डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

 • रित्या पोटी…
 • .तर अशी पाळीच येती ना!
 • मोजक्या शब्दांत असंख्य गोष्टी
 • सर्वानाच हे आव्हान
 • धोक्याचा इशारा
 • राष्ट्र कसे चालते?
 • श्रमसंस्कार छावणी
 • शासनकर्ते बोध घेतील काय?
 • तारखेसंबंधीचा खुलासा
 • आमचे दुर्दैव!
 • दळवींचा लेख

रित्या पोटी… 

या पांघरूण राती, जगले कशात नाही? ऐकून कान फुटले, पोटातली सनई... चालून सर्व वाटा, वाटाळलेच नाही ‘चमड्यास’ विकून जगता, तुकड्यास लाज येई... पायात चाळ माझ्या अबुत नाचताना माझ्याच सावल्यांचे पेटून रक्त जाई... अंधार फाडूनी मी लिहिणार होते काही या पापणीत वारा, बनलाच नाही शाई... पेलीन सर्व मरणे- होती आशा परंतू गर्भात सूर्य माझ्या अंकुरलाच नाही... विकण्यास जीव माझा,मजलाच आज घाई सोलून कातडी ही देईल का कसाई..?
- राजन जी. गवस

तर अशी पाळीच येती ना! 

ता. 27 मे 1978 व्या साधनेतील 'जे रूट' हा डॉ. ना. य. डोळे यांचा लेख वाचला. त्यावरची शनिवार दि. 17 जून 1978 च्या साधनेतील कुमार विकास, वर्धा यांची प्रतिक्रियाही वाचली.

कुमार विकास यांनी श्री जवाहरलालजींसंबंधी जे मूल्यमापन केले आहे. ते माझ्या विचाराशी जुळते आहे. त्यांचे कार्य माझ्यामते खालीलप्रमाणे आहे:

स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची अवस्था एका कुजलेल्या दलदलीसारखी होती. श्री जवाहरलालजींनी त्या दलदलीमध्ये सिमेंट काँक्रिटचे खर्चिक उंच उंच खांब घालून त्यावर एक तसाच अफाट स्लॅब टाकला व त्या स्लॅबवर विज्ञानाचा एक दिखाऊ डोलारा उभा केला. त्या स्लॅबवर आलीशान मोटारीतून हिंडून दौरे काढले व लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि नियोजनांच्या (खऱ्या अर्थाने ती नियोजने नव्हतीच) घोषणा दिल्या. तसे नसते तर ‘समता संगर' हे सदर लिहिण्याची किंवा चालवण्याची साधनेवर पाळी आली नसती असे मला वाटते. 
- कृष्णा कुंटे, मालाड.

मोजक्या शब्दांत असंख्य गोष्टी 

साधनेतील लिखाण वाचून कधी अंगावर शहारे येतात तर कधी मन समुद्राच्या लाटांप्रमाणे उफाळून येते. साधनेतले लिखाण जिवंत, जळजळीत, प्रखर, पाटावर प्रहार करणारे असते. साधना व्यर्थला तोंड फोडते, कथेची व्यथा करते आणि ती व्यथा नाहीशी करण्याचा उपायही सुचवते.

साधनेने खूप जणांना आधार दिला. गरीब, दुर्बल येथे तसा रहात नाही. दलित, आदिवासी यांना साधनेने अनेक मित्र मिळवून दिले आहेत. साधना नियमित वाचण्याचा मी निश्चय केला आहे.

साधना अस्पृश्यता निवारण्याचे काम जोमाने पुढे नेत आहे. साधना बऱ्यावाईटाला वाचा फोडते. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देते. इंदिरा-संजयसारख्यांची कल्पना साधनेतूनच चांगल्या त-हेने आली. मोजक्या शब्दांत असंख्य गोष्टी साधना आम्हाला देऊन जाते.
- धनंजय कोरगावकर, पणजी.

सर्वानाच हे आव्हान 

1 जुलैच्या अंकातील श्री यदुनाथ थत्ते यांचा ‘क्या जाग उठी तरुणाई हे?’ हा लेख फारच आवडला. मोजक्या, पण परखड शब्दांत संपूर्ण क्रांती आणि सामाजिक परिवर्तन याविषयी त्यांनी आपले विचार मांडले आहेत. प्रत्येकाने आपल्यापासून सुरवात करावी, ही त्यांची सूचना केवळ तरुणांनाच नव्हे, तर सर्वांनाच एक आव्हान आहे. हे आपण कसे स्वीकारतो, यावर संपूर्ण क्रांतीचे यश अवलंबून आहे.
- ज. का. फडके, पुणे.

धोक्याचा इशारा 

दि. 3-6-78 च्या साधनेतील श्री निपाणीकर यांचे पत्र योग्य वाटते. 'अनावृतपत्र' व 'स्त्री शिक्षिका 'हे शब्द 'खटकणारे' आहेत. ‘आवश्यक ते संपादकीय संस्कार' त्यावर झालेले नाहीत. मागे आवश्यक ते ‘संपादकीय संस्कार' न झाल्यामुळे साधनेच्या चालकांवर गंभीर प्रसंग आला होता. 
- व. तु. दिघे, नाशिक रोड. 

राष्ट्र कसे चालते? 

1 जुलै 1978 च्या अंकात ‘अशाने राष्ट्र उभे राहत नसते!' हा मधु पानवलकरांचा पोटतिडिकेनं लिहिलेला लेख वाचला. 

'पदोपदी नाडणारा, आपले काम वेळेवर न करणारा आणि कामामध्ये कधीही रस न घेणारा सरकारी नोकर' अशी मधू पानवलकरांची सरकारी नोकरांविषयी धारणा वाचून हसावे की रडावे, हेच कळत नाही! एकजात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वरील सत्रात अखडणाऱ्या मधू पानवलकरांसारख्या टीकाकारांनी का राष्ट्र चालत असते? रोज रेल्वे वेळेवर सुटतात, आज टाकलेली पत्रे उद्या सकाळी मिळतात, इथला संदेश तारेने किंवा टेलिफोनने जगाच्या कुठल्याही भागात जातो, तो कोणामुळे? मूठभर भ्रष्टाचारी सरकारी नोकरांच्यामुळे, वेळेवर काम न करण्यामुळे, एकजात सर्व सरकारी नोकरांना बट्टा लावण्याची विकृत मनोवृत्ती आपल्याकडे अनेकांची आहे. 

‘आचार्य संत विनोबांचा जयजयकार’ खूपच आवडला. 'लाश वही हे, कफन बदला है’ - असे सध्या तरी प्रत्येकाला वाटते, तसेच मलाही, पण दिवस बदलतील असे वाटते.  
‘साधना’ आकर्षकही हवा हे दा. की. ठाकूर यांचे मत योग्य आहे, पण 'साधनेट तल्या मजकुराची रुची लालित्यमय साहित्याहून कणभरही उणी नसल्यामुळे फालतू लालित्याचा हव्यास न धरणेच योग्य. 

साधनेसाठी नेहमीच पत्र पाठवावे असे वाटते, पण कधीतरी पत्र पाठवण्यास मन लाचार करते. आजही म्हणूनच पत्र पाठवत आहे.
साधना अनंत शुभेच्छा! 
- गोकुळदास येशींकर, मालेगाव.

श्रमसंस्कार छावणी 

18 मे ते 28 मे च्या दरम्यान सोमनाथ येथे आंतर भारतीतर्फे झालेल्या श्रमसंस्कार शिबिराला मी गेलो होतो आंतर भारतीतर्फे संघटित केलेल्या या शिबिरातील वातावरण मला फारच आवडले. आदरणीय श्री बाबा आमटे यांनी आमच्याशी केलेल्या गप्पा-गोष्टी मी जीवनात कधीच विसरणार नाही. कोणतेही काम कमीपणाचे समजू नये, ही महत्वाची शिकवण मला त्यातून मिळाली. अनेक समविचारी तरुण-तरुणींशी परिचय झाल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
- प्रमोद ठाणेदार, सांगली. 

शासनकर्ते बोध घेतील काय? 

साधना ही आणीबाणीसारख्या खडतर दिव्यातून तावूनसुलाखून यशस्वी बाहेर पडली. त्यामुळे तर देशातील सामान्यांची ‘साधनात ही प्रेरणा स्थान बनली आहे. निर्भयपणे अन्यायाविरुद्ध तुटून पडणारी, नव-समाज निर्मितीसाठी नवे मौलिक विचार देणारी, समताधिष्ठित लोकशाहीचा विचार रुजवण्यासाठी धडपडणारी साधना आजही समाजात आत्मविश्वासाने वावरताना आमच्यासारख्या तिच्या हितचिंतकांना सार्थ अभिमान वाटतो व जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी वाटाड्या-सोबत असल्याचे समाधान मिळते.

साधनेचा प्रत्येक अंक वाचनीय असतो. 'युवा मनाचे स्पंद' व 'समता संगर' ही सदरे तर वाचकांना वैचारिक चालना देतात. तसेच सामाजिक व आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणारे लेखही उद्बोधक असतात.

17 जूनच्या अंकातील बाबा आमटे यांचे चिंतन आवडले, बाबांचा प्रत्येक शब्द हा खरोखरच चिंतनीय आहे. दुसऱ्या स्वातंत्र्या नंतर लोकांच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु त्यांच्या अपेक्षेची पूर्तता शासनाकडून होऊ शकली नाही. जनसामान्यांचा आवाजच प्रस्तुत चिंतनातून व्यक्त झाला आहे. बाबा म्हणतात त्याप्रमाणे “आश्वासनांचा आंगठा चूरयायला देऊन जनतेला फार काळ थांबवता येणे शक्य नाही. जनता सरकारने नाराजीचा डोंब उसळण्याची वाट पाहू नये. वेळीच जनता ने काळाची पावले ओळखून गमावत चाललेल्या विश्वासाला रोखले पाहिजे. 

दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना जनमताची अनामिक अधिकारवाणी त्यातून दुमदुमत होती पण आता त्यांच्यातला आत्मतुष्ट आवेश गर्दीच्या रक्ताला उधाण आणीत आहे, कारण परस्परांतील सेतू बनलेली उद्दिष्टेच गहाळ झाली आहेत. ह्या बाबांच्या चितनातील ओळींचा अर्थ समजून शासनकर्ते काही बोध घेतील ही अपेक्षा. 
- अंकुधा काळदाते, आपेगाव.

तारखेसंबंधीचा खुलासा 

साधनेच्या 1 जुलैच्या अंकात सुरबानाना टिपणीसांसंबंधी एक लेख आहे. त्यांच्या निधनानंतर वेळ न दवडता त्यांना ह्या लेखाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली गेली हे योग्यच झाले. मात्र ह्या लेखात नानांच्या जीवनातल्या काही घटनांशी संबंधित अशा तारखा दिल्या आहेत. त्यांत काही चुका आहेत.

1923 साली नानांनी सार्वजनिक जीवनात पदार्पण केले आणि 1924 साली ते महाड नगरपालिकेत निवडून आले, असे लेखात म्हटले आहे.

महाड कॉलेजच्या मार्च 1962 च्या वार्षिकात नानांनी दिलेली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्या मुलाखतीत नानांनी स्वतःच आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटनांच्या तारखा-वर्षे दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.

10 डिसेंबर 1898 जन्म. 
1920 सार्वजनिक जीवनात प्रवेश 
1922 एका पोटनिवडणुकीत विजयी होऊन महाड नगरपालिकेत प्रवेश
1923 ऑगस्ट, मुंबई येथे सोशल सर्व्हिस लीगच्या ऑफिसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याशी पहिली भेट
1924 सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा रा. व. सीताराम केशव बोल्यांचा ठराव मुंबई कौन्सिलात संमत. 
1925 नाना टिपणीस महाड़ नगरपालिकेचे अध्यक्ष झाले.
हया तारखा नानांनी स्वतःच दिलेल्या असल्यामुळे मुद्दाम कळवीत आहे.

- रा. भि. जोशी, मुंबई.

आमचे दुर्दैव! 

साधनाचा 3 जूनचा अंक वाचून आश्चर्य वाटले.

साधनाला बातचीत करण्यासाठी आता माणसे मिळत नाहीत काय? साधनेऐवजी गतिमान सहयाद्रीत अशी बातचीत येऊ शकेल.

एका सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेल्या संधिसाधू व लाळघोट्या प्राचार्यांची खोटारडी मुलाखत छापून साधनानेच आपला दर्जा कमी केला असे मला वाटते.

ज्या साधनेने आणीबाणीतही मोहन धारिया, ना. ग. गोरे, कृष्णकांत, उमाशंकर जोशी, मावळकर यांच्या मुलाखती छापल्या व लोकजागृती केली व धीट साप्ताहिक म्हणून लौकिक मिळवला, त्या साधनेवर संधिसाधू व चमचेगिरीत प्रवीण असलेल्या तथाकथित प्राचार्यांची मुलाखत छापण्याची वेळ यावी. दुर्दैव आम्हा वाचकांचे! दुसरे काय?
- पी. बी. जैन, पुणे.

दळवींचा लेख 

साधनेच्या 1 जुलैच्या अंकातील "शाह कमिशनचे लोकशिक्षणात्मक मूल्य" हा श्री सी. आर. दळवी यांचा लेख सद्य:परिस्थितीत अत्यंत उपकारक असाच जाहे. सुशिक्षित समाजात शाह कमिशनच्या सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण कार्यासंबंधी जे नाना प्रकारचे गैरसमज निर्माण झाले आहेत व पसरवलेही जात आहेत, त्यांच्या निराकरणासाठी तर हा लेख आवश्यकच आहे, पण त्याबरोबरच "श्रीमती इंदिरा गांधी एक प्रवृत्ती" हाच देशाला खरा धोका आहे, हा श्री दळवी यांनी काढलेला निष्कर्ष सर्वांनाच यथार्थपणे मार्गदर्शन करणारा व सर्वांच्या हिताचा आहे. म्हणून प्रस्तुत लेखात श्री दळवी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी जनतेला स्वातंत्र्याच्या मूल्याची शिकवण सतत देण्यासाठी पुढे आले पाहिजे.
- मामा क्षीरसागर, दर्यापूर.

Tags: राजन जी. गवस कृष्णा कुंटे ज. का. फडके व. तु. दिघे गोकुळदास येशींकर प्रमोद ठाणेदार रा. भि. जोशी पी. बी. जैन बाबा आमटे मावळकर उमाशंकर जोशी कृष्णकांत ना. ग. गोरे मोहन धारिया इंदिरा गांधी श्री दळवी Rajan G. Gawas Krushna Kunte J.K. Fadke V.T. Dighe Gokuldas Yeshinkar Pramod Thanedar R.B. Joshi P.B.Jain Baba Amte Mavalkar Umashankar Joshi Krushnakant Na.G. Gore Mohan Dhariya Indira Gandhi #Shri Dalvi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके