डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 14 ऑगस्टच्या अंकातील मतीन भोसले यांचे ‘अस्वस्थ वर्तमान’ खिन्न करणारे आहे. आजच्या या तथाकथित विकासाच्या वाटेने धावणाऱ्या सरकार, प्रशासन व एकूणच व्यवस्थेविषयी संताप आणणारे आहे. या तथाकथित विकासाच्या योजनांना सम्यक, समतोल आर्थिक विकासाचे रूप नसेल, तर महत्प्रयासांनी उभी केलेली, राहिलेली खऱ्याखुऱ्या विकासाची रोपटी/बेटे चिरडून उद्‌ध्वस्त होतात, यांचे हे मन सुन्न करणारे ज्वलंत उदाहरण आहे. बुलडोझर केवळ प्रश्नचिन्ह या आश्रमशाळेवर फिरलेला नाही, तर गरीब फासेपारधी चिमुकल्यांच्या  जगण्यातल्या सुखस्वप्नांवर, विकासावर बुलडोझरने घाला घातला आहे!

धार्मिक हिंदू उदारमतवादी असू शकत नाहीत, असा तुमचा समज आहे का?

दि.28 ऑगस्ट 2021 चा ‘धर्माने मला काय दिले?’ हा विशेषांक विचारप्रवर्तक आहे. अंकाच्या पृष्ठसंख्येची मर्यादा लक्षात घेऊनही एक मोठी त्रुटी चटकन मनात भरते. ज्यांना ‘धार्मिक हिंदू’ म्हणता येईल, अशा कोणाचाही लेख या अंकात नाही. लेखक उदारमतवादी असावेत हा तुमचा आग्रह योग्यच आहे. पण फादर आणि रेव्हरंड अशा व्यक्तींची निवड करताना धार्मिक हिंदू उदारमतवादी असू शकत नाहीत, असा तुमचा कुठे तरी समज झाला असावा.  सर्वच लेखकांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यातले काही विशेष लक्षात राहण्याजोगे आहेत. रेव्हरंड चित्रलेखा जेम्स म्हणतात, ‘मी अंधश्रद्धांना आणि भोंदूगिरीला थारा देत नाही.’ पुढे त्या सवाल करतात, ‘स्त्री-पुरुष समानता ही जर बायबलमध्ये आहे, तर चर्चमध्ये किंवा प्रत्यक्ष समाजात का दिसत नाही?’ 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सहभागी झाल्यानंतर त्यांना चर्चमधल्या जातीयवादाची माहिती झाली याची कबुली त्या देतात.

डॅनिअल मस्करणीस या तरुणाने सातत्याने साधनामध्ये पुरोगामी विचार मांडलेले आहेत. विवेक मंचामुळे त्यांना धर्माने काय चुकीचे दिलेय हेही उमजू लागले. आपल्या पूर्वजांचे ख्रिस्ती धर्मांतर हे स्वेच्छेने नाही, तर सक्तीचे होते हा एक क्लेशदायक इतिहास त्यांनी समजून घेतला. धर्मचिकित्सेच्या आधारे त्याचा सामाजिक जीवनातला प्रभाव कमी करणे खूप गरजेचे झाले आहे, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

इस्लामपासून अनभिज्ञ असणारे सर्वाधिक मुसलमानच आहेत, या मानवेंद्र रॉय यांच्या वक्तव्याशी फ.म. शहाजिंदे सहमत होतात आणि इस्लामचे संवादस्वरूप लोप पावून त्याला हट्टाग्रहाचे स्वरूप आल्याची कबुली देतात. सामाजिक चळवळीत आल्यानंतर रझिया पटेल यांना पहिला संघर्ष धर्माच्या नावाने दडपशाही करणाऱ्यांशी करावा लागला, हे सत्य त्या वाचकांसमोर ठेवतात. मुस्लिम समाजात अंधश्रद्धांचा प्रसार आणि शोषण वाढवण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धर्माचा हातभार आहे, हे शमसुद्दीन तांबोळी यांचे निरीक्षण परखड आहे. हिंदू धर्मात अशा प्रकारच्या अत्यंत परखड आणि निर्भीड चिकित्सेची मोठी परंपरा आहे. सर्वच धर्मांची अशा प्रकारची चिकित्सा समाजासाठी आवश्यक आहे. त्या दृष्टीने साधनामधले हे लेख आश्वासक वाटतात. त्या मानाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या लेखनात पुरेसा प्रांजळपणा नाही. स्वतःच्या धर्माची महती गाताना (तो त्यांचा अधिकार आहे), मदर तेरेसा यांच्या तथाकथित ‘चमत्कारांविषयी’ त्यांनी उघडपणे घेतलेली अ-वैज्ञानिक भूमिका ते सोईस्करपणे विसरतात. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड धर्माचे परिमाण न लावता झाली असे म्हणताना, या पदापर्यंत पोहोचण्याच्या मुळाशी माझ्या धर्माचीच प्रेरणा आहे, हेही ठासून सांगतात.

एरवी वैज्ञानिक भूमिका घेणाऱ्या दत्तप्रसाद दाभोळकरांनी सुरुवातीलाच ‘विज्ञान आणि धर्म’ हे दोघेही म्हटले तर चूक आणि म्हटले तर बरोबर! असे अघळपघळ विधान केले आहे. विज्ञान कसे चूक आहे याबाबत त्यांनी काही प्रबोधन केले असते तर बरे झाले असते. डीएनए चाचणी न करता कोणाला पिता-पुत्री या नात्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो त्यांनी ठेवावा. काही अपवाद वगळता नेहमी तसेच होत असते. त्यात विज्ञानाने स्वीकारण्यासारखे किंवा नाकारण्यासारखे काही नाही. तीच गोष्ट हमीद दाभोलकर यांच्या लेखाविषयी. ‘विज्ञानाचा धर्म’ हा शब्दप्रयोग एक वेळ लाक्षणिक अर्थाने समजून घेता येईल. पण ‘धर्माचे विज्ञान’ म्हणजे काय? असे शब्दप्रयोग संभ्रम निर्माण करतात आणि सामान्यांना भुलवण्यासाठी वापरले जाण्याचा धोका असतो. एकूण विचाराला खाद्य देणाऱ्या साधनाचे आभार.

सत्यरंजन खरे, मुंबई

----

निधर्मीपणाचे स्तोम न माजवता वस्तुनिष्ठ विचार आवश्यक!

दि.28 ऑगस्टच्या अंकातील ‘धर्माने मला काय दिले?’ या विषयावरील विविध लेखांचा आणि त्यातील विचारांचा माझ्या मते अल्पशिक्षित वा निरक्षर नागरिकांना धर्म काय देतो किंवा देत नाही याबद्दलचा विचार करणे अतिशय गरजेचे आहे. समाजातील या वर्गासाठी (या वर्गात महिला जास्त असाव्यात असे वाटते) ‘धर्म ही अफूची गोळी’ असू शकते, किंबहुना असतेच. या जनतेचे अज्ञान आणि त्याचा गैरफायदा करून घेणारे राजकीय पुढारी आणि धर्ममार्तंड यांच्याशी मुकाबला कसा करायचा हा अधिक गंभीर प्रश्न आहे. आणि माझ्या मते धर्माने मला काय दिले, या विषयावरील चर्चा अधिक व्यापक व्हावी ते वाटत असेल तर धर्माचे सर्वसामान्यांच्या जीवनातील स्थान काय असते हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू असला पाहिजे.

या विषयावर सुचलेले आणखी काही विचार : 1. सुशिक्षित व्यक्तीला धर्म शहाणा करू शकतो किंवा माथेफिरूपण करू शकतो. कसेही असले तरी धर्माचे आपल्या जीवनातील स्थान नाकारून काहीच साध्य  होणार नाही हे उघड आहे. म्हणूनच एखाद्याच्या निधर्मीपणाचे अवास्तव स्तोम न माजवता वस्तुनिष्ठ विचार करणे जरुरीचे आहे. 2. एखादी व्यक्ती तिच्या वा त्याच्या खाजगी आयुष्यात धर्माला खूप महत्त्व देत असली/असला तरी त्या व्यक्तीचे समाजभान प्रखर असू शकते. त्यामुळे धर्माच्या प्रभावाबद्दल सरसकट विधाने करणे संयुक्तिक नसते.

नरेंद्र महादेव आपटे, पुणे

----

मोठ्यांचा विकास छोट्यांच्या सुविधा उद्‌ध्वस्त करूनच होणार आहे का?

दि. 14 ऑगस्टच्या अंकातील मतीन भोसले यांचे ‘अस्वस्थ वर्तमान’ खिन्न करणारे आहे. आजच्या या तथाकथित विकासाच्या वाटेने धावणाऱ्या सरकार, प्रशासन व एकूणच व्यवस्थेविषयी संताप आणणारे आहे. या तथाकथित विकासाच्या योजनांना सम्यक, समतोल आर्थिक विकासाचे रूप नसेल, तर महत्प्रयासांनी उभी केलेली, राहिलेली खऱ्याखुऱ्या विकासाची रोपटी/बेटे चिरडून उद्‌ध्वस्त होतात, यांचे हे मन सुन्न करणारे ज्वलंत उदाहरण आहे. बुलडोझर केवळ प्रश्नचिन्ह या आश्रमशाळेवर फिरलेला नाही, तर गरीब फासेपारधी चिमुकल्यांच्या  जगण्यातल्या सुखस्वप्नांवर, विकासावर बुलडोझरने घाला घातला आहे!

प्रश्न असा पडतो की, समृद्धी महामार्गाला थोडे वळण देऊन या आश्रमशाळेला वळसा घालून पुढे नेऊन आश्रमशाळा वाचवण्याचा विचार का केला गेला नाही? 12 वर्षांच्या प्रयत्नांतून साकारलेले, समाजातल्या गरीब, दुर्लक्षित 486 विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन फुलविणारे शिक्षण देणारे विद्यामंदिर जमीनदोस्त करणाऱ्यांना कुठला आणि कोणाचा विकास साधायचा आहे? बरं, तुमचे सारे बरोबर आहे म्हटले तरी ही आश्रमशाळा पाडण्यापूर्वी, तेथून शक्य तितक्या जवळ तशी तेवढी इमारत व जागा  बांधून देण्याची व्यवस्था करणे आणि ते शक्यच नव्हते तर, त्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ पुरविणे- पाडणारांचे कर्तव्य नाही का? उत्तरदायित्व नाही का? का मोठा विकास छोट्या गरिबांच्या विकासाच्या सोईसुविधा उद्‌ध्वस्त करूनच उभा राहणार आहे? पण काय करणार, सत्ताशक्तीच्या बुलडोझरपुढे व्यक्ती, संस्था यांचा शक्तिहीन क्रोध कोलमडून पडतो. सारेच कठीण आहे! पण मतीन भोसले यांची विजिगीषू जिद्द मोठी आहे, कौतुकास्पद आहे. त्यांच्या बळकट समर्थ हातांना आपण अल्प असला तरी होईल तेवढा हातभार लावणे, एवढेच आता आपल्या हाती आहे.

अरुण वि. कुकडे, नाशिक

----

साधनाच्या 73 वर्षांच्या यशाचे खरे कारण ‘ते’ आहे!

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दि. 21 ऑगस्टचा साधना अंक हाती आला. कोणतेही मासिक असो वा साप्ताहिक, सुरुवात नेहमी संपादकीयाने आणि पुस्तक असेल तर लेखकाच्या मनोगतानेच करायची, याची सवय स्वत:स लावून घेतली आहे. कारण यामुळे त्या साहित्याशी नाळ जुळायला मदत होते.

या अंकातील संपादकीय वाचत असताना 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकास 73 वर्षे पूर्ण झाली हे समजले. परमपूज्य साने गुरुजींपासून आतापर्यंतच्या सर्व संपादकांनी अनेक लेखक व हितचिंतकाच्या साह्याने, ‘स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधनां। करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधनां॥’ हे ब्रीद अंगी बाळगून गेली 73 वर्षे समाजप्रबोधनाचा हा यज्ञ अविरतपणे तेज:पुंज ठेवला आहे. दरम्यानच्या कालावधीत अनेक स्थित्यंतरे आली, नवी आव्हाने समोर आली- पण थकता न थांबता हा लामणदीप अखंडपणे तेवत राहिला आहे. अगदी कोविड-19 हे वैश्विक संकटसुद्धा यास रोखू शकले नाही. याचे सारे श्रेय साधना परिवारास जाते.

माझा साधना परिवाराशी संबंध गेल्या सात-आठ वर्षांचा, पण विषयांची विविधता, लेखांची निवड व दांभिकपणावर सडेतोडपणे झणझणीत अंजन घालणारे संपादकीय हे माझ्या विशेष आवडीचे भाग. साधना नेहमीच समाजातील दांभिकतेचा बुरखा फाडताना कचरला नाही किंवा वंचित, शोषितांचा आवाज बनताना मागे हटला नाही. हेच गेल्या 73 वर्षांच्या यशाचे खरे कारण आहे असे मला वाटते. 74 व्या वर्षांत पदार्पण करताना नवनवीन विषयांसह येणारा साधना अंक हा माझ्या परिवारातील एक अविभाज्य घटक असेल हे मात्र नक्की.

अजय काळे, तासगाव, सांगली

----

महादेवभाई आमच्या विस्मरणात कसे गेले, हे एक आश्चर्यच!

दि. 21 ऑगस्टच्या अंकातील रामचंद्र गुहा यांचा ‘गोष्ट विस्मरणात गेलेल्या थोर गांधीवादाची’ हा लेख वाचला. ऑगस्ट महिन्याचे औचित्य साधून देशासाठी प्राणार्पण  करणाऱ्या देशभक्तांचे स्मरण करणारा हा लेख वाचल्यानंतर आश्चर्यच वाटले. एवढा महान विचारांचा संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणारा विद्वान व गांधीजींचा सर्वप्रिय अनुयायी ज्याचा उल्लेख म.गांधी ‘महादेव आता माझा हात, पाय आणि मेंदूही आहे’ असा करतात. असे बुद्धिजीवी स्वातंत्र्यचळवळीचे केंद्रबिंदू असणारे महादेव देसाई आमच्या विस्मरणात कसे गेले, हे आश्चर्यच आहे! त्यांच्या जीवनाबद्दल माहिती करून देण्यासाठी आम्ही आमच्या ‘उस्मानाबाद गप्पाष्टक मंडळ’मध्ये देवीदास वडगावकर यांचे व्याख्यानच ठेवले. ‘महादेव देसाई यांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान’ आम्हांला उलगडत गेले. साधना साप्ताहिकाचे विस्मरणात गेलेल्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या बुद्धिजीवी विचारवंतांबद्दल एक लेख अवश्य असावा असे वाटते. स्वातंत्र्य दिनादिवशी आम्ही ठरावीक देशभक्तांबद्दल पुन्हा पुन्हा बोलतो, परंतु अशा विस्मरणातील देशभक्तांना स्मरणात ठेवण्यासाठी साधनाने हा लेख प्रसिद्ध केला हे स्पृहणीय आहे.

विष्णू शिवराम ढेरे, काकंबा, जि.उस्मानाबाद

----

उत्तर व दक्षिण यांच्यातील असमतोलाला तिसरेही एक कारण आहे!

दि. 26 जूनच्या साधनातील रामचंद्र गुहा यांचा ‘उत्तर व दक्षिणेकडील राज्यांच्या विकासाचा असमतोल’ याबद्दलचा लेख वाचला. त्या विकासाच्या फरकाची त्यांनी इतिहासातील दोन कारणे दिली आहेत. ती म्हणजे एक- परकीय मुस्िीम आक्रमणे व दोन- फाळणीवेळची हिंसा व अत्याचार यांची झळ उत्तरेला फार मोठ्या प्रमाणात बसली. पण दक्षिणेकडे ही झळ पोहोचली नाही. ही दोन्ही कारणे बरोबरच आहेत, तरीही तिसरे कारण म्हणजे उत्तरेपेक्षा दक्षिणेकडील राज्ये आकाराने लहान व उत्तरेपेक्षा खूपच कमी लोकसंख्या हे एक कारण असावे असे वाटते.

या बाबत एक वेगळाच विचार मांडावासा वाटतो तो म्हणजे- उत्तरेकडे कडवे हिंदुत्व व कडवे मुस्लिमत्व वाढीस लागले असावे असे वाटते. परकीय आक्रमकांचे अत्याचार, धर्मांतर, देवळांची तोडफोड, स्त्रियांवरील अत्याचार पुन्हा फाळणीच्या वेळीही अशाच अत्याचारांना उत्तरेकडील लोकांना सहन करावे लागले. त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात मुस्लीम समाजाबद्दल रोष असावा व त्याचे रूपांतर कडवेपणात झाले असावे. याउलट अनेक शतके मुस्लीम राजवट असल्यामुळे मुस्लिम समाज स्वत:ला राज्यकर्ता समाज व हिंदू हे प्रजाजन- अशा समजात अजूनही असल्यामुळे मुस्लिमही कडवे झाले असावेत. या गोष्टी दक्षिणेकडील राज्यांच्या वाट्याला न आल्यामुळे व लोकसंख्या व राज्यांचा आकारमान, या सोईच्या गोष्टींमुळे त्यांचा वैचारिक, सामाजिक व आर्थिक विकास झाला असावा असे वाटते.

स्नेहलता गोसावी, पुणे

----

तो लेख पुन:पुन्हा वाचला आणि अधिकाधिक आकलन झाले!

दि.28 ऑगस्टचा ‘धर्माने मला काय दिले?’ हा विशेषांक अतिशय आवडला. डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा लेख पुन:पुन्हा वाचण्यासारखा आहे. मी तसा वाचला आणि त्यांच्या विचारांचे अधिकाधिक आकलन झाले. मला ‘तिमिरातून तेजाकडे’ पुस्तकाबद्दल माहीत नव्हते, आता ते संग्रही ठेवीन. सर्वच लेख जरी आत्मनिवेदनपर असले तरी विचार करायला लावतात.

विवेक पटवर्धन, ठाणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके