डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भालचंद्र नेमाडेंच्या मुलाखतीची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर संपादकांना अंकाची कल्पना स्फुरली या पार्श्वभूमीवर एक सूचना करावीशी वाटते. ‘कर्तव्य साधना’ या पोर्टलद्वारे साधनाने आपला डिजिटल ठसा उमटवला आहे. ‘कर्तव्य साधना’मधली श्राव्यसामग्री (‘कन्टेन्ट’ या अर्थाने) उल्लेखनीय आहे, पण अनेक सामग्रीचा पूर्ण भाग ऐकायचा झाल्यास स्टोरीटेल या ॲपची वर्गणी आवश्यक आहे- अर्थात हे आर्थिक प्रारूप योग्य आहे. पण काही मुलाखती, चर्चा आणि संपादकीय विचार ‘पॉडकास्ट’ या माध्यमाद्वारे ‘कर्तव्य साधना’ उपलब्ध करू शकते का याचा विचार व्हावा. 

भारतीय संस्कृती आणि धर्माभिमान यातील फरक अधोरेखित करणारे लेख...

दि. 2 एप्रिलच्या साधनेतील अन्वर राजन यांचा ‘परधर्म द्वेष’, दत्तप्रसाद दाभोलकरांचा ‘हिजाब- स्वामी विवेकानंद, पंडित नेहरू आणि संघ परिवार’, रामचंद्र गुहांचा ‘भयगंड बाळगत खिडक्या बंद करण्याचे दुष्परिणाम’ आणि ‘डेक्कन कॉलेज परिसरातील केशवरावांची नववी मुलाखत’ हे सर्व लेख वाचले. गांधी-नेहरू, पटेल-आझाद आणि एकंदर काँग्रेसप्रणित किंवा सुभाषबाबू, भगतसिंग या क्रांतिकारकांना अभिप्रेत असणारा राष्ट्रवाद तसेच विवेकानंद, म.गांधी, टागोर, नेहरू या सर्वांनी जाणलेला वैश्विकतेची, मानवतेची शिकवण सांगणारा हिंदू धर्म आणि विविधतेतील एकता जगणारी भारतीय संस्कृती एका बाजूला आणि सनातनी-वैदिक परंपरेतून तथाकथित राष्ट्रवादाच्या नावाखाली पुनर्स्थापित होऊ पाहणारा प्रामुख्याने मुस्लिम द्वेषावर आधारलेला संकुचित, कर्मठ धर्माभिमान यातील फरक अधोरेखित करणारे हे लेख आहेत.

अन्वर राजन हे हिंदू-मुस्लिम प्रश्नावर समन्वयाची भूमिका घेऊन आपल्या समाजात सुधारण्यास वाव आहे याची जाणीव ठेऊन गेली कित्येक वर्ष काम करीत आहेत. येथील मुस्लिम उपरे नसून 95 टक्के मुस्लिम हे येथील जनतेचे धर्मांतर झाल्यामुळे झाले आहेत; ते तलवारीच्या बळावर झाले नसून बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या दलितांप्रमाणे समाजबांधवांनी समाजात स्थान देण्याचे नाकारल्यामुळे झाले आहेत, हे इतिहासाचे दाखले देऊन व उदाहरणासहित स्पष्ट करतात. संत आणि सुफी संप्रदाय यांच्या कार्याचा उल्लेख करून भारतीयांच्या सहिष्णू वृत्तीची आठवणही त्यांनी करून दिली आहे.

तोच धागा पकडून दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विवेकानंदांच्या चिंतनाची, तपशीलवार माहिती देऊन विवेकानंदानी खरा हिंदू धर्म हा वैश्विकतेचा आणि मानवतेचा पुरस्कार करणारा आहे, हे सातत्याने आणि कळकळीने प्रतिपादन केल्याचे स्पष्ट करतात. दुर्दैवाने या महत्त्वाच्या दार्शनिकाचा तथाकथित धर्माभिमान्यांना सोयीस्कररित्या विसर पडला आहे.

रामचंद्र गुहा यांनी तथाकथित राष्ट्रवादाच्या अस्मितेच्या नावाखाली विनाकारण बाळगलेल्या मुस्लिम भयगंडाची खिल्ली उडवली आहे. गुहांनी विवेकानंदांच्या वैश्विकतेच्या भूमिकेचा पुरस्कार म.गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी असलेली काँग्रेस कशी करत होती, हे इतिहासाचे दाखले देऊन स्पष्ट करतात. त्या दृष्टीने स्वातंत्र्यसेनानी उषा मेहतांचे पत्रव्यवहार उल्लेखनीय आहेत. दुसऱ्या महायुद्धात नरसंहाराला जबाबदार असणाऱ्या जर्मनी वगैरे राष्ट्रांबाबतही सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवणे कसे आवश्यक आहे, हे आवर्जून सांगितले आहे. केशवरावांची नववी मुलाखत प्रश्नोत्तराच्या रूपाने याला सरळ हात घालते. गांधी-नेहरू, पटेल-आझाद यांची काँग्रेस किंवा सुभाषबाबू-भगतसिंग यांच्या क्रांतिकार्यामागची प्रेरणा ‘राष्ट्रवादा’शिवाय आणखी कोणती होती, असा प्रश्न विचारून सध्याच्या तथाकथित राष्ट्रवादाच्या नावाखाली धर्माभिमान्यांना निरुत्तर करतात. त्या वेळी यांचा राष्ट्रवाद कुठे गेला होता, याचे उत्तर मिळणार नाही सांगायला नकोच. देश विद्वेषाच्या आणि यादवीच्या खाईत जाण्यापूर्वी सारासार विचार करणाऱ्या नव्या पिढीने वेळीच सावध होणे आवश्यक आहे. 

जी. डी.पारेख, पुणे


‘दीर्घ मुलाखत’ या फॉर्ममुळे तो अवकाश उपलब्ध झाला...

26 मार्चचा तीन कवींच्या दीर्घ मुलाखती असलेला अंक आवडला. अंकाला भरभरून मिळणारा वाचक प्रतिसाद पाहता जनमानसात कवितेबद्दल असणारी सुप्त, अप्रकट  आस्था जाणवते, आणि संपादकीयात नमूद केलेली उद्दिष्टे यशस्वी झाली आहेत हे दिसते. तीन कवींच्या निवडीमागची भूमिका संपादकीयात स्पष्टपणे आणि समर्पकपणे आली आहे. त्यावरून साधनाच्या एकेका विशेषांकामागे किती नियोजन, परिश्रम आणि दूरदृष्टी असते याची कल्पना आली. तसेच नेटकेपणा आणि संक्षिप्तता हे कवितेचे एक मुख्य अंग मानले तरी कवितेच्या आणि एकूणच साहित्यनिर्मितीमागच्या भूमिका आणि प्रेरणांचा समर्थपणे वेध घ्यायला जो अवकाश आवश्यक असतो तो ‘दीर्घ मुलाखत’ या फॉर्मद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे कवींच्या भूमिका समजायला मदत  झाली. (लोकनाथ यशवंत यांना विचारले गेलेले प्रश्न मात्र बाळबोध वाटले, त्यामुळे अधूनमधून रसभंग झाला ही अंकातील एकच उणीव नोंदवता येईल). समाजमाध्यमांवरील उथळ पोस्ट्‌स सायबरस्पेसमध्ये चटकन्‌ विकीर्ण होत जातात. अशा वेळी गंभीर वाचन-चिंतनाला उद्युक्त करणाऱ्या, साहित्य आस्वादाच्या नव्या वाटा चोखाळायला प्रवृत्त करणाऱ्या या अंकाचे वैशिष्ट्य उठून दिसते.

भालचंद्र नेमाडेंच्या मुलाखतीची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर संपादकांना अंकाची कल्पना स्फुरली या पार्श्वभूमीवर एक सूचना करावीशी वाटते. ‘कर्तव्य साधना’ या पोर्टलद्वारे साधनाने आपला डिजिटल ठसा उमटवला आहे. ‘कर्तव्य साधना’मधली श्राव्यसामग्री (‘कन्टेन्ट’ या अर्थाने) उल्लेखनीय आहे, पण अनेक सामग्रीचा पूर्ण भाग ऐकायचा झाल्यास स्टोरीटेल या ॲपची वर्गणी आवश्यक आहे- अर्थात हे आर्थिक प्रारूप योग्य आहे. पण काही मुलाखती, चर्चा आणि संपादकीय विचार ‘पॉडकास्ट’ या माध्यमाद्वारे ‘कर्तव्य साधना’ उपलब्ध करू शकते का याचा विचार व्हावा. 

‘पॉडकास्ट’ हे शंभर टक्के श्राव्यमाध्यम गेल्या काही वर्षात जगभरात बरेच लोकप्रिय झाले असून, एकाच वेळी ‘मास’ आणि अभिजात अशा दोन्ही पातळींवर यशस्वी झाले आहे. फोनवर सहजपणे उत्तमोत्तम माहिती-मुलाखती-विश्लेषणे या माध्यमाद्वारे ऐकता येतात. मराठीत दर्जेदार, प्रशंसा करावी अशी पॉडकास्टस विरळा आहेत. (अंकातील अन्य दोन्ही मुलाखतीसुद्धा उत्तमपणे या माध्यमाद्वारे ऐकता आल्या असत्या). ‘कर्तव्य साधना’ने प्रायोगिक तत्त्वावर या माध्यमाची चाचपणी करावी अशी नम्र सूचना मी करू इच्छितो. जगभरातल्या मराठी वाचकांकडे उत्तमोत्तम सामग्री याद्वारे तर जाईलच, पण प्रिंटमाध्यमाच्या मर्यादा (जसे की शब्दसंख्या) ओलांडून  नवीन प्रकारची सामग्री या माध्यमाद्वारे विशेषतः युवा वर्गाकडे जाऊ शकते.  सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक पान वाचनीय असणाऱ्या या संग्राह्य अंकाच्या निर्मितीबद्दल संपादक, तिन्ही कवी, मुलाखतकर्ते आणि साधनाचे अभिनंदन.

भूषण निगळे, जर्मनी


जाणीवपूर्वक दोन मुद्दे टाळले आहेत...

7 मेच्या साधना अंकातील संपादकीय ‘मुखवटा राज ठाकरेंचा, चेहरा भाजपचा!’ वाचला. यात राज ठाकरेंची आजवरची वाटचाल व धरसोड यावर लिहिले आहे आणि टीका केली आहे. पण राज ठाकरे हे भाजपाचा चेहरा नाहीत व जरूरी नाही. भाजपा सक्षम आहे. तरीही राज ठाकरेंनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून फक्त महाराष्ट्रात नाही तर एकदम देशातील लोकांचे लक्ष वेधले आहे. याचाच अर्थ राज ठाकरेंचा मुद्दा आम जनतेला भावणारा आहे. या सर्व ऊहापोहामध्ये संपादकांनी जाणीवपूर्वक दोन मुद्दे टाळले आहेत. 1. शरद पवारांचे धरसोड राजकारण आणि जाती-पातींचे राजकारण 2. सेक्युलर देशात सदैव संविधानाचा उल्लेख होताना आधी ‘हिजाब’ मग ‘किताब’ हा संकुचित विचार व खरोखरच हिंदूबहुल देशात लाऊडस्पीकरवरून अजान साधनेला आवडते काय?

पुढील सर्व निवडणुकीत भाजपाचा निर्विवाद विजय यावर आणखी एक संपादकीय साधनाने लिहिण्याची तयारी ठेवावी.

किशोर मधुकर काकडे, बेळगाव

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके