डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वस्तुत: ज्ञानेश्वर मुळे यांनी तरुणपणात पन्हाळगडावर मंगेश पाडगावकरांची कशी भेट झाली व त्यांनी मुंबईला आकाश आणि हिरवळ बघायला मिळत नाही, म्हणून आम्हांला कोल्हापूरला यायला आवडतं, असे पाडगावकरांचे विधान मुळेंच्या ‘कायमचे’ लक्षात कसे राहिले, याचे सविस्तर वर्णन केले आहे.

पाडगावकरांचे मोकळे आकाश कायमचे लक्षात राहूनही मुळे उच्च, अति उच्च शिक्षण घेऊन विदेशी सेवेच्या निमित्ताने जगभर का हिंडले, याचे उत्तर मिळत नाही. थोडक्यात मुळे यांना जो ‘लोळणे समाज’ स्थापन करावयाचा आहे तो सर्व खाऊनपिऊन तृप्त झालेल्या उच्चभ्रू वर्गाकरिता.

खरे तर तसे क्लब आणि रिसॉर्ट तर पुष्कळ आहेतच, पुन्हा मुळेंच्या या ‘लोळणे समाज’ची गरज नाही. ही मनोवृत्ती चंगळवादाचेच एक रूप आहे.

मुळेंचा ‘लोळणे समाज’ चंगळवादाचेच रूप

‘साधना’चा सात जुलैचा अंक नेहमीप्रमाणेच एका बैठकीत वाचून काढला. परंतु त्यातील ज्ञानेश्वर मुळे यांचा ‘लोळणे विरुद्ध पळणे, आधुनिक संस्कृती-संघर्ष’ या लेखातील विचार पटले नाहीत. ‘साधना’मध्ये तो प्रसिद्ध व्हावा याचेही आश्चर्य वाटले, म्हणून हा पत्रप्रपंच.

आधुनिक जीवनशैलीत स्पर्धेमुळे दैनंदिन आयुष्यात सतत पळावे लागते, प्रगतीच्या नावाखाली आपण नैसर्गिक जीवन गमावून बसलो आहोत म्हणून आता वेग कमी केला पाहिजे, एव्हढेच नव्हे तर आता ‘लोळणे’ सुरू केले पाहिजे, असा मुळे यांच्या लेखाचा सारांश आहे.

या संदर्भात एक छोटासा किस्सा जगप्रसिद्ध आहे. (तोच आशय सांगायला मुळे यांनी चार पाने खर्ची घातली आहेत.) एक आफ्रिकन शेतकरी आपल्या शेतात झाडाखाली निवांत ‘लोळत’ असतो. तिकडून जाणारा एक ब्रिटिश घोडेस्वार प्रवासी त्याला हटकतो. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद झडतो:

‘‘अरे अशा कामाच्या वेळी तू असा लोळत का पडलेला आहेस’’

‘‘मग मी काय करायला हवं?’’

‘‘अरे आपल्या शेताची मशागत कर, पेरणी कर..’’

‘‘त्यामुळे काय होईल?’’

‘‘काय होईल म्हणजे? धनधान्यानं तुझं घर भरून जाईल. सुबत्ता येईल...’’

‘‘मग... पुढे...’’

‘‘अरे पुढे काय... तू, तुझी बायको पोरं सुखी व्हाल...’’

‘‘मग....’’

‘‘अरे मग काय, तू आरामात जीवन जगशील...’’

‘‘महाशय..... मी आतासुद्धा तेच करीत आहे. आराम करण्यासाठी पुन्हा तुम्ही सांगता ते करायची काहीच गरज नाही...’’ या किश्शाचे अनेक अन्वयार्थ आहेत.

‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ असाही (निसर्गाभिमुख जगणे) अर्थ आहे, आणि ‘अल्पसंतुष्ट आळशी माणसाची प्रवृत्ती’ असाही अर्थ आहे. समाधानी वृत्ती हीच सुखाची गुरुकिल्ली, असे कितीही म्हटले तरी आजच्या काळात त्या गोष्टीतील आफ्रिकन शेतकऱ्याचे अनुकरण कुणी करावे असे कोणतेच मानवतावादी तत्त्वज्ञान सांगत नाही, जे ज्ञानेश्वर मुळे सांगत आहेत.

वस्तुत: ज्ञानेश्वर मुळे यांनी तरुणपणात पन्हाळगडावर मंगेश पाडगावकरांची कशी भेट झाली व त्यांनी मुंबईला आकाश आणि हिरवळ बघायला मिळत नाही, म्हणून आम्हांला कोल्हापूरला यायला आवडतं, असे पाडगावकरांचे विधान मुळेंच्या ‘कायमचे’ लक्षात कसे राहिले, याचे सविस्तर वर्णन केले आहे.

पाडगावकरांचे मोकळे आकाश कायमचे लक्षात राहूनही मुळे उच्च, अति उच्च शिक्षण घेऊन विदेशी सेवेच्या निमित्ताने जगभर का हिंडले, याचे उत्तर मिळत नाही. थोडक्यात मुळे यांना जो ‘लोळणे समाज’ स्थापन करावयाचा आहे तो सर्व खाऊनपिऊन तृप्त झालेल्या उच्चभ्रू वर्गाकरिता.

खरे तर तसे क्लब आणि रिसॉर्ट तर पुष्कळ आहेतच, पुन्हा मुळेंच्या या ‘लोळणे समाज’ची गरज नाही. ही मनोवृत्ती चंगळवादाचेच एक रूप आहे.

शिक्षण, रोजगार या क्षेत्रांतील सर्वोच्च संधीचा लाभ झालेल्या नवश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांना सर्व काही आटोपल्यानंतर आता असा निवृत्तिमार्गाचा झटका येणे स्वाभाविक आहे.

खंत अशी आहे की ‘साधना’मध्ये अशी छुपी चंगळवादी भूमिका प्रसिद्ध व्हावी. कारण ‘साधना’ मध्ये अशोक पवार आणि ॲड.दिलीप शिंदे यांचेही लेख प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या जगातील माणसे शिक्षण, निवास आणि आरोग्याच्या मूलभूत सोयींपासूनही वंचित दिसतात.

हातावर पोट असलेली माणसे तासभर काम करून आता आपण दिवसभर लोळू या असा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे मुळे यांनी आपल्या चंगळवादी ‘लोळणे समाज’ची तुलना प्रार्थना समाज किंवा आर्य समाजाशी करू नये. शासनातील अधिकारी सरकारी भूखंड मागून आपल्या सोसायट्या स्थापन करण्याचा आदर्श निर्माण करीतच आहेत, आता निवृत्त उच्च अधिकाऱ्यांनी सरकारला ‘लोळणे समाज’साठी एखादी टेकडी मागावी, म्हणजे ऊर्वरित मंत्री-आमदारांची लोळण्याची सोय होऊन जाईल.

प्रमोद मुनघाटे, pramodmunghate304@gmail.com

 

नेहरू सुकार्नो यांची आठवण झाली

30 जूनच्या ‘साधना’तील ‘तुकाराम’ या सिमेनासंबंधी राजा शिरगुप्पे यांचा लेख वाचला. फारच मार्मिक व उत्साहवर्धक असे त्याचे स्वरूप आहे. काही काही वाक्ये तर मूलभूत स्वरूपाचे तत्त्वज्ञान सांगणारी आहेत.

उदा... ‘‘कुठलीही इतिहास घडवणारी व्यक्ती ही स्वयंभू घटना नसते किंवा अधिक नेमक्या शब्दांत सांगायचे तर ‘अवतार’ नसते. ती एकूण परिस्थितीची, समाज विकास प्रक्रियेतील अपरिहार्य निर्मिती असते, ज्या काळाची ती व्यक्ती निर्मिती असते, तो काळ आणि त्या व्यक्तीला लाभलेले प्रत्यक्ष पर्यावरण यांची नीट मांडणी करून त्या व्यक्तीला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे.’’

हे वाचत असताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व इंडोनेशियाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ.सुकार्नो यांची आठवण झाली.

त्या वेळी त्यांना ‘परिस्थितीचे अपत्य/क्रांतीचे अपत्य’ असे म्हटले जात असे. त्या परिस्थितीतील त्यांच्या कार्यासाठी त्यांची ओळख होती.

मी 1966 ते 1968 दरम्यान औरंगाबाद व नांदेडमध्ये एस.टी.महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कामाला होतो. तेव्हा माझा मराठवाड्याशी संबंध आलेला आहे. 10 वर्षांपूर्वी माझी मुलगी परभणी जिल्ह्यातील ‘सेलू’ला दिलेली आहे. म्हणूनच तेथे जाणे-येणे होते व त्यामुळे मराठवाडा कसा आहे ते दिसते.

16 जूनच्या मराठवाडा अंकामधील दासू वैद्य यांच्या कविता आत्ताच वाचल्या व ताबडतोब हे पत्र लिहीत आहे. कविता आरपार भिडणाऱ्या आहेत. ‘नग्न सत्य’ त्या व्यक्त करतात.

मी नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी या खेड्यात राहणारा आहे. दासूंच्या कवितांनी त्या काळातील आठवणी जाग्या केल्या. आमचे गाव हे नांदगाव या कायम दुष्काळी तालुक्यात येते.

पाऊस यावा व आमच्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे म्हणून आम्ही राम मंदिराच्या खोल भागात असलेल्या महादेवाच्या पिंडीला पाण्यात बुडवून संकटात टाकायचो.

आम्ही बच्चेकंपनी कमरेला लिंबाच्या पानाच्या डहाळ्या बांधून उघड्याबंब अंगाने प्रत्येक गल्लीत घरोघर जाऊन ‘धोंडी धोंडी पाणी दे, सायमाय पिकू दे, देवाले चेले, पाणी घेऊन आले’ अशी हाक देत पाणी मागत फिरत होतो.

त्या वेळी त्या घरांतील गृहिणी आमच्या अंगावर कळशा-बादल्यांनी जोराने पाणी फेकत. जोरदार पाऊस यावा ही त्यामागची त्यांची भावना असे. या प्रसंगाची व त्या काळाची आठवण झाली. या स्मृतिरंजनाबद्दल धन्यवाद.

माननीय श्री.राजा शिरगुप्पे यांनी ‘तुकाराम’ सिनेमावरील लेखात दासूंविषयी बनविलेल्या त्यांच्या मतात सुधारणा करून दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे ‘दुबार पेरणी’च्या अभंगाविषयी उत्सुकता आहे. जबरदस्त इच्छाशक्ती असल्यामुळे मुसळधार पावसाची कविता निश्चितपणे दासू लिहू शकतील.

पी. जी. आसोपा, नाशिक.

 

हा तर लेखणीने अंगठा छाटण्याचा प्रकार!

‘साधना’ या प्रतिष्ठाप्राप्त साप्ताहिकात 30 जून 2012 च्या अंकात प्रतिष्ठाप्राप्त विचारवंत लेखक आणि आमचे लहान बंधू चंद्रपूरचे पूर्वनिवासी आणि एका भारदस्त ‘लोकमत’ दैनिकाचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी बिचाऱ्या पी.संगमा या निरागस निष्कपट आदिवासी नेत्याची खिल्ली उडविण्यासाठी ‘सेंटर पेज’मध्ये एक खुसखुशीत आणि खुन्नसबाज लेख लिहिला.

लेखाचे नाव ‘हसरा पुढारी हास्यास्पद होतो तेव्हा...’

लेखनस्वातंत्र्य आहे, प्रा.सुरेश द्वादशीवारांनी विरोध करावा, परंतु एका आदिवासी नेत्याची अशी थट्टा करू नये असे आम्ही त्यांना विनवतो.

प्राचीन भारतात एकलव्याचा अंगठा कापून दक्षिणा घेणारे द्रोणाचार्य कधी टीकेस पात्र झाले नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यात लोकसभा किंवा कोणतीही निवडणूक जिंकता आली नाही.

सोनियाजी अथवा राहुल वगैरे मंडळींचे नाते ‘तसे’ नसते तर!

संत तुकारामाच्या चरित्र व चारित्र्याची आता वाहवाह होते, पण उच्च दर्जाचे साहित्य त्यांना इंद्रायणीत बुडवावे लागले! आतापर्यंत जाती, वंश आणि धर्म पाहून बऱ्याच उमेदवारांना राष्ट्रपती ‘करण्यात’ आले, असे लिहिणारे सुरेशराव पी.ए.संगमा (भूतपूर्व सभापती लोकसभा) यांची मात्र टिंगलटवाळी करतात.

जिंकण्या-हरण्याचा प्रश्न नाही. परंतु या देशाची फाळणी होताना अहिंसा सम्राट म.गांधींचा खून होताना जाती, वंश आणि ‘प्रवृत्ती’चा परिचय या देशाला झालेला आहे. यावर खूप काही लिहिता येईल. पण यात एका आदिम समाजाच्या नेत्याची टिंगलटवाळी करून सुरेशराव द्वादशीवारांनी लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांवर प्रहार केलेला आहे हे दुर्दैव!

एकनाथ साळवे, माजी आमदार, दुधोळी, जि.चंद्रपूर

-------------------

विज्ञानजन्य विचारांची पेरणी

30 जूनच्या साधना संपादकीय लेखातून राजा शिरगुप्पे यांनी ‘तुकाराम’ चित्रपटाच्या निर्मितीचा, आशय-अभिव्यक्तीचा आणि वारकरी परंपरेचा घेतलेला वेध चांगला आहे.

शेवटी चित्रपट ही एक कलाकृती असते. तिच्या मर्यादा (माध्यम) असतात.

‘तुकोबाचा अंत तुम्ही दाखवू शकला असता तर तुकोबांच्या अमर क्रांतिकारकत्वाचा क्रांतिकारी आशय तुम्ही चित्रपटाला देऊ शकला असता.’ अशी शंका उपस्थित करून एका जुन्याच विषयाचा संदर्भ त्या लेखात येतो.

उत्तरापंथे गमन झालेले महानुभाव श्री चक्रधरस्वामी असोत की जिवंत समाधी प्रकरण असो, सदेह वैकुंठगमनाचे भावनिक नाट्य असो, इथल्या व्यवस्थेचा वैचारिक खुजेपणा, अनैतिहासिक विचार आणि सत्य संशोधनाचा अभाव यांचे काय करायचे?

भावना तर लगेच भडकतात; महात्म्यांबाबत प्रश्न खूप नाजूक असतात. बुद्धिनिष्ठा स्वीकारायला कोण तयार आहे?

‘विद्रोही तुकाराम’मधील मतांचा अभिजनवादी विचारसरणीवर काय परिणाम होऊ शकला? बहुजन स्त्री-पुरुषांच्या अज्ञानमूलक आणि भडकणाऱ्या श्रद्धाशील (अंधश्रद्धा) भावनांचेही काय करणार? असे अनेक प्रश्न सातत्याने निर्माण होत आले. ‘चार्वाक’ही त्यामुळे असाच दुर्लक्षित झाला. वगैरे...

चित्रपट, कविता, साहित्य कलाकृतीचे कवित्व ठीक आहे. याची जाणीव झाली की, ‘माफ करणे किंवा माफी मागणे’ याला काहीच अर्थ उरत नाही. तो एक उपचारच ठरतो. प्रखर ज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा, विवेक आणि विज्ञानजन्य विचारांची पेरणी करण्याचा मनोदय व्यक्त केल्याबद्दल आभार.

प्रा. किसन पाटील, जळगाव

-------------  

शासनातील अधिकारी सरकारी भूखंड

उपेक्षितांच्या जीवनदर्शनाने विचारांना चालना मिळाली 7 जुलै 2012 चा साधना अंक विचारांना चालना देणारा वाटला. यातील ‘रबर स्टँप ही प्रतिमा अस्पष्ट करणार?’ हे संपादकीय प्रभावी व्यक्तिपरिचय करून देणारे असून, त्यातील प्रणव मुखर्जी यांच्या कार्याचा चढता आलेख खरोखरच गौरवपूर्ण व कौतुकास्पद आहे.

या अंकातील राजाभाऊ शिरगुप्पे यांचा ‘गरिबांचं देखणेपण’ आणि अशोक पवार यांचा ‘कष्टकरी माय माझ्या डोकशात घुमायला’ हे दोन्ही लेख वास्तवाचे प्रभावी चित्रण करणारे तर आहेतच, पण जगण्यासाठी व्यवस्थेशी करावा लागलेला संघर्ष आणि मानवतेचे विकृत दर्शन झाल्याचे जाणवले.

अलीकडे नात्यात आलेले दुरावलेपण आणि मायेचा संपत चाललेला ओलावा याचा परिणाम, माणसापासून दूर होत असलेला माणूस हे खरोखरच अस्वस्थ करणारे आहे.

राजाभाऊ यांनी आपली खंत मावशीच्या आठवणीच्या रूपाने व्यक्त केली असली तरी परिस्थितीत न होणारा बदल ही चिंतेची बाब आहे.

गरिबीत जन्म घेणं हा गुन्हा असत नाही आणि कुणी कुठं जन्म घ्यावा हे कधी कुणी ठरवत नाही, पण जगण्यासाठी सर्वांनाच धडपड करावी लागते या अर्थाने राजाभाऊंच्या मावशीचे जगणे हे खऱ्या संघर्षाचे अस्वस्थ करणारे जगणे आहे.

मागच्या अंकातील ‘चळवळ्या पोरांची वांड मावशी’ हा राजाभाऊंचा लेख समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या, धडपड्या कॉ्मरेड धनाजी गुरव यांच्या आईचे मोठेपण सांगणारा आहे. अनेक बायाबापड्यांचे जगणे राजाभाऊंच्या लेखनातून समोर यावे असे मनोमन वाटते.

‘कष्टकरी माय माझ्या डोकशात घुमायला’ हा अशोक पवार यांचा लेख समाजातल्या दु:खित, पीडित वारांगनांचे दु:ख मांडणारा आहे. पडद्यामागील स्त्रीचे जगणे खरोखरच अंगावर शहारे आणणारे असते हा अनुभव त्यांनी स्वत: घेतला आहे.

नामदेव ढसाळांच्या, अरुण काळे यांच्या कवितेत येणारे स्त्रीजिणे अशोक पवार पुन्हा एकदा या लेखातून पुढे आणतात, यावरून स्त्रीकडे बघण्याची दृष्टी आता बदलायला हवी एवढे शिकता आले तरी पुष्कळ असे वाटते. दोन्ही लेख अस्वस्थ करणारे व काहीतरी शिकण्यासाठी सांगून जाणारे आहेत.

प्रा.डॉ.संपतराव पार्लेकर, पलूस, जि.सांगली  

 

प्रसंग आणि परिस्थितीनुरूप असणारी भाषाशैली

9 जूनच्या ‘साधना’मध्ये ‘कॉ.दिलीप कांबळे : लाल सलाम’ ही संघर्षकथा वाचली आणि मन विविध प्रकारच्या भावभावनांनी भारावून गेले.

ॲड.के.डी. शिंदे यांनी ही संघर्षकथा अत्यंत प्रभावीपणे लिहून कॉ.दिलीप कांबळे यांचे जिवंत शब्दचित्र नजरेसमोर उभे केले आहे.

यातून एक कार्यकर्ता कसा घडत जातो हे जसे समजते, तसेच दुसऱ्या बाजूने एक कार्यकर्ता दुसऱ्या नव्या युवकाला हाताशी धरून एखाद्या शिल्पासारखा कसा घडवत जातो, याचीही उकल होते. ही कथा काल्पनिक नाही, त्यामुळे हा काही नुसता प्रतिभेचा फुलोरा नाही. एका कार्यकर्त्याचे वास्तव चित्र कॉ.दिलीप कांबळेंच्या निमित्ताने अभ्यासता आले.

ॲड.शिंदे यांची शोधक दृष्टी या संघर्षकथेमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. प्रसंग आणि परिस्थितीनुरूप असणारी त्यांची भाषाशैली वाचकांच्या मनाचा ठाव घेते आणि वाचक-लेखक स्नेहबंध निर्माण करते.

वाचकांच्या मनावर प्रभाव टाकणारी कथेतील वाक्ये : शरणागत सैनिक ज्या हतबलतेतून रणांगणात शस्त्रे खाली ठेवतो, त्याच हतबलतेतून दिलीपनं पाटी-पेन्सिल खाली ठेवली... तलाठ्याच्या हाताखाली उमेदवारी करणारा काही दिवसांनी तलाठी होतो, किन्नरचा सरावाने ड्रायव्हर होतो, कंपाऊंडचा डॉक्टरबी होतो, गवंड्याच्या हाताखाली काम करणारा गवंडी होतो.

बी.आर. माडगूळकर, पिंपरी, पुणे

Tags: विवेक बुद्धिनिष्ठा ज्ञाननिष्ठा लोकशाही चंगळवाद पाऊस दुष्काळ conscience intellect enlightenment democracy chauvinism rain drought weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके