डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वामी रंगनाथन यांनी लिहिलेले Eternal Values for changing Society या नावाचे जवळजवळ 800 पानांचे एक उत्तम पुस्तक माझ्या आणीबाणीतील येरवड्याच्या वास्तव्यात, वाचनालयात आले होते. त्यातील  सत्य हे आजही परिस्थितीनुरूप आहे. त्यात त्यांनी (हे पुस्तक भारतीय विद्याभवन मुंबई- 400007. यांचे पब्लिकेशन आहे व मी वाचली ती 1971 ची आवृत्ती होती) भारतीय संस्कृतीची उदात्तता चांगल्या रीतीने वर्णन केली आहे. शेवटच्या 26 व्या प्रकरणात त्यांनी The Philosophy of Democratic Administrations (पान 752 ते 772) आताच्या अँडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस म्हणजे I. A. S चे सुंदर व यथायोग्य वर्णन केले आहे.

वाचकांना प्रेरणादायी अंक

‘युवा अभिव्यक्ती अंक’ प्रकाशित करून तरुणांना लिहिण्याची प्रेरणा देणाऱ्या साधना संपादकांचे अभिनंदन.

संपूर्ण अंक वाचनीय आहे. श्री.म. माटेंच्या ‘देशोदेशीचे ज्ञानेश्वर’ या पहिल्या लेखात, प्रचंड बुद्धिमत्ता असणाऱ्या देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांचा घेतलेला आढावा या युवा अभिव्यक्ती अंकाचा पायाच म्हणावा लागेल. या लेखातून असंख्य वाचकांना प्रेरणा मिळेल. गांधी जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या तोकड्या धडपडीचा प्रत्यय ‘2 ऑक्टोबर’ या लेखातून येतो. तेवढ्यापुरती ‘गांधी’ या महामानवाविषयीची धडपड व 2 ऑक्टोबर गेल्यानंतर गांधी या नावाचा पडणारे विसर त्याने लेखातून स्पष्ट केलाय. संकल्पने या छोटेखानी लेखात इंग्रजी शब्दांचाही वापर तितकाच केलाय. त्यामुळे आजच्या तरुणांच्या मराठी भाषेचा प्रत्ययही येतो.

‘चेतन भगतला लिहिलेल्या पत्रातून वाचकांच्या एखाद्या लेखकाकडून काम अपेक्षा असू शकतात, याचेच सूचन होते. एखादा अपंग असतानाही परिस्थितीशी झुंजत जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर कुठपर्यंत पोहोचू शकतो, याचा प्रत्यय गणपत धुमाळे या मित्रावर दीपक जाधवने लिहिलेल्या लेखातून येतो. असंख्य तरुणांना प्रेरणादायी असा लेख आहे. प्रसन्न जोशीचा लेखही ब्लॉगिंगविषयीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. हमीद दाभोलकरांचा ‘त्या बैठकीनंतर मनात आलेले काही विचार’ हा लेख, समाजपरिवर्तनाच्या चळवळीकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणांचा निर्देश करतो. समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील लोकांनी आजच्या तरुणांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी, हे त्यांनी केलेले सूचनही महत्त्वाचे वाटले. अशोक पवारचा ‘या कवितेवर कविताच करता येत नाही’ हा लेख म्हणजे या अंकाचा कळसच. लेख वाचता वाचता मन सुन्न होऊन जाते. नीलेश मोडकचा ‘महापूर’ हा लेख आजच्या तरुणांच्या मानसिकतेचे दर्शन घडवतो. रेडिओ मिर्ची, रेडिओ एफ.एम. यावरून सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या शुभ्रा व स्मिताचा घेतलेला वेध नवतरुणांना त्या क्षेत्राचा विचार करायला लावणारा आहे. ‘तारुण्याची जाणीव’ हा चंद्रशेखर पाटीलचा लेखही निवडणुकीविषयीची मानसिकता व त्यातून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनी सर्वांना विचार करायला लावेल असाच आहे.

योगिनी महाले, पुणे विद्यापीठ, पुणे.

Tags- Yogini Mahale, Readers Opinion, Praise, Yuva Abhivyakti Ank, Young writers, वाचक अभिप्राय, युवा अभिव्यक्ती अंक, कौतुक, तरूण लेखकांना प्रतिसाद, प्रोत्साहन, विनायक पाचलग, प्रसन्न जोशी, दीपक जाधव, नीलेश मोडक, डॉ. हमीद दाभोलकर, अशोक पवार, चंद्रशेखर पाटील, श्री. म. माटे

सातारा भूषण शरद जोशी आणि हातभट्टी

रा.ना. गोडबोले ट्रस्टचा ‘सातारा भूषण’ हा महत्त्वाचा पुरस्कार स्वीकारताना शरद जोशी यांनी, ‘शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडत असतील तर धान्यापासून मद्यनिर्मितीच्या परिणामांची पर्वा नाही.’ हे आपले मौलिक मत मांडले. मनात आलेला प्रश्न एकच. मागे शरद जोशींनी खेड्यातील शेतकरी महिलांच्या सबलीकरणासाठी ‘सीता शेती’ हा परसदारातील शेतीचा विचार मांडला होता. त्यांच्या अनेक चळवळींप्रमाणे तो प्रयत्न फसला होता. आता हातभट्टीला मान्यता व प्रमाणपत्र द्यावे, शेतकरी संघटनेने वा सरकारने खेड्यातील महिलांना हातभट्टी बनविण्याचे प्रशिक्षण द्यावे, त्यांनी परसदारी हातभट्टी सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा एखादा प्रकल्प हातात घेता येईल का?

दत्तप्रसाद दाभोलकर, सातारा

 

युवा अंक दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध व्हावा!

‘युवा अभिव्यक्ती अंक’ हा खरोखरच अप्रतिम म्हणावा लागेल. नवे वाचक आणि सामाजिक भान व मूलभूत कार्य करणाऱ्या युवकांना प्राधान्य, या दोन गोष्टी समोर ठेवून साधनाने अशा प्रकारचे साहित्या देण्याचा प्रघात या पुढेही चालू ठेवावा. ‘2 ऑक्टोबर’ या लेखात संकल्प गुर्जर या युवकाने हाताळलेली थीम अप्रतिम आहे. ‘सेशियो क्लब’मध्ये प्रोजेक्ट साकारताना संकल्पची वैचारिक गुंफण त्याच्या मनात हिंमत आणते, हा अनुभव खूप प्रगल्भ आहे. विनायक पाचलग याने चेतन भगतला लिहिलेले पत्र केवळ त्याच्यासारखा प्रगल्भ नवयुवकच लिहू शकतो आणि लेखनातील त्याची अभिव्यक्ती आणि युवकाला शोभणारा भाबडेपणा, त्याने योग्य ‘पंच’द्वारे व्यक्त केले आहे. या पत्रातून चेतन भगतच्या करिअरमधील पैलू विनायक ने उलगडताना वापरलेल्या संज्ञा व हाताळलेला विषय युवा वाचकांना नक्कीच भावतील. युवा वाचकांना साधना कसा आवडेल याची क्लृप्ती साधना संपादक मंडळाने अचूक हेरली आहे, असे म्हणावे काय? दीपक जाधव या पत्रकार युवकाने आपल्या मित्राच्या जीवनाचा घेतलेला मागोवा मनाला भिडणारा आहे. गणपतसारख्या आव्हाने झेलणाऱ्या युवकाची कथा मन अस्वस्थ करून जाते.

प्रसन्न जोशी या युवक पत्रकाराने हाताळलेला ‘ब्लॉगिंग, तरुणाई आणि मराठी’ हा विषय इतका सोपा केलाय की आता संगणक, माहिती तंत्रज्ञान यांच्यापासून दूर राहणाऱ्यांना त्याचा खूप लाभ होऊ शकतो. डॉ. हमीद दाभोलकरने सामाजिक कार्यपद्धतीवर टाकलेला सल्लारूपी प्रकाश विचारांना चालना देतो. विशेषत: आजच्या तरुणाईला हे विचार जवळचे आणि ‘अपील’ होणारे आहेत. प्रत्येक महाविद्यालयात हा लेख जाहीरपणे वाचला जावा असे माझे मत आहे. ‘संस्कृती’ प्रतिष्ठानचे पारितोषिक मिळवणारा अशोक पवार सध्या वाचकांच्या नजरेस ठळकपणे दिसू लागला आहे. त्याच्या लेखात उल्लेख करण्यात आलेली आंध्र प्रदेश हायवेवरील बंगाल कॉलनी चंद्रपूरजवळच्या भद्रावती भागात आहे असे मला आठवते. या लेखातील दृश्य मन अस्वस्थ आणि उद्विग्न करणारी आहेत. नीलेश मोडकचा ‘महापूर’ हा साधनात प्रसिद्ध झालेला दुसरा किंवा तिसरा लेख. या ‘महापूर’ लेखात रेखाटलेले वास्तव खूप भेदक आहे. बाळ नीलेश कुठून रे आणलीस तू ही परिपक्वता? शुभ्रा आणि स्मिता या दोन आर.जें. ची ओळख स्नेहा अवसरीकरने मस्तपैकी करून दिली आहे. आकाशवाणीवर सेवेत असलेल्या स्नेहाकडून अधिक समर्थ लेखनाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल का? तारुण्याच्या जाणिवेतून आपले अनुभव सांगताना चंद्रशेखर पाटीलने कथन केलेले अनुभव बोधप्रद आहेत.

या अंकावर साकारलेल्या सुंदर मुखपृष्ठासाठी गिरीश सहस्रबुद्धे यांचे त्रिवार अभिनंदन. या अंकातील संपादकीय ‘हम हैं नये, अंदाज यूँ हो पुराना’ वाचले नसते, तर युवा अभिव्यक्ती अंक नियोजनपूर्वक काढलाय असा ग्रह होणे स्वाभाविक होते. थोड्याशा अवधीत काही युवकांचे लेख हाती येतात काम आणि युवा विशेषांकाची संकल्पना तयार होऊन सुंदर अंक हाती पडतो काय! असाच युवा अंक दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध व्हावा.

नंदकिशोर पेडणेकर, बँक ऑफ महाराष्ट्र, सावेली शाखा, अहमदनगर

 

एका विधानाशी सहमत नाही

हमीद दाभोलकर यांचा साधनाच्या युवा अभिव्यक्ती अंकातील लेख वाचला. बराचसा मनापासून पटला. लेखातून त्यांनी मांडलेली निरीक्षणे तरुणांच्या मानसिकतेचे योग्य दर्शन घडवितात. परिवर्तनवादी चळवळींचे सर्वांत मोठे अपयश म्हणजे त्यांचा तरुणांवर असलेला अविश्वास. चळवळी या आजकाल चिरतरुणांच्या का बनल्या आहेत, त्याचे हे एक कारण आहे. चळवळी चालविणाऱ्या लोकांमध्येच दोष आहेत, त्यामुळे तरुण त्यांच्यामागे येत नाहीत. माझ्या मते हे दोष पुढीलप्रमाणे...

1.हे लोक आपल्या ध्येयाशी पुरेसे प्रामाणिक नाहीत.

2.आपल्या भूमिकांबाबत, विचारांबाबत खूप कर्मठ, अहंकारी आहेत.

3.त्यांचा स्वत:वरच पूर्ण विश्वास नाही.

4.म्हणून त्यांचा दुसऱ्यांवरही (विशेषत: तरुणांवरही) पूर्ण विश्वास नाही.

5.तत्त्वज्ञानाच्या पातळीवर हे लोक खूप गोंधळलेले आहेत. त्यामुळे ठाम वा निश्चित भूमिका ते घेऊ व देऊही शकत नाहीत.

6.तरुणांना जागा करून देण्याची त्यांची तयारी नाही.

7.हे लोक नको इतके भावनिक व भित्रे आहेत.

पण जोपर्यंत तरुण आहेत, तोपर्यंत परिवर्तनाची आशा जिवंत आहे. मी या लेखातील एका विधानाशी मात्र सहमत नाही. (‘ठराविक लोकांच्या अमर्याद त्यागापेक्षा अनेक जणांच्या थोड्या-थोड्या त्यागावर निर्माण झालेले सामाजिक कामाचे मॉडेल आजच्या तरुणाईला जवळचे वाटण्याची अधिक शक्यता आहे.’) अमर्याद त्यागासाठी तरुण आजही तयार आहेत, फक्त त्या त्यागासाठी पुरेसे समर्थ कारण व समर्थ नेतृत्व त्यांच्यापुढे उपलब्ध नाही. चळवळीतील लोकांचे वैफल्य त्यांच्या स्वत:च्या गैरसमजुतीमुळे आहे. त्यामुळे भविष्याबाबत निराशावादी व्हायची गरज नाही.

राहुल रेवले, सातारा

 

भारताच्या प्रशासनाच्या वास्तवाचे योग्य दर्शन

श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांनी आतापर्यंत भारतीय प्रशासनावर लिहिलेले सर्व लेख मी काळजीपूर्वक वाचलेले आहेत व सर्वच लेख अतिशय वास्तव, अभ्यासपूर्वक व विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेत, त्याबद्दल श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन.

मी महात्मा गांधी विद्यालय, महमदपूर, जि. लातूर येथे ‘लोकप्रशासन’ विषयाचा प्राध्यापक म्हणून गेल्या 34 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहे. त्यामुळे भारतीय प्रशासनाबद्दल व प्रशासनातील कर्मचाऱ्यांबद्दल बऱ्याच गोष्टी वाचल्या आहेत. पण श्री.देशमुख यांनी 17 व्या अध्यायात ज्या ‘सिक्स थिंकिंग हॅट’चा उल्लेख केला आहे, तो भारतीय प्रशासनाच्या संदर्भात तंतोतंत लागू पडतो. या सहा रंगांना एकत्रित करून, प्रशासनामध्ये काम करणाऱ्या त्या त्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना व्यापक स्वरूपाचे प्रशिक्षण वेळोवेळी देणे आवश्यक असून, तसे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची प्रत्येक तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्थापना करावी. जेणेकरून कर्मचाऱ्यांचा विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविण्यास मदत होऊ शकेल व अशा प्रशिक्षणांमधून प्रत्येक प्रश्नाबद्दल सविस्तर अभ्यासक्रम तयार करून, तो तज्ज्ञ व्यक्तीमार्फत शिकविला जावा, जेणेकरून संपूर्ण कर्मचाऱ्यांची प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीबद्दल किंवा सामाजिक उत्तरदायित्वाबद्दलची भावना अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकेल.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ कर्मचाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही, कर्मचाऱ्यांना राबवून घेणाऱ्या राज्मकर्त्यांमध्ये जितक्या जास्त प्रमाणात व्यवस्थापकीय तंत्र अधिक असेल, तेवढ्या जास्त प्रमाणात प्रशासनातील कर्मचारी काम करतील. कारण काम करण्यापेक्षा काम करवून घेणे या बाबीला प्रशासनात अधिक महत्त्व असते. किंबहुना यालाच ‘प्रशासन’ म्हणतात.

प्रा.डॉ.टी.एन.गायकवाड, ता.अहमदपूर, जि.लातूर

 

जखमी पाखरासारखी स्थिती

नेहमीप्रमाणे भरगच्च दिवाळी अंक खूप काही सांगून गेला. विशेषत: ‘शोधयात्रा’ खूप भावली. त्याकरिता घेतलेले प्रामाणिक कष्ट जाणवतात. कधी कधी ती तुटक वाटते, कदाचित एका भागातून दुसऱ्या भागात मात्रा गेल्याने तसे वाटत असावे. राज्यकर्त्यांनी व संबंधित लोकांनी हे वास्तव जरूर वाचावे. मनात प्रश्न करावेत, समस्या सोडवाव्यात. खेड्यापाड्यातला महाराष्ट्र कसा आहे, माणसे कशी जगताहेत, योजना पोहोचत नाहीत, हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हे शासनकर्त्यांना भूषणावह नाही. शिक्षणसम्राटांनी करोडो रुपये मिळवावेत व पीडितांसाठी काहीच करू नये? हुशार मुला-मुलींना मोफत शिक्षण इतर सोयी का देऊ नयेत? त्यांना ते सहज शक्य आहे. मी ‘शोधयात्रा’ वाचून अस्वस्थ झालो. एखाद्या जखमी पाखरासारखी माझी स्थिती झाली. हे वास्तव साधनाने प्रकाशात आणले याबद्दल शतश: आभार! असेच उद्‌बोधक लेख द्यावेत.

इतर अंक वाचनीयच आहे, पण साधनाच्या लौकिकात या लेखाने भर घातली आहे. एक भीषण वास्तव महाराष्ट्रापुढे, देशापुढे आले, हेही नसे थोडके!

एन. पी. शहाणे, कोथरूड, पुणे 21.

 

बहुसंख्य आय.ए.एस. तोल सांभाळून आहेत!

एक स्वातंत्र्यसैनिक व काँग्रेसचा एके काळचा तालुका, जिल्हा, प्रांत या पातळीवरील पदाधिकारी म्हणून माझा प्रशासनाशी 1945 पासून काही अंशी संबंध आला आहे. 1945-46 ला आमच्या नाशिक जिल्ह्यात त्यावेळी इंग्रज कलेक्टर होते व त्यांचा दबदबा खूप असायचा. येवले तालुका काँग्रेसचा चिटणीस- मग अध्यक्ष यामुळे त्यांचा-माझा संबंधही आला व त्यांच्या कामाची व काम करण्याच्या पद्धतीची कल्पनाही आली.

1947 साली स्वातंत्र्य मिळणार असे निश्चित झाले असताना ब्रिटिश नोकरशाहीची जागा भारतीय नोकरशाहीकडे येणार, या बद्दल कुतूहलही वाढले, नंतरही नाशिक जिल्ह्याचे कलेटर म्हणून कॅ. नंजप्पा, श्री.पिंप्रुटकर, श्री.आर.जी. साळवी व 1957 ला पुण्यात आल्यावर श्री. पेमास्टर, श्री.देशमुख, श्री.अफजलपूरकर, श्री. श्रीनिवास पाटील व आत्ताचे श्री.दळवी अशा कर्तबगार I. C. S, I. A. S, मंडळींची आठवण होते.

I. A. S हा ऑल राऊंडर असतो. त्याला G. A. D पासून शेती, सहकार, वस्त्रोद्योग वगैरे कशातही टाका, तो त्याला अगदी योग्य असे काम करतो. I. C. S. च्या परीक्षा स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्लंडला होत असत, अशा I. C. S होणाऱ्या व्यक्तीच्या मनावर ‘इंग्रज सरकारचे’हित पाहणे हा मुख्य दृष्टिकोन ठसविला जात होता. त्याचे पुढे I. A. S मध्ये रूपांतर झाल्यानंतर हे बदलले व भारतीय घटनेप्रमाणे काम करण्याचे उद्देश त्यांच्या कर्तव्यात प्रमुख बनले.

Administration हे एक स्वतंत्र व प्रगल्भ शास्त्र आहे. कार्मालम कोणतेही असो, उद्योग कोणताही असो Administration ची, Manangement ची गरज ही आवश्यकच मानली गेली आहे. यावर भारतात व भारताबाहेरील देशांत बरेच अभ्यासक झाले. इंग्रजीत पीटर ड्रकर हा सर्वांचा आवडता व योग्य असा मॅनेजमेंटवर शिकविणारा शास्त्रज्ञ मानला जातो. त्याचे Tact या पुस्तकाचे शीर्षकच या शास्त्राचे उत्तम वर्णन आहे. Administrator ला Tact आवश्यकच धरली गेली आहे.

आपल्या कामात समानता आणणे, कुठलाही मुद्दा सुटला नाही पाहिजे, त्याचप्रमाणे कोणाचाही मोठा तोरा नसला पाहिजे, हे पीटर ड्रकरने म्हटल्याप्रमाणे Tact वर अवलंबून आहे.

त्याला माझ्या दृष्टीने आजचा I. A.S वर्ग पुरेपूर उतरला आहे. लोकशाहीत परिस्थिती थोडी नाजूक असते, ती ‘अवघड जागी दुखणे व जावई वैद्य’ या जुन्या मराठी म्हणीसारखी आहे.

लोकप्रतिनिधी व त्यातून बनलेले मंत्री, यांना न दुखावता पण त्यांच्या लहरीप्रमाणे न वागता काम करणे, हे अत्यंत कठीण आहे. मला वाटते पुष्कळशा अंशाने I. A. S., I.P.S, I.F.S  हे वर्ग या कामात वाकबगार आहेत. जनतेच्या अपेक्षा लोकशाही राज्य यंत्रणेमुळे वाढल्या आहेत. त्यात काही वेळा अतिशयोक्तीही होते, पण कामाची चौकट, परंपरा, नीती व मंत्र्यांच्या मर्जीनुसार, जनतेच्या अपेक्षांना तोंड देणे हे कठीण काम आजची नोकरशाही करीत आहे.

स्वामी रंगनाथन यांनी लिहिलेले Eternal Values for changing Society या नावाचे जवळजवळ 800 पानांचे एक उत्तम पुस्तक माझ्या आणीबाणीतील येरवड्याच्या वास्तव्यात, वाचनालयात आले होते. त्यातील  सत्य हे आजही परिस्थितीनुरूप आहे. त्यात त्यांनी (हे पुस्तक भारतीय विद्याभवन मुंबई- 400007. यांचे पब्लिकेशन आहे व मी वाचली ती 1971 ची आवृत्ती होती) भारतीय संस्कृतीची उदात्तता चांगल्या रीतीने वर्णन केली आहे. शेवटच्या 26 व्या प्रकरणात त्यांनी The Philosophy of Democratic Administrations (पान 752 ते 772) आताच्या अँडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस म्हणजे I. A. S चे सुंदर व यथायोग्य वर्णन केले आहे.

तरी पण तांदुळात खडे असणारच. या न्यायाने एखाद दुसरा कमी पडत असेल, पण बहुसंख्य I.A.S अधिकारी तोल सांभाळून आहेत.

प्रभाकर गुप्ते, पुणे

 

साधना वाचन संस्कृती केंद्र

पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही साधना वाचन संस्कृती केंद्रे चालू करण्यात अपयश येत आहे. या बाबत पुन्हा एकदा आवाहन करीत आहोत. याचे कारण अपवादात्मक ठिकाणी ही केंद्रे चालू आहेत. चांगले कामही करीत आहेत. परंतु अजूनही त्या सर्वांना एकत्र गुंफून साधना वाचन संस्कृतीची चळवळ उभी करण्यात पाऊल पुढे पडत नाही, ते घडून यावे अशी अपेक्षा आहे. साधना वाचन संस्कृती केंद्र स्थापन करण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

1.आपल्या गावातील साधनाचे वर्गणीदार व वाचक यांच्याशी आवर्जून संपर्क करणे व या सर्वांशी प्रत्यक्ष वा पत्राने भेटण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

2.साधना वाचन संस्कृती केंद्राची महिन्यातून एकदा बैठक व्हावी, त्यात या ना त्या स्वरूपात वाचनाबाबत चर्चा व्हावी.

3.साधनाचे नवे वर्गणीदार नोंदवणे व जुन्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करणे, हे केंद्रामार्फत घडून यावे.

4.वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी शक्यतेनुसार काही नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जावेत.

5.यासाठी लागणारा निधी आवश्यकता पडल्यास सुरुवातीच्या काळात साधना देईल. साधना वर्गणीदार नोंदवण्याचे कमिशन, साधना प्रकाशनाच्या पुस्तकविक्रीचे कमिशन यामधून हा खर्च उभा राहू शकतो व उभा रहावा अशी इच्छा आहे.

6.सर्व साधना मित्रमंडळांना शक्य तितक्या लवकर भेट देण्याची माझी इच्छा आहे, मात्र स्थानिक साधनामित्रमंडळाला किमान पाच सभासद-कार्यकर्ते असावेत, आणि एक वर्षासाठी कार्य करण्याची त्यांची इच्छा असावी. अशांची नावे व फोन नंबर श्री.राजेंद्र बहाळकर (मोबाईल : 9822596370) साधना वितरण व्यवस्थापक यांच्याकडे येताच संबंधितांशी मी स्वत: संपर्क साधेन व पुढील तपशील नक्की करेन.

नरेंद्र दाभोलकर

संपादक, साधना

 

ज्योती बसू, भाई वैद्य आणि...

आदरणीम ज्योती बसू, मा. भाई वैद्य आणि मी. ही काय भानगड? गड्या भानगड काही नाही. नाही नाही, ज्योती बसू,भाई वैद्य हे कळाले पण त्या पंगतीत मी, म्हणून म्हटलं हे काय खटलं हाय?

बऱ्याच वर्षांपूर्वी ज्योती बसू पुण्यात आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी पुण्याचे प्रथम नागरिक म्हणजेच पुण्याचे महापौर मा.भाई वैद्य गेले होते, असे मला स्मरते. तेव्हा भार्इंसोबत आम्ही काहीजण पुणे स्टेशनवर गेलो होतो. ज्योतीबाबूंचे स्वागत केले. त्याच दिवशी सभेचा कार्यक्रम ‘गोखले हॉल’मध्ये होता.

ज्योती बसूंचे व्याख्यान भार्इंच्या अध्यक्षतेखाली ठेवले होते. गोखले हॉल तुडुंब भरलेला. ज्योती बसू व्यासपीठावर येऊन बसले आणि- ‘आमा देर दिगे दिगे सौंग्राम चॉल छेऽ चॉलबेऽ चॉलबेऽ... मे लढाईऽ बाचार लढाईऽ मेऽ लढाई ज्योत्तो होबो.’ अशी घोषणा सभागृहातून झाली. भाई क्षणभर चक्रावले. ज्योती बसूंच्या चेहऱ्यावर मात्र चमक दिसली. त्यांनी भार्इंना विचारले,‘कौन है ये?’ भाई म्हणाले, ‘हमारे राष्ट्र सेवादल संस्था का कार्यकर्ता है.’ बसू म्हणाले, ‘बहोत अच्छे, हमार बांगला भाषा जाण छे!’ भाई आनंदले.

दुसऱ्या दिवशी भाई माझ्या घरी आले. ‘वाऽ चंदा, काल धमालच केलीस. राष्ट्र सेवादल कलापथकाचे नाव तू रोशन केलेस. तू नट आहेस हे माहीत होते, पण तू ‘नटरंग’ आहेस हे माहीत नव्हते. तुला बंगाली भाषा येते हे माहीत नव्हते. कुठे आणि कधी शिकलास बंगाली भाषा.’ मी म्हणालो, ‘त्याचे काय आहे भाई, अखिल भारतीय समाजवादी पक्षाचे अधिवेशन पुण्यात होते. त्या एवढ्या मोठ्या अधिवेशनाचा अधिभार तुमच्याकडेच होता. तेव्हा निळू फुले हे पुणे शहर राष्ट्र सेवादल कलापथकाचे प्रमुख होते. कामाच्या विभागणीत निळुभाऊंकडे अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमाचा भार सोपवला होता. अधिवेशन रंगदार,ढंगदार झाले. सर्वजण विशेषत: उत्तर भारतीय आणि बंगाली खूष झाले आणि अधिवेशनाचे सूप वाजले. समारोपाची एक भलीमोठी मिरवणूक निघाली. मिरवणुकीत बंगाली समाजवादी काही आकर्षक जोशिल्या घोषणा देत होते. मी भारावून गेलो आणि त्यांच्यात सामील होऊन घोषणा देऊ लागलो. त्या बंगाली घोषणांचा उपयोग ज्योती बसू यांच्या सभेच्या वेळेस त्यांच्या स्वागतासाठी मी केला.’

- चंद्रकांत बोराटे

पाषाण, पुणे 411008.

Tags: दुर्लक्ष दुष्परिणाम हातभट्टी दारू निर्मिती दत्तप्रसाद दाभोळकर टीका शेतकरी नेते शरद जोशी शेतकरी संघटना Farmers society liquor production criticism of Sharad Joshi Dattaprasad Dabholkar Readers Opinion मुखपृष्ठ कौतुक डॉ. हमीद दाभोलकर नीलेश मोडक दीपक जाधव प्रसन्न जोशी विनायक पाचलग प्रोत्साहन तरूण लेखकांना प्रतिसाद कौतुक युवा अभिव्यक्ती अंक वाचक अभिप्राय Life Experiences Blogging Praising Nandkishor Pednekar Younge Writers Yuva Abhivyakti Ank Readers Response चळवळीतील सहभाग. तरूणाई वाचक मत वाचकांचा प्रतिसाद राहुल रेवले Youngster Social Movement Yuva Abhivyakti Hamid Dabholkar Rahul REwale लक्ष्मीकांत देशमुख व्यवस्थापकीय तंत्र प्रशासन प्रा. डॉ. टी. एन. गायकवाड Six Thinking Hat Laxmikant Deshmukh Indian Governance Governance Prof. Dr. T. N. Gaikwad वास्तवदर्शी लेखमाला शोधयात्रा दिवाळी अंक एन. पी. शहाणे Reality in State Praise Shodhyatra Magazine Diwali Ank Readers Response N. P. Shahane अनुभव कथन. उत्तम अधिकारी. प्रभाकर गुप्ते आयएफएस आयपीएस आएएस व्यवस्थापन नोकरशाही वाचक प्रतिसाद Readers Opinion   Prabhakar Gupte Experience of Administration Bureacracy Tacts   Manangement I.F.S I.P.S I. A. S. Administration जुन्या आठवणी. सेवादल कलापथक बंगाली घोषणा बंगाली भाषा राष्ट्र सेवा दल भाई वैद्य पुणे दौरा ज्योती बसू चंद्रकांत बोराटे आठवणी Bengali Slogan Bhai Vaidya Jyoti Basu Rashtra Seva dal Memories Chandrakant Borate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके