डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वरील सर्व संदर्भ मी पेशव्यांना बदनाम करण्यासाठी घेतलेले नाहीत. पेशवे चांगले होते, असे मी मानतो; पण त्याचबरोबर छोट्या-मोठ्या विभागांना, राजांना आणि जनतेला पेशवे, अब्दाली व बादशाह यांच्यापासून सारखेच भय वाटत होते. म्हणजे शरद जोशी जे म्हणालेत, ‘राजे म्हणजे लुटारू, म्हणून बहुसंख्य खेडी कायम घाबरलेली असत.’ अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला, त्या वेळी खेडी उदासीन होती आणि वाईरकर गोडसेभटजींनी ‘माझा प्रवास’मध्ये नोंदवल्याप्रमाणे 1857 मध्ये सारी जनता उदासीन होती आणि उत्तरेला जाण्यापूर्वी काकांनी त्याला सांगितले होते, ‘उत्तर देशातल्या स्त्रिया फार चतुर; त्यांच्यापासून जपून रहा!’ होळकरांनी जाळलेला इंदूरचा राजवाडा अजूनही तसाच आहे.

धर्म राजकारण की, अधर्म राजकारण?

सदानंद मोरे हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांची मांडणी, माहितीची विपुलता व शैली याचा मी चाहता आहे, पण सध्याच्या त्यांच्या साधनातील व इतरत्रसुद्धा येणाऱ्या लेखांमुळे मनात गोंधळ होतोय. मराठी राज्य व पेशवाई याबद्दल ते फारच आदराने व एकांगी लिहिताहेत, असे वाटते. मराठी राज्य व पेशवाई याबद्दल माझ्याही मनात प्रेम व आदर आहे. मात्र शिवाजी व अकबर वगळता सारे मध्ययुगीन राजे व राजवटी एकाच माळेचे मणी होते, त्या काळाच्या चौकटीत बंदिस्त होते; त्यामुळे त्यांच्यात उडदामाजी काळे-गोरे एवढाच फरक करता येतो, असे मला वाटते. आता मोरेंनी साधनात (12 जुलै) ‘उत्तरेतला एकही मुसलमान सत्ताधारी पानिपतवर मराठ्यांच्या मदतीला आला नाही, असे लिहिले आहे. इतरत्र त्यांनी दुसऱ्या एका लेखात मराठ्यांनी हक्काने मिळवलेली चौथाई वसूल करण्यासाठी लुटालूट केली, असे लिहिले आहे. आता याबाबत वस्तुस्थिती काय आहे?

1. मार्च 1760 मध्ये राजा केशवराव पेशव्यास लिहितो, ‘अब्दाली आला आहे. त्यास इकडील सरदारास त्याचेही भय व तुमचेही भय, त्यामुळे कोणास मिळतील सांगता येत नाही’ (पेशवे दफ्तर 21/187)

2. इ.स.1787 मध्ये जोधपूर येथून कृष्णाजी जगन्नाथ पुण्यात पंतप्रधानास कळवितो की, ‘राजपूत सरदारांचे म्हणणे की, तुर्कांपेक्षा हिंदी राज्य चांगले. परंतु राज्यउच्छेद होऊ लागला, तर लढाई होणे प्राप्तच आहे. मुलखाचा उच्छेद होऊ नये, रयतेस शांती मिळावी, उभी पिके तुडवली जाऊ नयेत, अशी राजपूत राजांची इच्छा आहे.’

3. जानेवारी 1729 मध्ये बाजीराव पेशा चिमाजीस लिहितो, ‘जिकडे पैसा मिळेल तिकडे जाणे, माळवा प्रांत लुटून टाकणे. आम्ही छत्रसालचे मुलखात आलो आहोत. तुम्ही इकडे येऊ नये. तुम्ही तिकडे पोट भरणे, आम्ही इकडे भरतो. दोन्ही लष्करे ही एका जागी घेऊन पैका कैसा मिळेल?’

4. जुलै 1757 मध्ये सखाराम भगवंतास राघोबादादा लिहितो, ‘तुम्ही सुजाउद्दोला याचे मदतीस जावे लागेल. परंतु तो रुपया देणार नाही, असे म्हणाला. ऐसीयासी रुपये न घेता त्याचे मदतीस जावे, यास सरकारची किफायत कोणती? जिकडे रुपया मिळेल, तिकडे जावे. मुलूख मिळवावा व जप्ती करावी. तुम्हास पुढे पाठवायचे कारण हेच. कोणाचे मदतीस पाठवले नाही, तीर्थयात्रेस पाठवले नाही’ (पेशवे दफ्तर 21/134)

5. डिसेंबर 1759 मध्ये रामजी अनंत यास लिहिलेल्या एका पत्रात नानासाहेब पेशवा स्पष्ट लिहितो की, ‘बंगाल लुटून कोट दोन कोट रुपये कर्ज फेडणे आवश्यक आहे.’ (काव्येतिहास संग्रह 166)

6. एप्रिल 1737 मध्ये भीमराव पेशव्यास बाजी लिहितो की, ‘तुमच्या आज्ञेप्रमाणे दतीयेकर वगैरे राजांकडून दांडगाईने पैसे वसूल केले आहेत. (पेशवे दफ्तर 15/34)

7. त्याच वर्षाच्या जूनमध्ये मराठी अधिकाऱ्यांच्या भीतीने रयत पळून जाऊन निम्मी शहरे रिकामी झाल्याची हकिगत पिलाजी जाधव यांनी पेशव्यास कळवली आहे. (पेशवे दफ्तर 15/52)

8. मे 1739 मध्ये मराठी सैन्याने रामनगरच्या रयतेची चिरगुट पांघरुणेसुद्धा पळविल्याबद्दलची हकिगत कृष्णराव महादेव याने चिमाजी अप्पास कळविली. (पेशवे दफ्तर 40/14)

9. इ.स.1747 मध्ये उत्तरेकडून पेशव्यास आलेल्या एका पत्रात म्हटले आहे, ‘येथील लोक पैका आपल्या प्रतापाच्या भयेकरून देतात, फार कष्टी, न मागता देतात. दु:ख वाटते.’ (पेशवे दफ्तर 21/19) 

वरील सर्व संदर्भ मी पेशव्यांना बदनाम करण्यासाठी घेतलेले नाहीत. पेशवे चांगले होते, असे मी मानतो; पण त्याचबरोबर छोट्या-मोठ्या विभागांना, राजांना आणि जनतेला पेशवे, अब्दाली व बादशाह यांच्यापासून सारखेच भय वाटत होते. म्हणजे शरद जोशी जे म्हणालेत, ‘राजे म्हणजे लुटारू, म्हणून बहुसंख्य खेडी कायम घाबरलेली असत.’ अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला, त्या वेळी खेडी उदासीन होती आणि वाईरकर गोडसेभटजींनी ‘माझा प्रवास’मध्ये नोंदवल्याप्रमाणे 1857 मध्ये सारी जनता उदासीन होती आणि उत्तरेला जाण्यापूर्वी काकांनी त्याला सांगितले होते, ‘उत्तर देशातल्या स्त्रिया फार चतुर; त्यांच्यापासून जपून रहा!’ होळकरांनी जाळलेला इंदूरचा राजवाडा अजूनही तसाच आहे.

लोकहितवादींनी लिहिल्याप्रमाणे, अमृतरावांनी होळकरांच्या मदतीने खणती लावून पुणे लुटले. पैसे मिळावेत, म्हणून स्त्रियांना आणि लहान मुलांना तापलेल्या तव्यावर उभे केले व त्यांच्या बेंबीत उकळते तेल ओतले. मिळालेली चार कोटी रुपयांची लूट घेऊन ते काशीच्या पंडितांकडे गेले. त्यांनी सांगितले, ‘या पापाला प्रायश्चित्त एवढेच की, त्यातली निम्मी रक्कम आम्हाला द्या’ आणि बंगालमध्ये हिंडलो तर ‘लवकर झोपी जा, नाही तर बागी मराठी येतील’ म्हणून लहान मुलांना लोकगीतातून घाबरवत असत, हे आजही समजते. लोकगीते खोटी असतात का? आणखी एक गोष्ट आहे. परिवारातील एक इतिहासकार म्हणाला होता, ‘मराठे तेवढ्यासाठीच गेले होते. ते ज्या विभागात गेले, तेवढाच बंगाल भारतात राहिला; बाकीचा धर्मांतरित होऊन पाकिस्तानात गेला.’ त्याला उत्तर देताना एक बंगाली इतिहासकार म्हणाला होता, ‘मराठे गेले त्याच्या आधी वा नंतर धर्मांतरे झालेली नाहीत; उलट जिथे प्रजा हिंदू होती, दुर्बल होती, तेथे लुटालूट करणे सोपे होते, म्हणून मराठे गेले होते.’

असो. इतिहास हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, पण तो माझ्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे याबाबत सदानंद मोरे यांनी मार्गदर्शन करावे, या एकाच हेतूने हे पत्र लिहिले आहे

दत्तप्रसाद दाभोलकर, सातारा

 

एक उत्तम भाषण

साधनाने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी पुण्यात ‘प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर केलेले भाषण ऐकण्याची संधी मिळाली. वागळे मनापासून आणि मनातलं बोलले. वाहिनीवर बोलताना ते काहीसं कर्कश आणि आक्रस्ताळेपणे बोलतात, पण ‘त्या’ भाषणात ‘तो’ सूर त्यांनी लावला नाही; तरीही त्यांचं निवेदन पुरेसं आक्रमक आणि एका अर्थी स्फोटक होतं. माध्यमांतले संपादक कोणत्या दबावाखाली आणि तणावाखाली काम करत असतात याची कल्पना अनेकांना आहे. हेच ‘भाग्य’ जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या अनेक कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तींच्या वाट्याला येतं. तथापि, असह्य दबावाखाली आणि भ्रष्ट वातावरणात कार्यरत राहूनही काही सकारात्मक व दिलासादायक काम करणारे अनेक जण आढळतात- माध्यमात, प्रशासनात, उद्योगव्यवसायात, न्यायपालिकेत, अगदी करमणुकीसारख्या तद्दन व्यापारी क्षेत्रातही- हे आपलं भाग्यच म्हणायला हवं, याची एक ओशासक चुणूक पुन्हा एकदा वागळे यांच्या भाषणात ऐकायला मिळाली.

‘पेड न्यूज’ हा प्रकार तसा अलीकडे राजकारणात बराच रुळला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तो आणखी प्रकर्षाने जाणवला. त्याहीपेक्षा तो घवघवीत यश मिळवून गेला, ही चिंतेची बाब आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो! ही जगातली एक सर्वाधिक महागडी निवडणूक होती, एवढंच नव्हे तर ‘माध्यमां’नी या निवडणुकीच्या निकालावर निर्णायक पकड मिळवल्याचं दिसलं. त्यावरची कडी म्हणजे निवडणूक संपल्यानंतरही काही ठरावीक उद्योगसमूह सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने माध्यमे पद्धतशीरपणे ताब्यात घेताना दिसतात. परिणामस्वरूपी संपादकांचं ‘अभिव्यक्ती-स्वातंत्र्य’ आणखीच धोक्यात आलंय, हे वागळे यांनी अगदी ठणकावून, उदाहरणं देऊन सांगितलं. खुद्द स्वत:वरही राजीनामा देऊन बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते, हेसुद्धा त्यांनी ‘खुल्लम्‌खुल्ला’ सांगून टाकलं.

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना डॉक्टरांनी ‘सक्तीची रजा’ घ्यायला लावली असल्याचं ऐकलं होतं. परंतु बरेच दिवस झाले, वागळे त्यांच्या वाहिनीवरून गायबच राहिले आहेत. ते फक्त प्रकृतीच्या कारणाने की त्यांच्यावरही त्यांच्या स्वत:च्याच भाकिताप्रमाणे पायउतार होण्याची वेळ आलीय, ते समजलं नाही. पण ते खरं असेल तर फारच चिंताजनक आहे. मी काही ‘निखिल वागळे यांच्या फॅन क्लब’मधला नाही; पण तरीही, काहीएक स्वतंत्र बाणा जपणाऱ्या पत्रकारांमध्ये ते मोडतात, अशी माझी समजूत आहे आणि म्हणूनच त्यांचं मुख्य प्रवाहातल्या माध्यमात असणं मला महत्त्वाचं वाटतं.  

शेवटी आपण चिंता करण्यापलीकडे तरी काय करू शकतो? भ्रष्ट आणि सवंग माध्यमांपासून स्वत:चा पूर्ण बचाव करायचा म्हटलं तर टीव्ही बघायला नको आणि पेपरही वाचायला नको. बातम्या ऐकायच्यात? बी.बी.सी. पाहा. ताज्या घडामोडी माहिती करून घ्यायच्यायत? इंटरनेटवरचे काही मोजके आणि विश्वसनीय ब्लॉग वाचा. यातलं काहीच करावंसं वाटत नसेल, तर ‘हरी-हरी’ करत घरी स्वस्थ बसा!

प्रभाकर (बापू) करंदीकर, पुणे

 

त्यांच्या हेतूबद्दल शंका नको...

26 जुलैच्या अंकात भाजपच्या विजयामुळे निर्माण होणाऱ्या भयभ्रमाचे भविष्य वर्तवण्यात डॉ.रामचंद्र गुहांची थोडी घाई झाली आहे. कारण भाजपला देशाचे सरकार चालवण्यासाठी निदान दीड-दोन वर्षे देणे उचित ठरेल. भारतातील गरिबी व सामाजिक विषमतेचे वास्तव याबाबतीत डॉ.गुहांचे मुद्दे रास्त आहेत. तथापि, जेत्यांची मानसिकता डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व भारतीय आध्यात्मिकतेच्या श्रेष्ठत्वाशी जोडण्यात डॉ.गुहांचा नेहमी दिसणारा समतोल दिसत नाही.

वंश, धर्म, भाषा व संस्कृतीचा अभिमान बाळगणे हा मानवी मनाचा स्वाभाविक कल आहे. तथापि, वेद व उपनिषदांनी सर्वप्रथम प्रकाशात आणलेल्या भारतीय आध्यात्मिकतेची मूल्ये, त्यांच्या अतिशायी स्वरूपामुळे (transcendental nature) या मानवनिर्मित स्वाभाविक भेदांपलीकडे जाणारी आहेत, असे जगातील प्रमुख विचारवंत मानतात.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या फर्ग्युसन कॉलेज अँफी थिएटरमध्ये 1951 साली झालेल्या भाषणास मी हजर होतो. हिंदू महासभेत अहिंदूंनाही मुक्त प्रवेश द्यावा, हा त्यांचा मुद्दा नाकारल्यामुळे त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला व भारतीय आध्यात्मिकतेची मूल्ये सर्व मानव वंशांचा समान ठेवा आहे, असे डॉ.मुखर्जी म्हटल्याचे स्मरते. डॉ.मुखर्जी महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष होते. बुद्धकाळातील प्राचीन अवशेष घेऊन श्रीलंका, ब्रह्मदेश (म्यानमार), थायलंड, कंबोडिया इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या. भारतातील विरोधी पक्षांची एक राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्यांनी स्थापन केली. या आघाडीचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. डॉ.राममनोहर लोहियांनी पुढे हाच कित्ता गिरवला. जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण विलिनीकरणासाठी त्यांनी देशव्यापी आंदोलन केले. त्यावेळी त्यांना श्रीनगरमध्ये अटक झाली व अटकेत असतानाच 1952 मध्ये वयाच्या केवळ 52 व्या वर्षे त्यांचा मृत्यू झाला. डॉ.मुखर्जींचे व्यक्तिमत्त्व नि:स्वार्थी व उदारमतवादी होते. त्यांच्या हेतूबद्दल शंका घेण्याचे काही कारण दिसत नाही.

श्री. रा. नेने, पुणे

 

टोपी घालणारा ‘सेक्युलर?’

6 जुलैच्या साधनात दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख वाचला. त्यानिमित्त हा पत्रप्रपंच.

1. दाभोलकर लिहितात, ‘...अगदी सद्‌भावना यात्रेतसुद्धा मुसलमानांची टोपी डोक्यावर ठेवावयास नकार देणारे मोदी...’ आता नरेंद्र मोदींची तथाकथित ‘सद्‌भावना यात्रा’ (जी मुळात एक ‘पब्लिसिटी स्टंट’ होती) व अजितदादांचे ‘आत्मक्लेश’ हे एकाच पठडीतले होय. जर मोदींनी मुसलमानांची टोपी डोक्यावर घातली असती, तर काय मोदी ‘सेक्युलर’ झाले असते का? मुलायमसिंह, अखिलेश यादव हे मुसलमानांची टोपी घालून निवडणुकीचा प्रचार करतात. म्हणून काय त्यांच्या राज्यात मुसलमान जनांची स्थिती आदर्शवत आहे का?

2. संघ व काही ‘हिंदुरक्षक’ संघटना भाजपच्या शासनकाळात मदांध होऊन मुसलमानांची हत्या वगैरे करतील, असे मानायचे कारण नाही. त्या संघटनांचा ‘मुसलमानद्वेष’ जगजाहीर असला तरी भारतात सद्यस्थिती अशी आहे, की गळे कापण्याचे राजकारण टिकणार नाही.

3. हिंदूंमध्ये धार्मिक असहिष्णुता पसरवणाऱ्या संघटनांबरोबरच तशाच प्रकारच्या मुसलमान संघटनांचाही विचार व्हावा. ओवेसींची एमआयएम असो वा मुस्लिम लीग (केरळ), हिंदूंविरुद्ध भावना भडकावून वहाबी मुसलमानत्व निर्माण करण्याचे प्रयत्नही गाडले पाहिजेत.

श्री.रावसाहेब जयवंतराव देसाई, मडगाव, गोवा. 

Tags: दत्तप्रसाद दाभोलकर प्रभाकर (बापू) करंदीकर श्री. रा. नेने श्री.रावसाहेब जयवंतराव देसाई ravsaheb desai shri. ra. nene prabhakar karandikar dattprasad dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात