डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पत्रास कारण की (13 फेब्रुवारी 1986)

...

साधना (दि. 16 जानेवारी) मधील ! ‘अविस्मरणीय पंतप्रधान’ अग्रलेख वाचला. आवडला.

लालबहादूर शास्त्री यांच्या कर्तृत्वाचा आपण घेतलेला आढावा यथार्थ आहे. आपण शास्त्रींच्यावर हा लेख लिहून एक फार चांगले काम केले आहे. मुलांचा शोध घेणे व त्यांचा गौरव करणेही, तसेच उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याची साधनाची परंपराच आहे. ती आपण जोपासली आहे, बळकट केली आहे. कारण इतिहासात शास्त्रींच्या वाट्याला उपेक्षाच आलेली दिसते. त्यांची कारकीर्दी अल्प असली तरी ती ऐतिहासिकदृष्टया महत्वाची आहे. उत्तर प्रदेशात एका गरीब कुटुंबात जन्माला आल्याने अतिशय कष्टाने त्यांना शिक्षण घ्यावे लागले. स्वकर्तृत्वाने ते पंतप्रधान झाले. अल्प कारकीर्दीतही त्यांनी सर्व भारतियांची मने जिंकली. ‘जय जवान, जय किसान' ही घोषणा देऊन त्यांनी देशभर चैतन्य आणले. 1965 च्या भारत-पाक युद्धात पाकला चारी मुंड्या चीत करून 1962 च्या युद्धाचा कलंक धुवून काढला. संरक्षणावर लक्ष केंद्रित केले. भारतीय सेना त्यांनी मजबूत केली. त्यांचे ठिकाणी अविचल देशभक्ती, दृढनिधार, स्वाभिमानी वृत्ती, साधी राहणी इ. गुणांचा समन्वय दिसून येतो. ज्यांच्या जीवनालाच अविचल ध्येयवादाने दर्जा येतो. त्यांना दर्जेदार राहणीमानाची आवश्यकता भासत नाही. शास्त्री, त्या अर्थाने म. गांधी जयप्रकाशजी यांच्या परंपरेतील होते.

संघटनात्मक कामासाठी मंत्रीपदाचा त्याग करणारे, रेल्वेच्या अपघाताची नैतिक जबाबदारी मानून रेल्वेमंत्रीपदाचा त्याग करणारे रेल्वेमंत्री, पंतप्रधानपदासारख्या अत्युच्च पदी गेल्यावरही साधेपण न सोडणारे शास्त्री खरोखरच राजकारणातील आदर्श होत. 

मृदु स्वभावाच्या शास्त्रींचा कणखरपणा अतुलनीय होय. या पंतप्रधानांची स्मृती भारतीय जनतेच्या स्मरणात चिरकाळ राहील. त्यांची स्मृती या लेखाद्वारे आपण जागवली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! या लेखाद्वारे कोटयावधी भारतियांच्या भावना प्रातिनिधीकपणे आपण या लेखात व्यक्त केल्या आहेत असे वाटते. कै. शास्त्रींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
प्रा. आनंदराव सुळ, सातारा. 

'आहे रे'कडून यापुढे कसलीही राजकीय समस्या सुटणार नाही. 'नाही रे' ना सहाय्य केले, तर काही होईल. भारतीय मतदार बहुसंख्य अशिक्षित, अकिंचन आहे. पण पोक्त, प्रामाणिक आहे. गरज आहे आहे ती त्याला आधार, धीर, विश्वास देण्याची. कोणीतरी त्राता आहे, ही दृढ भावना करण्याची. राजकीय सत्तास्थान एकदा मिळाले. की 'मि. क्लीन’ सर्वार्थाने ‘बोल्ड' होतात. मातुःश्री जिजाबाईंचा प्रभाव शिवाजीराजांवर सर्वार्थाने होता. अनेकपटींनी कसलेल्या राजूकाजधुरंधर गुण राजीवजींमध्ये मातेचे येणारच. शेवटपर्यंत ‘मनसि अन्यद् वचसि अन्यद् कर्तु अन्यद्’ भाव इंदिराजींनी दूर केला नाही. तोच सध्याच्या पंतप्रधानामध्ये येणार नाही काय? दुसरे काय होणार ?
- वा. य. वालावलकर, तोर्ल. 

प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सोहळा. ज्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले, त्यांचे स्मरण करण्याचा हा प्रेरणादायी दिन, आज सर्व क्षेत्रांत अनेक समस्या समोर उभ्या आहेत. देश हाच धर्म आणि देव मानून रचनात्मक संघर्षाला सिध्द होण्याची आज निकड वाटते.
- रामकृष्ण विडेकर, लातूर. 

साधनेचा प्रजासत्ताकदिन, विशेषतः ‘वृत्तपत्रांच्या पाठीत गारद्यांची कट्यार !’ हा सडेतोड अग्रलेख वाचून एक प्रश्न आपणांस विचारावासा वाटतो. 'एस्टॅब्डिश्ड' वृत्तपत्राची व्याख्या काय असू शकते ? वास्तविक ‘साधना’ आज सदतीस वर्षे साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होते व हजारो वाचकांना सामाजिक, राजकीय प्रसंगी आंतरदेशीय राजकारणावरचे माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध होत असल्यामुळे ते वाचून त्यांची ज्ञानाची कक्षा नेहमीच वाढावीत आले आहे. शिवाय साधनेच्या प्रसिद्धीमध्ये कधी खंड पडलेला नाही. पुन्हा मालकीहक्काचेही हे साप्ताहिक नसून, ‘ट्रस्ट' तर्फे ते नेहमी प्रसिद्ध केले जाते. असे असताना 'साधना' ला कागदाचा कोटा, ते ' एस्टॅब्लिश्ड' वृत्तपत्रांत बसत नसल्याची सबब सांगून कोटा रद्द करायची किमया स्वतंत्र व लोकशाही पुरस्कर्त्या सरकारने करावी, ही महत् आश्चर्याची बाब आहे! साहजिकच प्रश्न पडतो की, सरकारची ‘एस्टॅब्लिश्ड' वृत्तपत्राची व्याख्या तरी काय असू शकते ? व 'साधना' त्या दृष्टीने कुठे कमी पडते ?
- राम वैद्य, कल्याण. 

(19 डिसेंबर) : ‘या शिवारांचा टाहो ऐकू येतो काय ?' हा गणपतराव आवटे यांचा लेख वाचला. दुष्काळी परिस्थितीचे त्यांनी घडविलेले हे जितेजागते दर्शनच होय. दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. साधनाने शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नांवर ‘शिवारांचा टाहो’ या नव्या सदरातून लेख द्यावेत. नूतन वर्षानिमित्त सर्व साथींना अभिवादन!
- सुधाकर आरसुडें, वर्दापूर.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके