डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरे तर मेधाताई पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन यांच्या वास्तवाशी मी फारसा परिचित नव्हतो, केवळ त्यांचा झगडा वाचून व ऐकून होतो. परंतु हा लेख वाचल्यानंतर वास्तवाच्या जवळ पोहोचलो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या गप्पा मारणाऱ्या शासनयंत्रणेविषयी मनात नुसतीच चीड नाही, तर घृणा उत्पन्न झाली. भारतात स्वत:च्या मातीला आई मानणारे आदिवासी बांधव- त्यांची ही अवस्था! शिस्तबद्ध, संयमी, परस्परांबद्दल आस्था, प्रेम व जिव्हाळा आणि कधी तरी आपणास न्याय मिळेल; या भावनेने शांतपणे मिळेल ते खाऊन प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द पाहिल्यावर त्यांच्या आदिवासी- संस्कृतीला सलाम करावा वाटतो.

केवळ स्त्रीदाक्षिण्य नको...

दि.2 मेच्या साधनात प्रसिद्ध झालेला ‘नामसामर्थ्य’ हा अपर्णा दीक्षित यांचा लेख आवडला. या लेखातील विचारांना पूरक असे काही मुद्दे मांडत आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ‘स्वामिनॉमिक्स’ नावाच्या सदरात नियमित लेखन करणारे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ स्वामिनाथन अंकलेशर अय्यर काही वर्षांपूर्वी गोव्यात आले होते. त्यांना आम्ही विचारले, ‘तुमचे बंधू (काँग्रेसचे नेते) मणिशंकर अय्यर हे आपले नाव मणिशंकर अंकलेशर अय्यर असे लिहीत नाहीत, मग तुम्हीच आपले मधले नाव अंकलेशर असे का लावता?’ ते म्हणाले, ‘अंकलेशर हे माझ्या पत्नीचे माहेरचे आडनाव आहे. माझ्या पत्नीच्या सन्मानार्थ मी तिचे आडनाव माझ्या नावातील मधले नाव असे लावतो.’

आपल्या पत्नीचा किंवा पतीचा उल्लेख इंग्रजीमध्ये करताना ‘वाइफ’ किंवा ‘हजबन्ड’ असा न करता ‘स्पाऊस’ असा केला जातो. याला इंग्रजीत जेंडर सेन्सेटिव्ह (स्त्रियांबद्दल संवेदनशीलता दाखवणे), जेंडर न्यूट्रल (स्त्री-पुरुषांच्या लिंगाबाबत तटस्थता दाखवणे) याबरोबरच नॉन-बायनरी (स्त्री-पुरुषांत भेद न करणे) असे शब्द आहेत.

‘महारोगी’ हा शब्द जसा भाषेतून हद्दपार होऊन ‘कुष्ठरोगी’ हा शब्द मराठी किंवा कोकणी भाषेत वापरला जातो, त्याचप्रमाणे ‘विधवा’ हा शब्दही न वापरण्याचा प्रघात आता पडला आहे किंवा पडतो आहे. उदाहरणार्थ- सोनिया गांधी ह्या स्मृतिशेष राजीव गांधींच्या ‘विधवा’ (विडो ऑफ) असे न म्हणता- त्या स्मृतिशेष राजीव गांधीच्या पत्नी आहेत, असे इंग्रजीत तरी म्हटले जाते. आता सर्व भारतीय भाषांतून विधवा हा शब्द वगळला पाहिजे.

जपान एअरलाइन्सच्या विमानात प्रवाशांचे स्वागत करताना ‘वेलकम लेडीज ॲन्ड जंटलमन’ असे न म्हणता ‘वेलकम एव्हरीवन’ असे म्हणतात. संस्कृतमध्ये स्त्रियांसाठी ‘वामा’ हा शब्द आहे. वामा म्हणजे पुरुषाच्या डाव्या बाजूने उभी असलेली किंवा बसलेली असा आहे. डावी बाजू ही उजव्या बाजूपेक्षा कनिष्ठ आहे, हा (गैर)समज आपल्यात आहे. डावी बाजू कनिष्ठ मानल्यामुळे विठ्ठल-रखुमाईच्या देवळात रखुमाई विठ्ठलाच्या डाव्या बाजूला उभी असते. पार्वती, सीता या अनुक्रमे शंकराच्या व रामाच्या डाव्या बाजूने उभ्या असल्याचे चित्रांत दाखवले जाते. सर्व विवाहसोहळ्यांत वराच्या डाव्या बाजूला वधू उभी असते किंवा बसलेली असते. मुंबई-पुण्यात ‘वामा’ नावाचे खास स्त्रियांसाठी साड्या व अन्य कपडे विकणारे दुकान आहे. त्यामुळे भाषेतला ‘वामा’ हा स्त्रियांना संबोधून असलेला शब्द जसा आपण जाणीवपूर्वक वापरता कामा नये, तसेच स्त्रीला पुरुषाच्या उजव्या बाजूला उभी करण्याचा वा बसवण्याचा प्रघात पाडणे हे प्रागतिक पाऊल आहे, असे आपण समजले पाहिजे.

मार्केटिंगमध्ये जेव्हा पहिल्या वाक्यात ‘गिऱ्हाइक-कस्टमर’ हा शब्द येतो, त्याच्या पुढच्या वाक्यात गिऱ्हाइकाला संबोधून she किंवा her हे शब्द किंवा they हा शब्द येतो. ‘आय ॲम अ कॉम्प्लान बॉय’ असे म्हणणाऱ्या कॉम्प्लानच्या जाहिरातीत पुढे ‘आय ॲम अ कॉम्प्लान गर्ल’ असा बदल करण्यात आला. माझा गोव्यात ‘मॉन्जिनीस’ या नावाखाली बेकरी उत्पादने उत्पादित करणारा कारखाना आहे. त्याची जाहिरात करताना वाढदिवसाला मॉन्जिनीस केक कापणाऱ्या बालकाचे चित्र आम्ही दाखवताना ते आवर्जून मुलाचे न दाखवता मुलीचे दाखवतो. हिंदुस्तान लिव्हर कंपनीचे स्त्रियांसाठी चेहऱ्यावर लावता येणारे क्रीम ‘फेअर ॲन्ड लव्हली’ या नावाने विकले जात असे. या नावातून गौरवर्णीय स्त्रिया ह्या कृष्णवर्णीय स्त्रियांपेक्षा अधिक सुंदर असतात असा अर्थ सूचित होतो, हे कंपनीच्या लक्षात आले किंवा निदर्शनास आणले गेले. त्यामुळे कंपनीने ‘फेअर ॲन्ड लव्हली’ हे नाव बदलून ‘ग्लो ॲन्ड लव्हली’ असे केले. गोव्यात सांतेरी, शांतादुर्गा, महालसा, महालक्ष्मी, कामाक्षी या देवींची देवळे आहेत. आपण शांतादुर्गेच्या देवळात गेलात, तर देवळाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कमानीवर ‘श्री शांतादुर्गा विजयते’ हे पुरुषधार्जिणे वाक्य असते.

स्त्री कलाकारांना ‘ॲक्ट्रेस’ न म्हणता ‘ॲक्टर’ म्हणावे आणि कविता लिहिणाऱ्या स्त्रीला ‘कवयित्री’ न म्हणता ‘कवी’च म्हणावे, असे रूढ होत आहे. आमच्या औद्योगिक आस्थापनात वेगवेगळ्या पदांवर स्त्री कर्मचारी असाव्यात, असा आमचा आग्रह असतो. एचआरडी (मानवी संसाधन बळ) मॅनेजर (व्यवस्थापक) स्त्री असेल, तर ती पुरुष व्यवस्थापकापेक्षा अधिक कार्यक्षम असते, असा माझा अनुभव आहे. कारण आस्थापनातले सर्व कर्मचारी व मजूर तिच्याकडे मातृस्वरूपात पाहतात. स्त्री व्यवस्थापक त्यांच्याशी वात्सल्याने वागते. याउलट पुरुष व्यवस्थापकाची प्रतिमा ‘वडिलांची’ म्हणजे शिस्तीची किंवा धाकाची असते. त्यामुळेच इंद्रा नूयी, रमा विजापूरकर, सुधा मूर्ती, विनीता बाली, किरण मुजुमदार-शॉ या स्त्रिया व्यवस्थापनाच्या सर्वोच्च पदावर आहेत. अमेरिकेत ज्यो बायोडेन यांनी कमला हॅरिसला आपली उपाध्यक्षपदाची उमेदवार म्हणून निवडली, याचा फार मोठा फायदा बायोडेन यांना होतो आहे.

दुर्गा भागवत, इंदिरा गोस्वामी, सोनिया गांधी, लता मंगेशकर, सुश्मिता सेन आणि अनेक स्त्रिया (पुरुषाशी) लग्न न केल्यामुळे वा पतीचे निधन झाल्यावर नावारूपास आलेल्या आहेत. कोरोनाच्या साथीत आपल्या घरीच बसून आपले व्यावसायिक काम करता येत असल्याने पुरुष कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण पूर्ण वेळ घरी असल्यामुळे स्वाभाविकच आपले व्यावसायिक काम करण्याबरोबरच स्त्रीला स्वयंपाक करणे, मुलांचे संगोपन ही कामे करावी लागत असल्यामुळे त्यांची फार कुचंबणा होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तात्पर्य- सर्व पुरुषांनी केवळ स्त्रीदाक्षिण्य न दाखवता आपली स्त्रियांसंबंधीची संवेदनशीलता अधिक तरल केली पाहिजे.

दत्ता दामोदर नायक, गोवा
----
चिनी वर्चस्वामुळे धास्तावलेला देश

चीन, भारत आणि इतर देश या विषयावर बरेच लिखाण विशेषतः इंग्रजीमध्ये बघायला मिळते. साधनानेही असे उपयुक्त लेखन प्रसिद्ध केले आहे. यंदाच्या दिवाळी अंकातही श्री.शैलेश माळोदे यांचा लेख आहे. माझ्या मते चीन, भारत आणि आपले भविष्य या विषयावर अधिक विचारविनिमय होणे गरजेचे आहे. जे विचार सुचले, ते मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच.  

1.  चीनने गेल्या तीस वर्षांत जी आर्थिक प्रगती केली आहे, ती अचंबित करणारी आहे. अर्थात या प्रगतीची किंमत ज्यांनी मोजली आहे, ते चीनमधील सर्वसामान्य नागरिक या विषयावर काही बोलतात का? जगभरातील अनेक अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विश्लेषक चीनचा अभ्यास करत असतात- त्यांच्या हाती काय लागते? (हा भेडसावणारा एक प्रश्न. असो.)

2. चीन हा अजब देश आहे. भांडवलवादी देश आहे, असे कोणी म्हणणार नाही. कदाचित तो भांडवलवादी पण साम्यवादाच्या बुरख्याखाली लपलेला देश असेल. मला जे म्हणावयाचे आहे त्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी डावलता येणार नाही. प्रचंड लोकसंख्या सोडली तर भारत आणि चीन यामध्ये काहीही सारखेपणा नाही. आपले आणि चीनचे राजकीय मार्ग पूर्णतः वेगळे आहेत, इतिहास वेगळा आहे आणि संस्कृतीही. यासंदर्भात माझा प्रश्न असा की- चीनबरोबर आपली तुलना कशासाठी करायची? तशी तुलना करण्याचे काही फायदे होतात का? 

3. चीनबद्दल जी माहिती मिळते, ती पूर्णपणे विश्वसनीय असते का? हा प्रश्न पण मला नेहमीच विचारावासा वाटतो, कारण माझ्या मते चीन हे एक अनाकलनीय गूढ आहे. 

4. Tiananmen Square Protests अशी ज्या आंदोलनाची ओळख आहे, त्या 1989 च्या आंदोलनात आणि त्याआधी झालेल्या तथाकथित सामाजिक क्रांतीच्या दरम्यान किती निरपराध नागरिकांची निर्घृण हत्या झाली असावी? पण याबद्दल काहीही बोलायचे नाही, असे धोरण दिसते. (कारण आपण कोण?) परंतु यासंदर्भात नेहमी पडणारा प्रश्न असा की- चीनमधील काम्युनिस्ट शासन तेथील कोट्यवधी नागरिकांचे सहकार्य कसे मिळवते? 

5. चीन व अमेरिका यांचे नाते दुरावलेल्या भावासारखे आहे. हे भाऊ केव्हाही एकत्र येतील. त्यामुळे आपण या दोन्ही देशांपासून सावध राहायला हवे, नाही का? 

6. चीनचा आर्थिक साम्राज्यवाद वाढतो आहे आणि आफ्रिकेतील अनेक देशांना विविध प्रकारची कर्जे व मदत देऊन चीन आपले वर्चस्व झपाट्याने वाढवत आहे. ही वस्तुस्थिती त्या देशांसाठी हितावह नाही. या सगळ्या व्यवहारात त्या देशांची अगतिकता अधोरेखित होते. 

7. आजच्या घडीला चीन सर्वांत मोठी महासत्ता बनण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरत आहे, हे उघड आहे. चीनचे सरकार आणि तेथील कम्युनिस्ट पक्ष विविध प्रकारे आपल्या नागरिकांवर निर्बंध घालून नियंत्रण ठेवत आहे, तसे नियंत्रण ठेवणे कधीही समर्थनीय नाही आणि कोणत्याच लोकशाही देशाला ते शक्य नाही. 

8. सध्याच्या परिस्थितीत चीनचे आव्हान स्वीकारण्यासाठी भारताने काय करावे, याबद्दल अनेक मते वाचायला मिळतात. त्याचे सरळ-साधे उत्तर उपलब्ध  नाही. आपल्याला जे करता येईल ते पूर्ण तयारीने करावे आणि तेवढेच करावे, यातच कदाचित शहाणपणा आहे. नाही का? 

9. चीनच्या विस्तारवादी, आक्रमक  आणि दांडगाईचे प्रदर्शन करणाऱ्या भूमिकेमुळे भारतासमोर मोठे आव्हान उभे आहे. याबाबत चीनबरोबर मुकाबला आपल्या देशालाच करावा लागणार आहे. परंतु यासंदर्भात असे दिसते की, इतर अनेक  देशसुद्धा  धास्तावलेले आहेत. यापुढील काळात अनेक देशांशी अधिक घट्ट मैत्रीचे नाते जोपासणे आता भारतासाठी गरजेचे झाले आहे.  

नरेंद्र महादेव आपटे, पुणे 
----
‘लकिर के इस तरफ’ दूरचित्रवाणीवर दाखवावा

दि. 12 सप्टेंबरच्या साधनात ‘तग धरून उभे : जीवन आणि शाळा’ हा शिल्पा बल्लाळ यांचा लेख अतिशय सुंदर व वास्तवाचे भान करून देणारा आहे.

खरे तर मेधाताई पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन यांच्या वास्तवाशी मी फारसा परिचित नव्हतो, केवळ त्यांचा झगडा वाचून व ऐकून होतो. परंतु हा लेख वाचल्यानंतर वास्तवाच्या जवळ पोहोचलो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या गप्पा मारणाऱ्या शासनयंत्रणेविषयी मनात नुसतीच चीड नाही, तर घृणा उत्पन्न झाली. भारतात स्वत:च्या मातीला आई मानणारे आदिवासी बांधव- त्यांची ही अवस्था! शिस्तबद्ध, संयमी, परस्परांबद्दल आस्था, प्रेम व जिव्हाळा आणि कधी तरी आपणास न्याय मिळेल; या भावनेने शांतपणे मिळेल ते खाऊन प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द पाहिल्यावर त्यांच्या आदिवासी- संस्कृतीला सलाम करावा वाटतो.

चौतीस वर्षांनंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 केंद्र सरकार देशात आणत आहे. त्या धोरणात कुठे तरी या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा, त्यांच्या शिक्षणासंबंधी खास विचार व्हावा, असे प्रामाणिकपणे वाटते. तेसुद्धा आपल्या देशाचे सुजाण नागरिक आहेत. त्यांनाही त्यांचा शिक्षणाचा हक्क द्यावा, तरच आमची लोकशाही व शासनव्यवस्था जिवंत आहे असे वाटेल; अन्यथा सर्व व्यर्थ!

शिल्पा बल्लाळ यांच्या ‘लकिर के इस तरफ’ या यु-ट्यूबवरील फिल्मला दूरचित्रवाणीवरील पडद्यावर आणून सामान्यांना पाहता येईल अशी व्यवस्था व्हायला हवी, असे वाटते. सामान्य जनतेने हे पाहिल्यावर सर्वांना देशातील विषमतेची जाणीव होईल. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था निर्माण करू पाहणाऱ्या शासनयंत्रणेला मूलभूत प्रश्नांची जाण होईल आणि सुबुद्धी होऊन आदिवासी बांधवांना न्याय मिळेल.

प्रा. गणपतराव कणसे, कराड, जि.सातारा
----
तो तर्क करावा लागणे यातच यश

या वर्षीचा बालकुमार अंक हातात पडला. या अंकाच्या प्रकाशनाची बातमी व्हॉट्‌सॲपवर पाहिली/वाचली होती. रेणुताई गावस्कर भाषणात म्हणाल्या, ‘साने गुरुजींना अंक पाहून आनंद झाला असता.’ अंक वाचल्यावर मला वाटते, गुरुजी आज असते तर अंक हातात घेऊन चक्क नाचले असते. इतर कारणांबरोबरच इतर भाषांतील ज्ञानेश्वर त्यांना या अंकात दिसले असते. त्यांना आपली आंतरभारतीची कल्पना प्रत्यक्षात आल्याचा आनंद  झाला असता. गुरुजींना काय अनुभूती येऊ शकेल, असा तर्क आम्हाला करावा लागणे यात अंकातील लेखक तरुण/तरुणीचे कर्तृत्व सामावले आहे.

ॲड्‌.देवीदास वडगावकर, उस्मानाबाद

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके