डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

20 ऑक्टोबर 2007 च्या 'साधना' अंकात ‘आख्यान’सदरात श्री.चंद्रकांत भोंजाळ यांचा ‘सारे जहाँ से अच्छा’हा माहितीपूर्ण लेख उत्तम आहे. तो लेख आणि ‘नवनीत’या ख्यातनाम हिंदी मासिकाच्या ऑगस्ट 2007 च्या अंकातील डॉ.अबरार रहमानी यांचा याच मथळ्याचा लेख यात विलक्षण साम्य आहे. श्री.भोंजाळ हिंदीत डॉ. अबरार रहमानी या टोपणनावाने लेखन करतात का? नसल्यास. झाला प्रकार ‘साधना’साठी फारसा शोभादायक नाही. हिंदीतील लेखाची छायाप्रत सोबत पाठवीत आहे. छाननी करून ‘साधना’ च्या पुढील अंकात आपण खुलासा कराल असा विश्वास वाटतो. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा.

हात दुखले आणि मनी..

‘साधना’दिवाळी अंक पोस्टाने घरी आला आणि दिवाळीची सर्व कामे आवरून मी तो हातात घेतला, चाळला. दुपारी जेवणानंतर निवांत वाचू, या सवयीनं बाजूला केला. कारण वाचनाअगोदर घरातली कामं उरकणं महत्त्वाचं होतं. दुपारी जेवणानंतर वामकुक्षीच्या साथीला ‘साधना’अंक हातात घेतला, अन् पडून वाचण्याचा हा अंक नाही म्हणून काही वेळातच उठून अंक मांडीवर ठेवून वाचू लागले.

अतुल कुलकर्णींचा ‘मी असा घडलो’हा लेख वाचून होईपर्यंत पायांना प्रचंड मुंग्या आल्या, म्हणून अंक बाजूला केला. नंतर त्यातील ग.प्र.प्रधान, सदानंद मोरे, रूपा कुलकर्णी इत्यादींचे लेख बुद्धीला सकस खाद्य पुरवणारे वाटले, पण अंक बाजूला ठेववत नाही आणि वाचनही सलग चालू ठेवणं अवघड झालं ‘वजनदार’ असल्यामुळे हाताला कळ यायला लागली. मग अंक पोथी वाचण्याच्या स्टॅंडवर ठेवून वाचला नव्हे खाल्ला. जाहिरातींच्या प्रचंड माऱ्यापुढे अंकाचे वजन वाढतेय व वाचकांना त्रास होतोय, याचा कदाचित संपादकांना विसर पडला असावा. जाहिरातवाल्यांच्या मनाबरोबर वाचकांच्या मनाचाही थोडा विचार झाला असता तर आमचे मन व हात दुखले नसते. हे एवढंच सोडलं तर अंक अतिशय दर्जेदार, सकस व देखणा, उत्कृष्ट आहे. यावर्षीही अंक नंबर वन राहणार यात शंकाच नाही.

रजनी पांडव,सी-1, 6 रक्षलेखा सोसायटी, दत्तवाडी, पुणे 30.

----

सर्वथैव असमर्थनीय!

भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात जातींचे अस्तित्व नाकारता येत नाही, हे खरे असले तरी दलितांना आणि सर्व मागास जाती-जमातींना विकासाची विशेष संधी देणे हेच सामाजिक न्यायाला पोषक असून आधुनिक काळाशी सुसंगत आहे. ज्या पांढरपेशा जातींनी आजवर शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अग्रस्थानी राहून प्रगतीची सर्व फळे चाखली आणि ज्या जातींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणात अमाप सत्ता भोगली, त्यांनी समाजातील मागास व उपेक्षित राहिलेल्या जाती-जमातींना शिक्षण आणि नोकऱ्या यांची जादा संधी देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात चित्पावन ब्राह्मणांनी जागतिक संमेलन घेतले आणि मराठा समाजाची परिषद झाली-हे दोनही मेळावे सर्वथैव असमर्थनीय आहेत.

चंद्रशेखर पिंगळे,पुणे

----

‘साधना’साठी हा प्रकार शोभादायक नाही

संपादक साधना, 

20 ऑक्टोबर 2007 च्या 'साधना' अंकात ‘आख्यान’सदरात श्री.चंद्रकांत भोंजाळ यांचा ‘सारे जहाँ से अच्छा’हा माहितीपूर्ण लेख उत्तम आहे. तो लेख आणि ‘नवनीत’या ख्यातनाम हिंदी मासिकाच्या ऑगस्ट 2007 च्या अंकातील डॉ.अबरार रहमानी यांचा याच मथळ्याचा लेख यात विलक्षण साम्य आहे. श्री.भोंजाळ हिंदीत डॉ. अबरार रहमानी या टोपणनावाने लेखन करतात का? नसल्यास. झाला प्रकार ‘साधना’साठी फारसा शोभादायक नाही. हिंदीतील लेखाची छायाप्रत सोबत पाठवीत आहे. छाननी करून ‘साधना’ च्या पुढील अंकात आपण खुलासा कराल असा विश्वास वाटतो. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा.

ज्ञानेश्वर वि. परुळेकर, 22/3 सिद्धार्थनगर, नं. 4, गोरेगाव प.) मुंबई 400062.

----

संपादक साधना,

आपले पत्र व त्या सोबत पाठवलेली ज्ञानेश्वर परुळेकर यांच्या पत्राची झेरॉक्स व ‘नवनीत’मधील लेखाचे कात्रणही मिळाले. मी नवनीतचा वाचक नाही. मी अनुवाद करीत असतो आणि स्वतंत्र लेखनही करीत असतो. लेखन करण्यासाठी संदर्भ म्हणून वाचनात आलेली माहिती लिहून व अनुवाद करून ठेवण्याची माझी सवय आहे. तसाच हा लेख नकळत ठेवलेला असावा. ऑफिसचे काम, मुंबई-पुणे अपडाऊन या धावपळीत तो आपल्याकडे प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आला. त्यावेळी तो लेख अनुवादित आहे असा उल्लेख करायचे अनवधानाने राहून गेले. नाहीतर अनुवादक म्हणून माझे नाव छापताना मला कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाही. मी अनेक मोठ्या साहित्यिकांच्या कृतीचे अनुवाद त्याची अनुमती घेऊन, त्याच्या नावासकटच छापले आहेत, त्यामुळे जाणूनबुजून असे काही करण्याचा माझा उद्देश नव्हता. पण वरील लेख अनुवादित आहे असे छापायाचे राहन गेल्यामुळे कुणी दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात मी जास्त काळजी घेईन याची खात्री बाळगावी.

चंद्रकांत भोंजाळ, 2 (तळमजला), सहकारशिल्प, वीरा देसाई मार्ग, मुंबई 58.

Tags: रजनी पांडव चंद्रशेखर पिंगळे ज्ञानेश्वर वि. परुळेकर चंद्रकांत भोंजाळ प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके