डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

7 फेब्रुवारीच्या अंकातील संजय भास्कर जोशी यांचा ‘अभिमन्यूचा धडा' हा लेख उत्तम जमला आहे. ‘सारेगमप' हा कार्यक्रम अफाट लोकप्रियता मिळवत असताना या कार्यक्रमाची अनाकर्षक, दोषी बाजू दाखवणे हे धाडसाचे होते- हे काम ज्या सडेतोडपणे जोशी यांनी त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! वास्तवदर्शी कार्यक्रमाबद्दल (रिॲलिटी शोज)संबंधी काही विचार मला यानिमित्त मांडावेसे वाटतात.

ब्राह्मणांनी लोकशाहीचा आदर करावा!

शनिवारवाड्याच्या देखाव्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भूगाव येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनातील ठराव ‘ते हि नो दिवसा: गता:' या काळाची आठवण करून देणारे वाटतात. शनिवारवाडा हे भारतात असे ठिकाण आहे की जेथे ब्राह्मणांनी धर्मसत्ता व राजसत्ता एकाच वेळी उपभोगली. ते म्हणतात की, ‘ब्राह्मणांनी आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवला, पण लोकशाहीत बुद्धीचे काम फार चालत नाही. लोकशाहीत डोक्याला नव्हे तर डोक्यांना किंमत आहे! म्हणजे आताची लोकशाही बिनडोक (मूर्ख)लोकांची आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे. पण लोकशाहीमुळेच कोणत्याही लोकसमुदायाला आपली संघटना बांधण्याचा, संस्कृतीचा विकास करण्याचा तसेच सरकारचा निषेध करण्याचा अधिकार मिळत आहे, त्याचा पुरेपूर उपभोग घेऊन लोकशाहीला दूषण देणे म्हणजे खालल्या घराचे वासे मोजणेच आहे. त्यांच्यासाठी आता पेशवाईसारखी हुकूमशाही कशी येणार? म्हणून त्यांनी इतरांप्रमाणे लोकशाहीने दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची फळे गोड मानून घ्यावी.

तसेच बहुतेक द्विजवराप्रमाणे त्यांचा असा समज आहे की देवाने त्यांना अधिक बुद्धी दिली आहे. हे जर खरे असते तर जगात ब्राह्मणांना खूप मागणी आली असती व सर्वच ब्राह्मण भूदेव असल्याने देववाणी संस्कृतमध्ये पारंगत झाले असते. पण हा त्यांचा गैरसमज दिसतो. ‘ब्राह्मणांना संस्कृत भाषा कळत नाही व त्यांना वेदांची नावेही ठाऊक नाहीत!' असे दस्तुरखुद्द योगाचार्य रामदेवबाबा यांनीच अधिवेशनात सांगितले. शिवाय त्यांचा समज जर खरा असता तर शूद्र वर्णात डॉ.आंबेडकरांसारखे भारतरत्न निर्माणच झाले नसते. एका ठरावात त्यांनी शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या जेम्स लेनचा व त्यांना मदत करणाऱ्यांचा निषेध केला आहे. जेम्स लेनला मदत करणारे भांडारकर इन्स्टिट्यूटमधील बारा ब्राह्मण संचालक आहेत व ते सर्व आर.एस.एस.चे आहेत. नामोल्लेखासह त्यांचा निषेध करायला हवा होता. म्हणून त्यांचा हा ठराव तोंडदेखला आहे. साप सोडून भुई थोपटणे आहे. त्यांनी एका ठरावात ‘ब्राह्मणांना आरक्षण नको' असे म्हटले आहे. हे त्यांचे औदार्य नसून व्यावहारिक मोठेपणा आहे. कारण त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने, सामाजिक, ऐतिहासिक कारणामुळे भरपुर मिळत आहे. कुळकायद्याच्या फेरविचारांची त्यांनी अपेक्षा करू नये. घड्याळाचे काटे आता उलटे फिरणार नाहीत हे त्यांनी ध्यानी घ्यावे. त्यांनी प्रचलित लोकशाही राज्यपद्धतीवर नाराज राहू नये. साने गुरुजी, एस.एम.जोशी, विनोबा भावे यांच्याप्रमाणे समाजाशी एकरूप होऊन ‘मनुष्याची श्रेष्ठ-कनिष्ठता जन्माधिष्ठित नसते, जन्मत: सर्व समान असतात' असा ठराव करून ब्राह्मणेतरांचे प्रेम मिळवायला हवे होते.

पंडितराव बंडू बारी, रामपेठ, जळगाव.

वारकऱ्यांनी ‘भेदाभेद, अमंगळ' नाहीसा करावा!

21 फेब्रुवारीच्या ‘साधना' अंकातील ‘आनंद यादव यांची माघार ही तर ऐतिहासिक चूक!' हे संपादकीय वारकरी व यादव यांचे सडेतोड पंचनामा करणारे आहे. संशोधन करून व आपली प्रतिभा वापरून ‘संतसूर्य तुकाराम' नामक चरित्रात्मक कादंबरी (वारकरीसंप्रदामातील एका गटाने विरोध केल्यामुळे) डॉ.यादव यांनी मागे घेऊन संबंधितांची माफी मागितली. या कृतीमुळे डॉ. यादवांना एवढे संशोधन करूनही तुकोबांचा ‘सत्य असत्याशी मन केली ग्वाही, मानियले नाही बहुमता' हा विचार पचवता आला नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळेच संमेलनाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा हक्क त्यांनी गमावला आहे, हेच अधोरेखित होते!

धार्मिक उत्सवातून प्राचीन पोथ्या-पुराणातील ‘लीला' सांगणाऱ्यांनी व त्या ऐकणाऱ्यांनी तुकोबारायांच्या तरुणाईतील स्खलनशील जीवनाच्या कादंबरीत रेखाटलेल्या वर्णनावर गदारोळ उडवावा याचे आश्चर्य वाटते. 350 वर्षांपूर्वीच समानतेची आणि बंधुभावाची शिकवण संतसूर्य तुकाराम यांनी ‘विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ' या  अभंगातून दिली. पण आजही समाजातील एका समूहाला गावकुसाबाहेर पशूचे जीवन जगावे लागत आहे आणि त्या समूहावर गावागावात अत्याचार होत आहेत.तेव्हा सत्य काय असत्य काय, ह्याचा पडताळा न करता कुणीतरी भडकवले म्हणून सदर कादंबरीच्या विरोधात जाळपोळ, बंद वगैरे करण्यात शक्ती व वेळ वाया घालवण्यापेक्षा माणसामाणसातील ‘अमंगळ भेदाभेद' नाहीसे करण्याचे प्रयत्न (वरील अभंग तारस्वरात म्हणणाऱ्या व तो दुसऱ्यांना ऐकवणाऱ्या) वारकऱ्यांकडून अपेक्षित आहे.

गोविंद काजरोळकर  कुर्ला, मुंबई.

असे नवे प्रयोग पुढेही चालू ठेवा!

‘डॉन' आणि ‘आऊटलुक' यांच्यातून उत्तम लेखसामग्री तुम्ही अनुवादित करून छापता, तशीच सामग्री ‘साधना'तून इंग्रजीत उतरण्याची व्यवस्था करायला हवी... कुठल्याही नामवंत आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने अवश्य अनुवादित करून घ्यावी, अशी मोलाची लेखनसामग्री तुम्ही साधनात देत आहात याचा आनंद वाटतो. पत्रलेखक देखील महत्त्वाची कामगिरी करीत आहेत. जास्तीत जास्त वाचकांची पत्रे छापण्याचा आग्रह वाचकच करीत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. 24 जानेवारीचा अंक मला नव्या वळणावरचा वाटला. त्यातील सर्वच लेख दोन-तीनदा वाचले. एवढेच नव्हे तर पुढेही वाचण्यासारखे व समजून घेण्यासारखे आहेत. तळवलकरांचा लेख तर आंतरराष्ट्रीय कक्षेचा आहे. हेरंब कुलकर्णी संपादित सहाव्या वेतन आयोगावरील पुस्तकातील उतारेदेखील सामान्य वाचकांना खूप विश्लेषक सामग्री पुरवतात. गिरीश सहस्रबुद्धे यांची पानांची सजावट, रेखाचित्रे कौतुकास्पद आहेत. असे नवे प्रयोग सतत पुढेही चालू ठेवावेत.

रेणू गावस्कर यांच्या लेखातील ‘नजमा'शी संवाद विलक्षण आहे. 31 जानेवारीचा अंक वाचून तर एकदा नव्हे पुन्हापुन्हा सतत येरझारा घालत चर्चा केल्याशिवाय होतच नाही. मात्र पाचरणे, गवाणकर या नव्या लेखकांना ‘प्रचारात्मकता' कमी करायला सांगावी. पानांची रचनादेखील नव्या प्रयोगाची आहे.

गोपाळ शहा, बारडोली, सुरत

रसभंग करणारा व ‘मी'पणा मिरवणारा लेख

7 फेब्रुवारीच्या ‘साधना' अंकातील ‘अभिमन्यूचा धडा' हा संजय जोशी यांचा लेख वाचून अनेकांना यातना झाल्या असतील. पहिल्याच परिच्छेदात जोशींनी स्वत:ची आरती ओवाळून घेतली आहे. ‘मी सहसा असे रिॲलिटी शो पाहात नाही'. मग सगळ्या जगभर लाखो लोक सोमवारी आणि मंगळवारची रात्री साडेनऊच्या वेळेची आतुरतेने वाट बघत होते ते कसे?

‘आजचे आघाडीचे गायक किंवा गायिका लहान होते तेव्हा ते कसे गात असतील?' नक्कीच याच पाच जणांसारखे!

आर्या आंबेकरची लावणी, प्रथमेश लघाटेचे नाट्यगीत, रोहित राऊतचा रॉक शो, मुग्धाचे इतक्या लहान वयातील भावपूर्ण गाणे व अंतिम फेरीतील कार्तिकीचे शास्त्रीय गाण्यावर बेतलेले गीत म्हणण्याची कुवत पाहून व ऐकून थक्क व्हायला होते. परीक्षक म्हणून महादेवन, घोषाल, वाडेकरजी, शौनकजी, हृदयनाथजी, बकुळ पंडितजी, अंकलीकर या व अशा दर्जाच्या संगीताची उत्तम जाण असणाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या सर्वांना दाद देऊन त्यांचे कौतुक केले. ते संजय जोशींपेक्षा लाखपटीने या क्षेत्रातील जाणकार आहेत म्हणून! पल्लवी जोशीचे सूत्रसंचालन, वाद्यवृंदाचे श्रवणीय संगीत, अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांचे गाण्यावरचे अभिप्राय व झी मराठीने केलेले सुरेख व नेत्रदीपक नेपथ्य या सर्वांमुळे ही संगीताची मालिका दीर्घकाळ आनंद देत राहील.

त्यामुळेच असे वाटते की, ‘साधना'सारख्या साप्ताहिकात इतका रसभंग करणारा व ‘मी'पणा मिरवणारा लेख छापून यायला नको होता.

विनोद सावंत, कृष्णानगर, सातारा

सकारात्मक व समतोल समीक्षा करावी !

श्री. संजय जोशी यांचा ‘अभिमन्यूचा धडा' हा लेख वाचनात आला. श्री.जोशी हे काही ‘पॉझिटिव्ह' विचार करू शकत नाहीत काय? अवधूत गुप्ते यांनी मुग्धाला कौतुक म्हणून काही म्हटले तर त्यात ‘आचरटपणा' काय? श्री.गुप्ते व वैशाली सामंत यांनी प्रत्येक अभिप्राय देताना, मुलांच्या पालकांना व शिक्षकांना ‘ह्या मुलांचे बालपण हरवणार नाही ह्याची काळजी घ्या' म्हणून सांगितले आहे. श्री.जोशी हा कार्यक्रम पाहत असतील तर त्यांनी ह्याची नोंद का घेतली नाही? फक्त नकारात्मक मत का व्यक्त करावे? कोणत्याही गोष्टीची समीक्षा करावयाची तर ती सकारात्मक व समतोल असावी असे माझे मत आहे, ते चूक आहे असे मला वाटत नाही.

मोहन बिच्चू, माहीम मुंबई.

दिलखुलास दाद द्या!

गोविंदराव तळवलकरांच्या जोडीला माधवराव गाडगीळ यांची लेखमाला सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे. मंगेश नाबर यांनी ‘साधना'तील लेखनाचा सविस्तर आढावा घेतला आहे, हे चांगले केले.

प्रदीप तत्सत यांच्या लेखातील बाजू पळशीकरांनी विचारात घेण्यासारखी आहे. यावेळी ‘संजय उवाच' (अभिमन्यूचा धडा)काहीसे एकांगी झाले आहेत. ‘सारेगमप'च्या उणिवा जमेला धरूनही या कार्यक्रमाने खूप मौल्यवान असे सांस्कृतिक धन गेल्या सहा महिन्यात दिले आहे, त्याला दिलखुलास दाद दिलीच पाहिजे.

प्रा.रमेश जोशी, दादर, मुंबई.

‘रिॲलिटी शोज'विषयी काही विचार...

7 फेब्रुवारीच्या अंकातील संजय भास्कर जोशी यांचा ‘अभिमन्यूचा धडा' हा लेख उत्तम जमला आहे. ‘सारेगमप' हा कार्यक्रम अफाट लोकप्रियता मिळवत असताना या कार्यक्रमाची अनाकर्षक, दोषी बाजू दाखवणे हे धाडसाचे होते- हे काम ज्या सडेतोडपणे जोशी यांनी त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! वास्तवदर्शी कार्यक्रमाबद्दल (रिॲलिटी शोज)संबंधी काही विचार मला यानिमित्त मांडावेसे वाटतात.

‘वास्तवदर्शी कार्यक्रम' हे गुणवान स्पर्धकांतून सर्वोत्तम कलाकार निवडण्याचे साधन असतात, अशी बऱ्याच लोकांची भाबडी समजूत असते. ‘ कार्यक्रम उत्तम आहे, तेवढे एसएमएस वापरणे बंद करा!' अशा अनेक प्रतिक्रिया ऐकू येतात. वस्तुस्थिती अशी आहे की अशा एसएमएसमधून येणारे उत्पन्न जास्तीत जास्त मिळवावे, हेच अशा कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्ट असते. गुणवान महागायक, महानर्तक, महाविनोदाचार्य मिळवणे हे या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे एक साधन असते. गुणवत्ता हाच निकष असता तर सामान्य दर्जाचे गायक अंतिम फेरीत व गुणवान गायक सर्वात आधी बाद असे चित्र (जे, हिंदी वास्तवदर्शी कार्यक्रमात हटकून दिसते)दिसले नसते.‘बहुजनांचे चातुर्य' हे गुणवत्तेबद्दल फारसे लागू होत नाही हे आपण नेहमी पाहतोच. (उदा. निवडणुकांमधून भयानक चारित्र्याचे हमखास निवडून येणारे आपले नेते!)

या पार्श्वभूमीवर ‘झी मराठी' वाहिनीने या बालकलाकारांना साजेशी बक्षीसे देणे उचित ठरले असते. अर्थव्यवस्थेतील अशी अनेक क्षेत्रे असतात, ज्यात त्यातल्या मनुष्यबळाची गुणवत्ता हा नफा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष ठरतो. अशा क्षेत्रात त्यातल्या मनुष्यबळाला भरपूर (यथायोग्य नव्हे!)पगार देण्याची प्रथा असते.(उदाहरणार्थ, सॉफ्टवेअर अभियंत्याचे आभाळाला भिडलेले पगार, गुंतवणूक. बँकींगमधल्या कर्मचाऱ्यांचे अशक्यप्राय व अद्‌भुत वाटणारे बोनस. मेरिल लिंच या आता अस्तंगत झालेल्या गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयातल्या संडासाची किंमत 17 लाख रुपये होती, हे उदाहरण मननीय ठरावे!)

या पार्श्वभूमीवर ‘झी मराठी'ने काम करावे? एसएमएस व जाहिरातींद्वारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवूनही शेवटी विजेत्यांना लाखा-दोन लाखांची चिल्लर रक्कम (तीसुद्धा कुठल्या तरी कंपनीने पुरस्कृत केलेली)देण्यात आली. हा अन्याय आहे. दुय्मम दर्जाच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बालमजुरांना एक-दोन रुपयांची ‘टीप' ठेवण्यासारखे!

अर्थात, या कार्यक्रमाच्या काही चांगल्या बाजूंचा उल्लेख करणे आवश्यक आहे. श्री.जोशी यांनी लिहिल्याप्रमाणे ‘सारेगमप'ने अशा वास्तवदर्शी कार्यक्रमात अपरिहार्यपणे येणारा थिल्लरपणा बराचसा टाळला.(अपवाद म्हणजे शेवटी शेवटी मराठी मालिकांमधल्या कलाकारांना संगीतावर मतप्रदर्शन करायला लावणे)हिंदी वास्तवदर्शी कार्यक्रमांत हा थिल्लरपणा बऱ्याचदा बीभत्सरसाचे रूप धारण करतो; ‘व्हॉईस ऑफ इंडिया' या सुमार कार्यक्रमात तर गुंड ‘शान' या निवेदकावर हल्ला करतात असे दाखविले होते, तर युवकांच्या एका वाहिनीवरच्या अशा कार्यक्रमात निवेदिका एका स्पर्धकाच्या मुस्काटीत मारते असे वास्तव दाखवले होते.(पुढे त्या स्पर्धकाने त्या निवेदकला तोंडात मारले, व नंतर त्या कार्यक्रमाच्या बॅकस्टेज कर्मचाऱ्यांनी त्या स्पर्धकाला बुकलून काढले- हे असले ढळढळीत वास्तव आपले कार्यक्रम टाळतात हे आपले अहोभाग्य!)

सरते शेवटी एकूणच वास्तवदर्शी कार्यक्रमांच्या एका चांगल्या बाजूबद्दल लिहावेसे वाटते. कला-साहित्य खेळ- अशा काही क्षेत्रात तेथे शिखरावर असलेल्यांच्या व त्या क्षेत्रात दुय्यम फळीत असलेल्यांच्या समाज मान्यतेत, आर्थिक परिस्थितीत, उपलब्धीत कमालीचा फरक असतो. त्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांचा विचार केला तर हा फरक कितीतरी असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर श्री.विक्रम चंद्रासारख्या असामान्य प्रतिभावान इंग्रजी कादंबरीकाराला ‘सॅक्रेड गेम्स' या कादंबरीसाठी आठ कोटींचे मानधन मिळते, तर अप्रकाशित, होतकरू लेखकाला एखादा इंग्रजी (व इंग्रज) प्रकाशक मिळणे अशक्यप्राय असते. मात्र शिखरावरील कलाकाराचे उदाहरण मनात ठेवून लाखो युवक-युवती(अनेकदा किमान गुणवत्ता असूनही) या क्षेत्रात यायचा प्रयत्न करतात व दारूणरित्या पराभूत होतात.

अशा परिस्थितीत समाजातल्या एका महत्त्वाच्या घटकात वैफल्य पसरू शकते. वास्तवदर्शी कार्यक्रमात अशा हजारो तरुणांना चमकण्याची संधी मिळते, त्यांचे वैफल्य काही काळ तरी दूर होते. ‘इंडियन आयडॉल' सारख्या टुकार कार्यक्रमांतल्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या युवकांना त्यांच्या तालुक्यातील कार्यक्रमात नुसत्या उपस्थितीचे पन्नास हजार रुपये मिळतात.(अर्थात त्यामुळे ‘सुमारांची सद्दी' वाढते हा धोका आहेच.) आणि शेवटी अशा वास्तवदर्शी कार्यक्रमात उत्साहाने (परवडत नसूनही) एसएमएस पाठवणारी जनता!

खऱ्या वास्तवात या जनतेच्या हाती कुठली निवड राहिली आहे? सर्वात महत्त्वाची निवड जिथे करायची त्या निवडणुकीत मतदान कक्षात मतदान करायला गेले की काय दिसते? एक उमेदवार लफंगा, दुसरा गुंड, तिसरा बलात्कारी, चौथा खुनी व सगळेच पैसेखाऊ. अशा परिस्थितीत धडपडणाऱ्या मेहनती व थोडीशी गुणवत्ता असलेल्या अशा या वास्तवदर्शी कार्यक्रमातल्या कलाकारांची कारकीर्द घडवण्याचे त्यांना यशस्वी बनवण्यात आपले मत कामी आले याचे समाधान फार मोठे असते. (त्यातही शक्यतो आपल्याच प्रांतातल्या व आपल्याच जातीतील कलाकाराला मत देण्याचे धोरण असते)असे समाधान हे वास्तवदर्शी कार्यक्रम लोकांना मिळवून देतात- जरी तो त्यांचा मुख्य उद्देश नसला तरी- हे विसरता येणार नाही.

भूषण निगळे, बंगलोर, 75.

Tags: पंडितराव बंडू बारी गोविंद काजरोळकर   गोपाळ शहा विनोद सावंत मोहन बिच्चू प्रा.रमेश जोशी भूषण निगळे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात