डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनाचा या वर्षीचा अखेरचा अंक (25 डिसेंबर 2010) वाचनीय आणि लक्षात राहण्यासारखा वाटला. त्याला कारणही तसेच आहे- ते कारण म्हणजे त्या अंकातील राजा शिरगुप्पे यांचा स्वानुभवावरील उत्तम आणि सुरेख लेख. शिरगुप्पे एका दूरचित्रवाणी मालिकेचे चित्रीकरण पाहण्यास केवळ कुतूहलाने जातात आणि तेथे आबालाल रेहमान या महान चित्रकाराच्या भूमिकेसाठी हवा असलेला कलाकार चंद्रकांत जोशी यांना शिरगुप्पे यांच्या रूपात गवसतो.

सभासद होण्याला कारणीभूत ठरलेला लेख

मी 25 डिसेंबरच्या अंकापासून साधनाचा सभासद झालो आहे. यासाठी कारणीभूत ठरला साधना दिवाळी अंकातील राजा शिरगुप्पे यांचा लेख. अनिल अवचट यांच्या ‘माणसं’ पुस्तकाप्रमाणे हा लेख वाटतो. आपली पूर्वग्रहदूषित मते बदलणारा हा लेख आहे. 8 जानेवारीच्या अंकातील ‘यदुनाथ’ हा सुरेश द्वादशीवार यांचा लेख अत्यंत माहितीपूर्ण, अल्प शब्दांमध्ये मोठा आशय व्यक्त करणारा आहे. देवेंद्र गावंडे यांचा गडचिरोलीमधील नक्षलवादाच्या संदर्भातील लेख परखड सत्य मांडतो. इतर अंकांचेही वाचन सध्या सुरू आहे.

सुहास जाधव, नांदगाव, सातारा

तो लेख वाचण्यासाठी धाडसी मनाची आवश्यकता आहे

‘साधना’चा दिवाळी अंक हाती पडला तेव्हा खरं सांगायचं तर ‘शोधयात्रा- ग्रामीण बिहारमधील दुर्ग भागांची...’ हा लेख टाळून पुढे जात होतो. सहज म्हणून लेखाच्या प्रारंभीच्या तीन-चार ओळी वाचल्या आणि पुढे सरकत गेलो! अंक खाली ठेवलाच नाही. 65 पानांचा लेख सलग संपूर्ण वाचला आणि स्तब्ध झालो! मनातले विचारही चिडीचूप झाले होते! मी काही तासातच बिहारमधील दुर्ग भागातून निरीक्षण (फेरफटका नाही!) करून आलो आहे असे वाटले. मनात कणव निर्माण झाली. ‘पिझ्झा बर्गर’ संस्कृतीला उंदराची आठवण आली तरी ओकाऱ्या होतील, इथे तर मुसहार- महादलित, शेतामधील उंदीर शोधून पोट भरतात! उंदीर भाजून खातात! हे एकच नाही, तर अशी अनेक दृश्ये या लेखातून, निरीक्षणातून वाचायला मिळतात. मन पीडित होते. उरते फक्त करुणा...

हा लेख प्रकाश झा यांच्या ‘दामुल’ चित्रपटाची आठवण करून देतो. मन विषण्ण करणारा हा लेख आहे. बिहारबद्दल कुणी अद्वातद्वा, वाट्टेल तसे बोलू लागला तर त्याच्यासमोर प्रस्तुत लेख ठेवण्याचे काम मी करीन. करुणेनंतर ही कृती आहे आणि ती मी जरूर करीन. आणखी एक सांगू? प्रस्तुत लेख वाचण्यासाठी, त्यातील निरीक्षणे पेलवण्यासाठी धाडसी मनाची आवश्यकता आहे.

नारायण लाळे, मुंबई

समर्पक शब्दांतील निर्भीड लेख

15 जानेवारीच्या ‘साधना’तील ‘काळोखाची रजनी होती’ हा गोविंदराव तळवलकरांचा लेख वाचला. हा लेख मला इतका आवडला की, मी तो लेख दोन वेळा वाचला. आजच्या भारतातील स्थितीचे अत्यंत समर्पक शब्दांत व निर्भीडपणे केलेले त्यातील विवेचन अंत:करणात जाऊन भिडते. राजकीय परिस्थिती, वेगवेगळ्या पक्षांची धोरणे(असलीच तर), आपले राज्यकर्ते यांची अत्यंत मननीय चर्चा त्यात आहे. आपल्या राजकारण्यांना शिक्षण, शेती, संरक्षण, उद्योगधंदे, नागरी जीवनाची चाड नाही, चाड आहे फक्त खुर्चीचीच, मग आपल्या देशाचे काय होणार? गांधी-जवाहरांचा हाच देश? भ्रष्टाचाराने देश पोखरून निघाला आहे. निष्ठा नष्टच झाली आहे- खून, मारामाऱ्या, बलात्काराच्या बातम्या रोज येतात, त्या वाचवत नाहीत. खरंच आपण आध्यात्मिक आहोत का?  गीतेत भगवानांनी वचन दिलेले आहे ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌।’ देवा ती वेळ आली आहे. परखड व स्पष्ट शब्दांत तळवलकर यांनी लेख लिहिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

शांतिलाल शाह, पुणे

तो लेख वाचताना डोळे पाणावतात

साधनाचा या वर्षीचा अखेरचा अंक (25 डिसेंबर 2010) वाचनीय आणि लक्षात राहण्यासारखा वाटला. त्याला कारणही तसेच आहे- ते कारण म्हणजे त्या अंकातील राजा शिरगुप्पे यांचा स्वानुभवावरील उत्तम आणि सुरेख लेख. शिरगुप्पे एका दूरचित्रवाणी मालिकेचे चित्रीकरण पाहण्यास केवळ कुतूहलाने जातात आणि तेथे आबालाल रेहमान या महान चित्रकाराच्या भूमिकेसाठी हवा असलेला कलाकार चंद्रकांत जोशी यांना शिरगुप्पे यांच्या रूपात गवसतो. हा एक विलक्षण प्रवास त्या भूमिकेच्या सादरीकरणासह राजा शिरगुप्पे यांनी वाचकांसमोर अतिशय सुरेखपणे मांडलाय.

समोर उभे असलेले आव्हान मग ते महाराष्ट्रातील दुर्ग जिल्हे भटकंती करून पिंजण्याचे असो, वा बिहारसारख्या अनोळखी राज्याचा व्यापक दौरा; त्या आव्हानास शिरगुप्पे पूर्णतया भिडून वाचकांना स्वत:चे अनुभव छानपणे सांगणारच अशी त्यांची ओळख साधना वाचकांना झालीय. शिरगुप्पे यांची अंगकाठी महान चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांच्याशी मिळतीजुळती असणे ही नैसर्गिक देणगी असली तरी (आबालाल रेहमान)ची भूमिका त्यांनी परिणामकारकपणे वठवणे हे म्हणावे तितके सोपे नव्हते. याची जाणीव बाळगून शिरगुप्पे यांनी आपल्या  नेहमीच्या शैलीत आव्हानाला भिडून आत्मविश्वासाने ती भूमिका जीव ओतून पार पाडली आणि लेखाच्या शेवटी त्याचा अनुभवही वाचकांना येतो.

राजर्षि शाहू महाराज या मालिकेचे चित्रीकरण खंडित होऊन नंतर ते पुन्हा सुरू झाले व मध्यंतरीच्या काळात खूप घडामोडी झाल्याचे लेख वाचताना लक्षात येते. पण मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होताच आबालाल यांची भूमिका वठवण्यास शिरगुप्पे पुन्हा पूर्वीइतक्या उत्साहात उभे राहिलेले दिसतात. पंचगंगेच्या तीरावर गंभीर प्रसंगाचे चित्रीकरण केले जात असतानाचा प्रसंग त्यांनी खूप परिणामकारकपणे मांडलेला आहे. प्रत्यक्ष प्रसंगात ज्याप्रमाणे आबालाल यांचे डोळे पाणावतात तसे तो प्रसंग वाचताना वाचकांचेही पाणावतील अशी स्थिती होते.

मालिकेत भूमिका केल्याचे मानधन मिळाल्याच्या प्रसंगी राजा शिरगुप्पे यांनी कथन केलेला अनुभव तर अगदी अविस्मरणीय आणि मनात घर करून राहणारा आहे. महान चित्रकाराची भूमिका करणाऱ्या शिरगुप्पेंना कला विद्यालयातील एक गरजू विद्यार्थी नेमका भेटतो काय, आणि शिरगुप्पे यांच्या मानधनाची रक्कम त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या मदतीला येते काय! हा खरोखर एक विलक्षण योगायोगच! त्या विद्यार्थ्याने आबालाल यांचे केलेले पोर्ट्रेट अप्रतिम असणार यात तिळमात्र शंका नाही.

डॉ. श्रीकांत परळकर, मुंबई 

‘ऐन मध्यरात्री’ सर्वाधिक आवडली

साधनाचा बालकुमार दिवाळी अंक मला खूप आवडला. त्यातील प्रत्येक गोष्टीतून मला बोध घेण्यास मिळतो. ‘राम व कृष्णी’ या अरुणा ढेरे यांच्या गोष्टीतून प्राण्यांवर प्रेम करण्याची भावना मनात निर्माण होते, पण मी शहरात राहत असल्याने एकही प्राणी पाळू शकत नाही. राजीव तांबे यांच्या ‘जादूचा फ्रॉक’ या गोष्टीतून दान करण्याचा उपदेश मिळतो. राजन गवस यांच्या ‘टी-शर्ट’मधून नेत्यांच्या खोट्या आश्वासनांची माहिती मिळते. अनिल अवचट यांच्या ‘बोगदा पर्वा’तून झाडे जगवण्याचा तर जयंत नारळीकरांच्या ‘गंगातीरी व ग्रांटाकाठी’मधून वैज्ञानिकांचा आदर्श उभा राहतो. ‘ऐन मध्यरात्री’ ही दासू वैद्य यांची गोष्ट मला सर्वाधिक आवडली. कारण यापासून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर होईल. हा अंक काढल्याबद्दल आपला आभारी आहे.

हरीश रत्नपारखी, बीड

गांधींना बाजूला ठेवून त्या प्रश्नाकडे पाहावे

15 जानेवारीच्या अंकात श्री.अरविंद पारसनीस यांनी श्री.सुनील सहस्रबुद्धे यांच्या ॠरपवहळ’ी उहरश्रश्ररपसश ीें चेवशीप डलळशपलश या पुस्तकाच्या निमित्ताने आपले विचार मांडले आहेत. आजच्या डॉमिनंट सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक माहोलमध्ये ते प्रातिनिधिक स्वरूपाचे असल्याने त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. त्यांच्या मते ‘जीवनातील प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक विचारासाठी, प्रत्येक निर्णयासाठी, मानवी संस्कृतीच्या सर्वांगीण विकासासाठी, विवेकाचा मार्ग धरा!’ असे विज्ञान सांगते.

विज्ञानाविषयी माझीही अशीच काहीशी कल्पना आहे. परंतु सुनील सहस्रबुद्धेंनी विज्ञान व आधुनिक विज्ञान असा भेद करीत गांधींचा हवाला देत दाखवून दिले आहे की, आधुनिक विज्ञान हा विवेकाचा मार्ग हरवून बसले आहे. सुनील सहस्रबुद्धेंचे पुस्तक कठीण आहे. माझ्या एका शास्त्रज्ञ मित्राला मी या पुस्तकाचे परीक्षण करण्यासाठी विनवले, तर त्याने आपली असमर्थता व्यक्त करीत ‘परिचय’ करून देणे पसंत केले. परंतु ‘आधुनिक विज्ञानाने विवेक मार्ग सोडून दिला आहे का?’ हा प्रश्न गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे, एवढे मात्र निश्चित.

आइन्स्टाईन गांधींबद्दल काही म्हणेनात, पण विज्ञानक्षेत्रात गांधींना मान्यता नाही हे खरेच. तेव्हा गांधींना बाजूला ठेवून या प्रश्नाकडे पाहिले तर ते जास्त उपयुक्त ठरू शकेल. याविषयी बऱ्याच विज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी खूप काही लिहिले आहे. उदारणार्थ ’डलळशपलश, कशसशोपू रपव तळेश्रशपलश’ नावाचे पुस्तक श्री.आशीष नंदी यांनी संपादित केले आहे. या पुस्तकात आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणून मान्यता पावलेल्या फ्रान्सिस बेकनपासून सुरुवात करून वेगवेगळ्या वैज्ञानिक गृहीतकांचा समाचार घेतला गेला आहे. न्याय, समता व लोकशाही यांना मूलभूत मानून साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण व अर्थकारण यांचे विश्लेषण करण्याचे काम ‘साधना’ समर्थपणे करीत आहे.

आज आधुनिक विज्ञानाबाबत प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा आढळते. धनिक वर्ग व सत्ताधीशांबरोबर वैज्ञानिकही विवेकहीनपणे वाढत्या प्रमाणात व तीव्र गतीने न्याय, समता व लोकशाहीची पायमल्ली करताना दिसतात. इथे शास्त्रज्ञ वा वैज्ञानिकांच्या वैयक्तिक अविचारापुरता हा प्रश्न मर्यादित नसून आधुनिक विज्ञानाच्या अंतर्भूत स्वभावाचेच आकलन करून घेणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या माझ्यासारख्या एका नम्र विद्यार्थ्याला हे फार गरजेचे वाटते. साधनासारख्या समर्थ नियतकालिकाने ही कामगिरी पार पाडावी अशी विनंती.

दिलीप कामत, बेळगाव

मुद्देसूद परामर्श

‘साधना’च्या 15 जानेवारी अंकातील ‘टिकेकर-केतकर पर्व’ हे संपादकीय अतिशय उत्तम! अरुण टिकेकर व कुमार केतकर या दोन्ही मातब्बर संपादकांच्या कारकिर्दीचा थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद परामर्श त्यात घेतला आहे. हार्दिक अभिनंदन.

सुनीती नी. देव, नागपूर   

Tags: सुनीती नी. देव दिलीप कामत हरीश रत्नपारखी डॉ. श्रीकांत परळकर सुहास जाधव नारायण लाळे शांतिलाल शाह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके