डिजिटल अर्काईव्ह

साधनेच्या संपादकांस जाहीर पत्र....

इंग्रजांच्या काळी चालू असलेला वसाहतवात इथे आजही चालू आहे हे आपण सांगितलेत. पूर्वी ‘परदेशी कारखानदार’ ग्रामीण जनतेचे शोषण करीत होते; आता कलकत्ता, कानपूर, दिल्ली, बंगलोर, मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद आदी शहरातील ‘देशी कारखानदार’ ते करीत आहेत असेही लिहिलेत. या अनुभवात थोडे अधिक डोकावून पाहिले पाहिजे. या देशी व देशांतर्गत धुमाकूळ घालणाऱ्या वसाहतवादात ज्यांनी शोषितांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत पुढाकार घ्यायचा ते पुढारलेले तथाकथित शिक्षित- तंत्रज्ञ यंत्रज्ञ,  संघटित कामगार हे भागीदार म्हणून समाविष्ट झाले नसल्याने शोषितांचा मुक्ति लढा अधिक बिकट झाला आहे हेही ध्यानात घ्यायला हवे.

आपण ‘साधना’ चा दिवाळी निमित्त ‘शेतीसमस्या विशेषांक’ काढून, वाचकांच्या भेटीला पाठवलात याबद्दल आपले अभिनंदन! दिवाळीच्या दिवसांत आम्हाला लाडू, करंज्या, चकल्या, कडबोळी, श्रीखंड, बासुंदी यांची सवय! समाजातल्या वरच्या थरात ही चंगळ, तर तळागाळाचा माणूस हे सारे पातळ स्वरूपात का होईना, अनुभवतोच! खाऊचे पुडे देण्याघेण्यात आम्हाला धन्यता वाटते. आम्हाला ‘लॉलिपाप’ कुणी दिले की मुलांसारखे आम्ही बेहद्द खूश! माणूस उत्सवप्रिय आहे, त्याला करमणूक हवीच; सतत सुतकी चेहरा करून बसावे काय? कष्टमय जीवनात आनंदाचे हलकेफुलके क्षण हा विरंगुळा आहे, असे म्हणून ह्या समाधानाच्या क्षणांच्या आधारे आम्ही वर्षांतील उरल्या कष्टमय जीवनाची भलावण करतो! ते तसेच राहणार असे मानतो, आणि मग प्रस्थापित व्यवस्था बदलण्याचा विचारच मुळी करीत नाही. अर्थात, हे सारे जे ‘बोलके’, ‘जाणते’ आहेत त्यांच्याकडून निर्माण होणाऱ्या वातावरणामुळे होते.

श्रमानंतरची करमणूक निकोप व जीवनात पुननिर्माणाचे स्रोत खुली करते. आम्ही भोगात दंग आहोत, विलास चालू आहेत तेव्हा आमची करमणूक विकृत व परिणामी आमचा विध्वंस करणारी आहे हे कुणी तरी हेरून, महत्वाच्या उपेक्षित प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम करायला पाहिजेच. ते साधनेद्वारा आपण केलेत म्हणून आपले पुन्हा अभिनंदन! असा अंक काढणे आजच्या परिस्थितीत धाडस आहे. आपल्या संपादकीयाच्या काही ओळी आपल्याला ‘शेती समस्या विशेषांक का?’ हे सांगण्यासाठी खर्ची घालाव्या लागल्या आहेत, ह्याचे हेच कारण आहे. आपला ‘प्रयत्न वाचकांना आवडेल’ अशी उमेद आपण बागळून आहात. वाचक काय प्रतिसाद शब्दांतून, कृतीतून देतात ते लक्षपूर्वक पाहायला हवे. आपण उल्लेखिलेल्या काही मुद्यांवर अधिक प्रखर व पूरक प्रकाश टाकण्याचा इथे प्रयत्न आहे.

इंग्रजांच्या काळी चालू असलेला वसाहतवात इथे आजही चालू आहे हे आपण सांगितलेत. पूर्वी ‘परदेशी कारखानदार’ ग्रामीण जनतेचे शोषण करीत होते; आता कलकत्ता, कानपूर, दिल्ली, बंगलोर, मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद आदी शहरातील ‘देशी कारखानदार’ ते करीत आहेत असेही लिहिलेत. या अनुभवात थोडे अधिक डोकावून पाहिले पाहिजे. या देशी व देशांतर्गत धुमाकूळ घालणाऱ्या वसाहतवादात ज्यांनी शोषितांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत पुढाकार घ्यायचा ते पुढारलेले तथाकथित शिक्षित- तंत्रज्ञ यंत्रज्ञ-, संघटित कामगार हे भागीदार म्हणून समाविष्ट झाले नसल्याने शोषितांचा मुक्ति लढा अधिक बिकट झाला आहे हेही ध्यानात घ्यायला हवे. खाटिकखान्यात जाणारी गुरे दुष्काळाची बळी आहेत, तर झोपडपट्टीत भरती होणारे ग्रामीण भागातील भारतीय नागरिक देशाच्या आर्थिक सामाजिक धोरणांचे बळी आहेत. या धोरणामागे सरकार, प्रशासन व्यवस्थेतील कर्मचारी, संघटित कामगार वगैरे उभे आहेत.

मोठे उद्योग मालक व दलाल यांच्याशी त्यांची साठगाठ आहे. ती हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक घडली असो, नसो. परिणाम तितकेच भयानक. हे सारे ध्यानात घेऊन शोषितांनी निवडणुकीत मतदान करून शोषण मुक्तीचा कार्यक्रम हाती घेणारे सरकार सत्तेवर आणायला हवे आहे. आजचा भारतीय वसाहतवादी प्रभावाखालील समाज हा त्याच गुणधर्माच्या इतर विकसित देशातील समाजांशी संगनमत करून आहे हेही ध्यानात घ्यायला पाहिजे. कापूस, गहू, साखर, चैनीच्या वस्तू यांच्या आयातीचे हेच कारण. प्रस्थापित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेत मिळालेले राजकीय स्वातंत्र्य दलितांच्या हिताचे होणार नाही असे जे बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते; ते उच्चवर्णियांच्या हाती जाईल असे जे भय होते; तसेच हे स्वातंत्र्य शोषणकर्त्यांच्या हाती जाईल असे पुष्कळांना वाटत होते; तसेच झाले. दलितांची, शोषितांची, उपेक्षितांची ससेहोलपट आज होते आहे ती त्यांच्या हिताविरुद्धच्या कारणांच्या चढाईमुळेच. तेव्हा रिपब्लिकन पक्ष हा दलितांचा व शोषितांचा पक्ष व्हावा असे जे बाबासाहेबांना वाटत होते त्याचे हे मर्म आहे. हे या संदर्भात जनतेच्या पुढे परिणामकारकपणे मांडले जायले हवे असे मला वाटते.

सर्वश्री विलासराव साळुंके, चाफळकर बंधू, देवळ यांच्या कार्याचा आपण विधायक कार्य म्हणून उल्लेख केला आहेत. सरकारी योजनांतील सद्हेतू, मोठ्या प्रमाणावरची धन साधने वापरताना तपशिलाकडे काळजीपूर्वक न पाहिल्याने कसे विकल होतात, ह्याचा तपशील देऊन ते आपण सोदाहरण दाखवून दिले आहे. संशोधन महाराष्ट्रात त्याची फळे गुजराथेत! त्याने काही बिघडू नये, पण गुजरात शेंगदाण्याचे तेल महाराष्ट्राला विकत देताना या योगदानाची आठवण ठेवत नाही. आपल्याजवळ जमा झालेले शहाणपण पुष्कळ आहे, मग ते अनुभवातून आलेले असो वा संशोधनातून, पण त्याचा शहाणपणाने उपयोग करण्यात आम्ही कसे कमी पडतो हे आपल्या लेखातून खूपच चांगले ध्यानात येते. पाणी पंचायत, म्हैसाळ प्रयोग, आदी प्रयोगांच्या नेत्यांचे शेतकरी शासनाने दोन्ही हात पसरून स्वागत करावे असे आपण म्हणता. सध्याचे शासन शेतीचे हित जपणारे वा जोपासणारे आहे, हे म्हणणे अनुभवाच्या आधारावर टिकणारे नाही. शेतीवर राबणाऱ्या छोट्या जिरायत शेतकऱ्याच्या व शेतमजूर आणि बलुतेदार यांच्या दिशाभुलीमुळे निवडून आल्यावर शेतीच्या हितापेक्षा आपले स्वतःचे व त्यांच्यासारख्यांचे हित पाहणारे पोसणारे हे सरकार किंवा ही सरकारे आहेत. शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेला तो शेतकरी हे खरे नाही! आजचे शेतकऱ्यांचे म्हणविणारे पुढारी हाडाने शेतकरी राहिलेलेच नाहीत. त्यांचे लक्ष शेती, शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार ह्यांच्याकडे नसून भलतीकडेच आहे. असे नसते तर शेतीला पाणी देणारी वीज, जाहिराती, रोषणाई, एअर कन्डिशन्ड घरे कचेऱ्या, पंचतारांकित हॉटेले यांना अग्रक्रम मिळतोच ना? विजेच्या वापरातील आग्रक्रमाबद्दल आपण लाख रोख ठोक सवाल विचाराल सरकार आणि सरकारी कारभार त्याला भीक घालीत नाही, बघत नाही.

आजारी कारखाने सार्वजनिक क्षेत्रात घेऊन चालते, नफा मिळवते करून परत मालकांना परत करणारे सरकार, शेती का चालवायला घेत नाहीत? चालवून का दाखवीत नाही? याचे उत्तर याच्यातून मिळते. चितळे बंधूंची कर्जे बुडत नाहीत पण सरकार आणि सहकारी संस्था यांच्या कर्ज देण्याच्या कर्ज वापरायला मार्गदर्शन करण्याच्या पद्धतीमूळे आणि पुढाऱ्यांच्या फसव्या सल्ल्यामुळे सरकारी व त्यासारखी कर्जे बुडतात आणि त्याने शेतकरी बदनाम झाला आहे, तो सतत कर्जबाजारी राहतो आहे; कर्जात जन्मतो आहे; मरतो आहे! देवल, साळुंखे, चाफळकर, चितळे आणि त्यांच्यासारखे उद्योगी संघटक नागरिक यांची जिद्द, तळमळ आणि सरकारपाशी सामान्यतः जी साधनसामग्री व अधिकार असतात ते यांचा विकासाच्या वेगाशी मेळ घालणारी सरकारे या देशात आणि दिल्लीत असायला हवी आहेत. साऱ्या पंडिती चर्चांचा अहवालांचा पंचवार्षिक योजनांचा उल्लेख करून आपण झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्याचा खटाटोप करण्याचे आपल्या मनात आले असूनही, आपण सोडून दिलेत. सरकारवर अवलंबून राहू नये हे खरे, पण ते लोक विकासाच्या वाटेत आडवे आले तर फिरवून घेण्यात किंवा तसे सरकार घडविण्याचा प्रयत्न करण्यात काहीच वावगे नाही. ते व्हायला हवे.

शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, बलुतेदार, कारागिरांना त्यांचे शत्रू कोण, मित्र कोण हे समजावून द्यायला पाहिजे. ह्या शक्ती उपचार आणल्या पाहिजेत. आणि हे काम झंजावाताच्या झपाट्याने गेल्या दोनतीन वर्षात ज्या संघटनेने केले त्या शेतकरी संघटनेचा व तिचे नेते. श्री. शरद जोशी यांचा आपल्या अग्रलेखातील अनुल्लेख मात्र मला नीट उमगला नाही. ज्याचा ‘अज्ञानी... स्वतःचे सामर्थ्य न ओळखणारा, जातीपातीच्य विचाराने लुळा, अपंग बनलेला शेतकरी भाऊ असा आपण उल्लेख केला, जो असंघटित असल्याने उपेक्षित राहिला असे आपल्याला वाटते, तो खडबडून जागा झाला आणि ज्याने 23 जणांचे बलिदान दिले ते शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली! शेतकरी आज उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतमालास मिळावा अशी मागणी करतो आहे. तुम्हीही त्याच शब्दात बोलला असता तर बरे झाले असते ‘भरघोस’ प्रमाणात भाव वाढवून द्या असे म्हणण्यापेक्षा शेतकरी संघटनेचा शब्द प्रयोग ठोस वाटतो! शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत योग्य ते स्थान मिळेतो शेतीसमस्या संपणार नाहीत. साऱ्या ग्रामीण जीवनाचीच पुनर्रचना व्हायला हवी आहे. शेतीला पूरक असे आपण सुचविलेले व्यवसाय प्रक्रिया करणारे कारखाने तिथे हवे आहेत. हा देश शेती आणि त्यावर आधारित उद्योग व सध्याचे हलके उद्योग समन्वयातून घडावा.

आपण साधनेच्या दिवाळी अंकाद्वारा शेतीसमस्यांकडे जे लक्ष वेधलेत व जे मर्म भेदक विवेचन केलेत व सम्यक दृष्टी देण्याचा यत्न केलात याबद्दल आभार! 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक ( 1331 लेख )

साधना साप्ताहिकाचे वाचक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी