डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ग्रामीण साहित्य व दलित साहित्य यांना जोडणारा दुवा म्हणजे भास्कर चंदनशिव. वयाची 75 वर्षे पूर्ण झाली. जवळपास 50 वर्षे ते सातत्याने लेखन करीत आहेत. आयुष्यभर ते एक भूमिका घेऊन जगले व त्याच भूमिकेशी प्रामाणिक राहून त्यांनी लेखन केले. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, भटके या सर्वांचे दुःख, वेदना त्यांनी समाजासमोर मांडल्या. त्यांचेही लहानपण गरिबीमध्ये गेले. तो काळच तसा होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जगण्यापुरते शेतीतून मिळत होते. भास्कर चंदनशिव जेव्हा अंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात शिकत होते, तेव्हा त्यांना चित्र काढण्याचा छंद होता; परंतु कागद, रंग, ब्रश हे खर्चिक होते म्हणून ते लेखनाकडे वळले. रंगांद्वारे नाही, तर शब्दांद्वारे त्यांनी लोकांच्या वेदनेचे चित्र रेखाटले. आजही जेव्हा बाजारात भाव मिळत नाही म्हणून एखादा शेतकरी हताश होऊन टोमॅटो बाजारात टाकून निघून जातो, तेव्हा दहावीच्या अभ्यासक्रमातील त्यांचा ‘लाल चिखल’ धडा आठवतो.

कळीचा प्रश्न : मराठी भाषेने कोणत्या पातळीवर जिवंत राहायचे?

या पत्राला संदर्भ हे तो ‘त्रिभाषा सूत्र’ या विषयावर प्रा.हर्षवर्धन कडेपूरकर यांच्या तीन लेखांचा.

1. इंग्रजी भाषेच्या आक्रमणाच्या आजच्या काळात मराठी असो वा अन्य कोणतीही प्रादेशिक भाषा- शिकली नाही तर अडत नसेल ती कशासाठी शिकायची, असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्याचे समाधानकारक उत्तर सध्या मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

2.  मराठी भाषेबद्दल बोलायचे झाले तर जोपर्यंत ती अन्य भाषिकांना अनिवार्य वाटत नाही किंवा जोपर्यंत ती शिकण्याचे फायदे लक्षात येत नाहीत, तोपर्यंत ती कधीही अन्य भाषिकांत लोकप्रिय होणार नाही. सक्तीने कोणतीही भाषा लोकप्रिय होत नाही.

3. मराठी भाषकच  जर आपल्या भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असतील, तर तिचे भवितव्य फारसे चांगले असणार नाही, हे उघड आहे.

4. ‘मराठी भाषेला वाचवाऽ’ अशा प्रकारची हाकाटी हल्ली पिटली जात आहे. यासंबधी दिवंगत प्रा.अशोक रा.केळकर यांच्या लेखातील काही भाग खूप समर्पक वाटला. तो असा...

कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठी भाषेने कोणत्या पातळीवर जिवंत राहायचे? मराठी ही भारतातील डझन-दीड डझन विकसित भाषांपैकी एक समजली जाते, उद्या ती शेकड्याने मोजता येतील अशा अविकसित भाषांपैकी एक मानली जाऊ लागली, तर कसे? तर ती वाचली ना आपोआप, असे म्हणून समाधान मानायचे? ‘मराठीला वाचवा’ असे केवळ तोंडदेखले आवाहन करणाऱ्या मंडळींचे त्यात समाधान होईलही; पण जे असे आवाहन कळकळीने करीत आहेत, ते यात समाधान कसे मानतील? माणसाच्या जगण्याबद्दल विचार करताना आपण जीवनाच्या गुणवत्तेचा, ‘क्वालिटी ऑव्ह लाइफ’चा विचार करतो, तसाच भाषिक जीवनाच्या गुणवत्तेचा विचार करायला नको का?

वेगळ्या शब्दांत हा मुद्दा मांडायचा तर- मराठी भाषेला का वाचवायची, कशासाठी आणि कुणासाठी- याचा विचार करायला पाहिजे आणि तो विचार प्रादेशिक, भारतीय, जागतिक टप्प्यावर करायला पाहिजे; प्रश्नापासून पळून जाता कामा नये!

मराठी वाचवण्याच्या या सर्वच प्रश्नांचा आवाका किती विस्तृत आहे, याची कल्पना ना आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय नेतृत्वाला असते की जे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काही भरीव काम करू शकतात; ना सामान्य जनतेला असते, ज्यांना या प्रश्नांची दूरगामी झळ पोचणार असते. हा संस्कृत, अरबी-फार्सी, इंग्रजी, हिंदी या सत्तासूचक भाषांना हटवायचा किंवा त्यांचा उदो-उदो करण्याचा मुद्दा नाही, तर आपल्याला ग्रासणारा न्यूनभाव काढून त्या-त्या भाषांचा सदुपयोग करून घेण्याचा आहे. हा केवळ कोणाच्या नोकऱ्या वाचवण्याचा प्रश्न नाही, तर भाषेशी निगडित अशा सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा  आहे. हा केवळ या गल्ल्या-वस्त्यांतून पसरलेल्या प्रजेमध्ये मराठी टिकेल यांवर पोकळ समाधान मानण्याचा मुद्दा नाही, तर मराठीच्या वापराची गुणवत्ता वाढवण्याचा आणि तिची प्रतिष्ठा सुस्थिर करण्याचा आहे. हा महाराष्ट्रातील अ-मराठी महाराष्ट्रीयांवर मराठी लादायचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या प्रादेशिक जीवनाशी त्यांचे नाते मराठीमार्फत जोडण्याचा आहे. हा केवळ जागतिकीकरण लादायचा जे उद्योग करीत आहेत त्यांच्याशी लढण्याचा किंवा त्यांना शरण जाऊन मोकळे होण्याचा प्रश्न नाही, तर इतिहासातून दीर्घ काळ चालत आलेली जागतिकीभवनाची क्रिया आहे तिला सर्वांना अनुकूल व हितकारी वळण लावण्याचा प्रश्न आहे. केवळ आर्थिक-राजकीय परिमाणांवर न विसंबता या क्रियेला इतर परिमाणे कशी लाभतील, हे पाहण्याचा प्रश्न आहे.

टीप- प्रा.केळकरांचा मूळ लेख ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला होता. 

नरेंद्र महादेव आपटे, पुणे

----

संसर्ग टाळण्यासाठी सुंताच आवश्यक आहे असे नाही!

दि. 2 जानेवारीच्या अंकातील अल्ताफहुसेन रमजान नबाब  यांचे ‘सुंता’ या विषयावरील स्वतःच्या अनुभवावर आधारित मनोगत वाचले. लेखकाने स्वत:, भाऊ व आपल्या मुलाच्या सुंता करण्याच्या वेळची अवैज्ञानिक पद्धत, होणारी घालमेल वगैरेंची माहिती वाचून अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. परंतु हे सर्व सुंताविषयीचे तपशील- जे सर्वश्रुत आहेत- पुन्हा कथन करण्याचे प्रयोजन काय, हे कळले नाही. त्याऐवजी लेखक आणि इतर समदुःखी या अघोरी परंपरेच्या, अंधश्रद्धेविरोधात समाजप्रबोधनाचे कोणते प्रयत्न करत आहेत हे सांगितले असते, तर ते लोकशिक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरले असते!

आणखी एक- पुरुषलघवीच्या जागी होणारे संसर्ग टाळण्यासाठी सुंताच करणे आवश्यक आहे असे नाही. आधुनिक जगात त्यासाठी अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. माझ्या एका शहात्तर वर्षांच्या स्नेह्यांना वार्धक्याने त्वचा अशक्त/कोरडी झाल्याने लघवीच्या जागी संसर्ग झाला, त्वचा लाल झाल्याने दुखू लागले. ते त्वचातज्ज्ञाकडे गेले. तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करून व योग्य खबरदारी घेऊन आठवड्याभरात ते संसर्गमुक्त झाले!

गोविंद काजरोळकर, पुणे

----

आजही बाजारात भाव मिळत नाही तेव्हा ‘लाल चिखल’ आठवतो...

दि.13 फेब्रुवारीच्या अंकातील अनिल अवचट यांचा संपादकीय जागेवर प्रसिद्ध झालेला ‘श्यामच्या आईची शिकवण’ हा लेख वाचून परत एकदा ‘श्यामची आई’ पुस्तक वाचल्याचा पुनर्प्रत्यय आला. मानवंदना सदरात आसाराम लोमटे यांचा भास्कर चंदनशिव यांच्यावरील लेख अप्रतिम आहे. ग्रामीण साहित्य व दलित साहित्य यांना जोडणारा दुवा म्हणजे भास्कर चंदनशिव. वयाची 75 वर्षे पूर्ण झाली. जवळपास 50 वर्षे ते सातत्याने लेखन करीत आहेत. आयुष्यभर ते एक भूमिका घेऊन जगले व त्याच भूमिकेशी प्रामाणिक राहून त्यांनी लेखन केले. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, भटके या सर्वांचे दुःख, वेदना त्यांनी समाजासमोर मांडल्या. त्यांचेही लहानपण गरिबीमध्ये गेले. तो काळच तसा होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जगण्यापुरते शेतीतून मिळत होते. भास्कर चंदनशिव जेव्हा अंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात शिकत होते, तेव्हा त्यांना चित्र काढण्याचा छंद होता; परंतु कागद, रंग, ब्रश हे खर्चिक होते म्हणून ते लेखनाकडे वळले. रंगांद्वारे नाही, तर शब्दांद्वारे त्यांनी लोकांच्या वेदनेचे चित्र रेखाटले. आजही जेव्हा बाजारात भाव मिळत नाही म्हणून एखादा शेतकरी हताश होऊन टोमॅटो बाजारात टाकून निघून जातो, तेव्हा दहावीच्या अभ्यासक्रमातील त्यांचा ‘लाल चिखल’ धडा आठवतो.

संतोष निवृत्तीराव लिमकर, कळंब, जि. उस्मानाबाद

----

निर्मला सीतारामन यांनी संधी दवडली!

‘अर्थसंकल्पीय भाषणापलीकडचा अर्थसंकल्प’ हा प्रा.संतोष मुळे यांचा लेख वाचला. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या ताज्या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘चित्रापेक्षा चौकटीवर भर अधिक’ असेच करावे लागेल. ‘जेव्हा सांगण्यासारखं फार काही नसतं, तेव्हा खूप शब्द वापरले जातात आणि जेव्हा खूप काही सांगायचं असतं, तेव्हा मोजकेच शब्द पुरतात’, अशा आशयाचे एक वचन आहे याची आठवणदेखील यानिमित्ताने झाली. अर्थसंकल्पाबाबत devil's in the details अर्थात तपशिलात दैत्य असते, असे कुजबुजत बोलले जाते. अर्थात, जसजसे तपशिलात जाऊ तसतसे यातील दैत्य रूप उलगडायला लागते. वास्तविक, कोणताही अर्थसंकल्प हा अर्थशास्त्रीय कमी व राजकीय अधिक असतो आणि हा अर्थसंकल्पही याला अपवाद नाही. तसे नसते तर पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यांत मुद्दामहून हेतुपूर्वक काही योजनांची रेलचेल अर्थसंकल्पात दिसती ना. त्यामुळे सदर राज्यांची दखल घ्यायचे एरवी तसे काही कारण दृष्टिपथात नव्हते. 2014 नंतरच्या एककल्ली नोटाबंदी आणि घिसाडघाईतील जीएसएटी अंमलबजावणीमुळे आर्थिक पातळीवरील सुधारणांची लय बिघडली ती बिघडलीच. देशातील बेरोजगारी मागील पंचेचाळीस वर्षांच्या उच्चांकी, तर जीडीपी मागील चाळीस वर्षांच्या नीचांकी पातळीवर असताना कथित ‘देवाची करणी’नामक कोरोनाचे संकट देशावर आदळले. त्यातच नियोजनशून्य पद्धतीने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीने देशाला आर्थिक अधोगतीकडे नेण्याची कसूर भरून काढली. हे सारे निस्तरायचे, तर देशात प्रथम आर्थिक सुधारणा आक्रमकपणे राबवण्याबरोबरच देशांतर्गत उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे गरजेचे. यातील एक न करता दुसरं होणार नाही, हे वास्तव आसतानाही ती संधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ताज्या अर्थसंकल्पात दवडली.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

----

मनावरचं शेवाळं अलगद उचललं आणि नितळ पाणी दिसलं...

प्रिय अनिल,

तुझा ‘साधना’मधील संपादकीय जागेवर प्रसिद्ध झालेला ‘श्यामची आईची शिकवण’ हा लेख वाचला. (साधना 20 फेब्रुवारी) श्यामची आई नव्यानं भेटली. लहानपणी वाचलेली ‘श्यामची आई’ व त्यातला श्याम यांनी भुरळ पाडली होती, पण ती वेगळ्या कारणानं! आईची माया, त्याच्या पायाला माती लागू नये म्हणून तिने घेतलेली काळजी, श्यामची आई सिनेमा पाहताना तो बैलगाडीतील सीन, ‘घनदाट रानी वाहे झुळू झुळू पाणी’ हे गाणं... त्या वेळी त्यांची गरिबी व वास्तवाचे चटके तेवढे जाणवलेही नाहीत, कारण कदाचित आमच्या घरात मध्यमवर्गी चणचण होती पण चटके नव्हते! तुझा लेख वाचताना जाणवलं- आपल्याही भोवती अशा मथुरा, रेणू होत्या, पण आपण त्यांची दखलही घेतली नव्हती.

‘श्यामच्या आई’ची नव्यानं ओळख करून दिल्यानं मनावरचं शेवाळं अलगद उचलल्यावर खालचं नितळ पाणी दिसावं असं झालं.

शुभा थत्ते,  ठाणे

----

त्यांनी साहित्यप्रेमींना केलेले आवाहन फलद्रूप व्हावे...

दि.23 फेब्रुवारीच्या साधनामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केलेले अध्यक्षीय भाषण वाचले आणि अस्वस्थ झालो.

भाषण कमालीचे विचारप्रवर्तक व काळजाला भिडणारे आहे. आजच्या भीती व दडपशाहीने प्रभावित झालेल्या तरुण, मध्यम व वृद्ध समाजाचे मनस्वी चित्रण केले आहे. भविष्याचा वेध घेणारे हे चिंतन सासणे यांच्या व्यापक विचारविश्वाचे नवनीत आहे. आजच्या मराठी साहित्यात सामान्य माणसाचा चेहरा हरवलेला आहे, हे त्यांचे अचूक निरीक्षण वास्तववादी आत्मचिंतनाला प्रवृत्त करणारे आहे.

भर्तृहरीचा संदर्भ देत दिवस-रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या-पांढऱ्या पटावर स्त्री-पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्याचा प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वत:च बघत रमत बसला आहे. स्वत: काळच कर्ता आणि भोक्ता असेल, सामान्य माणूस कोण आहे? साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, द्यावं लागणार आहे, असं मार्मिक विश्लेषण श्री.सासणे करतात.

तसेच यंत्रयुग-तंत्रयुग-अणुयुग व सध्या भ्रमयुगातून जात असल्याचे सांगतात. सर्वसामान्य माणूस संमोहित झाल्याचे, त्याची वाचा हरवली आहे, अबोध दहशत-भीती-आतंक त्याच्या जगण्याला लपेटून राहिली आहे, त्याबद्दल साहित्याने बोलणे त्यांना अपेक्षित आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनीच अनुवादित केलेल्या ‘दंतकथा’ या लघुकादंबरीत खाटकाच्या हल्ल्याच्या दहशतीने धास्तावलेल्या कोंबड्याचे अखेरचे मनोगत अंतर्मुख करणारे व प्रेरणा देणारे आहे. सत्याचा सूर्य उगवतच राहणार आहे, त्याला सलाम करून आरवण्याचे काम निर्भयतेने करण्याचे साहित्यिकांकडून अपेक्षित आहे- असा बहुमोल आशावाद त्यांनी प्रकट केला आहे. देश-परदेशातील मराठीप्रेमी जनांनी असे प्रासंगिक संवाद आयोजित करावेत, अशीही रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अशा भाषणाने माझ्यासारख्या (वय 92 वर्षे) तीन पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या वाचकाला केशवसुतांची तुतारी ऐकू आली. वि.स.खांडेकरांचा ध्येयवादी नायक आठवला. तसेच तेंडुलकरांची रांगडी चंपा व नारायण सुर्वेंची पतीला पत्र लिहून ‘घराबाहेर जाऊ का, ते कळवा’ असा रोखठोक प्रश्न करणारी पत्नी आठवली. दया पवार, नामदेव ढसाळ यांसारखा दलित साहित्यिकांनी पीडितांची खोल व्यथा मांडणारे लिहिलेले साहित्य वाचनात आले. आज असे साहित्य दुर्मिळ झाले आहे, अशीच खंत सासणे यांनी प्रांजळपणे व्यक्त केली आहे. भारत सासणे यांनी साहित्यप्रेमींना केलेले आवाहन फलद्रूप व्हावे, ही शुभेच्छा.

भालचंद्र आपटे, अहमदनगर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके