डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मिनट्‌सच्या 34 व्या मुद्‌द्यात मेकॉले म्हणतो, की ‘नवशिक्षितांचा नव्याने निर्माण होणारा वर्ग सामान्य जनता व सरकार यामधील संवादात दुभाषाचे काम करील. तो वर्ग रक्ताने व वर्णाने भारतीय असला तरी चालचलन, नीती, बुद्धी आणि विचारसरणीत तो आपल्यासारखाच असेल.’ त्याचे हे म्हणणे नेहमीच उद्‌धृत केले गेले व वसाहतवादी वृत्तीचा नमुना म्हणून आजही त्याकडे  पाहिले जाते. त्यावर सतत टीका केली जाते. त्याचे हे म्हणणे समर्थनीय नव्हतेच, पण त्याचाही संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.

त्या अभंगाचा अर्थ तसा नाही!

‘नीत्शेचे सामर्थ्य आणि मर्यादा’ हा 30 जूनच्या अंकातील ‘वाद-संवाद’मधील देवीदास बागूल यांचा लेख वाचला. नीत्शेच्या आधी अडीच हजार वर्षे देव नाकारणारे बुद्ध आणि महावीर अतुल देऊळगावकरांना का आठवले नाहीत, असे बागुलांनी आवेशाने विचारले आहे. त्याच आवेशाने असेही विचारता येईल की, बुद्ध आणि महावीर यांच्या आधी देव नाकारणारे बृहस्पती आणि चार्वाक बागुलांना का आठवले नाहीत?

मला असे वाटते की, खरे म्हणजे अमूक का आठवला नाही आणि तमूक का आठवला नाही असे वाद कुणी घालू नयेत, कारण प्रत्येकाच्या विचारविश्वाचा आकार हा त्याच्या डोक्याएवढा असतो.

बुद्धानंतर ईश्वराला नाकारण्याचे लेटेस्ट काम तुकारामांनी केले असे बागूल म्हणतात. मला हे मान्य नाही. तुकारामांनी विठ्ठलाला आळवणारे अनेक अभंग लिहिले आहेतच पण शंकर, गणपती आणि मारुती यांची आळवणी करणारे अभंगसुद्धा लिहिले आहेत. तुकाराम महाराजांनी कधीही ईश्वर नाकारला नाही. बागूल यांनी उल्लेख केलेल्या ‘तीर्थी धोंडा पाणी’ या अभंगात तीर्थक्षेत्रं नाकारली असली तरी ईश्वर नाकारलेला नाही.

प्रा.म.वा.धोंड आणि सतीश काळसेकर यांच्यासारखे काही विचारवंत ‘आहे देव ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा’ या अभंगाचा दाखला देऊन तुकाराम महाराजांनी ईश्वर नाकारला होता असे सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, ते लावतात तसा ‘देव आहे असे सांगावे, पण तो नाही असा अनुभव मनात घ्यावा’ असा या अभंगाचा अर्थ नाही. खरा अर्थ ‘देव असा आहे, म्हणजे सगुण साकार आहे, कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे असे लोकांना सांगावे, पण तो सगुण साकार नसून निर्गुण निराकार आहे असा अनुभव मनात घ्यावा’ असा आहे. (संदर्भ:ह.भ.प.नेऊरगावकर यांनी संपादित केलेली तुकाराम महाराजांची गाथा).

एकंदरीत तुकाराम महाराजांनी ईश्वर नाकारला नव्हता हेच दिसून येते.

विजय आपटे

मेकॉलेला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न अयोग्य!

साधना साप्ताहिकाच्या 23 जून 2012 ला प्रसिध्द झालेल्या अंकात प्रतिसाद या सदरात प्रभा पुरोहित यांचे ‘मेकॉलेचे विधान : गोबेल्स नीती’ हे पत्र फार महत्त्वाचे वाटते. मेकॉलेला खलनायक म्हणून सादर करण्याचा गेल्या 20-25 वर्षांत सतत प्रयत्न झाला. त्याच्या मिनट्‌सच्या आधारे हे सगळे केले गेले. प्रभा पुरोहितांनी त्यामागील सत्यशोध घेतला हे फार मोठे काम झाले.

भारतीयांना आधुनिक शिक्षण मिळावे, इथल्या जातिकेंद्रित शिक्षणव्यवस्थेऐवजी सर्वांना शिक्षण मिळावे असे मेकॉलेला वाटत होते. 2 फेब्रुवारी 1835 ला ब्रिटिश पार्लमेंटला सादर केलेल्या 36 कलमी मिनट्‌सवरून हे स्पष्ट होते.

1813 साली एका चार्टरने ब्रिटिश पार्लमेंटने भारतातल्या राजेमहाराजांना आश्वासन दिले होते, की इथल्या शिक्षणासाठी अरेबिक व संस्कृतमधून शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. त्याप्रमाणे वीस एक वर्षे शिक्षण चालले, पण या धोरणाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी झाली व त्याकरता जी कमिटी नेमली गेली तिचा अध्यक्ष मेकॉले होता. भारतीयांना आधुनिक शिक्षण मिळावे असे त्याचे मत होते. जुन्या शिक्षणव्यवस्थेवर व त्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर खर्च होणारा सार्वजनिक पैसा योग्य शिक्षणपध्दतीवर खर्च व्हावा असे त्याचे आग्रही मत होते (विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने असे शिक्षण घ्यायला किंवा दानशूर हितचिंतकानी त्यांचा खर्च केला तर मेकॉलेचा त्याला काही आक्षेप नव्हता.)

नव्या शिक्षणपद्धतीचे महत्त्व सांगत असताना ‘पाश्चात्य जीवनपद्धती अधिक चांगली’ हा अहंगंड मेकॉलेच्या मिनट्‌समधे दिसतो. पण हे तो 1835 साली लिहीत होता हा कालसंदर्भही आपण लक्षात घेतला पाहिजे. आधुनिक शिक्षण इंग्लिशमधून असावे, कारण सगळी पाठ्यपुस्तके इंग्लिशमध्ये व शिकवणारेही इंग्लिशमधून शिकवणारे होते हे त्या मिनट्‌समधे तो सांगतो.

मिनट्‌सच्या 34 व्या मुद्‌द्यात मेकॉले म्हणतो, की ‘नवशिक्षितांचा नव्याने निर्माण होणारा वर्ग सामान्य जनता व सरकार यामधील संवादात दुभाषाचे काम करील. तो वर्ग रक्ताने व वर्णाने भारतीय असला तरी चालचलन, नीती, बुद्धी आणि विचारसरणीत तो आपल्यासारखाच असेल.’ त्याचे हे म्हणणे नेहमीच उद्‌धृत केले गेले व वसाहतवादी वृत्तीचा नमुना म्हणून आजही त्याकडे  पाहिले जाते. त्यावर सतत टीका केली जाते. त्याचे हे म्हणणे समर्थनीय नव्हतेच, पण त्याचाही संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.

कालबाह्य शिक्षणपद्धतीवर तो टीका करीत होता. त्यावरील सार्वजनिक खर्च समर्थनीय आहे का, हा प्रश्न त्याच्या कमिटीसमोर होता. मेकॉलेला वाटत होते, की देशी भाषांतील परिभाषा या नवशिक्षितांच्या वर्गाने बनवावी. शास्त्र इत्यादी नव्या विषयांचे शिक्षण देण्यास देशी भाषा समर्थ झालेल्या नाहीत, त्यांना सशक्त, सबल केले पाहिजे हे तो स्पष्ट करतो. मेकॉलेला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न अयोग्य होता.

भारतात कंपनी सरकारचे राज्य असताना आपल्या मिनट्‌समध्ये त्याने ही मते मांडली होती, हा कालसंदर्भ नजरेआड करणे योग्य ठरणार नाही.

अशोक व शुभदा जोशी

माझे विधान कोणी जाणकार वाचक खोडून काढो!  

साधना अंकांचे वाचन मी नियमितपणे करत आलो आहे. आपल्याला पत्र लिहिण्यात मात्र हल्ली बराच खंड पडला आहे.

मात्र अलीकडच्या काही अंकांचे बदलते स्वरूप पाहाता गप्प बसून राहवत नाही म्हणून हे पत्र. आपले साप्ताहिक ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरातील वाचकांना कसे आकर्षक आणि वाचनीय होईल, त्यातूनही बोधप्रद साहित्य कसे देता येईल याचा आपण संपादकद्वय कसोशीने प्रयत्न करत आहात, हे अंकातील एकंदर लेखांवरून समजून येते. मित्रांनो, आपण व्यवस्थित तोल सांभाळून आहात, हे ताज्या अंकातील श्री. ज्ञानेश्वर मुळे आणि श्रीमती लीला जावडेकर यांच्या लेखांवरून समजून येते.

मला वाटते, एखाद्या सुजाण व सुशिक्षित महिलेचे आत्मचरित्र म्हणून आलेली अशी लेखमाला (अशी मी घडले सारखी) साधनामध्ये मी तरी वाचली नसावी. चूकभूल द्यावी घ्यावी. माझे हे विधान कोणी जाणकार वाचक खोडून काढो, अशी इच्छा आहे. असो, लीलातार्इंची ही लेखमाला वाचनीय होणार, एवढेच नव्हे तर गाजणार हे भविष्य आताच करण्यास कोणीही ज्योतिषी लागणार नाही.

कमलाकर गोटखिंडी

बागुलांना काय वाटते हे समजून घ्यायला उत्सुक

नवा अंक आजच हातात पडला. छान आहे. पूर्ण अंक अजून वाचायचा आहे. पण राजा शिरगुप्पेंचे तुकाराम सिनेमावरील संपादकीय फार आवडले. अति भारावलेल्या अवस्थेत लिहिले असले तरी लेखनामागचा त्यांचा प्रामाणिकपणा भावला. सिनेमा अजून पाहायचा बाकी असल्याने त्यांच्या मुद्‌द्यांत शिरत नाही. नव्या तुकारामावर वारकऱ्यांपैकी कोणीतरी लिहायला पाहिजे. देवीदास बागुलांना या तुकारामाबद्दल काय वाटते हे समजून घ्यायला मी उत्सुक आहे.

नव्या सिनेमाला, नव्या नाटकांना उचलून धरण्याचा साधनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

अवधूत परळकर

ते तुकारामाचे अभ्यासक असतीलही, पण...

30 जून 2012 चा अंक वेबने आणि पोस्टानेही काल हातात पडला. राजा शिरगुप्पे यांचे संपादकीय वाचले. ‘तुकाराम’ चित्रपट (नवा) पाहायची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिरगुप्पे यांनी एके ठिकाणी स्वत:ला ‘तुकारामाचा अभ्यासक’ म्हटलंय, असतीलही. पण तुकारामाचा जीवनकाल ‘सोळाव्या शतकातील’ असा उल्लेख ते दोन ठिकाणी करतात.

तुकाराम महाराज 1608 मध्ये जन्मले व 1650 मध्ये त्यांचे देहावसान झाले. म्हणजे त्यांचा जीवनकाल सतरावे शतक हा होता. सोळाव्या शतकात होऊन गेलेले संत म्हणजे एकनाथ महाराज (1533-1599).

तुकाराम, रामदास, शिवाजी, संभाजी या सर्व सतराव्या शतकातील विभूती, सोळाव्या नव्हे. (चालू वर्ष 2012 हे एकविसाव्या शतकातील 12 वे वर्ष आहे, विसाव्या शतकातील नाही.)

यशवंत कर्णिक

‘लेखक’ दुर्लभ असून सापडलेले आहेत

2 जूनच्या अंकातील ‘सेंटर पेज’ सदरामधील श्री.द्वादशीवार यांचा ‘वाद आहे, समाज (मात्र) नाही’ हा लेख उद्‌बोधक, माहितीपूर्ण व राजकीय परिस्थितीचे सिंहावलोकन करणारा असा महत्त्वपूर्ण लेख आहे. हैदराबाद येथे समाजवादी पक्षाच्या पुनरुज्जीवनाची राष्ट्रीय सभा गेल्या वर्षी झाली व त्यात जुन्या गोष्टी परत उगाळल्या गेल्या. मात्र सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीवर तेथेही विचार केला गेला नाही.

1. समाजवादी पक्षाचे विसर्जन का केले गेले, एवढा मोठा राष्ट्रीय पातळीवरील आणि 1935-65 या काळामध्ये काँग्रेसला पर्याय मानला जाणारा पक्ष विसर्जित का केला गेला, यावर तत्कालीन समाजवादी पक्षातील पुढारी का विचार करीत नाहीत? आत्मपरीक्षण व आत्मटीकाही (आपली जुनी कृती चूक असल्यास) करण्याची आवश्यकता नाही का?

2. प्रथमच श्री.द्वादशीवार यांनी सौम्य परंतु स्पष्ट शब्दात हे अप्रिय परंतु ‘पथ्य’ कार्य केले आहे. ‘लेखक’ दुर्लभ असून सापडलेले आहेत. परंतु ‘श्रोता’ व ‘वाचक’ सापडणार आहेत का?  1977-2012 एवढ्या कालखंडात झडझडून चर्चाच झाली नाही. त्या वेळचे समाजवादी काळाच्या पडद्याआड गेले. पुष्कळजण 75-80 च्या आसपास आहेत. त्यांनी तरी यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे- होती.

मनोहर जांभेकर, चिंचवड, पुणे.

प्रकाशाचे पंख असणाऱ्या लोकांनी...

साधनाचे अंक सध्या वेळेवर मिळत आहेत. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘सेंटर पेज’च्या बाबत तुम्हाला खूप पत्रे येत असतील. दोन पानांत किती भरगच्च लिहिता येते, हा नमुना अप्रतिम आहे. इतर लेखकांनीदेखील यातून खूप शिकण्यासारखे आहे.

साधनाचे अंक म्हणजे एकत्र सेमिनारच असतो. वाचक व लेखक तसेच इतर अनेकांना (कार्यकर्ते, सक्रिय नसणारे ध्येयवादी, काहीतरी करू पाहणारे इ...) देखील त्यातून खूप शिकता येते. 2 जूनच्या अंकात ‘वाद आहे, समाज, (मात्र) नाही’ हे ‘सेंटर पेज’ व्यक्त करते ती अवस्था आजची नाही, प्रकाशाचे पंख असणाऱ्या लोकांनी आपलेच पंख चोचींनी उद्‌ध्वस्त केले. त्या काळातील अग्रलेख व सामान्य जन हेच बोल व्यक्त करीत होते.

वस्तुत: 2 जूनच्या अंकातील ‘सेंटर पेज’विषयी खूप काही सांगता येण्याजोगे आहे. सत्ता आज आहे व उद्या नाही, त्यामुळे अनासक्त राहणाऱ्या लोकांनी काही गोष्टी प्रसृत केल्या, त्यामुळे जनलोकांची दिशाभूल झाली होती. सत्ता राबवायला पुरेसे ट्रेनिंग व लोक सोबत हवेत, हे त्या वेळच्या नेतेजनांच्या लक्षात आले नसेल!

इतरही खूप गोष्टी जाणकार निवेदन करतील, पण ही मंडळी एका विशिष्ट शहरातील होती, यावर लेखकाचा कटाक्ष आहे, खूप वर्षांनी हे रूढ पुन्हा शब्दांत आले आहे. ‘सेंटर पेज’च्या लेखकाचे अभिनंदन. त्यांच्यापाशी खूप काही नवे आहे. आजच्या काळास उपयोगी विश्लेषण. धन्यवाद.

बाबा भांड, फ्लिपकार्ट इत्यादी गोष्टींविषयीसुद्धा अभिनंदन.

गोपाळ शहा, बारडोली, गुजरात

त्या प्रश्नाचे उत्तर साधनातील ‘ते’ लेख देतील

गेली चार-पाच वर्षे मी साधनाचे वाचन करीत आहे आणि त्यामुळेच साधनाच्या नव्या अंकाची वाट पाहणे हा माझ्यासाठी एक औत्सुक्यपूर्ण अनुभव आहे.

अंक उघडल्यानंतर गोविंद तळवलकर, सुरेश द्वादशीवार, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, देवेंद्र गावंडे, द.ना.धनागरे ह्या लेखकांची नावे शोधण्याची एक सवयच लागलेली आहे. मी स्वत: शिक्षणक्षेत्राशीच संबंधित असल्यामुळे द.ना.धनागरे यांचे लेख मनाला विशेष भिडतात. धर्मापासून राजकारणापर्यंत विविध विषयांना स्पर्श करणारे सुरेश द्वादशीवार ह्यांचे व गोविंदराव तळवलकरांचे लेख मनाला अपूर्व असा बौद्धिक आनंद देतात. तळवलकरांचा चार्लस्‌ डिकन्सवरील लेख अतिशय उत्तम आहे. ज्यांनी डिकन्स वाचला नाही, त्यांच्या मनात तो वाचण्याची इच्छा निर्माण होईल, ज्यांनी अर्धामुर्धा वाचला असेल ते तो पूर्ण वाचण्याचा निर्धार करतील आणि ज्यांनी तो वाचला आहे, अभ्यासला आहे त्यांना परिचित प्रदेशात पुन्हा फेरफटका मारल्याचा अनुभव येईल असे ह्या लेखाचे स्वरूप आहे.

‘साहित्य आणि समाज’ ह्या प्रश्नाची चर्चा होताना आजचे साहित्य समाजापासून तुटलेले आहे असे म्हटले जात आहे. प्रत्यक्ष अनुभवाशी फारकत घेतलेले, केवळ शब्दांचा खेळ मांडून लिहिलेले साहित्य म्हणजे भंपकगिरी आहे. अनुभवातून निर्माण झालेले साहित्य म्हणजे काय ह्या प्रश्नाचे उत्तर ‘साधना’तील ‘मी खेडं कसं बदललं?’ हा संध्या चौगुलेंचा दीर्घ लेख किंवा बाबा भांड ह्यांचा ‘वेणूआई मांगीण आणि माऊली वृद्धाश्रम’, हा लेख, राजा शिरगुप्पे यांचे ‘न पेटलेले दिवे’ व ‘शोधयात्रा’ व असे इतर अनेक लेख देतील.

देवेंद्र गावंडे ह्यांचे नक्षलवादावरील लेख बरेच दिवस मनात चीड, हतबलता निर्माण करतात. प्रधानसरांवरील विशेषांकही उत्तम होता.

प्रतिभा कामत, मुंबई  

Tags: प्रतिभा कामत गोपाळ शहा मनोहर जांभेकर यशवंत कर्णिक विजय आपटे अशोक व शुभदा जोशी देवेंद्र गावंडे देवीदास बागूल गोविंदराव तळवलकर सुरेश द्वादशीवार तुकाराम Devendra Gawande Devidas Bagul Govindrao Talwalkar Suresh Dwadshiwar ukaram weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके