स्त्रीमुक्तीच्याच नव्हे तर कुठल्याही चळवळीतल्या स्त्रिया, आई झाल्यानंतरचा काही वर्षांचा काळ चळवळीपासून पूर्णपणे तुटतात. त्यानंतर पुन्हा चळवळीच्या प्रवाहात सामील होणे ही पुन्हा पहिल्यापासून सुरुवात असते. या मर्यादा गृहीत धरून त्यांना चळवळीशी मानसिकदृष्टया का असेना, जोडून ठेवावयास हवे. याउलट, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करणे निश्चितच अशोभनीय, निषेधार्ह आहे.
आपल्या एका मागील अंकात ‘साने गुरुजी'विषयी एका प्राध्यापकांनी फार सुंदर असा त्यांच्या विनयावर लेख लिहून मला जो आनंद दिला, त्याचे वर्णन करावे तितके थोडेच. तसेच दुसऱ्या एका अंकात दिवंगत ‘स्मिता पाटील’ या लोकोत्तर नटीवर जो लेख श्री. वसंत बापट यांनी लिहिला आहे, तो लेख म्हणजे उत्कृष्ट अभिजात वाङ्मयीन शब्दचित्र होय. जी भूमिका आपणास करावयाची त्या भूमिकेशी समरस होण्याची किती आवश्यकता असते हेच या लेखाने पटवून दिले आहे. या कृतीला लेखकाने ‘परात्मप्रवेश’ हा योग्य शब्द वापरला आहे. हे शब्दचित्र आधुनिक विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ ठेवून अभ्यासावे व याच दृष्टीने ‘मराठी’ या विषयाचा अभ्यास करावा. उत्तम चित्रे जशी अभिजात चित्रकारांनी चितारावी, तसे मला वाटते की ‘शब्दचित्रे’ ही कवींनीच लिहावीत.
- के. जी. कुलकर्णी, मुंबई
*****
वसंत बापट यांचा ‘स्मिता’ वरील लेख अतिशय हृदयस्पर्शी वाटतो. त्यांनी स्मिता पाटील यांच्या स्वभावातील गुणावगुणांची त्रयस्थपणे मांडणी केली आहे. स्मिताचे वैशिष्टय हे की, ती व्यक्ती व अभिनेत्री, एक कलावंत म्हणून, सारख्याच वृत्तीनं जीवनात वावरत होती. लेखाच्या शेवटी बापटांनी उद्धृत केलेली शेक्सपियरची ‘किंग लियर’ नाटकातील ओळ परिणामकारी, समयोचित वाटते. दुसरी ओळ उद्धृत केली असती तर बरे झाले असते. त्या ओळी अशा:
‘अॅज फ्लाईन टु वॅन्टन बॉईज, आर वुई टू गॉड्स, दे किल् अस फॉर देअर स्पोर्ट.’
- विश्वनाथ पोंटे, सोलापूर
*****
नोकरी करणाऱ्या स्त्रियांविषयी त्यांच्याबद्दल अनुदार उल्लेख श्री. तरवडे यांच्या लिखाणात प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे वारंवार येतात म्हणून मला त्यांना सुचवावेसे वाटते की त्यांनी ‘स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियां’ वरचे त्यांचे आक्षेप एकदा सरळपणे मांडावेत, म्हणजे त्यांची उत्तरे शोधता येतील. खरे तर मुक्त वा स्वतंत्र स्त्री ही अधिक जागरूक आई असते. कारण मातृत्व हे तिच्यावर ‘लादलेले’ नसून तिने ते जाणीवपूर्वक स्वीकारलेले असते. स्वातंत्र्य ह्या कल्पनेतून येणाऱ्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीवही तिच्यात निर्माण झालेली असते. त्यामुळेच, ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ आईचे प्रेम हे अधिक डोळस असण्याची शक्यता जास्त.
स्त्रीमुक्तीच्याच नव्हे तर कुठल्याही चळवळीतल्या स्त्रिया, आई झाल्यानंतरचा काही वर्षांचा काळ चळवळीपासून पूर्णपणे तुटतात. त्यानंतर पुन्हा चळवळीच्या प्रवाहात सामील होणे ही पुन्हा पहिल्यापासून सुरुवात असते. या मर्यादा गृहीत धरून त्यांना चळवळीशी मानसिकदृष्टया का असेना, जोडून ठेवावयास हवे. याउलट, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करणे निश्चितच अशोभनीय, निषेधार्ह आहे.
- सुनीति सु.र., पुणे
*****
स्वातंत्र्यदिनी व गणराज्यदिनी प्रतिवर्षी मी संकटग्रस्तांना आर्थिक मदत गेली 16 वर्षे देत आलो. सतत तीन वर्षे पूर्ण मूळ वेतन संरक्षण निधीला दिले. सेवानिवृत्तीनंतरही या दोन दिवशी पूर्ण मूळ वेतन देत राहिलो. आजपासून प्रत्येक महिन्याच्या सेवानिवृत्ती वेतनातील मूळ पगार राष्ट्रीय संरक्षण निधीला मी देणार आहे. मरणोत्तर दोन्ही डोळे दान करीत असल्याची मी सानंद घोषणा करतो.
- गणपत पाटील
(सेवानिवृत्त पोस्टमन, वणी)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या