डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गाइड वापरणारा विद्यार्थी प्रश्नोत्तराच्या चौकटीबाहेर जाऊ शकत नाही. जाण्याचे कारण नसते. कारण सर्व काही तयार मिळत असते. अशा विद्यार्थ्याला स्वत:चे प्रश्न पडत नाहीत, उत्तरे शोधण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात पाठ्यपुस्तक तयार करताना अत्यावश्यक व महत्त्वाचं काय याचा विचार केलेला असतो. गाइडमध्ये मात्र महत्त्वाचे प्रश्न, अतिमहत्त्वाचे प्रश्न अशी वर्गवारी केल्याने विद्यार्थी क्षणभर सुखावतो; पण आयुष्यभरचा दुखावतो. पुन्हा परीक्षेच्या ऐन काळात ‘अपेक्षित’ नावाचा प्रकार येतो. कित्येक विद्यार्थी ही ‘अपेक्षित’ किंवा ‘मोस्ट लाइकली’ गाइड्‌स येईपर्यंत अभ्यासच करत नाहीत. परिणामी वळवाच्या पावसाचं होतं, तसं विद्यार्थ्यांच्या जीवनात घडतं. पाणी मुरायला वाव आणि वेळच नसतो.

त्या प्रथा परंपरेने आपल्या दोन पिढ्यांचे नुकसान केले आहे...

दि. 10 जुलैच्या अंकातील सध्याच्या शिक्षणपद्धतीवर सडेतोड आणि मार्मिक भाष्य करणारे संपादकीय खूपच वास्तववादी आहे. ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तृतीय वर्ष बी. ए. मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रथम सत्रासाठी लावले आहे. या निमित्ताने निदान ‘या पुस्तकावर तरी गाइड काढू नका रे!’ असे संपादकांनी विनंतीवजा बजावले आहे.

आमच्या काळात गाइड्‌स नव्हती. खासगी क्लासेस नव्हते. अशा गोष्टी प्राप्त करायला आमच्याकडे पैसेही नव्हते. आणि हे सारे आमच्या दृष्टीने बरे झाले, असेच म्हणायला हवे. साधारणपणे 1970 च्या दशकात सुरू झालेली गाइड लिहिण्याची, काढण्याची व वापरण्याची प्रक्रिया आता पुरेशी वयस्कर होऊन प्रथा-परंपरा बनली आहे आणि गेल्या अर्ध शतकात या गाइड परंपरेनुसार दोन पिढ्यांचं नुकसान केलं आहे. या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी खरोखरच काही संशोधनाची गरज आहे.

गाइड वापरणारा विद्यार्थी प्रश्नोत्तराच्या चौकटीबाहेर जाऊ शकत नाही. जाण्याचे कारण नसते. कारण सर्व काही तयार मिळत असते. अशा विद्यार्थ्याला स्वत:चे प्रश्न पडत नाहीत, उत्तरे शोधण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात पाठ्यपुस्तक तयार करताना अत्यावश्यक व महत्त्वाचं काय याचा विचार केलेला असतो. गाइडमध्ये मात्र महत्त्वाचे प्रश्न, अतिमहत्त्वाचे प्रश्न अशी वर्गवारी केल्याने विद्यार्थी क्षणभर सुखावतो; पण आयुष्यभरचा दुखावतो. पुन्हा परीक्षेच्या ऐन काळात ‘अपेक्षित’ नावाचा प्रकार येतो. कित्येक विद्यार्थी ही ‘अपेक्षित’ किंवा ‘मोस्ट लाइकली’ गाइड्‌स येईपर्यंत अभ्यासच करत नाहीत. परिणामी वळवाच्या पावसाचं होतं, तसं विद्यार्थ्यांच्या जीवनात घडतं. पाणी मुरायला वाव आणि वेळच नसतो. ‘दहा ओळींत उत्तरे’, ‘चार ओळींत उत्तरे’, ‘एका वाक्यात उत्तरे’, ‘एका शब्दात उत्तरे’ अशी प्रश्नपद्धती असते, तेव्हा तर आपण विद्यार्थ्याला लिहिते करत आहोत की हात आखडता घ्यायला शिकवत आहोत; हेच कळेनासे होते. एखाद्या चांगल्या कवितेची किंवा कथेची तयारी गाइड वाचून केल्याने त्या कविता-कथेच्या रसग्रहणाला कायमचे ग्रहण लागते आणि मग कथा काय किंवा कविता न आवडणारी (खरं म्हणजे न समजणारी) पिढी उदयाला येते. अशा वेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या ‘मुले चालली विद्यालयाला, विद्या चालली लयाला’ या मार्मिक विधानाची प्रचिती येते. विद्यार्थी गाइड वापरतात हे एक वेळ समजण्यासारखं आहे, पण काही शिक्षकच गाइड वापरून शिकवू लागतात, तेव्हा परिस्थिती फारच हाताबाहेर गेली आहे, असे म्हणावेसे वाटते. आजचा गाइड वापरणारा विद्यार्थी जेव्हा उद्या शिक्षक होतो, तेव्हा तो गाइडचं समर्थन करतो. मग शिकणं आणि शिकवणं व्यापक होण्याऐवजी माफक बनतं.

सारांश आणि सुलभीकरण हे निदान साहित्याच्या बाबतीत तरी मूळ संहितेला हानिकारकच ठरतात. कारण मूळ संहितेचा आस्वाद हा मुळातूनच घ्यायला हवा. आपल्या साहित्याच्या प्रभावाला मर्यादा पडतील म्हणून नोबेल पारितोषिक नाकारणारे फ्रेंच तत्त्वज्ञ-लेखक ज्यां पां सार्त्र यांनी आपल्या ‘व्हॉट इज लिटरेचर?’ या ग्रंथात म्हटले आहे की, लेखकाची संहिता ही त्याच्या पातळीवरून किंवा त्याच्या पातळीच्या पलीकडे जाऊनही समजून घेतली की, मी सारं काही इथंपर्यंत अशा प्रकारे केलं आहे आणि या संहितेसंबंधी अजून खूप काही करण्यासारखं आहे आणि इथंच वाचकांचं, अभ्यासकाचं, समीक्षकाचं आणि संशोधकाचं काम सुरू होतं. सार्त्र असंही म्हणतात की, लेखक आपल्या संहितेत अनेक पोकळ्या, रिकाम्या जागा (silences)  ठेवत असतो व वाचकांनी त्या रिकाम्या जागा भरून संहिता जास्तीतजास्त अर्थपूर्ण करावी. मूळ संहितेचा सारांश वाचून किंवा गाइड वाचून आपण संहितेच्या अंतरंगात घुसू शकणार नाही, जीवनाचं व्यापक आकलन होणार नाही.

परीक्षा जवळ आल्या, की विद्यार्थी गंभीर बनतात. उत्तीर्ण होण्यासाठीचे सर्व शॉर्टकट्‌स वापरू लागतात. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात एकच गोष्ट घोळत असते- महत्त्वाचं काय? यावरून मला आमच्या वर्गात घडलेला एक किस्सा आठवतो. 1965 मध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आम्ही एफ. वाय. बी. ए. शिकत होतो. तर्कशास्त्र हा एक आवश्यक पेपर होता. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित तो पेपर शिकवत होते. त्यांनी या पेपरसाठी एक पाठ्यपुस्तक लिहिले होते. एकदा त्यांचा तास संपत असताना एक विद्यार्थी उठून उभा राहिला व म्हणाला, ‘‘सर, तुमच्या या पुस्तकातील परीक्षेसाठी महत्त्वाचं काय ते सांगितलं तर बरं होईल.’’ तेव्हा त्या सरांनी दिलेलं ते उत्तर आजही जसंच्या तसं लक्षात आहे. ते सर म्हणाले होते, ‘‘या पुस्तकातील (पुस्तक विद्यार्थ्यांसमोर धरून) अगदी पहिल्या पानापासून शेवटपर्यंतचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. तो तसा नसता तर हे पुस्तक लिहितानाच मी तो टाळला असता.’’ सरांचं ते वाक्य वेगळाच संस्कार करून गेलं. जे चांगलं असतं ते सारं महत्त्वाचं असतं आणि जे महत्त्वाचं असतं, ते सारं चांगलं असतं. या घटनेनंतर पाच वर्षांनी एम. ए. इंग्लिश करताना मला शेक्सपिअरचे ‘हॅम्लेट’ वाचण्याचा योग आला. (कारण ते अभ्यासक्रमात नव्हते.) या नाटकात पोलोनिअस हे पात्र हॅम्लेटला विचारते, ‘‘राजे, तुम्ही काय वाचत आहात?’’ तेव्हा हॅम्लेट म्हणतो, "Words, words, words" कोणत्याही संहितेचे शब्द वाचायला आपण शिकले पाहिजे, हे हॅम्लेटच्या या उत्तरावरून मी तेव्हा शिकलो आणि तसा वागत आलो. ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तकही सर्वांनी गांभीर्याने घेऊन त्याचा शब्दन्‌शब्द वाचावा, हेच संपादकांना सुचवायचे आहे, असे मला वाटते.

प्रा. डॉ. सहदेव चौगुले-शिंदे

----

निरनिराळ्या साहित्यकृतींत निरनिराळ्या रंगांचा आभास दिसतो...

साधनामध्ये ‘चैतन्य पंचक’ या प्रा. व.बा. बोधे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे श्री. विश्वास वसेकर यांनी केलेले समीक्षण वाचले. समीक्षण वाचल्यावर पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण झाली. समीक्षण वाचता वाचता असे लक्षात आले की निरनिराळ्या साहित्यकृती वाचतानासुद्धा आपल्याला निरनिराळ्या रंगांचा आभास होतो. अर्थात लेखकांनी काही रंगीत वर्णन केलेले नसते, पण आपल्याला तसा आभास होतो. आपण जेव्हा निरनिराळ्या चित्रकारांची चित्रे पाहतो तेव्हा ही चित्रे निरनिराळ्या रंगशैलीत उदा. भारतीय रंगसंगती, पाश्चिमात्य, मोगल रंगसंगती अशी चितारलेली आढळतात. प्रत्येक शैलीची एक खासियत आणि रंगांचा आविष्कार वेगवेगळा असतो. असाच रंगांचा आविष्कार आपल्याला साहित्यात दिसतो.

सुरुवात आपण काळ्या रंगापासून करू या. दलित साहित्य वाचताना आपल्याला फक्त काळ्या रंगाचाच आभास होतो. शतकानुशतके दुखःच भोगले असल्याने त्या दु:खाचेच प्रतीक असलेला काळा रंग दिसून येतो. अर्थात काळा रंग सगळेच रंग शोषून घेतो, असे जरी असले तरी अंतिम दर्शन काळ्याच रंगाचेच होते.

सहसा काळा रंग कुणी सौंदर्याचे प्रतीक म्हणून स्वीकारात नाहीत. पण संत एकनाथांची गौळण ‘रात्र काळी, घागर काळी’ काळ्या रंगाचे खूप सुंदर आणि आकर्षक रूप दाखवते आणि अद्वैतवादाचे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर उभे राहते.

वि. स. खांडेकर यांचे आदर्शवादी साहित्य आणि महात्मा गांधी, विनोबाजी भावे यांचे साहित्य वाचताना पांढऱ्या रंगाचे दर्शन होते. मन एकदम शांत होते. शांतीचा संदेश देण्यासाठी किंवा युद्धविराम जाहीर करण्यासाठी पांढऱ्या रंगाचाच का वापर करतात ते उमगते. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हेसुद्धा एक पांढऱ्या रंगाचे आणि शांतीचे प्रतीक आहे असेच वाटत राहते.

ख्रिश्चन धर्म अथवा बौद्ध धर्मावरील साहित्य वाचताना आपल्याला निळ्या रंगाचे आभास होतात. हा रंग सेवाभाव आणि प्रेमभाव दर्शवितो. फादर फ्रान्सीस दिब्रिटो यांचे लेख वाचताना याचा पुरेपूर अनुभव येतो. मदर तेरेसा यांच्या संदर्भातील लेख वाचतानासुद्धा याचाच प्रत्यय येतो. निळ्या रंगाचा खूप सुंदर अनुभव अर्नेस्ट हेमिंग्वेची कादंबरी Old Man and the Sea वाचताना येतो. कादंबरीची सुरुवात करताना लेखकाने वृद्ध कोळी सांतियागो या कादंबरीनायकाचे डोळे हे समुद्राच्या रंगाचे होते असे वर्णन केले आहे. कादंबरी वाचून पूर्ण झाली तरी सतत आपल्या नजरेसमोर ते निळे डोळे आणि निळा सागर येत राहतो.

व्यंकटेश माडगूळकर आणि ग. दि. माडगूळकर यांच्या कथा-कादंबऱ्या वाचताना मातीच्या मातकट रंगाचे आभास होतात. मातीच्या रंगाच्या निरनिराळ्या छटा दिसू लागतात. तांबडी माती, काळी माती, पांढरी माती डोळ्यांसमोर येते आणि मातीचा गंध आणि स्पर्श जाणवतो.

ना. धों. महानोर, मारुती चित्तमपल्ली यांचे साहित्य वाचताना हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसतात. बालकवींच्या कवितेतसुद्धा हिरव्या रंगाचा सुंदर आविष्कार आहे. सुधीर मोघे यांच्या कवितांमध्ये हिरवा रंग खुलून दिसतो.

प्रेमाचा रंग पिवळा आहे असे मानतात. मंगेश पाडगावकरांच्या कविता/गीते ऐकताना असाच पिवळ्या रंगाचा सुरेख आणि सुखद अनुभव येतो. William Wordsworth यांची इंग्रजी कविता Daffodils वाचतानासुद्धा सुंदर सोनेरी पिवळ्या रंगाचे रूप दिसते.

पानिपत, श्रीमान योगी, स्वामी अशा ऐतिहासिक कादंबऱ्या आणि रणजित देसाई, ना. सं. इनामदार, बाबासाहेब पुरंदरे यांचे साहित्य वाचताना केशरी रंगाचे आविष्कार पाहायला मिळतात. केशरी रंग हा शौर्याचे प्रतीक आहे याचे प्रत्यंतर येते.

केशरी रंगात विरक्ती आणि भक्ती मिसळली की भगवा रंग तयार होतो आणि संतसाहित्यात व वारकरी साहित्यात भगव्या रंगाचा साक्षात्कार होतो.  

साम्यवादी विचारवादी लेखकांचे लेख/कथा वाचताना क्रांतीच्या लाल रंगाचे जहाल रूप दिसते. लाल रंग हा संघर्षाचे प्रतीक म्हणूनच आपल्या नजरेत ठसतो. वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांमध्ये आणि लेखांमध्येसुद्धा असा क्रांतीचा लाल रंग प्रकर्षाने दिसतो.

सुरेश भट आणि भीमराव पांचाले यांच्या गझला ‘पारवा’ म्हणजे राखाडी रंगाचा अनुभव देऊन जातात.

रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य वाचताना तर इंद्रधनुष्य डोळ्यांसमोर उभे राहते. सप्तरंगांचा आविष्कार यांच्या कलाकृतीत आढळतो. शोभादर्शक पाहताना जसजशी निरनिराळ्या मनमोहक रचना आपल्याला दिसतात तसतशी सप्तरंगांची उधळण आपल्याला अनुभवायला मिळते. असाच सप्तरंगी आभास दुर्गा भागवत यांचे ऋतुचक्र वाचताना होतो.

बालकवींच्या ‘औदुंबर’ या एका कवितेत तर रंग, रेषा आणि लय यांचा सुंदर मिलाप झालेला आहे. मोह आवरत नाही म्हणून ही छोटी कविता इथे उद्‌धृत करत आहे. यातला काळिमा म्हणजे काळा रंगसुद्धा गोड आहे.

‘ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे

हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे

झाकळूनि जळ, गोड काळिमा पसरुनी लाटांवर

पाय सोडून जळात बसला असला औदुंबर’

हा पाय सोडून बसलेला औदुंबर म्हणजे रवींद्रनाथ टागोर, योगी अरविंद किंवा एखादा पुराणातील ऋषीचे प्रतीक वाटू लागते. अर्थात हे माझ्या मनात प्रतिबिंबित झालेले रंगांचे आभास आहेत. कदाचित वाचकांनाही याचा प्रत्यय आलेला असेल अथवा येईल.

अशोक वासुदेव बक्षी, सातारा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके