डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंकात प्रधान सरांच्या विचारांचे, पुस्तकांचे, कार्याचे, राजकीय जीवनाचे, सामाजिक जीवनाचे समग्र दर्शन होते. एक माणूस आपल्या जीवनात किती भव्यदिव्य कार्य करू शकतो, याचेही दर्शन होते. आयुष्यभर कोणताही दुराग्रह न धरता किती माणसे जोडतो, दुसऱ्यांचे जीवन महत्त्वाचे मानत आयुष्य वेचतो. या सर्वांबरोबर ‘प्रधान विचार, प्रधान चरित्र’ हा श्री.समीर शिपुरकर यांचा लेख खूप आवडला, अंतर्मनाला भावला.

विदर्भ सुखी आहे काय?

‘विदर्भाला सुखी करा नि मुंबईचे वैभव काम ठेवा’ असे उद्‌गार 50 वर्षांपूर्वी पं.नेहरू यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावरील विराट जाहीर सभेत काढलेले आहेत. पं.नेहरू यांचे हे विधान वाचल्यावर आज काय प्रत्ययास येते? या अनुषंगाने साप्ताहिक ‘साधना’च्या 8 मे च्या अंकात संपादकीय लिहिण्यात आले आहे. ‘साधना’चे या अग्रलेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!

पं.नेहरू यांचे उद्‌गार देऊन महाराष्ट्र राज्याचा 50 वर्षांच्या विकासाचा ताळेबंदच ‘साधना’ने सादर केला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तेव्हा ‘मुंबईचे वैभव काम ठेवा! या उद्‌गारांची शहानिशा अनेक विचारवंत, तज्ज्ञ मंडळी करतीलच; पण विदर्भाला सुखी ठेवण्यात सत्तारूढ काँग्रेस पक्ष यशस्वी झाला काय? या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. पं.नेहरू किती दूरदर्शी व द्रष्टे होते, याची कल्पना त्यांच्या वरील एका वाक्यावरून येते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण हेही दूरदर्शी होते. विदर्भाला महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे सर्वांना माहीत आहे; म्हणूनच त्यांनी विदर्भ-मराठवाड्याला विकासाच्या बाबतीत झुकते माप देऊ, असे म्हटले होते; पण पुढील सर्व राज्यकर्ते त्यांची ही वचनबद्धता विसरले, त्याचे परिणाम आज दिसत आहेत.

विदर्भाला महाराष्ट्र राज्याचा एक भाग तरी मानण्यात येते काय? विदर्भ-मराठवाडा आणि कोकण या विभागांना सध्या वसाहती मानण्यात येत नाही काय? ‘खबरदार, विदर्भासाठी चळवळ कराल तर!’ अशी धमकी देणाऱ्या विरोधी पक्षांनी ‘त्या विभागातील सिंचनप्रकल्प किंवा योजना पूर्ण करण्यासाठी पाहिजे तेवढ्या रकमा खर्च करा, मग त्या अनुशेषापेक्षा कितीही जास्त असतील तरी चालेल! कारण तोच खरा महाराष्ट्र आहे.’ असे कधी तरी म्हटले आहे काय? महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास झाला आहे काय? त्यांचे भावनात्मक ऐक्य तरी झाले आहे काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत. काही जिल्ह्यांत नक्षलवाद फोफावत आहे. मेळघाटातील बालकांचे कुपोषण थांबले आहे काय? मग महाराष्ट्रात कशासाठी राहावयाचे? असा प्रश्न त्या विभागातील लोकांनी विचारला व चळवळी केल्या, तर त्यांना दोष देता येईल काय? सिंचनाचा अनुशेष अद्याप कायम आहे. वैधानिक विकास मंडळांची मुदतवाढ मिळण्यास किती आटापिटा करावा लागला! कारण राज्यकर्त्यांना कृष्णा खोऱ्याची अधिक चिंता आहे!

विदर्भातील सर्व मोठे, मध्यम आणि लहान सिंचनप्रकल्प पूर्ण झाले आहेत काय? त्यांचा खर्च आता किती वाढला असेल? हे सर्व प्रकल्प कधी तरी पूर्ण होणार आहेत काय? गोसी खुर्द धरण अद्याप पूर्ण झाले नाही, ही धरणयोजना सुरू होऊन आता बावीस वर्षे झाली. या धरणामुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची काहीही प्रगती झालेली नाही. मग महाराष्ट्रात कशासाठी राहावयाचे?

महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन आता पन्नास वर्षे झाली. पन्नास वर्षे म्हणजे काही थोडा काळ नव्हे! पण आता फार उशीर झाला आहे व परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे आता विदर्भाशिवाय पर्याय नाही, या निष्कर्षाप्रत विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवादी मंडळी वेगाने ढकलली जात आहेत. विदर्भातील लोकांचा आता पूर्णपणे भ्रनिरास झाला आहे. 

अनुशेषाचे एक अभ्यासक ॲडव्होकेट मधुकरराव किंमतकर आणि विधानपरिषदेतील आमदार प्रा.बी.टी.देशमुख यांनी यावर बरेच लिहिले आहे. आमदार प्रा.बी.टी.देशमुख यांनी 1998 मध्ये ‘महाराष्ट्रातील जलसिंचन अनुशेष : क्ष-किरण परीक्षा’ या मथळ्याखाली एक पुस्तिका लिहिली आहे. त्यात त्यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाच्या भांडवलपुरवठ्यावर विदारक प्रकाश टाकला आहे. त्याच्यावर विचार व्हावा. संपादक महाशय, महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णहोत्सवानिमित्त आपण ‘विदर्भ सुखी आहे काय?’ हा प्रश्न उपस्थित केलाच आहे, तेव्हा आता या प्रश्नावर पुरेसे विचारमंथन होऊ द्यावे. म्हणजे योग्य निष्कर्षाप्रत येण्यासाठी लोकांना सोयीचे होईल. आपण हा प्रश्न उपस्थित करून विचारमंथनाला व विचारप्रवर्तनाला साहाय्यच करीत आहात. त्याबद्दल आपणास धन्यवाद.

 के. ए. पोतदार, सिंहगड रोड, पुणे 51.

प्रधान सरांवरील अंक सर्वार्थाने उत्तम

5 जून 2010 चा प्रधान सरांवरील साधना अंक अत्यंत दुर्मिळ फोटोंनी सजलेला, विविध लेखकांच्या आस्था-आपुलकी आणि अभ्यास या गुणांमुळे वाचनीय झालेला आहे. हा अंक सर्वार्थाने उत्तम व सर्वांगसुंदर असा वाटला. प्रत्येक लेख वाचनीय आहे. अकारण स्तुती करीत नाही (माझा तसा स्वभावही नाही) पण नरेंद्र दाभोलकरांचा ‘कृतार्थ साधक’ हा प्रारंभीचा लेख अतिशय उत्कृष्ट झाला आहे. सकाळच्या आवृत्तीत तो अपुरा आलेला होता हे त्यांनी सांगितल्याने समजले. हा संपूर्ण लेख उत्स्फूर्त, उत्कृष्ट आणि आत्मीय प्रेमाने चिंब झालेला आहे. सरांच्या व्यक्तित्वाचे एक सुंदर व देखणे शब्दशिल्प त्यात साकार केले आहे.

प्रधान सरांचे समृद्ध, पारदर्शी, प्रांजळ आणि श्रेष्ठ जीवनमूल्यांच्या आचरणातून तेजस्वी झालेले व्यक्तिमत्त्व कमालीचे भावले. त्यांच्या जीवनातील तत्त्वनिष्ठा, करुणा, सेवाभाव, निर्मोही भावना, साधेपणा व समर्पण वृत्ती कुणाही वाचकांना भावल्याशिवाय राहणार नाही आणि याच बाबी इतरांच्या लेखांमध्येही व्यक्त झालेल्या आहेत. संन्यास न घेतलेला हा संन्यासी; अध्यात्माला ईहवादी रूप देणारा हा थोर युगपुरुष होता असे मला वाटते. एक विचार असा आला की, त्यांच्या प्रत्येक ग्रंथावर मान्यवर अभ्यासकाकडून एक एक लेख लिहून घ्यावा आणि त्यात या अंकातील लेख समाविष्ट करून एक ग्रंथ सिद्ध करावा. जरी प्रधान सरांनी स्मारक करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी.

द. ता. भोसले, पंढरपूर.  

तद्‌दन राजकीय आणि संदर्भहीन भाष्य

22 मे 2010 च्या ‘साधना’त ‘रक्तदान महायज्ञ की पापांची रंगसफेदी’ हा सुबोध मोरे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. लेखाच्या गोषवाऱ्यातच लेखकाने रक्तदान हे चांगल्या उपक्रमाचे द्योतक असल्याचे मान्य केले आहे. परंतु पुढे संपूर्ण लेखाचे प्रयोजन काय आहे हेच कळत नाही. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूीवर ज्या विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभर झाले, त्यांत शिवसेनेने रक्तदान महायज्ञाचा संकल्प सोडला. माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार संदीप आचार्य यांची ही संकल्पना. हा अत्यंत विधायक उपक्रम शिवसेनेने डॉ.संजय जोशी तसेच इतरही अनेक सक्षम वैद्यकीय मंडळींच्या साहाय्याने पूर्णत्वास नेला. यात शिवसेनेच्या इतिहासाचा आणि तथाकथित ‘पापक्षालनाचा’ काय संबंध येतो?

साधनासारख्या साप्ताहिकातून ‘पाप-पुण्य’चे हिशेब कधी मांडले जाऊ लागले? या उपक्रमास शिवसैनिक, इतर जनता यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. किंबहुना, या एका दिवसाने महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांची रक्ताची गरज बऱ्यापैकी पूर्ण झाली हे स्वत: डॉ.संजय जोशी (अधिष्ठाता, केईएम रुग्णालय) आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने विशद केले आहे. या कार्यासाठी शिवसेनेने पक्षसंघटना, सत्ता यांचा विधायक उपयोग केला. हे काय ‘पापक्षालन’ होते काय? याउलट अलीकडच्याच काळात ‘युवक काँग्रेस’च्याच एका रक्तदान कार्यक्रमात रस्त्यावर उभे राहून ‘एकाच सुईने’ अनेक जणांचे रक्त काढण्याचा अघोरी प्रकार घडला होता. ह्या ‘पापा’ची दखल लेखकाने कधी घेतल्याचे स्मरत नाही आणि आजही लेखकाच्याच शब्दात सांगावयाचे तर या ‘रक्ताला चटावलेल्या वाघा’च्याच रुग्णवाहिका गावोगावी कार्यरत आहेत.

हा लेख या घटनाक्रमावर ‘भाष्य’ करणारा नसून, शिवसेनेचा इतिहास (तोही तोकडा) सांगण्याचा प्रयत्न आहे. अर्थात पुन्हा प्रश्न तोच! ‘महायज्ञा’संदर्भातील लेखात अत्रेंपासून पु.लं.पर्यंत आणि डॉ.आंबेडकरांपासून ते थेट निखिल वागळे, नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांनाच लेखकाने ओढले हे तर हास्यास्पदच आहे. ‘सिंघानिया’ हॉस्पिटलच्या संदर्भात जे काही झाले ते तर दुर्दैवच होय. त्याचे समर्थन कधीही होऊ शकणार नाही. परंतु म्हणून ‘या’ उपक्रमाचे महत्त्व कधीही कमी कसे होईल? लेखक सुबोध मोरे यांची इच्छा असो वा नसो, पण या ‘रक्तदान महायज्ञा’ची नोंद गिनिज बुकात होणे थांबणार नाही. परंतु वाईट ते नेहमी वाईटच असते आणि जे चांगले त्याला चांगलेही म्हणण्याचे ‘पुण्य’ आपण कधी करणार? ‘साधना’नेही असले ‘तद्‌दन राजकीय’ संदर्भहीन ‘भाष्य’ छापण्याआधी आपल्या विश्वासार्हतेचा आणि दर्जाचा जरूर विचार करावा.

अमेय प्रमोद रानडे, मुंबई.  

समीर शिपुरकरांचा लेख खूप आवडला

मी गेली 3 ते 4 वर्षे ‘साधना’ची सभासद आहे. बरेच वेळा प्रतिक्रिया लिहाव्यात असे मनात येते. परंतु प्रत्यक्ष लिहिले जात नाही. लिहिले तरी पाठविले जात नाही. साप्ताहिक मनापासून आवडते, या वेळी प्रधान मास्तर यांच्यावरील अंक वाचला. सुरुवातीला घाईने वाचला. परंतु नंतर तपशीलवार वाचत गेले तर प्रत्येकाचे लेख सरांच्या प्रेमाने ओथंबलेले आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष संबंध, सहवास आला आहे त्यांना तर तो मनापासून भावेल. पण ज्यांचा त्यांच्याशी फक्त लेखनाद्वारे परिचय घडला आहे त्यांनासुद्धा भारावून टाकणारा अंक आहे. मुखपृष्ठावरील चित्रापासून त्याची सुरुवात होते, शेवटच्या पानावर त्यांच्या साहित्याची यादी मिळते. सर्व अंक रसाळतेने भरला आहे.

अंकात प्रधान सरांच्या विचारांचे, पुस्तकांचे, कार्याचे, राजकीय जीवनाचे, सामाजिक जीवनाचे समग्र दर्शन होते. एक माणूस आपल्या जीवनात किती भव्यदिव्य कार्य करू शकतो, याचेही दर्शन होते. आयुष्यभर कोणताही दुराग्रह न धरता किती माणसे जोडतो, दुसऱ्यांचे जीवन महत्त्वाचे मानत आयुष्य वेचतो. या सर्वांबरोबर ‘प्रधान विचार, प्रधान चरित्र’ हा श्री.समीर शिपुरकर यांचा लेख खूप आवडला, अंतर्मनाला भावला. नेहमी जगातून माणूस गेल्यानंतर खूप स्तुतिपर लेखन होते, गोडवे गायले जातात, लिहिले जाते. जीवनातील अनेक क्षण प्रकाशात, उजेडात येतात. परंतु ‘प्रधान चरित्र, प्रधान विचार’ हा माहितीपट ते असताना टिपला गेला. महान माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनातील महान क्षण टिपणे हे एक महान कार्य त्यांनी केले आहे. मन:पूर्वक अभिनंदन.

शुभदा जोशी, पुणे.  

साखळी यंत्रणा भक्कम आहे!

15 मे 2010 च्या ‘साधना’ अंकात शोभा पुंडलिक पाटील यांचा ‘मास्तरकीचा सौदा’ हा लेख वाचला. लेख वस्तुनिष्ठ आहे, तथापि मास्तरकीचा सौदा झाल्यावर पुढेही सौदे करावे लागतात. नेमणूक-पत्र मिळाल्यावर मान्यता घ्यावी लागते. त्याचा भाव 1 लाखाच्या आसपास आहे, मान्यता मिळाल्यावर वेतनपथकापर्यंत जावे लागते. वेतनपथकाचा भाव 10 टक्के आहे, त्याशिवाय बिल पास होत नाही. यासाठी एका जिल्हा शिक्षण कार्यालयाबाबत मी मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या, तथापि काहीही उपयोग झाला नाही. मंत्रालय-राज्यपाल यांचे आदेश होऊनही शिक्षणाधिकारी-उपसंचालक ‘एकमेकां साह्य करू’ ही साखळी यंत्रणा भक्कम आहे, त्यामुळे उपयोग होत नाही. लेखकाचा पूर्ण पत्ता दिला असता तर त्यांना माझ्या अनुभवाचा उपयोग झाला असता.

ना. सी. पाटील, नाशिक रोड, नाशिक.  

सत्य शोधण्याच्या दोन पद्धती

15 मे 2010 च्या ‘साधना’ अंकात शोभा पुंडलिक पाटील यांचा ‘मास्तरीचा सौदा’ लेख वाचला. तो सद्य:स्थितीवर प्रकाश टाकणारा आहे. ‘बाजारात पुरवठा वाढला की मागणी कमी होते’ असा अर्थशास्त्राचा नियम नाही. बाजारात पुरवठा वाढला तर त्याची किंमत कमी होते, असा नियम आहे. असो... ‘दु:ख आणि मिथ्यावादाने आणलेली जीवनविन्मुखता’ हा सुरेश द्वादशीवार यांचा ‘चिंतन’पर लेख वाचला. शास्त्रज्ञ वा महात्मे सत्यशोधक असतात. समग्र दृष्टीने Micro-Approach जीवनाविषयी सत्य ‘सर्व्‌ खल्विदं ब्रह्म’ आणि ‘बुद्ध शरणमं गच्छामि’ या महावाक्यांत सांगितले आहे आणि सौक्ष्मिक दृष्टीने Macro-Approach ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘अत्त दीप भव’ या महावाक्यातही सत्य सांगितले आहे, त्यामुळे ती महावाक्ये परस्परविरोधी आहेत असे नाही. (श्री. सुरेश द्वादशीवार म्हणतात- ‘ती महावाक्ये विसंगत आहेत’) सत्य शोधण्याच्या दोन पद्धती आहेत. 1. समग्रदृष्टी- Macro-Approach 2. सौक्ष्मिक दृष्टी- Micro-Approach

प्रा. बी. एम. डोळे, मालेगाव.   

अद्‌भुत व बोलके मुखपृष्ठ

15 मे 2010 चा ‘साधना’ वाचनात आला. त्याच्या मुखपृष्ठावरील ‘मास्तरकीचा सौदा’ या लेखाच्या संदर्भात शैक्षणिक संस्थांचे दुकानदार हे चित्र इतके अद्‌भुत, बोलके आहेत की ती माहिती जाणणारा व विचार करणारा प्रभावित होईल. ‘मास्तकरीचा सौदा’ करण्यासाठी दुकान मांडून बसलेला दुकानदार. पैसे भरा आणि नेणुकीची ऑर्डर घ्या. प्रत्येक पदाचे दर वेगवेगळे हेही त्यात दर्शविले आहे. त्यामुळे शैक्षणिक दुकानदाऱ्या थांबणाऱ्या नाहीत, पण त्यांना झणझणीत थोबाडीत मारलेली आहे यात शंका नाही. शोभा पुंडलिक पाटील यांचा तो लेख वाचण्यासारखाच आहे. प्रा.धनागरे यांची अभ्यासपूर्ण लेखमालाही त्यातलाच एक प्रकार आहे. हे सर्व बोलूनही ह्या दुकानदारांवर किती परिणाम होतो हा प्रश्नच आहे. इतके कोडगे व निर्ढावलेले हे दुकानदार आहेत. मुखपृष्ठाबाबत चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे यांचे अभिनंदन.

उत्तम गिरी, चलठाणा (शांतिनगर).  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात