डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • सुरुंग
  • अस्थानी कौतुक
  • प्रश्न फक्त चेकच्या रकमेचा होता
  • जय भारत
  • एक पाऊल पुढे
  • सडेतोड विचार
  • संघर्षाची नांदी?
  • अस्तिकांनी इकडे पहावे
  • बुद्धिवादी आस्तिक

सुरुंग  

मित्रा,
तुला म्हणून सांगतो
महात्म्यांना पापात्मे
आणि
पापात्म्यांना हुतात्मे
करणारे संस्कार
ह्या देशात रूजण्याला
प्रारंभ झाला आहे
हजारो वर्षांपूर्वीच्या
मिरासदारीला
आता नवी धार पडत आहे
म्हणून म्हणतो
मित्रा,
तू जागजागी
सुरूंग पेरणे सुरु ठेव.
- सुरेश पाटील.

अस्थानी कौतुक 

मी मुंबईत आर्किटेक्ट म्हणून काम (स्वत:चा व्यवसाय) करतो. गेली अनेक वर्षे साधने चा नियमित वाचकच नव्हे तर वर्गणीदार आहे. साधनेतून अनेक चागल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळते यात काहीही वाद नाही. पण 22 जुलैच्या अंकात "मुंबई वार्ता" या सदरात पान क्रमांक 13 वर आलेले एक विधान तद्दन खोटे आहे असे वाटते. नव्हे, तर त्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. माझ्या ओळखीचे, नव्हे तर घनिष्ठ संबंध असलेले, सुमारे डझनभर "बिल्डर्स" आाणि त्याच्या दुप्पट इस्टेट एजंटस् आहेत. पैकी एका इस्टेट एजंटकडे सुमारे एक महिन्यापूर्वी मी काही कामानिमित्त गेलो होतो. त्याच वेळी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, स्टार्चमध्ये बुडवून काढलेले कपडे (अर्थात खादीचे) परिधान केलेले, आले. त्यांना कुलाबा ते ताडदेव, हाजीअलीपर्यंत जागा हवी होती.

प्रश्न फक्त चेकच्या रकमेचा होता 

''चेकने फक्त पंधरा हजारच देऊ शकेन. कॅश सुमारे साडेतीन लाखापर्यंतच. कारण पुढे फर्निचर वगैरेला कॅश लागणार. तेव्हा लवकरात लवकर जागा द्या" – शंकरराव. 
"आपल्या अटी काही वाईट नाहीत पण प्रश्न पुढचा आहे - तो म्हणजे इन्कमटॅक्स अँक्विझिशनचा" एजंट.

"आप उसकी फिकर मत कीजिए। उसे हम सम्भालेंगे" – शंकरराव.

तेव्हा संपादक महोदय, यापुढे तरी विशुद्ध चारित्र्याचा, गरिबांविषयी कळकळ असणारा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणच, असे म्हणण्याचे धाडस करू नका. 
- एक साधना कुटुंबीय.

जय भारत 

15 ऑगस्टचा अंक मिळाला. मोठ्या उत्सुकतेने अंक उघडला. अधाशासारखे पू. गुरुजींचा दिशा व आदरणीय अण्णांचा “साद" हे लेख वाचले व पान पलटले. परमपूज्य भाऊसाहेबांचा फोटो दिसला. श्वास रोखून एका दमात ते पान वाचले. मन सुन्न झाले. वाटलं, आपणही भाऊसारखे फाडफाड थोबाडीत मारून घ्यावे असे वाटले. अजून किती भाऊ आम्हि पचवणार कोण जाणे! 

झाला प्रकार अत्यंत निच आहे. पू. भाऊंच्या शरीरापेक्षा मनाच्या वेदना तीव्र असणार हे खरे आहे पण स्टेशनवरील 4।2 शे लोक म्हणजे भारत नव्हे. त्यातही निदान हमाल, तरी निघालेच ना? त्याच अंकुराच्या आशेवर आपण पुढे चालायचे.

आज महाराष्ट्रभर पू. भाऊंचे चाहते व अनुयायी पसरले आहेत. ज्यांना ज्यांना या फणसाचा गर चाखायला मिळाला असे अनेक जण अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. पण या अफाट समाजात ते मोजके आहेत. ह्यांची संख्या वाढवण्यासाठी भाऊसारख्या अनेक भाऊंची गरज आहे. समाजाकडून चोप खाऊनही समाजशिक्षण करणारे भाऊ आम्हाला हवे आहेत.

पू. भाऊसाहेबांना-पर्यायाने आपणा सर्वांना समाजाने दिलेल्या धड्याने माझ्यासारख्या रा.से. दलाच्या सैनिकाला असे वाटायला लागले आहे की, गावोगाव रा. से. दलाच्या शाखा निघाव्यात. शाखेवर हजारो मुला मुलींना सुसंस्कारित करावेत.
- इब्राहिम रसूल मुल्ला, हन्नूर. 

एक पाऊल पुढे 

अंबर सामग्री पोचली. कार्यकर्ते परवा पोचतील. तुम्ही उत्तर रत्नागिरीत घेऊन जाणार ऐकले. मी इथे गुंतली आहे. काळ 15 ऑगस्ट. स्वातंत्र्यासाठी खपलेल्यांची आठवण आणि पुढील स्वप्नांची जाणीवपूर्वक प्रतिज्ञा. बांबुळी ग्रामपंचायतीमध्ये यंदा तरुण पंच निवडून आले. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले.

पंचायतीचे झेंडावंदन झाले. पूर्वप्राथमिक शाळेचे आटोपले, सरपंच मुलांना पेपरमिट वाटतात. तत्पूर्वी मुलांशी बोलावता मास्तरांनी मला सांगितले. आज व्याख्यानाचा दिवस नाही, मी प्रश्नोत्तरांनी संभाषण साधले. आजचा दिवस कोणता? का आणि कसा साजरा करतो? स्वप्ने साकार कशी व्हायची? काम कोणते करू? या मराठवाड्यात काय झाले? आपल्याला पेपरमिट गोड लागेल? इथून काय करू या? भावना कशा पोचवू? पाणी कोणी दिले? विहिरीतील झरे म्हणजे शिवतीर्थ ना? ग्रामपंचायतीने बांधलेल्या विहिरीचे पाणी सर्वांचे ना? तसे मिळते? आज पिऊ या का? घरची भीती. थोडी शांतता. जिथे भीती, तिथे प्रीती कशी? आणि भीरूमागे परमेश्वर कोठला? मग कोण येतील? सारे हात वर! सरपंच, पंच, गुरुजी सारे बरोबर आले. स्पृश्य वाडीत हरिजन पंचाने पाणी काढले, महार विहिरीत चांभाराने. चांभार विहिरीत महाराने, सारी मुले पाणी प्याली. फेरीत गाणे 'खरा तो एकचि धर्म' घोषणा 'भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो!' व्यक्तिसंबंधित घोषणा वर्ज्य. सारा गाव गाजला. दुपारी ऐकले. काही गावकरी रागावले! पण त्याच्यात तशीच मुलांतही आता चर्चा चालेल. केले ते बरोबर की चुक? सध्या एवढे पुरे. 
- मधु पंडित, बांबुळी.

सडेतोड विचार 

ता. 29-7-78 य साधनेमधील श्रीपाद जोशी यांचा लेख वाचला. 'नास्तिकता स्तोम कशाला'मध्ये अत्यंत समर्पकपणे व संतुलित विचाराने पुरोगामी म्हणून प्रतिगामीपणा राखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. अभिनंदन!-
- अय्याज अहमद नायकवडी, मिरज.

संघर्षाची नांदी? 

या वर्षा-दोन वर्षांत दलितांचे एक निराळे चित्र दिसू लागले आहे. त्यांच्यातील तरुण पिढी सवर्ण हिंदूंच्या आश्वासनांना कंटाळली आहे. अस्पृश्यता, कायद्याने जात नाही हे त्यांनी ओळखले आहे. भलेपणा, माणुसकी, सर्व व्यर्थ असल्याची त्यांची खात्री पटली आहे. बंडखोरीशिवाय आता दुसरा मार्ग नाही असे त्यांना वाटू लागले आहे. 

वर वर कितीही दिसले तरी प्रचंड भारतातील सवर्ण हिंदू, स्वतःला मिळालेले दलितावरील अधिकार, सवलती, हक्क सहजासहजी सोडण्यास तयार नाहीत. आजकालच्या अनेक अत्याचाऱ्यांवरून आणि घटनांवरून हे दिसून येते. बहुसंख्य हिंदूना अस्पृश्यता दाखवायची आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. असा एखादा ठराव लोकमत टाकला तर काय निर्णय निघेल ते सांगता येत नाही. परिस्थिती अशी आहे की इकडे दलित बंडखोरीला तयार होत आहेत तर तिकडे सवर्ण अत्याचार करून आपले हक्क टिकवण्याच्या विचारात आहेत. दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊ लागल्यास कमजोर शासनास ते आवरणे जड जाणार आहे.

बहुसंख्यांच्या इच्छेविरुद्ध जाण्याची हिंमत लोकशाहीमधल्या किरकोळ पुढाऱ्यांत नसते. मग सवर्णीय अत्याचार आणि दलित बंडखोरी यातून काय निघणार? संघर्षाशिवाय दुसरे काही दिसत नाही. तडजोडीच्या जागा संपत आल्या. अहिंसक मार्ग, हृदय परिवर्तन, शांततामय क्रांती यातून दलितोद्धार होत नाही हे आता कळून चुकले.

संघर्षाने का होईना पण अस्पृश्यतेचा कलंक जर धुता आला तर तेही काही कमी नाही. 
- बी. वा. किर्लोस्कर.

अस्तिकांनी इकडे पहावे 

29 जुलैच्या अंकातील नास्तिकतेचे स्तोम कशाला हा लेख योग्य मार्गदर्शन करणारा व कालोचित आहे. नास्तिकतेचा आग्रह धरावा अशी अवस्था आपल्या देशातील सामाजिक क्रांतिलढ्याला अजून आलेली नाही. आणि अजून सर्वधर्म समादराच्या टप्प्यापर्यंतही पोचलेली नाही. गांधी, विनोबा, साने गुरुजी सेक्युलॅरिझमच्या याच अंगावर जोर देत. आजही त्याची गरज आहे का?

पण नास्तिकांचा हल्ला कर्मकांडावर नसून त्यामागील काल्पनिक श्रद्धांवर असतो हेही लक्षात घेतले पाहिजे. काल्पनिक श्रद्धांची जागा शास्त्रीय ज्ञानावर आधारलेल्या बुद्धिनिष्ठ निष्कर्यांनी घेण्याचा नास्तिकांचा आग्रह आवश्यक आहे. त्याचेअभावी आंधळ्या परंपरावाद्यांचे प्रबोधन होणार नाही व त्यांचे सहाय्य महागात पडेल. सत्य हाच परमेश्वर असे गांधी म्हणत. विनोबांनी सत्य हेच ब्रह्म म्हटले आहे व 'जगत् स्फूर्तिः जीवनं सत्य शोधनम्' अशी समस्यापूर्ती केली आहे.

काही कर्मकांडे निरागस असतात तर काही विषमता उत्पन्न करणारी असतात. भटजी व भगत दोघेही कर्मकांडावर जगणारे. पण भटजीचे कर्मकांड वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार पोसणारे व धनिकांना व सत्ताधाऱ्यांना बळ देणारे असते. देवळे बांधून प्रतिष्ठा मिळवणारे व देवासमोर भाविकांनी ठेवलेल्या निधीचा गैरवापर करणारे आजही आहेत. हजार रु. नोटा प्रकरणी व सुवर्ण विक्री व्यवहारात त्यांचे नुकतेच दर्शन झाले. त्या मानाने भगताचा उपद्रव कमी असतो. वारकरी तर पैसाही मिळवत नाहीत. सोवळेओवळे पाळणाऱ्या जानवेवाल्या कर्मकांडाची विध्वंसकता अस्पृश्यांना व स्त्रियांना किती छळते हे त्यांच्या जन्माला गेल्याशिवाय कळणार नाही. या भयानक कर्मकांडातून आमच्या आजच्या काही सहकाऱ्यांची सुटका करणे लोकशाहीच्या लढ़याच्या दृष्टीनेही निकडीचे आहे. श्री जोशी यांनी इकडे दुर्लक्ष करू नये.
- ल. के. देशपांडे, पुणे.

बुद्धिवादी आस्तिक 

29 जुलैच्या साधनामधील श्रीपाद जोशी यांचा लेख चांगला आहे. त्यामध्ये पुढील गैरसमजूत आढळते. 'नास्तिकता म्हणजे बुद्धिवाद' असे चुकीचे समीकरण लेखकाने मांडले आहे.

वास्तविक आस्तिक मनुष्यही प्रखर बुद्धिवादी असू शकतो. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यवीर सावरकर. धर्मतत्त्वांचा ज्यांनी सखोल अभ्यास केला आहे ते सर्व लोक बुद्धिवादी असल्याचे आढळून येते. कारण सर्वच धर्मात भगवद्गीतेतही कर्मकांडाला विरोध केला आहे. 

'मंदिरात कधीही न जाणारा मनुष्य धार्मिक म्हणजेच आस्तिक असू शकतो' असे ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाचे प्रमुख पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात. जागतिक सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्मावर भाष्य करणारे स्वामी विवेकानंद प्रखर बुद्धिवादी होते आणि त्यांचा धार्मिक कर्मकांडाला विरोध होता.

सर्वच धर्मात बुद्धिवादाला मान्यता नसून आचरणाला प्राधान्य आणि कर्मकांडाला गौण मानले आहे. जो विचार करायला लावतो, 'धारयते इति धर्मः।' अशी धर्माची व्याख्या आहे. समाजाच्या हितासाठी धर्म निर्माण झाला असा निष्कर्ष लोकमान्य टिळकांनी : 'गीतारहस्य 'मध्ये लिहिला आहे. 
- प्रा. के. ग. आचार्य, विक्रोळी.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके