डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 1 मेचा अंक ‘अपरिचित सत्यजित राय’ वाचून झाला. मुळात सत्यजित राय यांच्यासारख्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि प्रचंड चित्रपटनिर्मिती केलेल्या कलाकाराबद्दलचा अंक काढताना तो एकाच व्यक्तीने एकहाती काढावा ही कल्पनाच अडचणीची वाटली. असो. अंकात राय यांचा कार्यकाळ, त्यातील महत्त्वाच्या घटना आल्या आहेत, ते ठीकच आहे. परंतु इंटरनेटवरची एखादी माहिती देणारी साईट उघडल्यावर राय यांच्याबद्दल येतं त्याव्यतिरिक्त फार काही हाती लागत नाही. अंकाचे नाव ‘अपरिचित सत्यजित राय’ असे असले तरी राय यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग आणि अभिनेते, अभिनेत्रींनी केलेली काही वक्तव्ये वगळता फारसे काही अपरिचित हाती लागले असे वाटत नाही.

तर मग ते लोक भारतीय संविधानाचा उपमर्द करताहेत!

दि.24 एप्रिलच्या ‘पुस्तकदिन विशेषांकात’ प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखातील एका मुद्यावर आक्षेप घेणारे पत्र ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिले, ते 22 मेच्या साधना अंकात प्रसिद्ध झाले आहे. त्या संदर्भात हा प्रतिसाद...

‘सर्व माणसे मर्त्य आहेत, सॉक्रेटिस माणूस आहे, त्यामुळे सॉक्रेटिस मर्त्य आहे’ हे तर्कशास्त्रातील प्रमेय सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे ‘कोकणी ही मराठीची बोली आहे, गोव्यातही मराठीची बोली असलेली कोकणी बोलली जाते, म्हणूनच गोवा हा महाराष्ट्राचा भाग आहे.’ असे तर्कशास्त्र गोव्यातील महाराष्ट्रवादामागे होते.

1967 मध्ये घेतलेल्या ओपिनियन पोलच्या जनमतकौलात गोव्याने हा महाराष्ट्रवाद झिडकारून लावला, त्याच वेळी लोकशाही मानणाऱ्या विशाल ह्रदयाच्या महाराष्ट्राने ‘आपली तिन्हीही प्रमेये चुकली’ हे दिलदारपणे मान्य करायला हवे होते.  त्यानंतर 1975 साली केंद्रीय साहित्य अकादमीने अकादमीचे तत्कालीन अध्यक्ष भाषाशास्त्रज्ञ सुनितीकुमार चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोकणीला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली. ‘ओपिनियन पोलनंतर गोव्याबद्‌दल चकार शब्द न काढणाऱ्या’ महाराष्ट्रातील पु. ल. देशपांडे आणि वसंत बापट यांनी कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा देण्याच्या या निर्णयास विरोध केला. त्यापुढे गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. कोकणी गोव्याची राजभाषा झाली. एवढेच नव्हे तर भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात प्रजासत्ताक भारतातील स्वतंत्र भाषा म्हणून कोंकणीचा समावेश झाला. ‘गोव्यातील व महाराष्ट्रातील अनेकांचे आजही असे मत आहे की, कोकणी ही मराठीची बोली आहे.’ असे आदरणीय मधु मंगेश कर्णिक म्हणतात. असे असेल तर कोकणीला बोली मानणारे हे लोक भारतीय संविधानाचा उपमर्द करताहेत असे मानले पाहिजे. ओपिनियन पोलपूर्वीच्या राजकीय स्थितीचा आम्ही तटस्थपणे अभ्यास करतो तेव्हा मराठीने व महाराष्ट्राने गोव्यावर सांगितलेल्या अधिकारांत आम्हाला सांस्कृतिक व राजकीय वसाहतवादाची बीजे दिसतात. ही आमची मते महाराष्ट्राच्या विद्वेषातून नव्हे तर गोव्याच्या राजकीय इतिहासाच्या परिप्रेक्ष्यांतून बनली आहेत.

माझ्या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी गोव्याला स्वराज्य देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा स्पष्ट उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज चाणाक्ष, धूर्त, मुत्सद्दी व व्यवहारवादी राजकारणी होते. त्यामुळे त्यांना जेव्हा पोर्तुगीजांकडून गोवा जिंकणे शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांशी तह केला. थोर गोमंतकीय इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या ‘पोर्तुगीज-मराठे संबंध’ या ग्रंथात मोडी भाषेतून लिहिलेल्या त्या तहाची फोटोप्रत छापली आहे. महाराजांच्या आरमाराला पोर्तुगीजांनी मनुष्यबळ पुरवावे आणि महाराजांनी पोर्तुगीजांवर हल्ला करू नये अशा प्रकारचा तो तह होता. मोंगल हा शिवाजी महाराजांचा प्रमुख शत्रू होता आणि महाराष्ट्रातले सर्व सुभेदार एकजात त्यांच्या मागे उभे राहिले असते तर, दिल्लीच्या तख्तावरही छत्रपती शिवाजी महाराज बसू शकले असते आणि भारताचा इतिहास बदलला असता. त्यामुळे राजनितीचा भाग म्हणून महाराजांनी पोर्तुगीजांच्या गोव्यातील सत्तेला बाधा आणली नाही ह्याची जाणीव ठेवून, याबद्‌दल आम्ही त्यांना बिलकुल दोष देत नाही. मात्र शिवाजीमहाराज व संभाजी महाराज यांच्यानंतर उत्तरेत अटकेपार आणि दक्षिणेत तंजावरपर्यंत गेलेल्या मराठ्यांनी महाराष्ट्राच्या जवळचा छोटासा गोवा पोर्तुगीजांकडून जिंकून घेण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. हे ऐतिहासिक वास्तव मला अधोरेखित करायचे होते.

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रीय स्वातंत्र्य-सैनिकांप्रमाणेच देशाच्या शेष राज्यांतील स्वातंत्र्य-सैनिकांनीही भाग घेतला. यामागे गोव्याला उपकृत करण्यापेक्षा राष्ट्रीय कर्तव्यपूर्तीची भावना त्यांच्या मनात होती, असे आम्ही मानतो. या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या वैयक्तिक योगदानाबद्‌दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

माझ्या लेखातील ज्या वाक्यात ‘दलित’ शब्दाचा अंतर्भाव आहे ते वाक्य वाचले तर, कोकणीला दलित हे कुठल्याच महाराष्ट्रातील व्यक्तीने म्हटले नाही तर कोकणीला दलित मी स्वतः म्हटल्याचे स्पष्ट होते. कारण कोणत्याही भाषेला दुसऱ्या प्रगत भाषेची बोली समजणे हा भाषिक चातुर्वर्ण्याचा भाग आहे असे मला वाटते.

आदरणीय कर्णिकांच्या पत्रात एक आक्षेपार्ह वाक्य आहे ‘पिटर आल्वारिस हे धर्माने ख्रिश्चन होते, पण कर्माने अस्सल मुंबईकर महाराष्ट्रीय समाजवादी होते.’ आता ह्या वाक्यात आपण पुढीलप्रमाणे बदल करू ‘एस. एम. जोशी हे धर्मानेे हिंदू होते, पण कर्माने अस्सल पुणेकर महाराष्ट्रीय समाजवादी होते.’ असे वाक्य आदरणीय कर्णिकांनी लिहिले असते का?

अल्बर्ट एलिसच्या पुस्तकावरच्या माझ्या लेखात मी काही कारण वा संदर्भ नसताना हा विषय घुसडलेला नाही. लिहिताना संज्ञाप्रवाहाप्रमाणे तो लेखात आलेला आहे. ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ याबद्दल लिहिताना आवडणाऱ्या पुस्तकाबद्‌दल न लिहिता, प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहावे व लेखाला आत्मचरित्रात्मक चौकट असावी अशी साधनाच्या संपादकांची सूचना होती. त्यामुळे गोव्यात उद्‌भवलेला कोकणी-मराठी वाद आणि त्या वादाचा अल्बर्ट एलिसच्या विवेकवादातून चिकित्सा करण्याचा माझा प्रयत्न याबद्‌दल मला सांगायचे होते.

आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांना गोवा जिवाभावाचा वाटतो तसाच आम्हालाही महाराष्ट्र जिवाभावाचा वाटतो आणि दोन्ही राज्यांचे हे मैत्र पूज्य साने गुरूजीना आंतरभारतीची संकल्पना मांडताना अभिप्रेत होते.

दत्ता दामोदर नायक, गोवा

----

‘अपरिचित राय’मध्ये अपरिचित हाती लागले नाही!

दि. 1 मेचा अंक ‘अपरिचित सत्यजित राय’ वाचून झाला. मुळात सत्यजित राय यांच्यासारख्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि प्रचंड चित्रपटनिर्मिती केलेल्या कलाकाराबद्दलचा अंक काढताना तो एकाच व्यक्तीने एकहाती काढावा ही कल्पनाच अडचणीची वाटली. असो. अंकात राय यांचा कार्यकाळ, त्यातील महत्त्वाच्या घटना आल्या आहेत, ते ठीकच आहे. परंतु इंटरनेटवरची एखादी माहिती देणारी साईट उघडल्यावर राय यांच्याबद्दल येतं त्याव्यतिरिक्त फार काही हाती लागत नाही.

अंकाचे नाव ‘अपरिचित सत्यजित राय’ असे असले तरी राय यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग आणि अभिनेते, अभिनेत्रींनी केलेली काही वक्तव्ये वगळता फारसे काही अपरिचित हाती लागले असे वाटत नाही.

राय यांनी चित्रपटनिर्मितीच्या आधी सुरू केलेले चित्रपटविषयक कार्य आणि ज्याची जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत घेतली ते कलकत्ता फिल्म सोसायटी आणि फेडरेशन ऑफ  फिल्म सोसायटीजचे अध्यक्षपद हा महत्त्वाचा ऐवज या अंकात येतच नाही. आपल्याला ज्या प्रकारचा चित्रपट करायचा आहे, त्यासाठी प्रेक्षकांची तशा चित्रपटांसाठीची अभिरुची तयार करणे आवश्यक आहे, हे समजलेल्या काही मोजक्या (भारतीय भाषांत चित्रपट करणाऱ्या) चित्रपटकर्त्यांपैकी राय हे बिनीचे शिलेदार होते. हे निदान अपरिचित सत्यजित राय या नावाच्या अंकात यायला हवे होते. अंकाची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊनही ही त्रुटी महत्त्वाची ठरते. फिल्म सोसाटीच्या कार्यकाळात चित्रपट मिळवणे, ते दाखवणे, त्यावर चर्चा करणे, यासाठी सेन्सॉर बोर्डाशी, करमणूककर लावणाऱ्यांशी व्यवहार करणे हे फार अडचणीचे होते. राय यांनी स्वतःच्या आणि इतर फिल्म सोसायट्यांपुढच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत, त्याबद्दल अनेकांनी लिहिलेही आहे. हे तर यायलाच हवे होते.

रायविषयक अभ्यासाचा तपशील देताना अमेरिकेतील राय यांच्याबद्दलच्या केंद्राची भेट घेतल्याचा सविस्तर उल्लेख येतो, परंतु पुण्यात उपलब्ध असलेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील चित्रपट खजिन्याचा, (जे आता डिजिटल स्वरूपात तिथे पहायला उपलब्ध आहे.) ग्रंथालयातील लिखित, छापील, प्रकाशित मासिके, पुस्तकांतील अभ्यास-लेख यांचा उल्लेखही नाही. पुण्यातून निघणारा हा अंक वाचल्यावर कुणाला अधिकचे वाचन करायचे असेल तर हे ठिकाण महत्त्वाचे म्हणून नोंद व्हायला हवी होती. (आत्ता कोरोनाकाळात नाही तरी नंतर हे शक्य आहे.)

लेखकाला राय यांचा शोध लागण्याच्या आधीपासून पुण्यात एक ऋषितुल्य सिनेअभ्यासक राय यांच्या चित्रपटांचा आणि एकूणातच चित्रपट या तंत्राधिष्टित कलेचा अभ्यास करत होते. ते म्हणजे प्रा. सतीश बहादूर हे चित्रपट-रसासावाद हा अभ्यास विषय म्हणून सुरुवात करणारे फिल्म इन्स्टिट्यूटचे माजी प्राध्यापक. राय यांनीही त्यांच्या सखोल अभ्यास करण्याच्या पद्धतीची दखल घेतली होती. त्यांनी राय यांच्या चित्रपटांबद्दल लेख स्वरूपात विपुल लेखन केलेले आहे. बहादूरसरांचे बरेच लेखन आर्काइव्हच्या ग्रंथालयात आणि डॉ.श्यामला वनारसे यांचेकडे उपलब्ध आहे. डॉ.वनारसे यांच्याबरोबर सहलेखन केलेले पुस्तक ‘टेक्स्ट्युअल स्टडी ऑफ अपू ट्रिलॉजी’ हे दिल्लीच्या वाणी प्रकाशनाचे 2011 मधील आहे. त्यानंतर डॉ.श्यामला वनारसे यांचे ‘सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर’ हे मौलिक पुस्तक मौज प्रकाशनाने वितरित केलेले शब्दपर्व प्रकाशनाचे 2010 मधील पुस्तक आहे. ते राय यांच्या चित्रपटांबद्दलचे मराठीतीलच नाही तर एकूणातच महत्त्वाचे पुरस्कारप्राप्त पुस्तक आहे. या दोन्हींचा उल्लेखही संदर्भग्रंथांच्या यादीत नाही, ही फार मोठी त्रुटी आहे. त्यांच्या सान्निध्यात शिकून तयार झालेल्या, फिल्म सोसायटीचे काम करणाऱ्या, रूपवाणीसारखे मराठीतील गंभीर सिनेनियतकालिक काढणाऱ्या कुणाही मंडळींकडे हे संदर्भ मिळाले असते. (‘फ्लॅश बॅक’ या चित्रपटविषयक ग्रंथातही राय यांच्याविषयी लेख आहेत. 2004, माणूस प्रकाशन. संपादक सतीश जकातदार-वंदना भाले.)

श्माम बेनेगल आणि इतर मान्यवरांनी केलेल्या राय यांच्यावरच्या चार माहितीपटांची यादीही नेटवर सहज उपलब्ध आहे. त्यांचा संदर्भ चरित्रग्रंथ लिहिताना घेतला गेला नाही, का हा प्रश्न पडला. त्यांचा उल्लेख व्हायला हवा होता. वेळेची आणि पानांची मर्यादा लक्षात घेऊनही असे म्हणावेसे वाटते की, चित्रपट ही तंत्राधिष्ठित कला असल्याने सत्यजित राय यांच्या विपुल कार्याचा आणि व्यक्ती म्हणून आढावा घेताना (विशेषतः अपरिचित पैलूंचा) तांत्रिक अंगाचे ज्ञान आणि चित्रपट-आस्वाद कौशल्य असलेल्या काही मंडळींचे लेख यात यायला हवे होते. या कारणास्तव हा अंक एकहाती काढण्याच्या निर्णयाबद्दल खंत वाटते.

सुषमा दातार, पुणे.

----

ते चार लेख वाचून विशेष प्रभावित झालो!

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या 24 एप्रिलच्या अंकातील 15 मान्यवरांच्या लेखांपैकी चार लेख मला फारच भावले. हे लेख वाचून भारावून गेलो. अस्वस्थ झालो. हे लेख वाचून मनात जे विचार निर्माण झाले ते इथे मांडतो.

पहिला लेख दत्ता दामोदर नायक यांचा. मी काही उद्योजकांची चरित्रे, आत्मवृत्ते वाचली आहेत, पण आपल्या व्यावसायिक जीवनशैलीबाबत नायकांसारखी चिंतनशीलता मला कुठेही आढळून आली नाही. उद्योजकांना येणाऱ्या खऱ्याखुऱ्या अडचणी त्यांच्या लेखनातून त्यांनी अधोरेखित केल्या आहेत. ‘समाजाला उद्योजकांची फक्त श्रीमंती दिसते आणि समाज त्यांचा द्वेष करतो’.  हे त्यांचे विधान पूर्णपणे सत्य आहे. त्यांचे दु:ख कोणालाच लक्षात येत नाही. उद्योजक, मोठे व्यापारी यांच्या हातात कोणतीच गोष्ट नसते, तरीसुद्धा ते मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवून धाडसाने बाजारात उभे राहतात. नायक यांची काही राजकीय मते आहेत. म्हणजे ते संवेदनशील आहेत. राजकारणामुळे त्यांना कसा त्रास झाला हेही त्यांनी आपल्या लेखात नोंदवले आहे. आपला मुर्दाड समाज व उठवळ राजकारणी यांच्या कार्यावरही प्रकाश टाकला आहे. दत्ता नायक हे अल्बर्ट एलिस यांच्या विचाराने प्रभावित झाले आहेत. तसेच अनेक मराठी वाचक साधनामधील त्यांच्या लेखामुळे प्रभावित होतील व आपल्या जीवनशैलीबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करू लागतील, यात शंका नाही.

याच अंकातील मला भावलेला दुसरा लेख म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी यांचा. इव्हान एलिच व त्यांच्या ‘मेडिकल नेमेसिस’ या संकल्पनेबद्दल त्यांनी लिहिले आहे. आपल्या देशातील शिक्षणक्षेत्र व वैद्यकीय क्षेत्र यांना वाळवी किंवा कीड लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या वैद्यक सत्ता कशी धुमाकूळ घालत आहे हे आपण पाहतोच आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील काही अपवाद सोडले तर पैशापुढे शरीर, मन, समाज व पर्यावरण यांचे क्वचितच कुणाला भान आहे; हे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने उघड करावे हे विशेष आहे. आणि ते डॉ. नाडकर्णी यांनी केले आहे. या क्षेत्रातील निरोगी व निकोप मनाच्या व्यक्तींनी मेडिकल नेमेसिस होणार नाही व वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा बसेल असा प्रयत्न करावा ही विनंती.

तिसरा लेख म्हणजे लेखिका ॲलिस मिलर यांच्या ‘फॉर युवर ओन गुड’ या पुस्तकावर शिल्पा कांबळे यांचा. संस्काराच्या नावाखाली लहान मुलांचे भावविश्व त्यांचे आई-वडील, पालक, घरातील वडीलधारी व्यक्ती कशा प्रकारे विस्कटून टाकतात, हे या लेखात पाहायला मिळाले. आदिवासी समाजात लहान मुलांना कशा प्रकारे वाढवतात हे मला माहीत नाही. पण शिकलेला, सुसंस्कृत म्हणवून घेणारा समाज लहान मुलांना अजूनही अत्यंत दुष्टपणे व हिंस्रपणे वागवतो आणि बालसंगोपन(?) करतो हे सत्य आहे. या दाहक सत्याबाबत आतापर्यंत कोठेही वाचायला मिळाले नव्हते. शिल्पातार्इंच्या या लेखामुळे लहान मुलांबाबतची ही परिस्थिती प्रकाशात आली. एखाद्‌दुसरा अपवाद सोडला तर समाजातील प्रत्येकाचे शैशव करपलेले व कुमारावस्था दुभंगलेली अशीच आहे. पूर्वी लहान मुलांना शिक्षा करणे हा घरासाठी शिस्तीचा भाग होता. या शिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या व वेगळ्या साधनांनी करत असत. (तुरुंगात गुन्हेगारांसाठी असे शिक्षेचे विविध प्रकार व साधने उपलब्ध असतात) घरातील व शाळेतील मुलांना मारहाण तर सामान्य बाब होती. प्रत्येकाच्या लहानपणी पालक तासन्‌तास मुलांना उपदेश करायचे. (ते स्वत: कसे का वागेनात) आणि शेवटी म्हणायचे, ‘हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठी सांगतोय’. (दत्ता नायक यांनीही त्यांच्या लेखात आपल्या देशातील पिता-पुत्र संबंधाचा उल्लेख केलेला आहे. काही पिता-पुत्रांची नावेही दिली आहेत.)

चौथा लेख म्हणजे कल्पना दुधाळ यांचा. इंदुमती जोंधळे यांच्या ‘बिनपटाची चौकट’ या पुस्तकाच्या प्रभावाबाबत त्यांनी लिहिले आहे. लेख वाचून झाल्यावर बराच वेळ मी एकाच ठिकाणी सुन्नपणे बसून होतो. नेमकं मला काय झालं ते सांगता येत नाही. म्हणजे भोगलं पुस्तककारांनी, पण आपणही दुखावल्यासारखे होतो. पुस्तकाच्या लेखिकेवर आलेले प्रसंग म्हणजे आईचा निर्घृण मृत्यू, वडिलांची मानहानीकारक ताटातूट, लहान बहिणीचा मृतदेह मांडीवर घेऊन बसणे, अनाथाश्रम, रिमांड होममध्ये राहणे, लहान भावंडांपासून दूर राहणे वगैरे वाचताना प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहत होते. मानवी जीवन किती कुरूप असू शकते, सणासुदीला अनाथाश्रमातील मुलं कशी राहत असतील, त्या वेळी त्यांच्या मनात कोणते विचार येत असतील; अनाथाश्रमातील मुलांचे आनंदाचे, उत्साहाचे क्षण कोणते असतील; भावनिक प्रसंग कुठले असतील, सुरक्षितता कशी व केव्हा वाटत असेल; असे विचार माझ्या मनात येऊन गेले. अशा पुस्तकाची ओळख करून देऊन मूळ पुस्तक वाचण्याची बुद्धी, प्रेरणा निर्माण करणाऱ्या कल्पनाताई दुधाळ यांना धन्यवाद.

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने साधनाने हा वैशिष्ट्यपूर्ण, नावीन्यपूर्ण विशेषांक काढला, त्यामुळे आमच्यासारख्या वाचकांना अनेक विषयांची ओळख झाली, आम्ही प्रभावित झालो. लेखकांचे व साधना संपादकांचे आभार.

प्रभाकर बटगेरी, सोलापूर

----

परस्परसंबंध स्पष्ट, पण एक-दोन लेखात गल्लत?

‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ हा विशेषांक कोविडच्या गोंधळामुळे उशिरा का होईना मिळाला. प्रतीक्षा वाटायला लावल्यामुळे जास्त आवडला. नेहमीप्रमाणेच अंकाचे संपादकीय, अंक काढण्यामागील हेतू आणि अंकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणारे आहे. आवड आणि प्रभाव यांतला परस्परसंबंध तुम्ही स्पष्ट केलात, तरीही त्याची एक-दोन लेखांत गल्लत झाली आहे असे वाटते. चूकभूल द्यावी-घ्यावी.

प्रभावित केलेली पुस्तके तीन वेगळ्या भाषांतील असल्यामुळे मराठी लेखक-वाचकाला मराठीखेरीज इतर गोष्टींचे वावडे आहे, या लोकप्रिय समजाला छेद गेला. माननीय बाळ गंगाधर खेर शिक्षणमंत्री असताना, आमचे शैक्षणिक माध्यम एकाएकी मराठी करण्यात आले. राजकीय वातावरणही इंग्रज-इंग्रजीद्वेष्टे होते; त्यामुळे पाठ्यपुस्तकांखेरीज इंग्रजी अवांतर वाचन मी केले नाही. आता या अंकातील ‘प्रभावित करणारी पुस्तके’ आयुष्याच्या सायंकाळी का होईना अगत्याने वाचेन.

बहुतेक सगळ्या लेखनातून ‘संघर्षातून मार्ग काढला’ हे समान सूत्र आहे. याबाबत मी समविचारी आहे. लेखनिहाय मत देणे टाळत असले तरी डॉ. हमीद दाभोलकरांचे खास अभिनंदन.

शैला राव, गोवा

----

लेखक-अभ्यासक दुर्मिळ झालेत?

‘अपरिचित सत्यजित राय’ हा विशेषांक अत्यंत वाचनीय, माहितीपूर्ण आणि संग्राह्य झाला आहे. संपूर्ण अंकाचे लेखन एकहाती केले आहे हे विशेष. त्यावरून त्यांचा अफाट व्यासंग ध्यानी येतो आणि संपादकांचा त्यांच्यावरील गाढा विश्वास अधोरेखित होतो.  काही ठिकाणी द्विरुक्ती झाली आहे, ती टाळली असती तर छान झाले असते. पण हा किरकोळ मुद्दा आहे. त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या आणि अशा विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन मराठीत करणारे लेखक/अभ्यासक दुर्मिळ झाले आहेत की काय अशी शंका येते, हे बरे नव्हे.

प्रभाकर करंदीकर, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके