डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

चित्रकाराला (गिरीष सहस्रबुद्धे) तुम्ही आणखी वाव द्यावा व अंक सजवावा ही विनंती. राजन खान यांच्या लेखावर खूप नवनव्या प्रतिक्रिया येतील, इतका महत्त्वाचा विषय त्यात आहे. साधना कामत यांनी संगीत समीक्षक नाडकर्णी यांचे दोन पानात अप्रतिम व्यक्तिचित्र उभे केले आहे. त्यांनी आणखी खूप माणसे शोधून अशीच दोन पानात सजवावीत. ‘प्रतिसाद’ मधील पत्रेदेखील विसरता येत नाहीत.  वाचन-संस्कृती अभियान आणखी ठिकठिकाणी खूप बहरले असेल.  त्यांचेही अहवाल छापावेत.

एक गोष्ट आपण तत्काळ अंमलात आणू शकतो...

‘आपण समाजवादी आहोत का?’ हे ‘साधना’च्या 16 फेब्रुवारीच्या अंकातील दत्तप्रसाद दाभोलकर यांचे निवेदन वाचले. त्यांच्या विवेचनातील मुख्य मुद्दा हा अत्यंत विचारार्ह व त्याहून जास्त ‘आचारार्ह’ असून हा विचार चर्चेसाठी पुढे आणल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

“पण जेथे आपण नक्की काहीतरी करू शकू, अशा गोष्टीतही स्वत:ला समाजवादी म्हणविणारे आपण काय करतो? घरची धुणी-भांडी, केरकचरा काढणारी बाई, स्वयंपाकीण, ड्रायव्हर यांना आपण केवढा नगण्य पगार देतो?” हा त्यांचा प्रश्न आपण सर्वांनीच स्वत:ला विचारला पाहिजे आणि ही अन्याय्य परिस्थिती बदलण्यासाठी, निदान स्वतःपुरता आपल्या आचरणात विनाविलंब बदल घडवून आणला पाहिजे. 

परंतु ज्याने त्याने स्वत:च्या मनाने आपापल्या कामगारांचा पगार वाढविल्याने चांगल्या दिशेने एक पाऊल उचलले गेले, इतकेच फारतर म्हणता येईल. सुधारणा करणाऱ्याची सदसद्विवेकबुद्धीची टोचणी त्यामुळे कमी होईल व कामगारांचाही थोडा लाभ होईल. पण कामगारांना न्याय हक्क व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने अशा वैयक्तिक सुधारणा ही फक्त वरवरची मलमपट्टी ठरेल. मालकांनी केलेल्या असल्या वैयक्तिक, ऐच्छिक बदलांमुळे कामगार हक्क प्रस्थापित होण्याऐवजी, मालकांमध्ये स्वतःच्या औदार्याचे प्रकटीकरण केल्याचे समाधान व कामगारांमध्ये उपकृत झाल्याची भावना, अशा अनिष्ट भावना रुजतील आणि समाजवादी समतेपेक्षा भूतदयावादी वृत्तीखाली कामगार दडपून जातील. 

हे सर्व टाळण्यासाठी व कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क प्राप्त करून देण्यासाठी समाजवादी विचार-आचारवंतांनी त्वरेने पुढील पावले उचलावयास हवीत. 

1. व्यक्तिगत पातळीवर, उदारपणाच्या नव्हे तर कामगार हक्कांच्या दृष्टीने कृती करणाऱ्या व्यक्तींची नावे, पत्ते व त्यांच्या कृतीचा तपशील यांना साधनासारख्या साप्ताहिकात दरमहा प्रसिद्धी देऊन त्यातून अशा व्यक्तींचे गट उभे करण्याचा प्रयत्न करणे. 

2. या गटांनी परस्पर विचारांच्या देवाण-घेवाणीतून आपापल्या कामगारांच्या संदर्भात अधिकाधिक न्याय्य कृतींचा अंगिकार
करणे. 

3. या गटांनी घर-कामगार, मालक व या क्षेत्रातील जाणकार यांच्या समित्या नेमून कामगारांचे वेतन, रजा, कामगार-संरक्षण याबाबत नियमावली तयार करणे.

4. या कामगारांचे वेतन, रजा, कामगार-संरक्षण इत्यादी बाबतीत सरकारने लवकरात लवकर कायदा करून त्याची सत्वर व प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी सरकारवर दडपण आणणे.

याबरोबरच या सर्व बदलांचा प्रारंभ म्हणून सर्व समाजवाद्यांना तत्त्वत: मान्य असलेली, पैशाच्या दृष्टीने अंमलबजावणीत अडचण नसलेली आणि कृतीतून कामगारहक्कांचे प्रभावी समर्थन करणारी एक गोष्ट आपण तात्काळ अंमलात आणू शकतो; ती म्हणजे या कामगारांना हक्काची साप्ताहिक सुट्टी मंजूर करणे. माझ्यापुरती ही सुट्टी देण्याचा अनेकवार पुढे ढकलला जाणारा विचार दत्तप्रसाद दाभोलकरांच्या निवेदनामुळे मी तात्काळ सुरू केला आहे. असाच प्रतिसाद देणारे लोक मिळतील व त्यातून एका चांगल्या स्थित्यंतराचा प्रारंभ होईल असा विश्वास वाटतो.

प्रा.डॉ. अमरजा नेरूरकर 
निवृत्त प्रपाठक, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई.

(या विषयावर चर्चा- कृतिशील प्रतिसाद अपेक्षित आहे- संपादक)

----

असे ताजेपण दुर्लभ आहे

9 फेब्रुवारीचा ‘साधना’चा अंक पोचला. त्यात बाबांचे वाक्य संजय जोशी यांच्या लेखाच्या अग्रभागी आहे आणि त्यांचा उल्लेखही शेवटी आहे, हा एक योगायोग म्हणावा!! 2 फेब्रुवारीच्या अंकात खूप चांगले लेख आहेत. अग्रलेखही कसदार उतरत आहेत. ‘व्यासपीठ’ सदर तर बहारीचे आहे. शिक्षणाविषयीचे पानसे व व्यंकटरामन यांचे लेख नव्या दृष्टीच्या कार्यकर्त्यांना खूप प्रेरक आहेत. दोन्ही राजन महोदयांचे लेखदेखील खूप चर्चात्मक आहेत.

चित्रकाराला (गिरीष सहस्रबुद्धे) तुम्ही आणखी वाव द्यावा व अंक सजवावा ही विनंती. राजन खान यांच्या लेखावर खूप नवनव्या प्रतिक्रिया येतील, इतका महत्त्वाचा विषय त्यात आहे. साधना कामत यांनी संगीत समीक्षक नाडकर्णी यांचे दोन पानात अप्रतिम व्यक्तिचित्र उभे केले आहे. त्यांनी आणखी खूप माणसे शोधून अशीच दोन पानात सजवावीत. ‘प्रतिसाद’ मधील पत्रेदेखील विसरता येत नाहीत.  वाचन-संस्कृती अभियान आणखी ठिकठिकाणी खूप बहरले असेल.  त्यांचेही अहवाल छापावेत.

शीर्षके व पोटशीर्षके, लेखकाचे नाव इत्यादींबाबत काही एकवाक्यता, समानता, पानांची रचना करणाऱ्यांनी खास ध्यानी घ्यायला हवीत. लेखकांची नावे वेगवेगळ्या अक्षरात, कधी अधोरेखित तर कधी नाही- असतात. पोटशीर्षकात (:-) हे नको. ज्यांना मुद्रणात रस आहे, अशी माणसे ‘साधना’ च्या मुद्रणावर, प्रत्येक शब्दावर लक्ष देऊन असतीलच. ...खूप नवनवे लेखक व विषय ‘साधना’ तून येत आहेत, हे असे ताजेपण अतिशय दुर्लभ आहे. अशा कितीतरी लेखातूनच पुढे एका संस्कृतीची रेखावाट तयार होऊ शकते. 1964 साली यदुनाथजींनी बाबांच्या कार्यावर केवढा अप्रतिम विशेषांक प्रगट केला. त्यानंतर कितीतरी नवनवे प्रकारच सतत आकार घेत राहिले.

गोपाळ शहा
बी/189 चाणक्यपुरी, बारडोली, जि. सुरत. 394601.

----

कुंदर नव्हे; मनोहर

16 फेब्रुवारीच्या ‘साधना’ मधील डॉ.बाबा आमटे यांच्यावरील ग.प्र.प्रधान यांचा ‘महामानव हरपला’ हा लेख वाचला. गांधीजींच्या कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या अनुयायींमध्ये कुंदर दिवाण यांचा उल्लेख प्रधानांनी केला आहे. पण नावात त्यांनी गल्लत झाली आहे, प्रधानांना मनोहर दिवाणांचा उल्लेख करायचा होता. कुंदर दिवाण हे त्यांचे धाकटे बंधू. ते हयात आहेत. मनोहर दिवाण हे पहिले भारतीय कुष्ठसेवक म्हणून गणले जातात. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती राजेंद्रबाबूंच्या हस्ते पद्मश्री देण्यात आली. मनोहर दिवाण यांनी 1940 साली वर्धा जवळील दत्तपूर येथे कुष्ठरोग्यांची संस्था स्थापन केली. ही संस्था आजही कार्यरत आहे. 1980 साली मनोहन दिवाण यांचे वयाच्या80 व्या वर्षी निधन झाले. 

जयंत दिवाण 
18/71 यशवंतनगर, गोरेगाव (प.), मुंबई 62.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके