डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

I phoned Raja Shirguppe after reading his article on ‘संत तुकाराम’. Suresh Dwadashiwar's ‘मातीचे पाय’ remark for the ex-president Abdul Kalam for desiring to be President again reminded me of the infamous statement made by Churchill for our leaders "Men of straw with feet of Clay". Other articles, poems and above all- readers response, made me wait for each issue eagerly and expectatntly.- Taher A. Poonawalla, Pune

इंदिरा गांधींना वेगळा मार्ग काढता आला असता?

साधनाच्या 28 जुलैच्या अंकात यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रग्रंथावर नरेंद्र चपळगावकरांनी लिहिलेला जो लेख आहे त्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, आणीबाणीविषयी यशवंतरावांच्या काय क्रिया-प्रतिक्रिया होत्या त्याबद्दल तळवलकरांनी काही लिहावयास हवे होते.

तळवलकरांनी ठोस माहितीच्या अभावी काही लिहिले नसेल, पण त्या काळातला एक वर्तमानपत्र वाचक म्हणून मला जे जाणवले ते लिहितो.

आणीबाणीच्या बाबतीत इंदिरा गांधींची बाजू यशवंतरावांना पटलेली असावी असे मला वाटते. एक तर आणीबाणीच्या संपूर्ण काळात यशवंतरावांनी इंदिराजींना साथ दिली. आणीबाणीवर टीका करणाऱ्या ‘पु.ल.’ना त्यांनी जोकर म्हटले आणि इंदिरा गांधी सनदशीर मार्गाने पुन्हा जिंकून आल्यावर यशवंतराव पुन्हा त्यांना मिळाले.

मध्यंतरात त्यांनी इंदिराजींवर एकाधिकारशाहीचा आरोप केला, पण शेवटी ते म्हणाले, ‘कर्तबगारी बार्इंचीच, आम्ही कोण अधिकारात वाटा मागणारे?’

मी यशवंतरावांवर ठपका ठेवत नाहीये, कारण इंदिरा गांधींची बाजू मलाही पटलेली आहे. वैध रीतीने निवडून आलेले त्यांचे सरकार व काही राज्य-सरकारेसुद्धा अवैध मार्गांनी पाडण्याच्या विरोधकांच्या डावाला ‘आणीबाणी’ हे घटनासंमत उत्तर होते.

हा मुद्दा मी विस्तृतपणे ‘वाङ्‌मयशोभे’च्या एप्रिल 1977 च्या अंकात मांडला होता आणि असाही दाखला दिला होता की, 1968 साली फ्रान्सचे अध्यक्ष द गॉल यांनीही अशाच अडचणीत सापडल्यावर आणीबाणी घोषित करायची तयारी केली होती. (या प्रसंगावर एक सिनेमाही निघाला आहे)

इंदिरा गांधींना वेगळा मार्ग काढता आला असता का, हा एक वेगळा प्रश्न आहे. पण त्यांनी जो मार्ग काढला त्याबद्दल सहानुभूती असणारी काही महत्त्वाची माणसे होती/आहेत.

1. नरहर कुरुंदकर स्वत: आणीबाणीविरोधी असले तरी त्या वेळच्या ‘विरोधी पक्षांच्या वागण्यात पुरेसा बेजाबाबदारपणा, आततायीपणा आणि हुल्लडबाजी होती’ असे ते म्हणतात. (अंतर्नाद, जुलै 2008)

2. सर्वोदय नेता रा.कृ.पाटील यांनी तर जयप्रकाश नारायण यांना स्पष्ट म्हटले की, तत्कालीन सामाजिक अडचणींचा फायदा घेताना तुम्ही ‘Cheap Politician' सारखे वागलात. (मॉडर्न रिव्ह्यू, 1977)

3. पी.एन.धर यांनी अलीकडच्या त्यांच्या पुस्तकात इंदिराजींची बाजू मांडली आहे.

4. इंदर मल्होत्रा यांचा लेख मी कापून ठेवला होता. त्यांच्या 21/3/2007 च्या लेखात असे म्हटले आहे की, "...Thinking

Indians have begun to realise that undemocratic and anti-democratic modes of protest are as injuirious as ruthless

repression by the state. And, in this context, many are now prepared to admit that while Indira Gandhi did sin,

politically speaking, in June 1975, she had also been sinned against heavily)... (अधोरेखांकन माझे) यशवंतरावांची भूमिका अशीच असेल का?

भा.पां. पाटणकर, काचीगुडा, हैदराबाद

------------------

अपप्रवृत्तीवर उपाय शोधणे आवश्यक

डॉ.दिलीप शिंदे यांचा ‘सेकंड ओपिनियन’ हा लेख जनतेत जागरूकता निर्माण करणारा आहे. ‘सत्यमेव जयते’मधून आमीर खानने आपल्या स्वास्थ्यसेवेचे पितळ उघडे पाडले आहे.

सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमीकमी होत आहे व अपप्रवृत्तींची सतत वाढ होत आहे. यातील चांगले-वाईट ओळखणे कठीण आहे हे खरेच! या अपप्रवृत्तींची कारणे व त्यावरील उपाय शोधणे गरजेचे आहे.

‘लोकसंख्या वाढली आहे, म्हणून आणखी डॉक्टरांची गरज आहे’ असे सांगून भरमसाठ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 3500 लोकसंख्येसाठी एक डॉक्टर असावा असे प्रमाण सुचविले आहे.

प्रत्यक्षात आपल्याकडे हे प्रमाण 1161 लोकसंख्येमागे एक डॉक्टर (ॲलोपॅथी) आहे. आयुर्वेद व होमिओपॅथी जमेला धरले तर हे प्रमाण 582 लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे आहे. यामुळे प्रचंड व्यावसायिक चुरस होत आहे. पैशाच्या गरजेपेक्षा हाव अधिक आहे.

‘सेकंड ओपिनियन’ तर घ्यायला हवेच, शिवाय डॉक्टरने सांगितलेले एकदम मान्य करून त्याच्या हवाली आपण होण्याआधी आपल्या आजाराचे स्वरूप, उपचारांची दिशा, त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीची शक्यता, अंदाजे खर्च यासंबंधी माहिती मिळविणे हा रुग्णाचा अधिकार असतो.

डॉक्टरवरील श्रद्धेचा व रुग्णाच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो तेव्हा तो फसतो.

डॉ. विठ्ठल प्रभू, मुंबई  

--

त्यावरून गुरुदत्तची हुशारी लक्षात येते

30 जूनच्या ‘साधना’मध्ये ‘साहिब, बिबी और गुलाम’ या हिंदी चित्रपटावरील लेख पाहून साश्चर्य आनंद झाला. एका प्रकारे हा गुरुदत्तचा सन्मान झाला, असे मला वाटते.

श्री.प्रकाश चांदे यांनी हा अभ्यासपूर्ण लेख लिहून त्या चित्रपटाचे सांगोपांग व यथार्थ वर्णन केले आहे. सदर चित्रपट सर्वांगसुंदर बनविण्यामध्ये त्यातील पात्रांच्या वेशभूषा योजिणाऱ्या श्रीमती भानू अथय्या यांचेही योगदान आहे. त्यांना नंतर ‘गांधी’ चित्रपटासाठी ऑस्कर पारितोषिक मिळाले हे सर्वश्रुतच आहे.

लेखकाने या गंभीर चित्रपटातील मर्यादित विनोदनिर्मितीचे चांगले विवेचन केले आहे. वास्तविक गुरुदत्तच्या बऱ्याच चित्रपटांत ही बाजू जॉनी वॉकरने सांभाळली होती. परंतु ‘साहिब...’मध्ये नोकराच्या (बन्सी) भूमिकेसाठी धुमाळ या मराठी नटाची निवड करण्यात गुरुदत्तची हुषारी लक्षात येते.

या चित्रपटात धुमाळ (बन्सी) आणि हरींद्रनाथ चटोपाध्याय (घडीबाबू) यांनी ग्रीक शोकांतिकेतील ‘कोरस’ची कामगिरी बजावली आहे असे वाटते.

दिलीप नारायण पंगू, पुणे

--

त्यांच्या विचारांची खोली व प्रतिभेची उंची कळते

तब्बल 21 वर्षांनंतर म्हणजे 16 जून 2012 रोजी, आंग सान सू की यांचे भाषण नोबेल पारितोषिक स्वीकारताना ऑस्लो येथे झाले.

त्या संपूर्ण भाषणाचा गोडवा साधना वाचकांपर्यंत मुळाबरहुकूम पोहोचविणाऱ्या सुमन ओक यांचा अनुवाद म्हणजे एक मस्त मेजवानीच आहे. या उत्कृष्ट अनुवादाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!

आंग सान सू की यांच्या या भाषणामुळे त्यांच्या बुद्धीची झेप, विचारांची खोली आणि प्रतिभेची उंची यांची चांगली ओळख झाली. त्या केवळ स्वत:च्या देशबांधवांचा विचार मांडून थांबत नाहीत, तर एकूण मानवजातीसाठीचे कल्याणकारी विचार मांडतात. त्यांच्या भाषणातील आवडलेली काही वाक्ये-

1. सोडून जाणं म्हणजे किंचितसं मरणं, विस्मृतीत जाणं म्हणजेही मरणच.

2. जिथे जिथे यातनांकडे दुर्लक्ष केलं जातं तिथे तिथे संघर्षाची बीजे पडतात.

3. लोकशाही आणि मानवी अधिकार हे प्रत्येकाचे मूलभूत अधिकार आहेत.

श्री.बी.आर.माडगूळकर, पिंपरी, पुणे

---

माझ्या दृष्टीने पहिलीच भेट

‘साधना’चा ‘पुनर्भेट’ विशेषांक अतिशय आवडला.

खरे तर माझ्या दृष्टीने ही ‘पहिलीच भेट’ होती. कारण ‘साधना’चा वर्गणीदार होऊन मला दोनच वर्षे झाली. ‘साधना’चे वर्गणीदार आपण आधीच झालो नाही ही मोठी चूकच झाली, असे मात्र हा पुनर्भेट विशेषांक वाचून वाटले!

पूर्वीही मी ‘साधना’ वाचत असे, पण अधूनमधून. ‘साधना’ परिवारातर्फे कै.प्रा.वामन कुलकर्णी हे माझे स्नेही व महाविद्यालयातील सहकारी. ‘साधना’त काही विशेष असेल तर ते मला तो अंक आवर्जून देत.

‘पुनर्भेट’ विशेषांकातील सर्वच लेख चांगले असले तरी त्यातही राजन गवस यांचा ‘म्हातारा बैल’, संजय भास्कर जोशी यांचा ‘तीन गोष्टी’, झेलम परांजपे यांचा ‘बाबा’ आणि साधना कामत यांचा ‘तुटलेली तार’ हे चार लेख केवळ अविस्मरणीय! पुन्हा पुन्हा भेट द्यावेत असे. म्हणूनच संग्राह्य.

श्रीकांत जोशी, गारगोटी, कोल्हापूर

 

Dear Editor,

Your ‘पुनर्भेट’ special edition is attractive and interesting. Very well edited and selection of articles speaks

volume of editors concern for the readers expectations. It will be neither exaggeration nor flattery (चमचेगिरी) by any stretch of imagination to say, you have made ‘साधना’ readable imaginatively and intellectually, very different from previous ones.

Once in a small meeting with late Vijay Tendulkar, when I mentioned something referring to ‘साधना’

he said with some emphasis, "I don't read Sadhana." If he were alive, he would have certainly recognised you and

your achievement.

I phoned Raja Shirguppe after reading his article on ‘संत तुकाराम’. Suresh Dwadashiwar's ‘मातीचे पाय’ remark for the ex-president Abdul Kalam for desiring to be President again reminded me of the infamous statement made by Churchill for our leaders "Men of straw with feet of Clay". Other articles, poems and above all- readers response, made me wait for each issue eagerly and expectatntly.

Taher A. Poonawalla, Pune 411016.

Taher A. Poonawalla, Pune

Tags: संत तुकाराम ‘साधना’ आंग सान सू की इंदिरा गांधी आणीबाणी यशवंतराव चव्हाण Sant Tukaram ‘Sadhana’ Aung San Suu Kyi Indira Gandhi Emergency Yashwantrao Chavan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके