डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दलवाईंना ‘साधना’ने व तत्कालिन समाजवादी परिवाराने मोठा व नैतिक पाठिंबा दिला होता. दलवाई व नरहर कुरुंदकरांनी त्या काळात मुस्लिम समाजसुधारणा, हिंदू समाजाचे आधुनिकीकरण व दोहोंचा परस्परसंबंध यांवर लेखन केले होते, ते साधनामध्ये प्रसिध्द होत असे. सगळ्याच समाजाचे प्रबोधन करणारे ते लेखन होते.

महत्त्वाच्या प्रसंगी मन मोठे केले पाहिजे!

दि. 28 डिसेंबरच्या साधनाचे संपादकीय ‘हमीद दलवार्इंना अधिक मोठे कसे करता येईल?’ वाचले. 18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवार्इंनी मुंबईहून काढलेल्या सात मुस्लिम स्त्रियांच्या (जबानी तलाकला विरोध व समान नागरी कायद्याची मागणी करणाऱ्या) ऐतिहासिक मोर्चाचा मी साक्षीदार आहे. तो मोर्चा काळ्या घोड्याजवळ असलेल्या ठिकाणाहून विधानसभेवर गेला तेव्हा श्रीमती कमर अहमद या काँग्रेसच्या आमदार सामोऱ्या गेल्या होत्या, फार थोडे लोक उपस्थित होते.

दलवाईंना ‘साधना’ने व तत्कालिन समाजवादी परिवाराने मोठा व नैतिक पाठिंबा दिला होता. दलवाई व नरहर कुरुंदकरांनी त्या काळात मुस्लिम समाजसुधारणा, हिंदू समाजाचे आधुनिकीकरण व दोहोंचा परस्परसंबंध यांवर लेखन केले होते, ते साधनामध्ये प्रसिध्द होत असे. सगळ्याच समाजाचे प्रबोधन करणारे ते लेखन होते.

1966 मध्ये दलवाई काळाच्या पुढे होते. दलवाईंच्या नेतृत्वाखालील मोर्चाच्या मागण्यांपैकी जबानी तलाकबंदीला 2018 साल उजाडावे लागले. असे का झाले? याला जबाबदार काँग्रेस तर होतीच, पण त्याचबरोबर प्रस्थापित पुरोगामी/प्रागतिक पक्षही (डावे पक्ष, समाजवादी व तत्सम पक्ष) तितकेच जबाबदार होते. कुठलीही समाजसुधारणा होण्यासाठी सरकारला अनिष्ट प्रथांमध्ये (हे सर्व धर्मांना लागू) हस्तक्षेप करावा लागतो व योग्य ते कायदे करावे लागतात. ही गोष्ट सुमारे दोनशे वर्षांपूर्वी झालेल्या सतीप्रथाबंदीपासून दिसून आली आहे. मात्र वर उल्लेखिलेल्या सर्व पक्षांनी व त्यांच्या सरकारांनी मुस्लिम मतांच्या लोभापायी असा हस्तक्षेप करणे टाळले. यामुळे सेक्युलॅरिझमचे पाऊल पुढे पडले नाही, आणि मुस्लिम स्त्रियांवरील अन्याय चालूच राहिला. याचा भाजपचा फायदा झाला. भाजपने आता झपाट्याने तिहेरी तलाकबंदीचा कायदा करून टाकला, यात भाजपचा प्रामाणिकपणा किती वगैरे शंका घेऊन त्या कृतीचे महत्त्व कमी करणे हे राजकारण झाले.

उद्या समान नागरी कायदा हा विषय भाजप सरकार हाती घेईल, त्यावेळी अन्य पक्षांची पंचाईत होणार हे निश्चित. या पक्षांकडून फार अपेक्षा नाहीत, पण भाजपचे मात्र फावणार. समान नागरी कायदा हे प्रकरण जबानी तलाक बेकायदा ठरविण्याइतके सोपे नाही, त्यावर सखोल चर्चा-विचार करावा लागेल. सर्व धर्मांच्या रूढ कायद्यांचा, प्रगत देशांतील समान नागरी कायद्यांचाही अभ्यास करावा लागेल. मग सर्वसंमत एकमताचा मार्ग काढावा लागेल. समान नागरी कायद्याच्या विरोधातील सर्वांना विचारात घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांची खात्री पटवून तो कायदा करावा लागेल. परस्पर सदिच्छा व विश्वास या बळावर हे करता येईल. वेळ लागेल, पण अशक्य नाही. कुठेतरी सुरुवात करावीच लागेल.

परकीय आक्रमणावेळी जसे आपण एक होतो, तसेच महत्त्वाच्या समाजसुधारणा करताना पक्षभेद विसरून आपले योगदान दिले पाहिजे. राजकारण तर करायचेच आहे, पण अशा महत्त्वाच्या प्रसंगी मन मोठे केले पाहिजे.

म. मो. पेंडसे, मुंबई

----------------------------

दलवाईंना अधिक मोठे करण्यासाठी या मर्यादावर मात केली पाहिजे!

‘हमीद दलवाईंना अधिक मोठे कसे करता येईल?’ हे 28 डिसेंबरच्या अंकातील संपादकीय वाचले. ‘हमीदभाईंना अधिक मोठे करायचे असेल तर त्यांचे विचार, कार्य समजावून घेऊन त्याचा प्रसार केला पाहिजे, हिंदू आणि मुस्लिम धर्मात जन्मास आलेल्या विचारवंत-सुधारकांच्या तुलनेत दलवाईंचा विचार किती व कुठे प्रागतिक आहे, हे पुढे आणले पाहिजे. मुस्लिम धर्मात जन्मास आलेल्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांची दखल व ओळख करून घ्यावी लागेल. आपले विचारही सतत अद्ययावत ठेवले पाहिजेत;’ हे दलवाईंना अधिक मोठे करण्यासाठी प्रामुख्याने मांडलेले संपादकीयातील विचार पूर्णतः मान्य आहेत. पण प्रश्न असा आहे की, दलवाईंना अधिक मोठे करण्याची आपली क्षमता/तयारी किती आहे. संपादकीय वाचल्यानंतर डॉ.दाभोलकरांच्या ‘समता-संगर’ पुस्तकातील सुनील देशमुखांच्या ‘शबनम आणि चोपडीपलीकडे’ या 1998 मधील पत्राचे सहज स्मरण झाले. पत्रामध्ये त्यांनी आपली विचारसरणी जनसामान्यांना कळेल, ती त्यांना आपली वाटेल अशा सोप्या, आकर्षक, प्रभावी भाषेत मांडायला आपण कमी पडतो, शिवाय Technology is the backbone of revolution असे म्हणणारे आपण तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही, ही मते मांडली आहेत. त्याचबरोबर पुढारी किंवा तत्त्वज्ञ जास्त आणि प्रत्यक्ष कार्यकर्ते कमी दिसतात, असेही मत मांडले आहे. 21 वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या पत्रातील मुद्दे आजही अगदी जसेच्या तसे लागू होतात. फक्त आज आपण तंत्रज्ञानाचा बऱ्यापैकी वापर करू लागलो, पण उजवीकडच्यांचा तुलनेत कमी. दलवार्इंना अधिक मोठे करण्यासाठी या मर्यादांवर मात केली पाहिजे.

सौरभ बागडे, दापोली, जिल्हा रत्नागिरी

------------------------------

नकारात्मक विषयावर सकारात्मक लेख...

दि. 7 डिसेंबर 2019 च्या साधना अंकातील डॉ.दिलीप शिंदे यांचा ‘मावळतीचे बोल’ हा लेख वाचला. वयाच्या मानाने डॉक्टरसाहेब बरेच चिंतनशील असावेत असे वाटते. कारण मृत्यू हा शब्द सर्वसामान्यांना तसा अप्रियच. बहुतेक लोक मृत्यू म्हटल्यावर स्तब्ध होतात, त्यावर बोलायचे टाळतात, काही लोक अस्वस्थ होतात. काही लोकांना मृत्यू अशुभ वाटतो, ते धास्तावतात व मृत्यूबद्दल मोकळेपणाने बोलतसुध्दा नाहीत. फारच थोडे लोक मृत्यू म्हटल्यावर मनापासून विचार करायला लागतात. मृत्यूनंतर आपली अवस्था कशी असेल, प्रत्यक्ष मृत्यूसमयी आपली स्थिती काय असेल वगैरे... यांचा पुढचा विचार म्हणजे आपल्याला चांगला मृत्यू यावा, मृत्यूनंतरही आपल्याला चांगली दैव गती प्राप्त व्हावी इत्यादी.

आपला जन्म झाला आहे तर मृत्यूही होणारच. फक्त तो केव्हा आणि कसा असेल ते माहिती नसते किंवा ते सांगता येत नाही. मृत्यूमुळे व्यक्तीचे या जगाशी व आपल्या परिवाराशी निर्माण झालेले संबंध कायमचे दुरावतात, नव्हे तुटतात. त्यात कुटुंबाशी निर्माण झालेल्या आपलेपणामुळे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या भविष्याच्या चिंतेमुळे माणसे बेचैन होतात. किंवा आयुष्यभर राबून जमवलेल्या स्थावर/जंगम मालमत्तेला सोडून जावे लागणार आहे, अशा विचारामुळेही मृत्यू माणसाला अप्रिय ठरू शकतो.

आपली संस्कृती याबाबतीत आपल्याला योग्य ते सांगते की, उतारवयात हळूहळू संसारातून लक्ष काढून घ्या व ईश्वर चिंतनात मन गुंतवा. भारतातील प्रत्येक प्रांतात चांगले संत होऊन गेले आहेत. त्यांच्या साहित्यातून, विचारांतून सामान्य लोकांचे जगणे सोपे कसे होईल हे आले आहे, त्याचा मागोवा घ्यावा म्हणजे मृत्यूची भीती निश्चितच कमी होईल.

मृत्यूचा विचार मोकळेपणाने झाला पाहिजे. त्याचे दडपण किंवा भीती अजिबात मानू नये. आज आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात काही प्रगती केली असेल तर मोठी फुशारकी मारतो, पण काही दिवसांनी आम्ही मरणारच आहोत. आमचे आई-वडील ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते मरून गेले. त्यांचे आई-वडील तेही मरून गेले, आमची पुढची पिढी आमच्या पश्चात्‌ काही दिवसांनी पुढे मरणारच आहे. मग कसली आली आहे मरणाची भीती? जीर्ण झालेले कपडे बदलण्याप्रमाणे आत्मा शरीर बदलतो, हा भगवत्‌गीतेतला श्लोकही इथे देण्याची गरज नाही, कारण तो सर्वांना माहीत आहे. डॉक्टरांनी मृत्यूसंदर्भात जगण्याचे प्रयोजन सांगितले आहे, ते म्हणजे माणसाने समृद्ध आणि परिपूर्ण जीवन जगले पाहिजे, एक कवी तर म्हणतो...

जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे,

जगण्या-मरण्यामधील उरणे सुंदर आहे.

डॉ.दिलीप शिंदे यांनी एका वेगळ्या आणि अशुभ, विनाषी व नकारात्मक समजल्या जाणाऱ्या विषयावर सकारात्मक चिंतनशील लेख लिहिला, याबद्दल धन्यवाद.

प्रभाकर बटगेरी, सोलापूर

Tags: प्रतिसाद प्रतिक्रिया वाचक पत्रे प्रभाकर बटगेरी सौरभ बागडे म. मो. पेंडसे batgeri prabhakar saurabh bagade m m pendase pratikriya vachakanchi patre pratisad feedback weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके