डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यंदाचा 'साधनाचा अंक विशेष असेल असे पाहताक्षणी वाटले होते, परंतु अत्यंत निराशा झाली. 'विषमता आणि वैरभाव मिटविणे' हे जीवनध्येय असलेल्या साने गुरुजींच्या 'साधना'ला तुम्ही कुठेही न्याय दिला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एवढा विषय आज सर्वसमाजाला अस्वस्थ करत आहे. त्यावर आपल्या 'साधना' दिवाळी अंकात फक्त एक कविता 'प्रतिक्रिया' नावाची आहे. आपल्याला ह्या प्रश्नाने काहीच अस्वस्थ केले नाही, असे समजावे काय? साने गुरुजींनी सामाजिक वेदना मांडण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आपण अत्यंत फालतू विषयांसाठी वापरत आहात, हे दिवाळी अंकाची अनुक्रमणिका पाहताच कळून चुकते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याकडून परिसंवाद, लेख; मार्गदर्शन होईल असा अंक अपेक्षित होता.

माझ्या मनाला खटकले...

गेल्या महिन्यात 'सह्याद्री' वाहिनीवर साधना साप्ताहिकाच्या संपादकांची मुलाखत पाहिली. त्यात प्रथमपासून शेवटपर्यंत कोठेच साधना प्रेसचा उल्लेखही नसावा हे माझ्या मनाला खटकले आणि म्हणून या पत्राचा प्रपंच!

सुरुवातीपासून साधना ट्रस्टच्या (प्रेस, प्रकाशन, साप्ताहिक) या तीन शाखा मानल्या जात होत्या. मुंबईत आर्थिकदृष्ट्या साधना प्रेस चालविणे अशक्य झाले, म्हणून तो प्रेस पुण्यात हलविण्याचा निर्णय झाला साधना प्रेस मुंबईहून पुण्यात आला त्यावेळी मशिनरी उतरवून घेऊन ती चालू होईपर्यंतची जबाबदारी यदुनाथ थत्ते यांनी श्री.हरिभाऊ गद्रे यांच्या संमतीने माझ्यावर टाकली होती. पुण्यात शनिवार पेठेत पुरंदरे वाड्यात साधना प्रेस नियमित सुरू झाल्यानंतर माझी जबाबदारी मी पूर्ण केली.

त्यानंतर साधना प्रेसच्या नियुक्त व्यवस्थापकांनी त्यांच्या कारकिर्दीत साधना प्रेसला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आणि नंतर प्रेस पुरंदरे वाड्यातून शनवारातच सरदार बिवलकर यांच्या वास्तूत स्थलांतरित झाला. त्यामुळे प्रेस प्रकाशन, साप्ताहिक या तिन्हीला भरपूर जागा उपलब्ध झाली.

12 जुलै 1961 रोजी साधना ट्रस्टची मिटींग मुंबईत होती, त्यासाठी प्रेस व्यवस्थापक, प्रकाशन व्यवस्थापक, साधना ट्रस्ट सेक्रेटरी व साधना साप्ताहिकाचे संपादक श्री.यदुनाथ थत्ते सर्वजण मुंबईत होते.

तो दिवस पुणेकरांच्या दृष्टीने घातक ठरला! अचानक पानशेत धरण फुटल्याने पाण्याने रौद्ररूप धारण करून पुण्यात हाहाकार उडवून दिला. साधना प्रेसच्या आवारात पुराचे पाणी यायला लागल्याने, तेथील कामगारांनी जनवाणी प्रेसमध्ये मदतीसाठी निरोप पाठविला, म्हणून मी तेथील तीन-चार लोकांना घेऊन साधनात मदतीसाठी गेलो.

मशीनखात्यात असलेली कागदाची रिमे आम्ही पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये नेऊन ठेवेपर्यंत, साधनाच्या चौकात घोटाभर पाणी झाले. प्रत्येकालाच घराची चिंता लागल्याने व क्षणाक्षणाला पाणी वाढत असल्याचे पाहून सर्वांनी तेथून काढता पाय घेतला. शेवटी मी एकटाच राहिलो. मशीनखात्याच्या दरवाजाला कडी लावेपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी वाढले. तशा परिस्थितीत रस्त्यावर येणे पाण्याच्या ओढीने शक्य न झाल्याने, पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये जाऊन थांबलो. दुपारी 4 वाजेपर्यंत पहिल्या मजल्यापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने मला मशीनखात्याच्या पत्र्यावर चढून बसावे लागले. त्यानंतर संपूर्ण रात्रभर मला एकट्याने पत्र्यावर काढावी लागली. सकाळी उजाडल्यानंतर पुरामुळे झालेल्या परिस्थितीची खरी कल्पना आली. माझ्या दृष्टीने तेथील दुसरा दिवस हा माझा पुनर्जन्माचा ठरला! दुसऱ्या दिवशी सकाळी चिखलातून बाहेर पडून घरी जाईपर्यंत दुपारचे दोन वाजले!

पुरानंतर जवळजवळ तीन-चार महिने साधना प्रेस चालू होण्यात गेले. पुरानंतर साधना प्रेसच्या व्यवस्थापकांनी राजीनामा दिल्या कारणाने यदुनाथ थत्ते यांनी साधना प्रेसच्या व्यवस्थापकपदी माझी नियुक्ती केली. पुरानंतर 1961 साल अखेरपर्यंत आम्ही अहोरात्र कष्ट करून साधना प्रेस पुन्हा प्रगतीपथावर आणण्यात यशस्वी झालो. माझ्या बरोबरीने त्यावेळी साधना प्रेसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचे प्रयत्न कारणीभूत ठरले. साधना प्रेसला आणि साप्ताहिकाला महाराष्ट्र राज्यातर्फे प्रथम क्रमांकाची पारितोषिके प्राप्त झाली, या पाठीमागेसुद्धा साधना प्रेसच्या कामगारांचा सिंहाचा वाटा आहे.

विद्याभाऊ पटवर्धन, 705 शुक्रवार पेठ, पुणे 411002.
----
अत्यंत निराशा झाली!

यंदाचा 'साधनाचा अंक विशेष असेल असे पाहताक्षणी वाटले होते, परंतु अत्यंत निराशा झाली. 'विषमता आणि वैरभाव मिटविणे' हे जीवनध्येय असलेल्या साने गुरुजींच्या 'साधना'ला तुम्ही कुठेही न्याय दिला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एवढा विषय आज सर्वसमाजाला अस्वस्थ करत आहे. त्यावर आपल्या 'साधना' दिवाळी अंकात फक्त एक कविता 'प्रतिक्रिया' नावाची आहे. आपल्याला ह्या प्रश्नाने काहीच अस्वस्थ केले नाही, असे समजावे काय? साने गुरुजींनी सामाजिक वेदना मांडण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आपण अत्यंत फालतू विषयांसाठी वापरत आहात, हे दिवाळी अंकाची अनुक्रमणिका पाहताच कळून चुकते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याकडून परिसंवाद, लेख; मार्गदर्शन होईल असा अंक अपेक्षित होता.

उत्तम चव्हाण, अष्टविनायकनगर, हिंगोली.
----
दुष्ट प्रवृत्तींशी लढणे आवश्यक आहे म्हणून...

कल्याणच्या राष्ट्रसेवा दलातील सैनिक प्रभाकर गोडसे यांनी सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिरास दिलेल्या देणगीतून 'पुष्पा गोडसे पुरस्कार' रु. 5000/- सिद्ध झाला आहे. प्रभाकर गोडसे यांचे म्हणणे असे की माझ्या आडनावाच्या एका व्यक्तीने महात्मा गांधींचा खून करून, भारताला जगापुढे आपली मान खाली करायला लावली. परंतु मोठेपणी वाटू लागले की, ह्या दुष्ट प्रवृत्तीशी सतत लढणे आवश्यक आहे. ह्यासाठी विधायक कार्य आणि संघर्ष करून सतत ह्या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या दिवंगत पत्नीच्या नावे, दरवर्षी पुरस्कार देऊन त्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी.

हा पुरस्कार यंदा पुण्याचे रहिवासी राष्ट्र सेवादलाचे महामंत्री श्री.सुरेश देशमुख यांना साने गुरुजी आरोग्य मंदिराने जाहीर केला. प्रजासत्ताक दिनाला सकाळी झेंडावंदनाच्या वेळी सागे गुरुजी आरोग्य मंदिराच्या प्रांगणात ह्या पुरस्काराचे वितरण शिरोळच्या दत्त सहकारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व साधनाचे कार्यकारी विश्वस्त श्री.आप्पासाहेब सा.रे.पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

श्री.सुरेश देशमुख पुणे महानगपालिकेत बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांनी स्वखुशीने निवृत्ती स्वीकारली आणि राष्ट्र सेवादलाचे सर्ववेळ सेवक झाले. राष्ट्र सेवादलाने त्यांच्यावर पुण्याच्या 'साने गुरुजी स्मारकाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपविली होती. त्यांनी ह्या कामाचे सोने केले. ह्या स्मारकासाठी एक कोटी रुपये जमवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला. त्यांनी साने गुरुजी स्मारक दृष्ट लागेल इतके सुंदर केले आहे.

(सविस्तर वृत्तांत पुढील अंकात)

-लीलाधर हेगडे
----
उगाच हमी देऊ नये!

अलीकडे साधना साप्ताहिकात श्री.गोविंद तळवलकर सी.आय.ए.च्या फायलींमधील माहितीच्या आधारे भारतीय कम्युनिस्ट चळवळ, सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीची कशी गुलाम होती; हे अधिकारवाणीने सांगत आहेत व 'साधना'चे भोळेभाबडे वाचक आपल्याला ब्रह्मज्ञान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत आहेत.

वास्तविक, भारतातील समाजवाद्यांनी हे सत्य 60 वर्षांपूर्वीच मांडले होते. आपल्या वाचकांना आपण श्री.अशोक मेहता, मधु लिमये, केशव गोरे आदींची पुस्तके वाचावयास सांगावे; म्हणजे हे सत्य समजण्यास अमेरिका गुप्तहेर खात्याची आवश्यकता नाही हे त्यांना कळेल. तसेच एक विनंती. आपण श्री.तळवलकरांना सी.आय.ए.च्या ग्वायना, ग्वाटेमाला, निकाराग्वा, क्युबा, चिली आदी दक्षिण अमेरिका देशांतील कारवायांवरही प्रकाश पाडण्यास सांगावे.

श्री.दत्ता वांद्रे यांचे अजित अभ्यंकरांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचले. 'तळी उचलणे' हा शब्दप्रयोग एखाद्याच्या गैरकृत्याचे समर्थन केल्यास वापरतात हे श्री. वांद्रे यांच्या लक्षात नसावे. तसेच सध्याच्या जागतिकीकरणाचा अर्थ अमेरिकी व पाश्चात्त्य देशांच्या नेतृत्वाखालील जागतिकीकरण होय. पाश्चात्त्य राष्ट्रातील नेतृत्वाच्या डोक्यात एकोणिसाव्या शतकातील व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशियन क्रांती होईपर्यंत असलेले "White Mans Burden" चे भूत आहे. श्री.वांद्रे यांनी 28 एप्रिल 2002 च्या 'जनता' या इंग्रजी साप्ताहिकातील The New Liberal Imperialism हा लेख वाचला नसल्यास अवश्य वाचावा.

पं.नेहरूंनी अलिप्त राष्ट्र संघटना उभी केली हे खरे; परंतु त्याच नेहरूंच्या वारसदारांनी या संघटनेच्या एका संस्थापक राष्ट्राचे युगोस्लाव्हिया (पश्चिम जर्मनी, अमेरिका व अन्य पश्चिम युरोपीय देशांच्या चिथावणीवरून) तुकडे झालेले मख्खपणे पाहिले. काँग्रेस पक्षाच्या सरकारातील नेते व आर्थिक धोरण ठरविणारे अहलुवालियांसारखे वर्ल्ड बँकेच्या व इंटरनॅशनल मोनेटरी फंडात काम करीत होते. त्यांना अजूनही डॉलरमध्ये निवृत्तीवेतन मिळत असेल. अशा नेतृत्वाकडून स्वतंत्र बाण्याची अपेक्षा करणे कठीणच.

तरी श्री.वांद्रे यांना विनंती की, सोनिया गांधी, सज्जन डॉ.मनमोहनसिंग अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार नाहीत, याची उगाच हमी त्यांनी देऊ नये. अजूनही इराणबरोबरचा नैसर्गिक वायुसंबंधीचा करार आपण करीत नाही, उलट पाकिस्तान व इराणची बोलणी शेवटच्या टप्प्यात आहेत. याबाबतीत कोणाचा दबाव येत आहे, हे सांगण्याची गरज नाही.

भालचंद्र राजे 'गंगाधाम', पुणे 411037.
----
सेलूसारख्या छोट्या गावात...

आम्ही चालवलेल्या वाचन संस्कृती अभियानाचा अहवाल देत आहोत.

महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने विकसित होईल, असा विचार करून सेलू शहरात वेगवेगळ्या भागात चालणाऱ्या ज्ञानोदय, अंत्योदय, मुक्तद्वार, स्वाध्याय या ग्रंथालयाच्या शाखांवर महिला ग्रंथपालांची नेमणूक करून त्यांच्या सहकार्याने घरोघर जाऊन, महिलावाचक सभासदांची नोंदणी केली. पुस्तके घरपोच मिळतील अशी व्यवस्था केल्यामुळे प्रत्येक शाखेवर 30 ते 35 महिला वर्गणीदार झाल्या. काय वाचावे, कसे वाचावे या संदर्भात वाचकांना दिशा मिळावी, म्हणून मुख्य ग्रंथालयात महिन्यातून एक कार्यक्रम घेण्याचे ठरले.

11 नोव्हेंबर 2006 रोजी वाचन संस्कृती अभियानाची रितसर सुरुवात करण्यात आली. अभियानाचे उद्घाटन ज्येष्ठ सर्वोदय नेते गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या हस्ते झाले. 'लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत विनोदी लेखक डॉ.आनंद देशपांडे, बाल नाटककार रेणु पाचपोर, कवी अविनाश साळापुरीकर या लेखकांचा लेखनामागील माझी भूमिका' या विषयांवर संवाद रंगला.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 'अग्निपंख' व 'भारत 2020' या बहुचर्चित पुस्तकांवर झालेल्या चर्चेत युवक-युवतींचा सहभाग अधिक होता. 'व.पु.काळे यांच्या कथा' या विषयावर महिला वाचकांनी मांडलेली मते अंतर्मुख करणारी होती. 'प्राचार्य वासुदेव मुलाटे' यांच्या साहित्यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी स्वत: लेखक श्री.मुलाटे यांनी लेखकांच्या जाणीवांच्या संदर्भात केलेले विवेचन मार्मिक होते.

वाचन संस्कृती अभियानाचे सहावे पुष्प आजची वृत्तपत्रे' या विषयावर गुंफण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार डी.व्ही.मुळे यांनी आजची वृत्तपत्रे ध्येयवादापेक्षा व्यावसायिकतेकडे कशी झुकत चालली आहेत, हे सोदाहरण स्पष्ट केले. 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकाचे लेखक डॉ.अभय बंग यांच्या ध्वनिमुद्रित व्याख्यानाची कॅसेट वाचकांना ऐकवण्यात आली.

आठवे पुष्प 'माझे आवडते नियतकालिक' या विषयावर गुंफले गेले. प्राचार्य डी.आर.कुलकर्णीसरांनी 'साधना' या नियतकालिकाची ध्येयवादी वाटचाल विशद केली. इतर वाचकांनी आपापल्या आवडत्या साप्ताहिकाची वैशिष्ट्ये सांगितली. वाचन संस्कृती अभियानाचे, नववे पुष्प युवकांच्या आग्रहावरून शिव खेरा यांच्या प्रेरणादायी पुस्तकावर आयोजित करण्यात आले होते. 'आजादी से जीओ' ही सीडी वाचकांना दाखविण्यात आली. नाट्यकलाकार श्री.अनिल कुलकर्णी व सौ.रोहिणी कुलकर्णी यांनी सादर केलेले साभियन नाट्यवाचन सर्वांची मने जिंकणारे ठरले.

अकरावे पुष्प होते 'पुस्तक प्रदर्शनाचे', ग्रंथालयात नव्याने दाखल झालेली पुस्तके हाताळण्याची संधी जिज्ञासू वाचकांना मिळाली. वाचन संस्कृती अभियानामुळे पुस्तकांकडे वाचक अधिक शोधक नजरेने पाहात असल्याचे दिसून आले. बारावे पुष्प 'दिवाळी अंका'वर गुंफण्यात आले. वाचकांनी 'मला आवडलेला दिवाळी अंक' या विषयावर आपले विचार मांडले.

अशा प्रकारे वाचन संस्कृती अभियानांतर्गत प्रत्येक महिन्यात एक असे एकूण बारा कार्यक्रम वर्षभरात झाले. यात अगदी पहिल्यांदाच एखाद्या विषयावर व्यासपीठावरून बोलण्याची संधी लाभलेल्या वाचकांची संख्या अधिक आहे. साधनाने प्रकाशित केले की वाचन संस्कृती अभियान विशेषांक यासाठी दिशादर्शक ठरले.

या प्रत्येक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष सेलूभूषण अ‍ॅड्. वसंतराव खारकर होते. त्यांनी प्रत्येक वेळी यथोचित समारोप करून, वाचकांना अधिक चांगल्या पुस्तकांचे वाचन करण्यासाठी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहचिटणीस व संयोजक प्रा.डॉ.गंगाधर गळगे यांना ग्रंथपाल श्री.महादेव आगजाळ, साहाय्यक श्री.पंडित जगाडे, लिपिक श्री.विलास शिंदे व सेवक श्री.संतोष काष्टे या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.

ग्रंथालयाचे चिटणीस प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सल्लागार डी.आर.कुलकर्णी सर यांचे मागदर्शन उपयुक्त ठरले. या वर्षभरात अनेक लेखक, कवी, समीक्षक, कथाकार व कलाकारांनी वाचन संस्कृती अभियानात उपस्थिती लावून जो सहभाग नोंदविला, तो सेलूसारख्या छोट्या गावात अभूतपूर्व होता.

प्रा. डॉ.गंगाधर गळगे सहसचिव/संयोजक, वाचन संस्कृती अभियान.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके