डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 10 ऑगस्टच्या साधनातील किशोर काकडे यांच्या पत्रात ‘साधना परंपरेनुसार मोदीद्वेषाने...’ हा उल्लेख वाचून आश्चर्य वाटले. गेली कित्येक वर्षे मी साधनाचा वाचक आहे. या कालावधीत आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीबाबत साधनाने नेहमीच टीका केली आहे. त्याविरुद्ध आपली मतं सडेतोड शब्दांत मांडली आहेत. त्यांना कडाडून विरोध केला आहे, पण हे सर्व वैचारिक दृष्टिकोन ठेवून, आपली पातळी सोडून द्वेषपूर्ण भाषेत साधनाने काही लिहिलेले मला स्मरत नाही. काकडेंना हा द्वेष कुठे दिसला?

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाबाबत आणखी...

श्री. सुखदेव काळे यांच्या लेखात (साधना, 27 जुलै 2019) त्यांना मी 30 मार्चच्या अंकात लिहिलेला लेख वाचून अभिमान वाटला, असा उल्लेख आहे. का, ते कळले नाही. कदाचित त्यांना कौतुक वाटले असेल. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा लेख वाचायला मिळाला ते बरे झाले. त्याबद्दल माझे म्हणणे खाली देत आहे. माझी माहिती ‘अचूक’ नाही, हे मला मान्यच आहे, कारण मी (आणि बहुतेक आपण) खडकावर राहतो आणि आत काय असेल याचा फक्त अंदाज बांधू शकतो. मी काही नवे विचार मांडले, जे श्री.काळे यांनी जरूर विचारात घ्यायला हवे होते. ते त्यांनी केले असते, तर त्यामुळे काळे यांच्या मनातले बेसाल्टचे ‘मॉडेल’ किंवा संकल्पचित्र बदलले असते.

1) महाराष्ट्रातील नद्या ‘इनफ्लुअंट’ नाहीत, ‘एफ्लुअंट’ आहेत. नदीतून पाणी दगडात, खडकात जात नाही. तेथे भेगा, तडे असतील तरच जाते. आणि तसे असेल, तर तेथे झिरपण्याची नव्हे तर पाणी वाहण्याची क्रिया होते (फ्री फ्लो). यामुळे घडणारा फरक महत्त्वाचा असतो.

2) पाण्याची ‘भूगर्भ पातळी’ ही संकल्पना महाराष्ट्रात ‘बेस्लाट’ जातीच्या खडक भागात वापरणे योग्य नाही. पण याचा विचारच होत नाही. सरकारी स्तरावर तर नाहीच. कारण बहुतेक जिऑलॉजिस्ट इथले नाहीत. जे थोडे आहेत, ते मुळातून विचार करायला तयार नाहीत.

3) एकूण भूगर्भजल ‘समृद्धी’बद्दलच्या काळे यांच्या आणि आपल्या सर्वांच्या कल्पनाच तोकड्या आहेत. उत्तर भारतासारखे पाणी आपल्याला ठाऊकच नाही. जे आहे ते पाणी अधिक नीटपणे वापरून आपण काही करू शकतो, हे खरे; पण म्हणून ती तशी ‘जलसमृद्धी’ होत नाही. जांभा दगडाची पाणी साठवण्याची क्षमता जर ‘अफाट’ आहे, तर मग पाणी संपल्याचे संकट दर वर्षी सर्वत्र का येते?

4) सच्छिद्रतेबद्दलचा एक लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, हा खडक सच्छिद्र कुठे कुठे असला तरी ती भोके (छिद्रे) पाणी आरपार जाऊ देतील अशी असतातच असे नाही. ‘जांभा दगड’ अशी काहीएक वस्तू नाही, हेही महत्त्वाचे आहे. नेमके आपण कशाबद्दल बोलतो ते दर ठिकाणी पाहायला लागते. त्याची पोरॅसिटी व पर्मिॲबिलिटी (म्हणजे सच्छिद्रता आणि पारगम्यता) काढावी लागते.

5) ‘हजारो वर्षांचे पाण्याचे साठे’ हे कुठे असतात किंवा होते, कसे होते, हेही कळायला हवे. असे काही असेलच, तर ते बेसाल्टमधल्या फटींमध्ये पाणी असावे. जमिनीच्या आत सरोवर आहे किंवा जमिनीखाली नदीसारखे पाण्याचे प्रवाह असतात, या कल्पना तपासायला हव्यात. ते तसे नाही, असे मला वाटते. मुळात या नुसत्या कल्पना आहेत. त्या सुधारायला हव्यात.

6) माझ्या लेखातील काही भागांनाच काळे ते ‘खरे आहेत’ असे म्हणतात. प्रश्न असा की, भूगर्भातील खडकरचना ‘अनुकूल नाही आणि पर्जन्यमानही कमी आहे’ असा भाग फार मोठा आहे. तो केवळ काही ठिकाणी नाही. तो काही ठिकाणी असता, तर चित्र खचितच निराळे झाले असते. तो भाग फार मोठा आहे आणि वाढतो आहे.

7) सरकारी खात्यांच्या प्रयोगाबद्दल काळे यांनी आदराने लिहिले आहे. मलाही तसे वाटत असते, तर बरे झाले असते.

8) पण ज्यांना ‘भूजल पातळी’ या शब्दाची कधी अडचण झाली नाही, ज्यांना इनफ्लुअंट-एफ्लुअंट अशा नद्यांची वर्गवारी माहीत नाही; त्यांच्याबद्दल काय बोलायचे? अंडरग्राऊंड ब्लास्टिंग या कल्पनेमध्ये अडचण अशी की, बोअरच्या खोलीबरोबर सुरुंगाची शक्ती वाढवावी लागते आणि अशी ती किती वाढवता येईल, हा खरा प्रश्न आहे. शेवटी तो स्फोट आहे. त्याचे परिणाम काय होतील, ते सांगता येत नाही. त्याने भूकंपही होऊ शकतो.

9) मी मांडलेल्या ‘डोंगरी पाणीस्रोता’चा तर काळे यांनी उल्लेखही केलेला नाही! माझ्या मते, ती त्यातल्या त्यात सहज करण्यासारखी गोष्ट आहे. थोडक्यात म्हणायचे तर- काळे यांना माझ्या लेखातील नव्या संकल्पनांचा परामर्श मुळीच घेता आला नाही. नुसतेच ‘ते आम्हाला माहितीच होते,’ असा त्यांचा ॲटिट्यूड आहे, असे मला वाटते. पण तरीही त्यांनी या विषयावर लिहिले ते बरे झाले. त्यामुळे रूढ विचारसरणी पुढे आली. या सगळ्याबद्दलची अधिक चर्चा किंवा प्रत्यक्ष कृतीदेखील करता येईल. डोंगरमाथ्यावरच्या पाणीवापराबद्दल काही बोलले गेले तर बरे होईल.

-रत्नाकर पटवर्धन, नाशिक
 

मोदी, साधना आणि टाईम

दि. 10 ऑगस्टच्या साधनातील किशोर काकडे यांच्या पत्रात ‘साधना परंपरेनुसार मोदीद्वेषाने...’ हा उल्लेख वाचून आश्चर्य वाटले. गेली कित्येक वर्षे मी साधनाचा वाचक आहे. या कालावधीत आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीबाबत साधनाने नेहमीच टीका केली आहे. त्याविरुद्ध आपली मतं सडेतोड शब्दांत मांडली आहेत. त्यांना कडाडून विरोध केला आहे, पण हे सर्व वैचारिक दृष्टिकोन ठेवून, आपली पातळी सोडून द्वेषपूर्ण भाषेत साधनाने काही लिहिलेले मला स्मरत नाही. काकडेंना हा द्वेष कुठे दिसला? मोदीविरुद्ध जनतेत विशेषत: परदेशी जनतेत पद्धतशीरपणे द्वेष पसरवण्याचं काम प्रसारमाध्यमांनी फार मोठ्या प्रमाणावर केले आहे आणि त्याला भारतातील भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी (परवा परवापर्यंत शिवसेना नेत्यांनीही) खतपाणी घातलेले आहे. आपली वा आपल्या सगेसोयऱ्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आणखी उघड्यावर येऊ नये म्हणून ‘चौकीदार चोर है’, ‘ललित मोदी, निरव मोदी, सब मोदी चोर है’ असे नारे दिले.

परदेशात हे किती खालच्या पातळीवर चालले, आणि त्यामुळे मोदी सरकारने भारतात अत्याचारांचा कसा धुमाकूळ घातला आहे असं चित्र निर्माण गेलं आहे. हे पहायचं तर ‘टाईम’ साप्ताहिकाचा 20 मे 2019 चा अंक पहावा. अंक एवढ्याचकरता की, टाईम हे जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. गेली नव्वद वर्षे टाईमने आपला हा दर्जा जपून ठेवला आहे (की आता ‘आहे’च्या ऐवजी ‘होता’ म्हणावं?) टाईममध्ये आपली मुलाखत कधीना कधी छापून यावी ही जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांची इच्छा असते, असं म्हणतात. दि. 20 मेच्या अंकाच्या मुखपृष्ठावर रागीट व जरासा निष्ठुरपणाचा मोदींचा भला मोठा फोटो छापला आहे. फोटोबरोबर शीर्षक आहे- ‘देशाचे विभाजन करायला निघालेला पुढारी’.

या निवडणुकीत मोदी सपाटून मार खाणार याची राहुल गांधी, मायावती, राज ठाकरे यांना जितकी खात्री होती, तितकीच त्यांच्यावर या टाईममध्ये भला मोठा लेख लिहिणाऱ्या आतीष तसीर (त्यांचे वडील पाकिस्तानी मुस्लिम होते, असा त्यांनी उल्लेख केला आहे.) यांचीही खात्री होती. म्हणूनच सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी एक आठवडा हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. या लेखातील काही माहिती तुम्हाला नसेल, म्हणून खालील देत आहे. ‘मोदी सरकार आल्यापासून हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थिती इतकी बिघडली आहे की, आज स्त्रियांना मोकळेपणाने फिरायला भारत हा जगातील सर्वांत असुरक्षित देश बनला आहे,’ हा शोध त्या लेखात आहे. यावर न थांबता, अत्यंत गलिच्छ व निंद्य पातळीवर येऊन असाही उल्लेख आहे की, ‘भारतात मृत पावलेल्या, गाडलेल्या तरुण मुस्लिम मुलींचे देह उकरून त्यांवर लैंगिक अत्याचार करावे’ असे म्हणणाऱ्यांना भाजपचे एक मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावर बसवतात. एक हिंदू मारला तर शंभर मुस्लिमांना मारा असे हे मुख्यमंत्री म्हणतात. मोदींच्या राजवटीत सर्व अल्पसंख्यावर हल्ले होतात. अल्पसंख्याक म्हणजे दलित हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्धिप्रामाण्यवादी (ही यादी त्या लेखातील आहे)

2014 च्या निवडणुकीवेळी लेखक तसीर वाराणसीत (नरेंद्र मोदी येथूनच निवडणुकीला उभे होते) वार्ताहर म्हणून वावरत होते, आणि आपल्याला काही भवितव्य नाही हे त्यांच्या लक्षात आले, एक म्हणजे ते मुसलमान होते आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी गणले जात होते.  2019 च्या निवडणुकीच्या निकालाबद्दल अंदाज एवढे चुकण्याचं मुख्य कारण- मोदींनी कशाला अधिक महत्त्व दिले ते लक्षात घेण्यात आले नाही. त्यांनी पहिला मोठा प्रकल्प घेतला स्वच्छ भारत. ही व्होटबँक नव्हती. ही घोषणा न राहता त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. गेल्या पाच वर्षांत देश खूपच स्वच्छ झाला आहे. हे कोणीही पाहू शकतं. नंतर प्रत्येक खेड्यात, गावात वीजजोडणी, इथे फसवाफसवी नव्हती. या गावात वीज आहे हे म्हणायला निकष होता. गावातील कमीत कमी दहा टक्के खाजगी घरात वीजजोडणी झाली असेल, तरच त्या गावात वीज आली म्हणायचं.

नंतर घरोघर संडास असणं, पाच वर्षांत दहा-बारा कोटी खाजगी म्हणजे घरोघर संडास बांधण्यात आले. यामुळे स्वच्छताच नव्हे तर शारीरिक प्रकृती सुधारण्यात खूपच मदत होणार आहे, म्हणून यात सतत जाहिराती येत राहिल्या. स्वयंपाकघरात गॅस येणं तेवढंच महत्त्वाचं होतं. मी यादी देत बसत नाही, पण मोदींना इतकी मतं का मिळाली याला माझ्या दृष्टीने हीच कारणे आहेत. म्हणून कोट्यवधी गोरगरिबांचे आयुष्य सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून त्यांना दोन-चार वर्षांत शांततेचं नोबेल पारितोषिक मिळाल्यास कोणाला आश्चर्य वाटू नये. मी मोदीभक्त नाही, व्यक्तिपूजा ही मला अंधश्रद्धा वाटते. कोणी केलं यापेक्षा काय केलं, याला महत्त्व आहे. लालूप्रसाद यादव यांनी अनेक आर्थिक घोटाळे केले, पण त्यांच्या कारकिर्दीत आठ-दहा वर्षांत रेल्वेचे प्रवासी भाडे वाढले नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

सर्वोत्तम ठाकूर, मुंबई  


भाजपचेही पाय मातीचेच

दि. 10 ऑगस्टच्या साधना प्रतिसादमधील श्री. किशोर काकडे यांचे पत्र वाचनात आले. पत्रलेखकाने सदर पत्रातून अनेक अचंबित बाबींचे संदर्भ दिले आहेत. म्हातारी मेल्याचे दुख जरी नसले तरी पण काळ सोकावता कामा नये म्हणून हा पत्रप्रपंच. पत्रलेखकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की,
1) भारतात मुसलमान लोक धार्मिक दंगा करतात. पत्रलेखकाचे हे मत काहीअंशी ग्राह्य मानले तरी फक्त मुसलमान नाही तर सनातनी हिंदू लोकदेखील धार्मिक दंगा करतात. इतिहासात याचे असंख्य दाखले मिळतील. पत्रलेखकाने याचा शोध घ्यावा. हिंदू धर्म स्थापना आणि बुद्धभिक्षुकांची हत्या याचा काही संबंध आहे का? यावरदेखील विचार करावा. संघावर तीनवेळा बंदी का आली? गोध्रा हत्याकांड इत्यादींचा तथस्थपणे अभ्यास करावा. हिंदू धर्मातील दलितांचा नरसंहार- अनादर सनातनी हिंदूंनी केला.

2) देशाला पाद्री व मौलवींपेक्षा संत अधिक हवेत- पत्रलेखकाचे हे मत अचंबित करणारे आहे. पुरातन काळातील संत आणि वर्तमान आधुनिक काळातील संत यांचा पत्रलेखकाने फरक जाणून घ्यावा. राम-रहिम, आसाराम बापू आणि त्यांचा पुत्र, बाबा रामलाल, श्री. श्री. रविशंकर- ज्यांनी यमुना नदीच्या पात्रात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून यमुना नदीचे पात्र प्रदूषित केले होते. राष्ट्रीय हरित लवादाने पाच कोटीचा दंड ठोठावला तर तोही भरावयास नकार दिला. हे असले संत पत्रलेखकाला अभिप्रेत आहेत का? संपूर्ण आमटे परिवार, कोल्हे, बंग परिवार हे खरे संत.

3) अल्पसंख्यांकावर राग असायलाच हवा. कारण आजही त्यांचे धर्मपरिवर्तनाचे खेळ सुरूच आहेत- बहुसंख्य हिंदू धर्मांतर करत असतील तर हिंदू धर्मावर ही सणसणीत चपराक नाही का? धर्मांतर करणारे बहुसंख्य दलित असतात. हिंदू धर्मात असुरक्षित वाटून ते जर धर्मांतरे करत असतील तर तो दोष अल्पसंख्यांकांचा की हिंदू धर्मातील बुरसटलेल्या विचारप्रणालीचा, यावर आपण हिंदूंनी काही विचार करायला नको का?

4) काँग्रेसने देशात आणीबाणी लादली- पत्रलेखकाच्या या मताशी सहमती दर्शवतानाच नोटाबंदी ही एक प्रकारची आर्थिक आणीबाणी नव्हती का? मोदी काळात स्वायत्त संस्थांचे अवमूल्यन चालले आहे ते काय आणीबाणीपेक्षा कमी आहे का? माहिती अधिकार कायदा मोदी सरकारने पातळ केला. हे काय लोकशाहीचे लक्षण समजायचे का? आणीबाणीबाबत काँग्रेसला आणखी किती काळ झोडपणार?

5) रमेश पाध्येंचा मोदी कौतुकाचा लेख साधनाने छापावा, याबद्दल पत्रलेखक साधनाचे अभिनंदन करत आहेत. यावरूनच साधना सगळ्या (सदर पत्रलेखकाचा आवेश आणि आवेग पाहून साधनाने ते छापले) विचारांचा सन्मान करते असे पत्रलेखकाला वाटत नाही का? आणि शेवटी काँग्रेसने भ्रष्टाचार केला याविषयीची पत्रलेखकाची आगपाखड समजण्यासारखी असली तरी मोदी सरकारची कार्यपद्धती काय याचा विचार पत्रलेखकाने बहुधा केला नसावा.

-बाळकृष्ण शिंदे, पुणे   

Tags: 7 सप्टेंबर 2019 प्रतिसाद वाचक पत्रे 7 September 2019 readers opinion readers letter pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके