेर ऑलिंपिक. बाकीच्यांनी काय करायचे? कुरमुरे खात बसायचे. दिवसभर श्रम करून पैसा मिळवायचा, थोडा कांदाभाकरीसाठी खर्च करायचा आणि पुष्कळसा सरकारात कर म्हणून भरून स्पर्धकी खेळाडूंना पाठवून द्यायचा. आणि मग आपल्या करकरीत पैशांच्या बळावर खुशालचेंडूंचा चेंडूफळीचा खेळ गॅलरीतल्या फळफुटावर बसून किंवा टीव्हीच्या समोर फतकल मारून बघायचा. तुम खेलो,

हम टीव्ही सम्हालते है।

आ.श्री.केतकरांची ही लेखमाला आता ज्या साधनात छापली जात आहे त्या साधनाने कोणेएके काळी, म्हणजे विसाव्या शतकातल्या सत्तरच्या दशकात कुमार चित्रकला शिबिर भरवले होते. त्यातील चित्रांना पहिले-दुसरे-तिसरे असे पारितोषिक देण्याऐवजी शिबिरातील सर्व सहभागींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. गेले ते दिवस!

आता ऑलिंपिकचे दिवस आलेत, जेथे पहिला, दुसरा, तिसरा असणार आहे.

देवीदास बागूल, पुणे

 

कांदा जीवनावश्यकच!

23 जूनच्या ‘साधना’ अंकात सुनील तांबे यांचा ‘शेतकऱ्यांचा कांदा’ हा लेख वाचनीय आहे. श्री.तांबे नेहमीच अत्यंत अभ्यासपूर्ण व बारीकसारीक तपशिलासह नेमकी टिपणी करीत लिहितात, याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत.

तरीही त्यांची गाडी (साखर), कांदा (व कापूस) जीवनावश्यक वस्तू नाहीत, म्हणताना घसरली हेही श्री. देवीदास बागूल यांचे म्हणणे योग्यच आहे.

तशी त्यांची गाडी चहाची अतिस्तुती करतानाही किंचित घसरली होती, पण ती फार नव्हती, पण कांद्याच्या बाबतीतले त्यांचे मत पूर्णत: चुकीचेच आहे. कारण ‘कांदा’ हा गोरगरीब ते श्रीमंतांपर्यंत व कन्याकुमारी ते काश्मीर, अहमदाबाद ते गोहत्ती असा सर्व हिंदुस्थानभर, लहानांपासून थोरांपर्यंत सर्व स्त्री-पुरुषांना आवडतो, लागतो व रात्रंदिवस कांद्यावाचून राहवत नाही. म्हणून ‘कांदा’ हे शेतीउत्पादन जीवनावश्यक उत्पादन आहे.

याशिवाय ‘कांदा’ हा सर्व हवामानांत, सर्व प्रकृतीच्या माणसांना चालतो, पचतो व शरीरास आवश्यक असे गुणधर्म असलेला आहे; म्हणूनही त्याची जागा, जीवनावश्यक वस्तूतच आहे, असली पाहिजे!

श्री.तांबे व श्री.बागूल यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे असे मला म्हणावयाचे आहे. मी नाशिकचा रहिवासी, नागरिक आहे.

कांदा हा उपयुक्त, पोषक व तरीही परवडणारा व संबंध वर्षभर उपलब्ध होणारा असा आहे. म्हणून ‘कांदा’ हा सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजेत विराजमान झालेला आहे.

त्यातही विशेष म्हणजे कांदा हा आपल्याकडे भरपूर पिकतो, आपली गरज भागून निर्यात करण्यास पुरेसे उपलब्ध असणारे कांद्याचे उत्पादन आहे.

हे जे कांद्याचे उत्पादन, देशात भरपूर होते, त्यापैकी निम्म्याच्यावर महाराष्ट्रात व महाराष्ट्रातील निम्म्यावर नाशिक, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांत होते, असे असूनही कांदा व कांदाउत्पादक शेतकरी यांच्याकडे कोणी फारसे मनापासून लक्ष देत नाहीत.

जे घडले ते घडले असं- कांद्याचं पीक, शेतकऱ्यांचे हाल व कांद्याच्या भावाने ग्राहकांची तारांबळ होत राहते.

कांदाउत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव क्वचित सापडतो, पण तो सापडला की लगेच आरडाओरडा सुरू होतो. लगेच निर्यातबंदी की, कांदाभाव कोसळणे सुरू होते. सरकारदेखील या प्रश्नांत केवळ नक्राश्रू ढाळते. दोन आणि चार रुपये खरेदी केलेला कांदा सर्रास वीस- तीस रुपयांनी, मुंबई, दिल्लीला ग्राहकांपर्यंत जातो. तेव्हा शिव्याशापाचे धनी शेतकऱ्यांना केले जाते.

पण ट्रान्सपोर्टचा काटकसरीने केलेला खर्च उणे केला तर मधला गाळा हा या मधल्या लोकांच्या घशात जातो, हे वर्षानुवर्षे केले जात आहे. भाव जास्त वाढले की ते पाडण्याचे उद्योग सुरू होतात.

मी या विषयावर नाशिकच्या स्थानिक वर्तमानपत्रांत लिहिले, पण त्याचा उपयोग होत नाही. कारण कांदाउत्पादक शेतकरी परिस्थितीने दुबळा आहे व संघटित नाही. पुढारी, नेते, कार्यकर्ते यांना हा प्रश्न नीट मार्गावर लावावासा वाटत नाही.

कारण त्यांच्यापैकीही कोणीही व्यापारी, दलाल, व्यावसायिक वा त्यांच्याशी हितसंबंध असणारे असू शकतात. त्यामुळे उत्पादक व ग्राहक ह्यांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधात आहेत, असे भ्रम वर्षानुवर्षे जोपासले जात आहेत.

याऐवजी कांद्याचा उत्पादनखर्च काढा, त्यावर कांद्याचे खरेदीदर ठरवा. व्यापारी खरेदी करत नसतील, तर नाफेडने या परवडणाऱ्या हमीभाव दरात खरेदी करावी. अशा खरेदी केलेल्या मालाची देशभर परवडणाऱ्या रेल्वेभाडे दराने व ट्रकने पाठवणी करावी.

कांद्याचे पीक खूप आले तर ते साठवायची व्यवस्था नाफेडने/सरकारने करावी. त्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात परवडणारे भाव असतील तर कांदानिर्यात करावी. अन्य कांद्याची नीट साठवण करावी. कांदा नाशवंत आहे, पण तरीही व्यवस्थित ठेवला तर सहा-आठ महिने ठेवता येतो. असा ठेवलेला कांदा, कमी असताना किंवा कमी उत्पादनाच्या वेळी विकतो, वापरता येतो.

तसेच कांद्यावर डिहायड्रेशन करून एकापेक्षा एक सरस उत्पादने करण्यास प्रोत्साहन देता येणे शक्य आहे. एवढे जरी केले तरी, कांदा उत्पादकास दहा रुपये किलो भाव दिला तरी ग्राहकांपर्यंत नियमितपणे वीस-बावीस रुपये किलो भावाने कांदा पोहोचवता येईल.

पण असे काही नियोजन करायची इच्छा नाही. भाव पडले की, शेतकऱ्यांनी कांदा जास्त लावू नये व भाव क्वचित पडले की, शेतकऱ्यांनी कांदा जास्त लावावा असे शहाजोग सल्ले तेवढे दिले जातात. पण कांदा हे सामान्य शेतकऱ्यांसह साऱ्या सामान्य

माणसांची गरज आहे. व कांदा उत्पादन होते, त्यापेक्षा जास्त केले पाहिजे. असे झाले तर (कोणी लुटणार नाही) साठवता येईल, किंवा नियमित निर्यात करता येईल, ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही, तरीही शेतकरी बिचारे, बी-बियाणे, औषधे, खते, पाणी, राखण सारे करीत उत्पादने घेत आहेत व होईल तेवढ्या उत्पन्न व नफ्यावर समाधान मानत आहेत, तर दुसरीकडे, काही क्षेत्रांतील- भागातील- ग्राहक कांद्याला थोडा भाव मिळाला की बोटे मोडत आहेत.

हे सारे वर्षानुवर्षे सरकार पाहात आहे व मधली मंडळी मात्र मजेत आहेत. आंदोलने तात्पुरती यशस्वी होत विरून जातात.

तर असा हा कांद्याचा प्रश्न. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न व म्हणून कांदा नुसता जीवनावश्यकच, ग्राहकांना नाही तर, तो कांदाउत्पादक शेतकऱ्यांनाही जीवनावश्यक आहे.

अरुण वि. कुकडे, नाशिक

Tags: शेतकरी कांदा उत्पादक पारितोषिक शिबिर farmer                                                                              चित्रकला onion grower prize camp painting weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके