डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

केशवरावांची  तिसरी सूचना ‘भूतकाळ व इतिहास उगाळणाऱ्या लेखनाला जास्त जागा देऊ नका.’ ही सूचना चांगली आहे. हे खरे आहे की, देशाच्या अर्वाचीन इतिहासात ब्रिटिश सत्तेविरुद्धचा स्वातंत्र्यसंग्राम हे एक झळझळीत पर्व होते व तो इतिहास दर नव्या पिढीकडे पोहोचवण्याची गरज असते. पण हे नियतकालिकांचे कार्य असण्यापेक्षा ग्रंथ लेखनाचे प्रयोजनातून साधले जात असते. शिवाय, स्वातंत्र्यपूर्व काळ 70 वर्षांनंतर बराच मागे पडला आहे. त्या काळातील दिल्लीमधील व इतर मोठ्या शहरांतील घटना आणि काँग्रेस पक्षाचे शीर्षस्थ नेते यांच्याबद्दल बरेच लिहिले गेले आहे. त्यामुळे त्याबद्दल पुन्हा नको.

केशवरावांची तिसरी मुलाखत-  दुसरा प्रतिसाद

संपादकपदाची पूर्ण जबाबदारी आपण घेतल्यानंतर साधनाच्या अंकात बरेच लक्षणीय बदल विशेषतः विषयांच्या व लेखांच्या संदर्भात झाल्याचे दिसते. गेल्या सात वर्षांमध्ये आपण केलेल्या कामाकडे मागे वळून पाहण्याकरता ऐतिहासिक संदर्भाशी जोडून घेऊन केशवराव हे पात्र कल्पनेतून निर्माण केले असावे, ही कल्पना योग्य होती असे दिसते. कारण त्या निमित्ताने वाचकांनाही साधनाच्या अंकात काय असावे व काय टाळलेले बरे हे मांडण्याची संधी मिळाली आहे.

याआधी काही अंकांमध्ये संपादकीय सदरात प्रत्यक्ष मुलाखतीवर आधारलेले लेखन होते. पण इतिहासाचा धागा शोधून कल्पनेतून निर्माण केलेले स्वतंत्र भूमिका, विचार व व्यक्तिमत्त्व असणारे पात्र निर्माण करणे, ही प्रतिभा नाटककारांमध्ये असते. केशवराव दीड-दोनशे वर्षानंतर पुन्हा उभा करणे छान जमले आहे! कदाचित पुढे असेच एखादे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व हा फॉर्म निवडता येईल.

आता पुन्हा सूत्र क्रमांक दोनकडे वळतो. केशवराव म्हणतात, ‘दीर्घ लेख कमीत कमी असतील याची काळजी घ्या’. येथे दीर्घ लेख कशाला म्हणावे हे व्यक्तिगत निवडीवर अवलंबून असते. साधनामधील काही लेख वैचारिक अंगाचे तर काही तात्कालिक महत्त्वाच्या घटनाशी संबंधित असतात. साधनाच्या पूर्ण पानभर लेखात साधारणपणे पाचशे ते सव्वापाचशे शब्द मावतात, असे मोजल्यावर कळते. त्यामुळे साधारणपणे चार ते साडेचार पाने (दोन हजार शब्द) हा निकष  पाळल्यास  योग्य व्हावे. सात-आठ पानांचा लेख एका बैठकीत वाचणे, त्याचा विषय कितीही महत्त्वाचा असला तरी कंटाळवाणे होऊ शकते. शिवाय गंभीर वाचनाची गोडी असणाऱ्या व्यक्तीलाही विविध व्याप सांभाळून रोज एक ते दीड तास वाचनासाठी मिळू शकतात, हे लक्षात ठेवावे.

केशवरावांची  तिसरी सूचना ‘भूतकाळ व इतिहास उगाळणाऱ्या लेखनाला जास्त जागा देऊ नका.’ ही सूचना चांगली आहे. हे खरे आहे की, देशाच्या अर्वाचीन इतिहासात ब्रिटिश सत्तेविरुद्धचा स्वातंत्र्यसंग्राम हे एक झळझळीत पर्व होते व तो इतिहास दर नव्या पिढीकडे पोहोचवण्याची गरज असते. पण हे नियतकालिकांचे कार्य असण्यापेक्षा ग्रंथ लेखनाचे प्रयोजनातून साधले जात असते. शिवाय, स्वातंत्र्यपूर्व काळ 70 वर्षांनंतर बराच मागे पडला आहे. त्या काळातील दिल्लीमधील व इतर मोठ्या शहरांतील घटना आणि काँग्रेस पक्षाचे शीर्षस्थ नेते यांच्याबद्दल बरेच लिहिले गेले आहे. त्यामुळे त्याबद्दल पुन्हा नको. पण इतर प्रांतीय पातळीवर आणि विशेषतः दक्षिण व मध्य भारतातील राज्यांमधील स्वातंत्र्य लढ्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याने, त्यासंबंधीचे लेखन असावे. इंदिरा गांधी पर्व, आणीबाणी व जनता पार्टीचा अयशस्वी प्रयोग या आधुनिक काळात होऊन गेलेल्या घटना आता ऐतिहासिक काळात जमा झाल्याने, त्याविषयी पुन्हा नको.

केशवरावांचे  चौथे सूत्र ‘अतिगंभीर, क्लिष्ट, ठोकळेबाज व पोथीनिष्ठ लेखनाला तडकाफडकी नकार द्या’. इथे  अतिगंभीर व ठोकळेबाज काय आहे, याचे उत्तर व्यक्तीगणिक वेगवेगळे असू शकते. गेल्या वीस वर्षांत तसे फारसे लेख साधनामध्ये आल्याचे आठवत नाही. तरीही सूचना योग्य आहे, पण हे ठरवण्याचा अधिकार संपादकांनाच आहे. 

पाचवी सूचना ‘जे विषय अलीकडच्या काळात साधनाने किंवा अन्य माध्यमांनी हाताळले आहेत, त्यांना स्थान देणे टाळा’. ही सूचना एकदम योग्य असली तरी, एखादी घटना खूप मोठा परिणाम करणारी असेल तर त्यावर सर्व माध्यमे आपापले विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. तसेच एखादी घटना एकदम सर्व जगाला ग्रासून टाकणारी असेल तर ते होणारच, जसे सध्या चालू असलेल्या कोरोनापर्वाने घडवून आणले. त्यामुळे ‘इतर माध्यमांनी ते आधीच कव्हर केले म्हणून आम्ही ते टाळावे’ असे म्हणता येणार नाही. करोना संकट इतके लांबत गेले आहे आणि आता त्या चर्चेमध्ये  व्हॅक्सिन आल्याने या चर्चेला वेगळे वळण लागले आहे. पण पूर्वकाळात मास्क वापरा, शक्यतो घरी रहा, बाहेर वावरताना सुरक्षित अंतर राखा, वरच्यावर साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा या सूचना पुन:पुन्हा मांडण्याचा कहर माध्यमांकडून झाला, या सूचना आता नकोत. प्रत्येक टेलिफोन संभाषणापूर्वी हे लांबलचक निवेदन ऐकून सर्वांचे कान किटले आहेत.

केशवरावांचा शेवटचा टोला, ‘संपादक संपादकासारखे वागत नसतील तर अनेक घटक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.’ हे वाक्य तर क्रिकेट मॅचमध्ये शेवटच्या बॉलला सिक्सर मारून मॅच जिंकण्यासारखे वाटले.

रमेश आगाशे, सातारा

----

अव्यक्त मनोकल्पना/मनोधारणा सुखद दर्शन देणार?

दि. 9 जानेवारीच्या अंकातील ‘केशवरावांची तिसरी मुलाखत’ हे संपादकीय वाचले, आवडले. आपल्याच मनाने उत्स्फूर्तपणे उभे राहात, केशवरावांच्या रुपस्वरूपांत आपण आपले तटस्थपणे अवलोकन करण्याचा व त्यापुढे जाऊन आगामी काळासाठी सूचक संकल्प व काहीसे सुधारित धोरण व्यक्त करण्याचा मनोभाव चांगला प्रगट झाला आहे. मला वाटते- आता केशवराव मधूनमधून पुन्हा अवतरणार, तुम्हाला भेटणार व आपल्या अव्यक्त मनोकल्पना, मनोधारणा व अपेक्षा प्रगट होऊन आम्हाला सुखद दर्शन देणार! चांगले आहे.

या निमित्ताने, साधनाने दोन आर्थिक मुद्यांचा समावेश आपल्या धोरणात करून विशेष पाठपुरावा करावा असे वाटते. एक आपले कृषिक्षेत्र, शेतकरी व ग्रामीण भागातील लोक त्रासांत आहेत. पण शेती व शेतकरी यांचा विचार व उपाययोजना आपण तुकड्यातुकड्यांनी करतो आणि तात्पुरत्या मलमपट्ट्या करीत काही तरी केल्याचे समाधान मानत राहतो. त्याऐवजी समग्र विचार करण्याची गरज आहे. शेतीवर मानवी भार किती असावा, इथपासून कुठल्या राज्याच्या कुठल्या क्षेत्रांत कुठले पीक कमी पाण्यात, कमी श्रमात (सेंद्रिय खत- औषधांच्या कमी मात्रेत) जास्तीत जास्त उत्पादन देईल, यासाठी सांगोपांग विचार करून आराखडा तयार केला पाहिजे. यासाठी शेतीतज्ज्ञांचे ऐकले पाहिजे व राजकारण बाजूला ठेवून अर्थकारणाचा विचार केला पाहिजे.  

दुसरा प्रश्न आहे, आजच्या वाढत्या बेकारीचा, ती आता वेगाने वाढणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान, त्यांतून यंत्रांचा वाढता वापर करीत कमी माणसांना रोजगार देत उत्पादनखर्च कमी करायला हवा. असा एकूण सध्याचा कल आहे. यामुळे प्रचंड उत्पादन करण्याचे वेगवान वारे, उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्रांत घोंगावू लागले आहेत. यातून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल. तंत्रज्ञान व विशेष कौशल्य असणाऱ्या थोड्या लोकांना चांगले लाभदायी रोजगार मिळतील. पण मोठ्या प्रमाणात लोकांना काम नाही, रोजगार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत जाईल. अनुदान व भत्ते यावर किती लोकांना किती दिवस भरवणार, असे प्रश्न पुढे ठाकतील. रिकाम्या हातांच्या व अर्धवट पोट भरलेल्यांच्या असंतोषांतून सामाजिक स्वास्थ्य विलयास नेणारे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या बाबतीत तंत्रज्ञांनी, तंज्ज्ञांनी व समाजधुरिणांनी विचारपूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. या कामाला साधनाचा भरीव हातभार लागावा.                                               

अरुण वि.कुकडे, नाशिक

*

9 जानेवारी अंकाच्या संपादकीय मधील केशवरावांनी केलेल्या पाच सूचनांनुसार आपण लेखन प्रसिद्ध करणार असाल तरी आजच्या काळात पर्यावरण, शाश्वत विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी, युवक हे विषय सातत्याने मांडत राहणे गरजेचे आहे. यामुळे सदर प्रकारच्या लेखनाला प्रोत्साहित करावे.

गिरीश घनःश्याम पाटील, जळगाव

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके