डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘गेली एकवीस वर्षे’ भांडवलशाहीच्या आक्रमणातील याच अटळतेबद्दल आहे. मात्र त्यात भांडवलशाहीच्या गौरवीकरणाचा भाग नाही तर या प्रक्रियेतून होणारी घुसमट, मुस्कटदाबी, बधिरता आणि समाजविन्मुखता यांविषयीची जाणीव आहे. ‘गेली एकवीस वर्षे’ फ्रस्ट्रेशनपेक्षाही फ्रस्ट्रेट करणाऱ्या प्रक्रियांबद्दल आहे. भांडवली विळख्यात सापडलेल्या समाजात जगताना संवेदनशील व्यक्तीला आतपर्यंत कापत जाणाऱ्या निराशाजनक बाबींची प्रगाढ अनुभूती देणारं आहे. निराशेच्या स्रोतांबद्दल खडबडून जागं करू पाहणारं आहे, निराशेचं गौरवीकरण करणारं नाही! 

त्या नाटकात निराशेचे गौरवीकरण नाही!

13 ऑगस्टच्या अंकातील ‘हिरवे पान’ वाचले. वाचून गंमत वाटली. वीसेक वर्षांपूर्वी स.प.महाविद्यालयात शिकत असतानाचं कलामंडळ, वाङ्‌मय मंडळातील वातावरण आठवलं. महाविद्यालयीन युवकांच्या जागेत आपण शिंग मोडून घुसावं का असंही मनात आलं. तरीही प्रतिसाद द्यावासा वाटला, कारण सार्वजनिक चर्चाविश्वातील एखादी भूमिका पटली नसेल तर त्याविषयीची आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे. एक अभ्यासक म्हणून ते आपलं कर्तव्यही आहे या धारणेने हा प्रतिसाद! 

कोणत्याच कलाकृतीकडे पाहण्याचे एकच परिप्रेक्ष्य नसते. त्यामुळे माझेच परिप्रेक्ष्य योग्य असा दावा नाही, तरीही महाविद्यालयीन मंडळातील चुरशीच्या थोडेतरी पलीकडे जाऊन कलाकृतींचं आकलन केलं जावं हा आग्रह जरूर आहे.  ‘सीनिअर्सचा दबदबा’ आणि ‘आपणही कोणीतरी आहोत’ हे दाखवण्याची ज्युनिअर्सची ऊर्मी यातून निर्माण झालेलं चुरशीचं गंमतशीर वातावरण सर्वच महाविद्यालयांतील मंडळांमध्ये असतं. त्या चुरशीत उतरलेले अनेक खंदे वीर आणि वीरांगना महाविद्यालयीन ‘जीवन’ संपलं की पोटापाण्याच्या मागे लागतात ही ‘नाट्य’ किंवा ‘वाङ्‌मया’ची सेवा करणाऱ्यांची करुण शोकांतिका आहे, पण हे वास्तव आहे. 

बाहेरचं जग अशी ‘सेवा’ किंवा ‘साधना’ करण्याची उसंत प्रत्येकाला देतंच असं नाही, आणि मग आपल्यालाही त्या त्या वयात ते ठीक होते असं वाटू लागतं. शहाण्यासारखे आपण पोटापाण्याला लागतो. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून स्वीकारलेल्या धारणा-मूल्यं आणि निष्ठेतून स्वीकारलेल्या बाबी यांतील फरकही इथे स्पष्ट होऊ लागतो. हे सर्व ‘प्रवचन’ एवढ्यासाठी की निव्वळ तत्कालीन चुरशीच्या चौकटीत आपल्या समवयस्कांचे मूल्यमापन होऊ नये!

आता ‘गेली एकवीस वर्षे’विषयी! तरुण मिलिंद किशोरी ऊर्फ तरुण कि.मी. या आडनाव नसलेल्या शहरी मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या मुलाची आणि निव्वळ त्याच्या फ्रस्ट्रेशनची ही कहाणी नव्हे. परिवर्तनवाद्यांच्या पुढच्या पिढीचं हे फ्रस्ट्रेशन आहे. ‘बदल हवा’ म्हणणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला कमी-अधिक प्रमाणात आहे. ‘विचार बदला, म्हणजे जग बदलेल’ असे एच.आर.मध्ये एम.बी.ए. करणाऱ्याने किंवा आस्था चॅनेलवरून प्रवचन देणाऱ्याने म्हणणे ठीक आहे, पण सामाजिक बदलांसाठी सतत कार्यरत असणाऱ्याने ते म्हणावे अशी परिस्थिती नाही. अथक संघर्ष करून रायगडधील रिलायन्सचा सेझ रद्द होतो आणि त्याच्याच जोडीला जवळच्याच भागात नवा सेझ होणार असल्याची बातमी येते. सरकार वचन देऊन पाळत नाही. 

मुंबईतील बिल्डरविरुद्धचे संघर्ष असोत, विस्थापितांचे संघर्ष असो, व्यवस्था दाद लागू देत नाही. हे सर्व ‘फ्रस्टे्रट’ करणारंच असतं. तरीही अनेकजण फ्रस्ट्रेट न होता काम करत राहतात. ते सकारात्मक विचारांमुळे नव्हे तर परिवर्तनाविषयी असलेल्या निष्ठेमुळे! सर्वत्र प्रचंड ऊर्जा भरून राहिली आहे म्हणून नव्हे तर बाहेर ऊर्जा सापडत नसली तरी ती आत शोधली पाहिजे या जीवननिष्ठेमुळे! अशी जीवननिष्ठा विकसित करण्याचे प्रयत्न परिवर्तनाची कास धरणाऱ्या प्रत्येकालाच करावे लागतील. मात्र त्याचबरोबर परिस्थितीचे नेमके आकलन हवे. नवभांडवली अर्थकारणाच्या संदर्भात जे जे चाललंय ते बरं चाललंय असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

‘गेली एकवीस वर्षे’च्या सुरुवातीस एक वाक्य आहे, ‘परिवर्तन वगैरे चे गव्हेराचे टी शर्टस घालणाऱ्यांचं काम!’ त्याच्या जोडीला आता फार तर अण्णांच्या आंदोलनात कँडललाइट मार्च काढणाऱ्यांना जोडता येईल. मात्र जिथे परिवर्तनाची आणि त्यातील आपल्या भूमिकेची समज एवढी मर्यादित आहे तिथे उमेदीपेक्षा आव्हान मोठं आहे म्हणूनच तरुणाचं फ्रस्टे्रशनही शहरी मध्यमवर्गीय युवकाचे फ्रस्ट्रेशन न उरता ते परिवर्तनवाद्यांच्या पुढच्या पिढीचं फ्रस्ट्रेशन ठरतं.

1960 आणि 70 च्या दशकातील चळवळींच्या रेट्यांनी सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबसंस्थेत सुधारणा केली, मात्र समाजातील विषमता, शोषण, जमातींमधील तेढ आणि हिंसा होत्या तशाच राहिल्या. किंबहुना उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या कुशीत त्या अधिकाधिक तीव्र आणि अणकुचीदार होत जात असल्याचं दिसतं. त्यांचा सामना कसा करायचा हा पेच आहे. 

व्यवस्थेशी सामना करण्यासाठी वापरली गेलेली तंत्रं आणि डावपेच वेगाने ‘आऊट डेटेड’ ठरत आहेत. आणखी नवं काय शोधायचं या कठीण प्रश्नाचं समाधानकारक उत्तर काही सापडत नाही. ‘गेली एकवीस वर्षे’मध्ये तरुण आणि तरुणाची भूमिका पार पाडणारा कलाकार या दुहेरी भूमिका पार पाडताना ‘आम्ही आता काही केलं तरी तुम्ही म्हणणार, यात नवं काय’ असं जे वाक्य आहे ते हीच खंत प्रकट करणारं आहे. आम्ही नवं काही शोधू शकत नाही आणि ते नवं म्हणून सापडतं ते कुचकामी असल्याचंही त्याच्या जन्माच्या बरोबरीने प्रत्ययाला येतं. 

सामाजिक पातळीवर ही कुंठितावस्था उत्तर औद्योगिक भांडवलशाहीने चालना दिलेल्या सामाजिक-आर्थिक प्रक्रियेमुळे येते तर वैचारिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक कॅपिटॅलिझमचा विळखा मठ्ठपणा आणि बधिरता पदरी बांधतो. ‘गेली एकवीस वर्षे’मधला तरुण आपण इंटरनेटवर पोर्नोग्राफिक साईटस्‌ बघतो हे सर्वांना समजेल म्हणून भयग्रस्त होतो आणि ‘रोडीज्‌’मध्ये जाणे हा त्याला या भयगंडातून बाहेर पडण्याचा मार्ग वाटतो. हाच इलेक्ट्रॉनिक्स कॅपिटॉलिझमचा विळखा आहे. हा विळखा एवढा जीवघेणा आहे की त्यात संवेदनशील, विचारी, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्याचा मृत्यू निश्चित आहे. 

नाटकाच्या शेवटी हाताची  घडी घालून मंद स्मित करत थंडपणे उभ्या असलेल्या कर्तबगार यशस्वी पुरुषात झालेलं तरुणचं रूपांतर हे भांडवली व्यवस्थेच्या यशस्वी घोडदौडीचंच चिन्ह आहे. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर जगभरात भांडवलशाहीच्या सामर्थ्याचे गोडवे गाणारी मांडणी अनेकांनी केली. भांडवलशाही ही एकमेव आणि अपरिहार्य व्यवस्था आहे आणि तिच्याच पायी सर्व सुख आहे असे टाहो वारंवार फोडले गेले आणि आजही जात आहेत. या सर्व मांडणीचा आशय भांडवलशाहीच्या गौरवीकरणाचाच असतो.

‘गेली एकवीस वर्षे’ भांडवलशाहीच्या आक्रमणातील याच अटळतेबद्दल आहे. मात्र त्यात भांडवलशाहीच्या गौरवीकरणाचा भाग नाही तर या प्रक्रियेतून होणारी घुसमट, मुस्कटदाबी, बधिरता आणि समाजविन्मुखता यांविषयीची जाणीव आहे. ‘गेली एकवीस वर्षे’ फ्रस्ट्रेशनपेक्षाही फ्रस्ट्रेट करणाऱ्या प्रक्रियांबद्दल आहे. भांडवली विळख्यात सापडलेल्या समाजात जगताना संवेदनशील व्यक्तीला आतपर्यंत कापत जाणाऱ्या निराशाजनक बाबींची प्रगाढ अनुभूती देणारं आहे. निराशेच्या स्रोतांबद्दल खडबडून जागं करू पाहणारं आहे, निराशेचं गौरवीकरण करणारं नाही! 

चैत्रा रेडकर, मुंबई 

----

अनाकलनीय वाटणारे व्यक्तिमत्त्व शब्दांत पकडण्याची ताकद... 

बाबा आमटे यांच्यावर सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेला लेख वाचला आणि राहवेना म्हणून द्वादशीवारांना फोन केला, बाबांमधला माणूस किती मोठा होता हे याशिवाय वेगळ्या शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. अतिशय जवळ असणाऱ्या माणसालाही अनाकलनीय वाटणारे हे व्यक्तिमत्त्व, त्याला शब्दांत पकडण्याची ताकद या लेखात आहे. मन भारून टाकणारा, ताईंच्या कर्तृत्वालाही तितकेच महत्त्व देणारा हा लेख अनेकांना आवडला आहे. मला खूप खूप लोकांनी हे फोन करून कळवले. 

भारत जोडो, नर्मदा बचाओमध्ये काम केल्याने मला बाबा-ताईंचा सहवास लाभला, आयुष्य बदलून गेले, जीवनाला जगण्याचा अर्थ मिळाला. उमेद वाढली, स्वत:कडे वेगळ्याच नजरेने बघायला शिकलो. मी बाबांना प्रत्यक्ष ओळखत होतो, त्यामुळे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे लिखाण आहे. पण मला फोन करणाऱ्या अनेक जणांनी बाबा-ताईंना प्रत्यक्ष पाहिले वा भेटले नव्हते. अशा लोकांनी हा लेख आवडल्याचे, बाबांविषयी नवीन काहीतरी... पण इतके वेगळे वाचल्याचे आणि त्याने ते भारावून गेल्याचे स्वत: फोन करून कळवले.

ही द्वादशीवारांच्या शब्दांतली जादू. ‘ज्वाला आणि फुले’सारखीच पुन्हा अनुभवायला मिळाली. पण आपणांसारख्यांच्या सहवासात येण्याची राहण्याची संधी ‘आनंदवन’मुळे मिळाली. आत्ताच्या नवीन युवकांमध्येही आनंदवनविषयी हीच भावना आहे. 

‘बदल’ हाच जीवनाचा गाभा असताना, काही दशके आनंदवन सातत्याने स्फूर्तिस्थान राहिले आहे, हे या घाणीने बरबटलेल्या समाजामध्ये प्रकर्षाने जाणवते. मला व अनेकांना हा लेख अतिशय आवडला. आम्हांला पुन्हा बाबांच्या सान्निध्यात असल्याचे जाणवले. मी या सर्वांच्या वतीने आभार मानतोय!

संजय साळुंखे, पुणे 

-----

वस्तुस्थिती : शेतकऱ्यांची आणि विदर्भाची 

साधना साप्ताहिकामध्ये वेगवेगळ्या विषयांवर लेखमाला देण्याची सुरू केलेली परंपरा अभिनंदनीय आहे, हाच साधनाचा गाभा आहे.  ‘भारताची शेजारी’, ‘भारतातील प्रादेशिक पक्ष’, ‘विदर्भाला सुखी करा’, ‘नक्षलवादाचे आव्हान’, ‘दलपतसिंग येती गावा...’, ‘शेती आणि शेतकरी’, ‘ईशान्य भारत’ असे विशेषांक आपण प्रसिद्ध केलेत. राजा शिरगुप्पे यांनी तीन यात्रा काढल्या, त्यामध्ये त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती सादर केली आहे. ती वाचलीच पाहिजे यात शंका नाही. 

शेती व शेतकरी अंकात लेखकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अनुभवाच्या आधारे आपले मत मांडले आहे. या सर्वांचे सार म्हणजे शासन, नेते आदींनी शेतकऱ्यांना नागवे करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांवरील आकडे दाखवले जातात, पण त्यांच्या मूळ अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. ‘विदर्भाला सुखी करा’ या अंकातही आपले विचार मांडले आहेत. अजून पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, आमदार, खासदार विदर्भाच्या बाबतीत सावत्र वागणूक देत आहेत व विदर्भातील मंत्री, आमदार हे दमदार पाऊल उचलत नाहीत, विदर्भाचा माणूस हा शोषक आहे, महाराष्ट्राचा माणूस दगडाच्या माराचा त्रास सहन करणारा, त्यामुळे कोठे खट्ट झाले की तो ताडकन्‌ उठतो.

विदर्भात नियमित पाऊस वेळेवर आला तर विदर्भात शेती बागाईतीचा विचार होऊ शकतो, पण पाण्याची टंचाई महत्त्वाचीच आहे. आज शहरे वाढताहेत, मात्र त्यांचा पाणीपुरवठा हा ग्रामीण भागांत धरणे बांधून केला जातो, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही, त्याला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे शासन हे भांडवलदार लोकांचा, उद्योगवाल्यांचा विचार करताना दिसते. शेतकऱ्यांविषयी त्यांना कळवळा वाटत नाही. 

साधनामधील ‘शाळाभेट’ ही अभ्यासपूर्ण लेखमाला नामदेव माळी लिहीत आहेत, त्या लेखमालेचे पुस्तक व्हावे, सर्व शिक्षकांना मार्गदर्शक होईल. 

डॉ. उत्तम हरिभाऊ गिरी, (स्वातंत्र्यसैनिक), जामोद, जि.जळगाव 

-----

मुकुंदराज विद्यालयातील भाजीपाला लागवड

मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणजे शाळगाव. वास्तविक शाळगाव गावचे नाव शेरगाव असावे, नंतर ते शाळगाव झाले असावे. अशीच येथील माणसे पोलादी ताकदीची.  कुस्तीक्षेत्रात या गावातील अनेक मल्लांनी नाव कमविले आहे. तशीच येथील शिवारात लाल माती ओतप्रोत भरून राहिलेली आहे. कदाचित त्यामुळे मल्लविद्या येथे जोपासली जाते. 

आद्य कवी मुकुंदराज यांच्या नावानेच रयतप्रेमी लोकांनी कर्मवीर अण्णांच्यावर निष्ठा ठेवून 1959 साली श्री मुकुंदराज विद्यालयाची स्थापना केली. विद्यालयाने अनेक बाबतींत इतिहास घडविला आहेच. मुळातच येथील सेवकवर्गामध्ये नवीन काहीतरी करावे अशी ऊर्मी आहे, त्यातूनच सन 2011-2012 या शैक्षणिक वर्षांत पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी एखादा प्रकल्प राबवावा असे ठरविण्यात आले.

साधारण मे 2011 मध्ये पंचायत समिती कडेगावचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी भाजीपाला लागवड प्रकल्प राबवावा असे आवाहन मुख्याध्यापकांच्या मीटिंगमध्ये केले. ज्या शाळेशेजारी शेतीयोग्य जमीन आहे, अगर परिसर भरपूर आहे, अशा शाळांनी हा प्रकल्प राबवावा. प्रयोगादाखल सर्व शिक्षकांची मीटिंग घेतली. त्यामध्ये नामदेव माळी यांच्या आवाहनाची सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प पर्यावरण प्रकल्पाला पूरक असा होऊ शकतो. मुलेही त्यांना असलेले अनुभव स्वतंत्ररीत्या लिहू शकतील, म्हणून शाळेच्या पेरूच्या बागेमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये ‘भाजीपाला लागवड’ करावी असे ठरले. ‘भाजीपाला लागवड’ करत असताना त्या भाजीपाल्याची राखण व्यवस्थित व्हावी, बाहेरील जनावरांनी तो भाजीपाला खाऊन फस्त करू नये, याची खबरदारी शाळेला प्रथम घ्यावी लागली. त्यासाठी पेरू बागेभोवती सिमेंट पोल रोवून काटेरी तारेचे कुंपण करून घ्यावे लागले.

जूनच्या पहिल्या आठवड्यातच पहिली सभा झाली. पेरू बागेच्या पश्चिमेकडून प्रवेशद्वारापासूनच प्रत्येक वर्गाला एक पट्टा नेमून दिला. सुरुवातीस बागेतील पेरूच्या दोन ओळींतील अंतरात मध्येच प्रत्येक वर्गाने मेहनत करून जमीन टिकाव, खोऱ्याने उकरून भुशभुशीत केली. त्यातील तण, धसकटे बाजूला केली. त्या मातीचे गादीवाफे तयार केले.

विद्यार्थ्यांनी स्वत: राबून कष्ट करून जमीन लागवडीयोग्य बनवली. त्यामध्ये कंपोस्ट खत मिसळावे याकरिता शेण पाहिजे. सर्व मुले ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या घरी असलेले गाई- म्हशींचे शेण; काही दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणून त्या मातीत मिसळावे अशी विद्यार्थ्यांना सूचना केली. विद्यार्थ्यांनी लगेच शेण आणून मातीत मिसळले.

बी टाकण्यास जमीन तयार झाली. मध्येच आम्हाला सेवकांपैकी कोणीतरी सुचवले की, यातील रोपांना मुलांनीच खांद्यावरून पाणी आणून घालावे. पण एवढ्या मुलांना कळशा घ्याव्या लागणार, त्यासाठी समृद्धी प्लॅस्टिक कंपनीच्या 30 कळशा शाळेने खरेदी केल्या. त्या कळशांचे वैशिष्ट्य हे की, त्या वजनाने हलक्या- अगदी पाचवीच्या मुलांनाही सहज भरलेली कळशी उचलता यावी व ती भरलेली कळशी बागेत आणून ओतता यावी. 

कळशी आणल्यानंतर सुरुवातीस मुले आनंदाने हातात कळशी घेत, मी का तू अशी त्यांच्यात स्पर्धा लागे. ह्या कळशांचा आणखी एक फायदा शाळेला असा झाला की, गेल्या वर्षी ग्रामपंचायत, शाळगाव यांच्याकडून शाळेला 500 ते 600 रोपे वृक्षलागवडीसाठी मिळाली होती. ती रोपे शाळेच्या परिसरातच खुल्या मैदानात लावली. विशेषत: त्या रोपांना ज्या वेळी पाण्याची आवश्यकता आहे, त्यावेळी मुले घागरीच्याच साहाय्याने त्याला पाणी घालत असतात. 

आमची मुले राबणारी, कष्ट करणारी आहेत. त्यामुळे चालू वर्षी त्यातील 18 रोपे उन्हाळ्यात जीवित राहिली. मुलांची कष्टाळू वृत्ती असल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने त्या पेरूच्या बागेत वाफे तयार केले.

जून महिन्यात पाऊस पडू लागला. ओल जेव्हा खोलवर झाली तेव्हा मुलांनीच त्यांच्या घरी असलेले पेरणीतून, शिल्लक राहिलेले बी- विशेषत: भाजीपाल्यासाठी उपयुक्त असणारे आणली व ते तयार केलेल्या वाफ्यांतून टाकण्यात आले. पावटा, घेवडा, वाटाणा, धने, बटाटा, चवळी, मेथी, दुधी भोपळा, दोडका, पडवळ इत्यादींची चांगली उगवण व्हावी यासाठी मुलेच त्याला पाणी घालतात. 

टाकलेल्या बियांची चांगली उगवण झाली. तसेच शेवग्याच्या 25 फाद्यांची आणि कडीपत्त्यांच्या 10 रोपांची लागवड केली आहे. वाटाणा, घेवडा यांना शेंगा आल्या, कोथिंबिरीचा शाळेच्या पोषण आहारासाठी वापर होऊ लागला. त्यामुळे इतर पदार्थांबरोबर आमटी चविष्ट बनू लागली. मुलेही भाताबरोबर आमटी चवीने खाऊ लागली. शालेय पोषण आहार योजनेला ताजा भाजीपाला मिळू लागला. 

‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे’ या सर्वांना पूरक प्रकल्प इमारतीच्या डाव्या बाजूस कोपऱ्यात आमचे शिपाई श्री.पाटील यांनी स्वयंस्फूर्तीने खणून सऱ्या तयार करून त्यात मिरची, वांगी व राजगिरा या भाजीपाल्यांची लागवड केली. 

17 ऑगस्ट रोजी मा.नामदेव माळीसाहेब यांनी पट पडताळणीनिमित्त शाळेस भेट दिली. त्यांनी शाळेच्याअंतर्गत कामकाजाबरोबर भाजीपाला लागवडीची पाहणी केली, या कामाबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. त्यामुळे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली, पुढेही हा प्रकल्प आणखी जोमाने चालू ठेवण्याचा सर्व सेवकांचा मानस आहे.

पाटणकर दत्ताजीराव चंद्रोजीराव, मुख्याध्यापक, शाळगाव, ता.कडेगाव, जि.सांगली  

Tags: साधना आमटे. बाबा आमटे विदर्भ आनंदवन शाळगाव Sadhana Amteश्री मुकुंदराज विद्यालय Baba Amte Vidarbha Anandvan Shalgaon - Shri Mukundraj Vidyalaya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके