डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • पूल
  • 'डॉ. मंडलिकांचे पत्र महत्त्वाचे'
  • खायचे आणि दाखवायचे दात
  • काळजाला भिडणारी दैनंदिनी
  • निराशाजनक पुस्तक
  • चिंतन उद्बोधकारक
  • मराठवाडा विद्यापीठ नामांतर
  • झोतसंबंधीची भूमिका
  • 'साधना' आकर्षकही हवा
  • खुलासा

पूल 

दोन दरडींना जोडणारा पूल 
फार भक्कम असावा लागतो
बाजूच्या पहाडासारखा पक्का…

धडधडत जावू द्यायची असतात 
शेकडो वाहने वरून 
आणि तरीही
खचायचे नसते जरासुद्धा
दोन जगं जोडायची असतात ना त्याला!

दूरवर खळखळा वहात जाणारी नदी 
तिला ठेवायचे असते दूरच

- श्यामा केने. 

'डॉ. मंडलिकांचे पत्र महत्त्वाचे' 

दहा जूनच्या 'साधनेच्या' अंकातील डॉ. मंडलिकांनी जनता पक्ष महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षांना-एसेमना जे अनावृत पत्र लिहिलंय ते फार महत्त्वाचं, विचार करायला लावणारं, एवढंच नव्हे तर व्यथित करणारं आहे. डॉ. मंडलिक यांनी आणीबाणीत थोर कामगिरी बजावली आहे. जनता पक्षाचे बांधणीत त्यांनी खूप परिश्रम घेतलेत. त्यांना एसेमना लिहिण्याचा अधिकार जरूर आहे. माझ्यासारख्या सामान्यानं ऋषितुल्य व थोर माणसाला तसं पत्र लिहिण्याचं धाडस अवाजवी आहे पण त्या व्यथा डॉक्टर साहेबांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केल्याचं वाचून बरं वाटलं. त्याच व्यथा माझ्या आहेत, डॉक्टरसाहेबांच्या पत्राची उपेक्षा एसेम करणार नाहीत अशी उमेद वाटते. शेवटी लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, संपूर्ण क्रांती हे शब्द हवेतच विरणार असतील तर जनता पक्ष सत्तेवर असला काय किंवा त्याची जागा हुकुमशाही पक्षानं घेतली काय, दोन्ही सारखेच. पक्ष श्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेतली तरच देशाला काही उज्ज्वल भविष्याची आशा राहील.
- वि. ना. शहा, वालचंदनगर. 

खायचे आणि दाखवायचे दात 

महाराष्ट्र जनता पार्टीचे अधिवेशन पुणे येथे प्रथमच भरले. येथे खासदार, आमदार म. पा. नगरसेवक, नगर परिषदांचे सदस्य, तालुका पंचायतचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व चिटणीस, शिवाय विभागांचे (वार्ड) अध्यक्ष असे पुढारी निमंत्रित होते. थोडक्यात हे अधिवेशन पुढाऱ्यांचेच भरले होते असे म्हणायला काहीच हरकत नाही. या मान्यवर नेत्यांकडून पक्ष बांधणी, दलितांचे प्रश्न व इतर ज्वलंत प्रश्नावर चांगले मार्गदर्शन होईल असे वाटले होते परंतु त्याऐवजी येथे हाणामार्‍यांचा आदर्श पहावयास मिळाला! 

आणीबाणीच्या काळात विचार स्वातंत्र, लेखणी स्वातंत्र याविरुद्ध लढत होतो. विचारांची देवघेव गुप्त पत्रिकांमार्फत घराघरातून पोचवली जात होती. आताच्या मुक्त स्वातंत्र्यात 'झोत' व 'संघाची ढोंगबाजी' वरून अशोभनीय गुद्दागुद्दी व्हावी. पत्रकार व पुढार्‍यांना चोप देणे योग्य आहे काय? म्हणजेच परत विचार स्वातंत्र बंद. येथे जनसंघीयांनी संघाच्या लोकांना तैनाती फौज म्हणून वापरली असे सिद्धच होत आहे. जर संघाचा व जनसंघाचा काहीच संबंध नाही म्हणून हे लोक वरकरणी लोकांना सांगतात. संघ हा राजकारणापासून पूर्ण अलिप्त आहे असा टाहो फोडतात मग हे काय घडले? याचाच अर्थ यांचे खायचे दात वेगळेच आहेत ते यांच्या ढोंगबाजीवरून सिद्धच झाले आहे. 

हुकुमशाहीविरुद्ध लोकांनी विश्वासाने यांच्यावर मतांचा वर्षाव केला. पूज्य जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व एकत्र आलो, याचादेखील यांना विसर पडू लागला आहे. ज्या पूज्य जयप्रकाशजींनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा आदेश दिला ते पण हे लोक सत्तेवर आल्यावर सोयिस्कररीत्या विसरले असे खेदाने म्हणावे लागत आहे. पूज्य गांधींच्या समाधीजवळची शपथ घेणे हे सुद्धा शुद्ध ढोंगच आहे. आता त्यांचे सोन्याचे गिलीट उडून त्यांचे पितळ उघडे पडत आहे. या अधिवेशनात सामान्य कार्यकर्ते होते की नाही याची शंकाच आहे. ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी व जिवंत ठेवण्यासाठी धडपड केली त्यांना अधिवेशनाला  बंदी? जवळ जवळ या पुढार्‍यांनी त्यांना नवीन राजकीय दलित वर्गात ढकलले, असे खेदाने म्हणावे लागत आहे. आता पुढार्‍यांत व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये एक दरीच निर्माण होत आहे. यांना आझमगढचा खासदार मुख्यमंत्री चालतो पण बापू काळदाते (खासदार) विरोधी नेता म्हणून चालत नाही. श्री नारायण तावडे बंडखोर म्हणून बाहेर काढतात तर भिवंडीचा निवडून आलेला आमदार यांच्या पक्षात फिट बसतो. हे पक्षातील पुढारी मन मानेल असाच कारभार करताहेत असे खेदाने म्हणावे लागत आहे.
- बाळकृष्ण कदम, मुंबई 58. 

काळजाला भिडणारी दैनंदिनी 

दि. 3 जूनची व दि. 10 जूनची 'साधना' हे दोन्हीही अंक मी वाचले. बेडेकर गुरुजी, यांची दैनंदिनी काळजाला भिडणारी वाटली. श्री ल. के. देशपांडे या वाचक बंधूचे यातील विचार समर्पक वाटतात, असो.

थोर सत्पुरुष श्री बाबा आमटे यांचे चिंतन, 'नव मनुष्यायन : एक' स्वरूपात दि. 17 जूनच्या अंकात मी वाचले. 'दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर'च्या ओळी मला हृदयंगम वाटल्या, अत्यंत थोडक्या आणि मोजक्या शब्दांत संपूर्ण देशांचे सद्य:स्थितीत जे चित्रण झाले आहे ते यथार्थ आहे. 'नव मनुष्यायन' हे उपकारक ठरेल. एवढेच नव्हे तर सध्याचा मरगळलेल्या समाज अवस्थेमध्ये ही एक संजीवनी मात्रा ठरण्याचीच शक्यता आहे.

बाबा आमटे यांचे चिंतन श्री रमेश गुप्ता हे उत्कृष्टपणाने करीत आहेत यामध्ये का वाटत नाही.

राष्ट्रभुषण बाबा आमटे यांच्यासारख्या, थोर सत्पुरुषांचे आत्मचिंतन हे वाया जाणार नाही याची खात्री वाटते.

बाबांचा हा 'आतला आवाज, 'साधना' साप्ताहिकाद्वारा माय मराठीच्या लेकरांना मुक्तपणाने आणि निर्भयपणाने ऐकू द्या' हीच माझी विनंती. हुकुमशाही, जबरदस्ती हीही परवडली परंतु 'जैसे तैसे' चा सध्याचा मठ्ठपणा आणि जडत्व हे नष्ट होऊ दे! 'संपूर्ण क्रांती' हे थोतांड ठरू नये. अधिक काय लिहावे?
- पुरूषोत्तम तळेगावकर, औरंगाबाद. 

निराशाजनक पुस्तक 

आचार्य दादा धर्माधिकारी यांचे जन-बोध प्रकाशनतर्फे 5 जून 1978 रोजी 'संपूर्ण-क्रांती' या नावाचे एक पुस्तक प्रकाशीत झाले आहे. 5 जून 1974 रोजी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्वाखाली बिहार आदी राज्यांत जनजागरणाचा जो प्रयत्न झाला त्याला 'संपूर्ण-क्रांती' या विचाराने प्रभावित केले होते. त्याचेच पुढे पर्यवसान दिल्लीचे सत्तास्थान जनता पक्षाच्या हातात येण्यात झाले. त्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. एकूण चार वर्षे झाली. या चार वर्षांत 'संपूर्ण-क्रांती!' या आरोळीचा वापर मधूनमधून सारखा होत असतो. परंतु समाजजीवनास व राजसत्तेस या 'संपूर्ण-क्रांती'च्या तत्त्वज्ञानाची काहीही ओळख झालेली दिसत नाही. त्यामुळे दादा धर्माधिकारी यांच्या या पुस्तकामध्ये संपूर्ण-क्रांतीचे तत्त्वज्ञान व व्यवहारी मार्ग यासंबंधी विवेचन असेल अगर भारतातील संपूर्ण-क्रांतीच्या प्रयोगाचे विश्लेषण असेल अशी अपेक्षा होती. परंतु हे पुस्तक वाचल्यावर या बाबतीत संपूर्ण निराशा झाली. संपूर्ण क्रांतीची आधारशीला, मानवी विकासाचा अर्थ व आत्मभान अजिंक्यच असतो अशी तीन प्रकरणे या पुस्तकात आहेत. वैचारिक निबंधात प्रत्येक प्रकरणाचा एक मध्यवर्ती विचार असतो, व तो विचार तर्कशुद्धरीतीने हळूहळू पायऱ्या पायर्‍यांनी विकसित केलेला असतो आणि ही सर्व प्रकरणे मूळ विषयाशी तर्कबंधांनी जोडलेली असतात. परंतु या पुस्तकातील विवेचनात अशी तर्काची शिस्त पाळलेली नाही, त्यामुळे संपूर्ण क्रांतीचे विचार समजावून घेण्यास या पुस्तकाचा काहीही उपयोग नाही.

या पुस्तकातील काही सुटे सुटे विचार व काही वाक्ये विचार-गर्भ आहेत. पुष्कळ इंग्रजी पुस्तकांचा लेखकांची नावे देऊन उल्लेख केला आहे, त्यांचा उपयोग अभ्यासू वाचकास स्वतंत्रपणे वाचनास होऊ शकेल. या पुस्तकाचे मूल्य कमी आहे. एवढेच याचे गुण आहेत. 
- ह. श्री. परांजपे, चेंदणी, ठाणे. 

चिंतन उद्बोधकारक 

दि. 17 जूनचा साधनेचा अंक पाहिला. नव मनुष्यायनमधले दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर हे बाबा आमटे यांचे चिंतन वाचले. भारावल्यागत झाले. मोजक्या शब्दांत, परखड शब्दांत बाबांनी प्रचंड आशय सांगितला आहे. एकेक ओळ फटकार्‍यासारखी मनावर आघात करते.

श्री. पु. ल. देशपांडे खर्‍या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लेखक आहेत. लोकांचे-समूहांचे मनीचे भाव उमजून घेऊन ते व्यक्त करणे त्यांनाच जमते. दादा धर्माधिकारी यांच्याविषयी साधनेत त्यांनी लिहिलेला लेख वाचून एवढेच म्हणावेसे वाटते.
- कृ. द. खडपे, सांगली.  

मराठवाडा विद्यापीठ नामांतर 

मागच्या काही महिन्यांपूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या नावाचा प्रश्न महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला होता. औरंगाबादपासून दिल्लीपर्यंत या विद्यापीठाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्यावे अशा घोषणा निनादल्या.

विधानसभा निवडणुका झाल्या आणि या प्रश्नाची हवाच निघून गेलेली दिसते. या निवडणुकीत दलित पॅंथरचे कुठे रेड्डी कॉंग्रेसशी तर कुठे इंदिरा काँग्रेसशी सलगी केली होती. निवडणुका झाल्या. राज्यात तिरपुडे-दादांचे सरकार आले. तिरपुडे यांनी, मागे या मागणीला पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर नागपूरहून परतत असताना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला परतीचे भाडेसुद्धा दिल्याचे बोलले जाते. आज मंत्रिमंडळात तिरपुडे आहेत. ते ही मागणी मांडत का नाहीत? विधान सभेत हा प्रश्न येत नाही. कारण काय? सध्या या मागणीचे कट्टर पुरस्कर्ते गप्पगार बसलेले दिसतात.

डॉ. बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापिठाला मिळणे हा मराठवाड्यात राहणार्‍या माणसाचा गौरव आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. ही मागणी रेटण्यासाठी पुरोगामी शक्तींनी संघटित झाले पाहिजे. विशेषतः दलित युवक आघाडी, युवा जनता, युक्रांद, सेवा दल या व इतर संघटनांनी एकत्र येऊन कार्यक्रम ठरवला पाहिजे. 

सत्तेत असलेले हितसंबंधीय लोक जसा या मागणीकडे कानाडोळा करीत आहेत तसेच जनता पक्षातील काही लोकही करीत आहेत. काही लोकांनी मात्र यात मजा मारून घेतली. प्रश्न सुटलेला नाही. म्हणून मराठवाड्यातील युवकांनी पुन्हा संघटित होऊन या मागणीसाठी जोर धरला पाहिजे.
- अमर हबीब, अंबाजोगाई. 

झोतसंबंधीची भूमिका 

17 जूनच्या अंकात झोत प्रकरणासंबंधी काही वाचावयास मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. 24 जूनच्या अंकाने ही कसर पूर्णपणे भरून काढली. संपूर्ण अंक दर्जेदार झाला आहे. श्री लीलाधर हेगडे यांचा 'पुन्हा प्रपंच' फारच मार्मिक झाला आहे. हे सदर एका आड एक अंकात प्रसिद्ध करता येणार नाही का?
- नीतीन घोलप, मुंबई. 

'साधना' आकर्षकही हवा 

साधना हे विशिष्ट तत्त्वज्ञानाला, ध्येयवादाला वाहिलेले मासिक आहे याची मला जाणीव आहे. सध्याच्या काळाला अनुसरून ते थोडे अधिक ललित करण्याचा प्रयत्न व्हावा, असे सुचवावेसे वाटते.

अर्थात लालित्याकरता वा गावगप्पांसाठीच असणाऱ्या साप्ताहिकांप्रमाणे साधनेने होऊ नये हे मान्य, पण ठराविक परिघाबाहेर प्रसार आणि प्रचार होण्याकरता थोडे अधिक लालित्य साधनेत उतरावे असे वाटते.
- दा. चि. ठाकूर, भिलवाडा.

खुलासा 

साधनेच्या 17 जूनच्या अंकात 'जे रूट' विषयी प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया कुमार विकास यांनी पाठवली होती. पत्राखाली डॉ. श्री. वि. शास्त्री असे चुकून प्रसिद्ध झाले. 

Tags: बाळकृष्ण कदम नारायण तावडे बापू काळदाते आझमगढ वि. ना. शहा डॉ. मांडलिक Balkrishna Kadam Narayan Tawade Bapu Kaldate Azamgarh V. N. Shah #Dr. Mandlik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके