डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

समाजाहिताला बाधा पोहोचवणारी आणि व्यक्तींची बुद्धी पोखरणारी अंधश्रद्धा गाडण्यासाठी समाजात विज्ञानवाद वाढीस लागावा, तसेच महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा, यासाठी आपले आयुष्य वेचणारे तथा आपल्या जीवाची बाजी लावणारे थोर समाजसुधारक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिअंकातील प्रकाशित सर्व विज्ञानाधिष्ठित लेख कोणाही विचारी व विज्ञानावर निष्ठा असलेल्या व्यक्तीला आशेचा किरण दाखवणारे निश्चितच आहेत. असा हा संग्राह्य आणि नव्या पिढीला विचारप्रवण करणारा अंक प्रकाशित करणे हे साधनाची वैचारिक बांधिलकी अधोरेखित करणारे आहे.

सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाहीत

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिअंक वाचला. ‘विज्ञानाने मला (आणि जगाला) काय दिले?’ या विषयावरील सर्व मान्यवरांचे लेख खूपच छान आहेत. प्रभाकर देवधर यांच्या ‘आज आपण सोपान पायरीवर उभे आहोत’ या लेखामधील विज्ञान व तंत्रज्ञानक्षेत्रात भारत मागे पडला आहे, हे विधान खरेच आहे. त्यासाठी त्यांनी दिलेले एक कारण म्हणजे, आपला भक्तिमार्गाकडे  असलेला कल हे पूर्णत: पटत नाही. आपल्या कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथात ‘विज्ञानाची कास सोडा’, हे सांगितलेले नाही. किंबहुना, आपण आपले नियत कर्म हे उत्कृष्ट रीत्या व त्यामध्ये आपले मन, बुद्धी व शक्ती वापरून करा- असेच म्हटले आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, ‘व्यवसायात्मिका बुद्धी रेकेहकुरूनंदन’ . आपली बुद्धी ही एका कार्यावरच केंद्रित केली पाहिजे. अशा सर्व कर्मांना सात्त्विक कर्म  असे म्हटले आहे आणि असे कर्म करणारे ‘मनुष्याणां सहस्रेषु’ असेही सांगितले आहे. 

आध्यात्माचा आपल्या लोकांनी लावलेला सोईचा व चुकीचा अर्थ आणि त्याचे झालेले बाजारीकरण हे सर्व आपल्या अधोगतीस कारणीभूत आहेत. अध्यात्म व विज्ञान ही आपल्या जीवनरथाची दोन चाके असून दोन्ही बरोबरीनेच चालायला पाहिजेत. विज्ञानातील एखादा प्रयोग अयशस्वी झाल्यास माघार न घेता त्याची कारणे जाणून परत-परत तो करत राहणे व यशस्वी करणे हेच गीता सांगते.

त्यांनी सांगितलेले दुसरे कारण म्हणजे, आपल्या शालेय शिक्षणात असलेल्या त्रुटी. आपले विद्यार्थी केवळ गुणांच्या मागे लागतात व शिक्षणातील मूळ तत्त्व हरवून बसतात. मुलांनी स्वत: विचार करण्याच्या प्रवृत्तीस शालेय शिक्षणात वाव देत नाहीत. हल्ली तर मुलांना दुसरी-तिसरीपासूनच क्लासला पाठवतात, याचे आश्चर्य वाटते. सर्व अभ्यास हा परीक्षेत मार्क कसे मिळतील याच विचाराने चालतो. कोणत्याही प्रकारचे संशोधन करावयाचे असेल, तर स्वत:हून विचार करून परत-परत प्रयोग करण्याची गरज असते. असल्या शिक्षणामुळे व परिश्रम करण्याच्या अभावामुळे आपले विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाहीत.

आता नव्याने येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणामुळे आपली शिक्षणपद्धती सुधारेल, अशी आपण आशा करू यात.

प्रदीप चंद्रचूड, औंध, पुणे.

तरच विज्ञानवाद पुढच्या पिढीत झिरपला जाईल

समाजाहिताला बाधा पोहोचवणारी आणि व्यक्तींची बुद्धी पोखरणारी अंधश्रद्धा गाडण्यासाठी समाजात विज्ञानवाद वाढीस लागावा, तसेच महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा, यासाठी आपले आयुष्य वेचणारे तथा आपल्या जीवाची बाजी लावणारे थोर समाजसुधारक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिअंकातील प्रकाशित सर्व विज्ञानाधिष्ठित लेख कोणाही विचारी व विज्ञानावर निष्ठा असलेल्या व्यक्तीला आशेचा किरण दाखवणारे निश्चितच आहेत. असा हा संग्राह्य आणि नव्या पिढीला विचारप्रवण करणारा अंक प्रकाशित करणे हे साधनाची वैचारिक बांधिलकी अधोरेखित करणारे आहे. पूर्वी सुशिक्षित असणे जेवढे कठीण होते, तेवढेच आज अशिक्षित असणे अवघड झाले आहे. तरीदेखील आजचा हा तथाकथित सुशिक्षित वर्ग अवैज्ञानिक गोष्टींच्या आहारी जाताना बघून त्यांना सुशिक्षित म्हणावे की साक्षरशत्रू, असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच ‘विज्ञान आणि समाज’ या अनुषंगाने काही  विचार मांडणे क्रमप्राप्त ठरते.

खरे तर अगदी बालसुलभ अवस्थेतच मुलांच्या मनात अनेक गोष्टींबद्दल कुतूहल आणि या कुतूहलातून प्रश्न उत्पन्न होत असतात. पण आपल्याकडील बहुतांश वडिलधारी मंडळी त्या कुतूहलातून उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांचे शमन करण्यात अयशस्वी होतात. आपण मुलांना, ‘हे करा’ असे सांगण्यापेक्षा ‘हे करू नका’, असे बजावण्यावरच जास्त भर देतो. त्यामुळे बालवयात मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची जागा ‘मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष’ या स्थितीने घेतली जाते. मग वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या ‘प्रश्न पडणे’ या मूळ सिद्धांतालाच सुरुंग लावला जातो. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची जागा भीती, संकोच याने घेतली जाते आणि नकळत ‘एका आइन्स्टाईनचा’चा अकाली मृत्यू होतो. खरे तर विज्ञान सत्य सांगते, त्याच्या खरेपणाला संशोधनाचा भक्कम आधार असतो. डोळसपणे पाहिले तर आपल्या आसपास सगळीकडे विज्ञान सामावलेले आहे. मात्र ते समजून घेण्यासाठी निरीक्षणात्मक आणि चिकित्सक वृत्ती विद्यार्थिदशेतच निर्माण न होणे, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे खूप मोठे अपयश आहे. परीक्षेत मार्क मिळविण्यापुरता विज्ञान हा विषय न शिकता ‘विज्ञान शिका! विज्ञान जगा!!’ या अनुषंगानेच तो अंगीकारला गेला पाहिजे; तरच उद्याचे नवे जिज्ञासू विज्ञान संशोधक आपण घडवू शकू, तेव्हा  कुठे विज्ञानवाद पुढच्या पिढीत झिरपला जाईल. 

मानवी जीवनात विज्ञानाने उलथापालथ घडवून आणली. अनेक संशोधनांतून कित्येक गहन विषयांचा उलगडा विज्ञानाने केला, ज्यामुळे मानवी जीवन सुलभ आणि सोपे झाले. विज्ञानाने माणसाला त्याच्या जीवनाशी निगडित बाबींना केंद्रबिंदू मानून नेहमी सैद्धांतिक रचना, शोध, संशोधन केले आहे. विज्ञान महान मनाचे आहे. ते तुझे-माझे असा संकुचित विचार करत नसते. विज्ञान आसपास असते; पण ते बघायला जी वैज्ञानिक दृष्टी लागते, तिचा तुटवडा मात्र सर्वत्र जाणवतो. लोक विज्ञान शिकतात मात्र विज्ञान जगत नाहीत, असे लोकांचे एकंदरीतच वागणे पाहून वाटते. पाठ्यपुस्तकांच्या बाहेर विज्ञान येऊन जीवनाभिमुख झाल्याखेरीज त्याला ‘लोकविज्ञाना’चे अधिष्ठान प्राप्त होणार नाही. जगण्याच्या मर्यादा जाणून त्यांचा परिघ शास्त्रशुद्धपणे वाढवत नेणे म्हणजे विज्ञान. त्यात भावनाविवशतेपेक्षा करकरीत बुद्धीस आव्हान आणि आवाहन असते. गेली कित्येक वर्षे हा बुद्धिसंघर्ष सुरू आहे. विज्ञानात यश आणि अपयश असे काहीच नसते. अंतिम मुक्ती अध्यात्मात असते, असे म्हणतात. विज्ञानात काहीच अंतिम नसते, म्हणूनच तर ते रसरशीत असते. विज्ञानक्षेत्रात असतो तो केवळ प्रयोग. तसेच प्रयोगात मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. चिकित्सा करून, मूल्यमापनाच्या कसोटीवर घासूनच विज्ञानात निष्कर्षापर्यंत यावे लागते. विज्ञानातून तयार होणाऱ्या आविष्कारामागे असतो तो संशोधनाचा भक्कम आधार. म्हणूनच विज्ञान नेहमी सत्य सांगते.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

दोन किरकोळ गोष्टी

साधनाचे लोकमान्य टिळक विशेषांक व अण्णा भाऊ साठे विशेषांक उत्तम, वाचनीय व संग्राह्य आहेत. पण यामध्ये दोन किरकोळ गोष्टी वाटतात, त्या कळवीत आहे. कुमार केतकर, थोर विचारवंत, लेखक व प्रथितयश संपादक आहेत. त्यांचा लेख त्यांच्या प्रतिमेला साजेसा, चांगला आहे. पण त्यांनी लोकमान्य टिळक यांचे गुणवर्णन व थोरपण सांगताना हात आखडता घेतला आहे असे वाटते. बाकी सर्वांचे लेखन चांगलेच लिहिले आहे. दुसरे असे की, अण्णा भाऊ साठे विशेषांकांत उत्तम लेखक, साक्षेपी संपादक व विचारवंत, उत्तम कांबळे यांनी, पार्श्वभूमी सांगताना बराच इतिहास व सामाजिक परिस्थिती विषद करण्यात पन्नास टक्के जागा व्यापली आहे. लेख चांगला आहे, पण अण्णाभाऊ साठे यांना जास्त जागा मिळायला पाहिजे होती, असे वाटते. दोन्ही अंक खूप मेहनतीने सादर केले आहेत.

अरुण वि.कुकडे, नाशिक

त्या लेखात एक मोठी चूक

दि.18 जुलैचा साधना अंक मिळाला. नेहमीप्रमाणेच साधना परिवाराचा वक्तशीरपणा आणि अंकाची लेखनसंपन्नता अनुभवाला आली. अंकातील प्रा.विश्वास वसेकर यांचा लेखही त्यांच्या आजवरच्या लेखनाप्रमाणेच  आशयसंपन्न आणि रोचक आहे. मात्र या लेखात एक मोठी चूक आहे- भाषेच्या संदर्भात. ‘मुश्क’ या शब्दाचा अर्थ वसेकरांनी ‘मिशी’ असा दिला आहे. तो अत्यंत विपरीत आहे. मुश्क हा फारसी भाषेतील शब्द. त्याचा अर्थ कस्तुरी असा आहे. कस्तुरीचा दरवळ/सुगंध लपत नाही, या अर्थाने, इश्क और मुश्क छुपाए नहीं छुपते असे म्हटले जाते.
दुसरी चूक- साकी शराबला पाहिजे, खराबला कसे काय? कदाचित ही छपाईची चूक असेल. असो!

सुरेखा सबनीस, मुंबई.
 

Tags: प्रदीप चंद्रचूड बाळकृष्ण शिंदे अरुण वि.कुकडे सुरेखा सबनीस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात