डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘आणीबाणीच्या काळातील माझा तुरुंगवास’ हा श्रीमान सुरेश द्वादशीवारांचा लेख वाचताना माझा सात-सात दिवसांचा दोनदाचा बेळगाव-हिंडलगा जेलमधील डीआयआर खालील 1975 चा बंदजीवनाचा काळ आठवला आणि रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांसह इतर जणांबरोबर तो कारागृहात घालविलेला अद्‌भुत काळ आठवला. इंदिराजी, काँग्रेस आणि इतर संविधानाचे तोंडदेखले समर्थक आज जेव्हा आमची ओळख करून देताना तो उल्लेख होतो, तेव्हा बरं वाटतं. नंतर माझे सासरे झालेले सर्वोदयी कार्यकर्ते प्रभाकर मराठे आणि त्यांची कन्या उर्मिलाजी 19 महिने मिसाखाली होत्याच. शिवाय राम आपटे आणखी इतर बरेच होते. उभा देश बंदी झाला, अशीच अवस्था. तेव्हापासूनच आम्ही साधना वाचू लागलो. मी मात्र त्या वेळी जेपींच्या युवा संघर्षचा कार्यकर्ता, पण मूळचा आणि आजही संघ-स्वयंसेवकच होय... सुंदर लेख. 

बौद्धिकता व प्रयोगशीलता यामुळे कुमारांचे गाणे गाजले 

दि. 3 एप्रिलच्या अंकावरील मुखपृष्ठावर तरुण वयातील कुमार गंधर्व यांचा गातानाचा फोटो पाहून एकाच वेळी आश्चर्य आणि आनंद वाटला. आश्चर्य यासाठी की, आजवर कधी शास्त्रीय संगीताविषयी किंवा गायकांसंबंधीचे लेख साधनात वाचल्याचे स्मरत नव्हते. आनंद यासाठी की, साधना या विषयाकडे वळले- अशी मिश्र भावना माझ्यासारख्या शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण झाली असेल. 

अनुक्रमणिकेत पाहून कुमार गंधर्वांवरील लेख अतुल देऊळगावकर यांनी लिहिला आहे याचेही नवल वाटले. देऊळगावकर हे केवळ पर्यावरण या विषयाचे गंभीर अभ्यासपूर्ण लेखक आहेत, अशी मनाची धारणा झाली होती, पण हा लेख पाहून ते विभिन्न विषयांचे जाणकार आहेत हे समजले. त्यांचे लेख आम्ही कधी चुकवत नाही. अलीकडेच त्यांचे ‘विश्वाचे आर्त’ हे पुस्तक वाचले. भारत आणि इतर सर्व देशांमधील पर्यावरणाची किती अपरिमित हानी झाली आहे आणि या विषयाकडे सर्वसाधारण समाज ‘जानके भी अनजान’ कसा राहिला, हे प्रत्येक लेखात ठसवत राहतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुमारांवरील लेखनातून मला मोकळीक झाली. 

कुमार गंधर्वांची मैफल ऐकणे हे एक आनंदपर्व असते आणि दोन-तीन तासांत हे आनंदपर्व संपल्यावरही पुढे मनात बराच आनंद टिकून राहतो आणि पुन:पुन्हा मनात गुंजतो. आजवर मला प्रत्यक्ष समोर बसून हे आनंदपर्व चार-पाच वेळा तरी अनुभवता आले आहे. केंद्र सरकारच्या नोकरीमुळे वास्तव्य चंडीगडमध्ये होते. त्या वेळी तिथे 30-40 मराठी कुटुंबे होती, ती महाराष्ट्र मंडळामुळे जोडलेली होती. मंडळाच्या निधीसंकलनासाठी दर दोन-तीन वर्षांनी एका मोठ्या कलाकाराचा कार्यक्रम करून त्याप्रसंगी सोव्हिनियर काढले जायचे. त्यासाठी मंडळातील दोन-तीन बँक मॅनेजर, मोठ्या पोस्टवरील अधिकारी जाहिराती मिळवून फंड गोळा करायचे. माझ्या वास्तव्यात कुमार गंधर्वांचे चार आणि पं.भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर, रामदास कामत यांचा एक एक कार्यक्रम; सखाराम बार्इंडर (हिंदी), अखेरचा सवाल असे नाट्यप्रयोग घडवून आणले, तेव्हा मी मंडळाचा चिटणीस होतो. 

मंडळातील सर्वांत जुने सदस्य श्री.मधुकर पांडे हे कुमारांचे देवासपासूनचे जवळचे मित्र असल्याने कुमारांनी मंडळासाठी चार कार्यक्रम दिले, बिदागीही माफक घेतली. कार्यक्रमासाठी आल्यावर त्यांचा चार-पाच दिवस मुक्काम असायचा. त्यामुळे अनेक सदस्य पांडे यांच्या घरी जाऊन कुमारांच्या खासगी गप्पांमध्ये सामील व्हायचे. अशाच एका मुक्कामात बंगल्याच्या हिरवळीवर सतरंजीवर बसून मंडळाच्या सदस्यांशी कुमारांच्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कुमारांनी त्या बैठकीमध्ये आपल्या गायनशैलीवरील आमच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. गायनातील प्रगतशील वैचारिक पार्श्वभूमी त्यातून समजली. जुनी साचेबद्ध रागांची मांडणी बदलून नव्याने मांडणी करण्याचे प्रयत्न केले. जुन्या संगीताच्या अनेक अभिमान्यांना त्यामुळे कुमारांची प्रस्तुती मानवली नाही, ते कुमारांवर टीका करीत राहिले. 

कुमारांकडे मोठी सौंदर्यदृष्टी होती. त्यामुळे सुंदर वास्तुकला, डोंगर, खडक, वृक्ष इत्यादींमध्ये समरसून कला शोधायचे आणि ते सौंदर्य आपल्या गाण्यातून मांडण्याची कोशीश करायचे.  

तरुण वयातील दीर्घ आजारात त्यांचे एक फुप्फुस निकामी झाल्याने त्यांच्या गायनाला मर्यादा पडायची. दीर्घ पल्ल्याच्या तानांऐवजी ते छोट्याछोट्या ताना, पलटे वगैरेंमधून नव्या थाटाने गाणे रंगतदार करायचे. गायकीमधील प्रत्येक नवी उपज ठाशीव मोठ्या आवाजात व्हायची, पुढे त्यातून हलक्या व नाजूक हरकती जन्म घ्यायच्या. शास्त्रीय संगीताच्या अनेक श्रोत्यांनी या नव्या शैलीचे मनापासून स्वागत केले- एवढेच नव्हे, तर ते कुमारभक्त बनले. 

कुमारजींनी नावीन्य निर्माण करण्यासाठी माळव्यातील लोकसंगीत शास्त्रीय गायनात गुंफले. त्यांची निर्गुणी भजने, ऋतुराज मेहफिल, इतर ऋतुसंगीत खूप गाजले. 

एकंदरच कुमारांचे सर्वच गायन बौद्धिकता व प्रयोगशीलतेमुळे गाजले व पुढेही टिकून राहिले. शेवटी अतुल देऊळगावकरांनी आपल्या लेखनाचा वेगळा पैलू उघड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. 

रमेश आगाशे, सातारा 

----

महाराष्ट्राचे सत्ताधारी ‘अहो रूपं अहो ध्वनीं’मध्ये मश्गुल आहेत आणि... 

दि.27 मार्चचा अंक उशिरा मिळला. या अंकात माननीय अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी अतिशय नेमक्या शब्दांत सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती व तद्भव पुढे उभे ठाकलेल्या प्रश्नाविषयीच्या वास्तवाचा यथायोग्य परामर्श घेतला आहे. अभय टिळक अर्थतज्ज्ञ आहेतच; शिवाय अवघड सत्य नेमक्या शब्दांत स्पष्टपणे, लेखनात व भाषणात सांगण्याची त्यांच्याकडे शैली, हातोटी आहे. कोरोनाने व्यक्ती, समाज व सरकारला आरोग्याचे व आर्थिक झटके-चटके दिले आहेत. पण कोविड 19 च्या साथीने एकूण एकेरी विकासाचा डोलारा हा संख्याशास्त्रीय वाढीचा आहे, तो भुसभुशीत पायावर उभा आहे- हे उघडे पाडले आहे. सध्याच्या विकासाबरोबर, विषमता व पर्यावरणाचा ऱ्हास वाढत आहे. याकडे आपले धोरणकर्ते व त्यांच्यामुळे आपण दुर्लक्ष करीत आहोत. याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे इशारे गेल्या वर्षात कोरोनाच्या आपत्तीने दिले आहेत. शेतीची रोजगारक्षमता खुंटली आहे. रोजगारसंधीसाठी केवळ बेरोजगार युवक-युवतीच नाही, तर शेती करणे परवडत नाही व शेतीवर कुटुंबाचे भरणपोषण शक्य नाही, म्हणून शेतकरीही शहराकडे धावत आहेत. त्यातून शहरे कळाहीन, विनानियोजन फुगत आहेत. झोपटपट्टी, बकालपणा व बेरोजगारी शहरातही वाढत आहे. प्रश्न दिवसेंदिवस गंभीर व चिंताजनक होत आहेत, तरीही आपण रोजगारवाढीच्या व योग्य नियोजनाच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहोत. 

महाराष्ट्राचा विचार केला तर असे वाटते की, सत्ताधारी ‘अहो रूपं अहो ध्वनीं’मध्ये व स्वत:चेच प्रश्न सोडविण्यात मश्गुल आहेत, तर विरोधी पक्ष सत्ताहीन अवस्थेत प्रश्न कुरवाळत विरोध करण्यात रमले आहेत. मला वाटते, एकूण विचार करता, कमकुवत असलेली/ठेवलेली आरोग्यव्यवस्था व आपल्याच तालावर लोकांना बऱ्यापैकी नाचवणारे प्रशासन- दोहोंनीही या कठीण काळात बरेच काम केले आहे. अगदी देशपातळीवर काम करणाऱ्या आरोग्यव्यवस्था व प्रशासनाविषयीही तसे म्हणायला हरकत नाही. 

बेरोजगारी व स्थलांतर या दोन्ही प्रश्नांनी सामान्यांना अतिसार झाले. त्यासाठी आपल्या धोरणकर्त्यांना व आजवर रोजगारवृद्धीकडे पुरेसे लक्ष न देता, उथळ विकास व शहरीकरण राबविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना दोष दिला पाहिजे. वाईट याचेच वाटते की, हा गळाठा दूर होण्याची लक्षणे सध्या तरी दिसत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्यांच्या संघटित जनमताचा रेटा तयार केला पाहिजे. ते करण्यासाठी अर्थतज्ज्ञांसह समंजस राजकारण्यांनी आपापली मतमतांतरे बाजूला ठेवून, व्यापक जनहितसाधक चळवळी उभ्या करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला पाहिजे. सध्या तरी हे कठीण दिसते. अन्याय, अत्याचार व दुर्लक्ष यांच्या भडिमाराला तोंड देत जगणे भाग आहे. त्याच अंकात, मिलिंद बोकील यांचा कोरानाविषयक लेख भरपूर मोठा आहे. परिस्थितीची व अनुभवांची आवृत्ती वाचायला चांगली आहे. उपाययोजना आणि विशेषत: स्थानिक, राज्य व केंद्र शासनाला केलेल्या सूचना व मार्गदर्शन आशावादी आहे. सरकारांना जनमताचा दबाव समजतो. सामान्य माणसांना ‘मास्क वापरा, पाच-सहा फुटांचे अंतर ठेवून संसर्ग टाळा आणि सारखे सॅनिटराईज करत राहा,’ सांगणे भाग आहे. 

श्री.मधु जामकर यांचा ‘वठलेल्या झाडाखाली’ हा त्या अंकातील लेख चांगले ललित गद्य आहे. साधनाच्या ध्येयांत समाजप्रबोधनाचे ध्येय आहे, त्या स्वगतातून साधनाच्या वयोवृद्ध व थकलेल्या वाचकांना काळ कसा कंठावा, याविषयी मार्गदर्शन झाले आहे, असे म्हणता येईल. 

अरुण वि.कुकडे, नाशिक  

----

मार्टिन ल्युथर जसा युरोपीय ज्ञानेश्वर, तसेच... 

दि.17 एप्रिलच्या साधनामधील दिनेश पाटील यांचा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील लेख वाचला, खूप आवडला. एका महत्त्वाच्या, परंतु दुर्लक्षित अशा पुरोगामी चळवळीच्या पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. महात्मा फुले व सयाजीराव गायकवाड या दोघांनी ज्या तळमळीने साक्षरताप्रसाराचा प्रयत्न केला, त्यावरून एका पाश्चात्त्य ज्ञानेश्वराची आठवण झाली. मार्टिन ल्युथर हा ख्रिश्चन पाद्री ज्ञानेश्वरांनंतर दोन शतकांनी कार्यरत झाला. ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील भगवद्‌गीता मराठीमध्ये आणली, मार्टिनने लॅटिनमधील बायबलचे भाषांतर जर्मन भाषेत केले. तो नुसते भाषांतर करून थांबला नाही; ते भाषांतर सर्वसाधारण लोकांना वाचता यावे, यासाठी त्याने साक्षरता प्रसाराचा खूप प्रयत्न केला. त्याने खूप शाळा उघडल्या, तेथील राजे व सरंजामदार आणि श्रीमंत लोक यांच्या मदतीने त्याने हा उपक्रम केला. त्यामुळे जर्मनीमध्ये- म्हणजे त्या वेळच्या प्रशियामध्ये साक्षरतेचा प्रसार खूप झाला. नंतर ‘साक्षरतेचा प्रसार’ प्रोटेस्टंट चर्चचे व मिशनऱ्यांचे ब्रीदच बनले. जेथे जेथे प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार झाला तेथे प्रोटेस्टंट मिशनरी गेले, तेथे साक्षरतेचा प्रसार झाला. भारतात व आफ्रिकेतही साक्षरता प्रसाराचे मोठे श्रेय ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे विशेषतः प्रॉटेस्टंट मिशनऱ्यांकडे जाते. सर्व युरोपमध्ये, युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिकामध्ये व ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्यामध्ये 1900 पर्यंत जवळपास शंभर टक्के साक्षरता होती. याचे मोठे श्रेय मार्टिन ल्युथरला व नंतर लगेचच निघालेल्या छपाईच्या तंत्रज्ञानाला द्यावे लागेल. त्या वेळी भारतामध्ये फार तर दहा टक्के साक्षरता असेल. साहजिकच असे वाटून जाते की, ज्ञानेश्वरांनी व इतर सर्व संतांनी जर साक्षरता प्रसारावर भर दिला असता तर किती बरे झाले असते... केवढा प्रचंड फरक पडला असता! साक्षरता प्रसाराचे हे काम होण्यासाठी सयाजीराव व महात्मा फुले यांचा जन्म होईपर्यंत वाट बघायला लागली. मार्टिन ल्यूथर जसा युरोपियन ज्ञानेश्वर तसेच महात्मा फुले आणि सयाजीराव गायकवाड हे भारतीय मार्टिन ल्युथर होते, असे म्हणायला हरकत नाही. 

सुभाष आठले, कोल्हापूर. 

----

तिथे संघाचा उल्लेख होतो तेव्हा बरं वाटतं... 

‘आणीबाणीच्या काळातील माझा तुरुंगवास’ हा श्रीमान सुरेश द्वादशीवारांचा लेख वाचताना माझा सात-सात दिवसांचा दोनदाचा बेळगाव-हिंडलगा जेलमधील डीआयआर खालील 1975 चा बंदजीवनाचा काळ आठवला आणि रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांसह इतर जणांबरोबर तो कारागृहात घालविलेला अद्‌भुत काळ आठवला. इंदिराजी, काँग्रेस आणि इतर संविधानाचे तोंडदेखले समर्थक आज जेव्हा आमची ओळख करून देताना तो उल्लेख होतो, तेव्हा बरं वाटतं. नंतर माझे सासरे झालेले सर्वोदयी कार्यकर्ते प्रभाकर मराठे आणि त्यांची कन्या उर्मिलाजी 19 महिने मिसाखाली होत्याच. शिवाय राम आपटे आणखी इतर बरेच होते. उभा देश बंदी झाला, अशीच अवस्था. तेव्हापासूनच आम्ही साधना वाचू लागलो. मी मात्र त्या वेळी जेपींच्या युवा संघर्षचा कार्यकर्ता, पण मूळचा आणि आजही संघ-स्वयंसेवकच होय... सुंदर लेख. 

किशोर मधुकर काकडे, बेळगाव 

----

अशा टीकेला समाजात मान्यता मिळत नाही

सुरुवातीलाच मला खुलासा करायचा आहे की, मी संघाचा स्वयंसेवक नाही आणि मी कधीही संघात गेलो नाही. दि.17 एप्रिल 2021 च्या अंकातील दत्तप्रसाद दाभोळकर यांचे ‘हुकूमशाही : संघ परिवाराची आणि कम्युनष्टांची’ या शीर्षकाचे पत्र वाचले. ते अजून गोळवलकर, देवरस, मधोक यांच्यातच घुटमळताना दिसतात. ते पाहून मला ज्येष्ठ विचारवंत सुहास पळशीकर यांनी जयदेव डोळे यांच्या ‘आरएसएस’ या पुस्तकाची लोकसत्ताच्या दि. 13/8/17 च्या अंकात लिहिलेल्या समीक्षेची आठवण झाली. या समीक्षेत पळशीकर यांनी लिहिले होते, ‘विचार, संघटन आणि पक्षीय राजकारण या तिन्ही बाबतीत संघ बदललेला आहे, त्या बदलांमध्ये त्याची आत्ताची ताकद आहे... (लेखकाचा) जुन्याच चौकटीमध्ये संघाच्या सामाजिक शक्तीचे आकलन करण्याचा आग्रहदेखील डोकावतो.’ त्यांनी पुढे लिहिले आहे की, ‘साचेबंद चिकित्सेच्या पलीकडे जाऊन सभोवताली होणाऱ्या स्थित्यंतराची समीक्षा होण्याची आवश्यकता आहे.’

बीबीसी मराठीमध्ये 21 सप्टेंबर 2018 रोजी सुहास पळशीकर यांनी लिहिले होते, ‘इतक्या दीर्घ काळ अस्तित्वात असलेल्या या अजस्र संघटनेत काही स्थित्यंतरे होणे स्वाभाविक आहे आणि अशी काही स्थित्यंतरे झालेलीही आहेत. संघाचे विरोधक ती एक स्थिर व अपरिवर्तनीय वस्तू मानतात आणि तिच्या जुन्या वैशिष्ट्यांच्या आधारे तिच्यावर टिका करतात,  त्यामुळेच ती काही वेळा गैरलागू आणि संदर्भविहीन ठरते. ते अर्थात संघाला सोईचं ठरतं, कारण अशा टीकेला समाजात फारशी मान्यता मिळत नाही.’ 

विजय आपटे, पुणे 

----

एका दाबून टाकलेल्या किंकाळीला वाचा फोडली 

श्री.सुरेश खैरनार यांनी 3 एप्रिलच्या अंकात ‘भागलपूरचा आत्मा’- मुन्नासिंहच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने जे कथन केलेले आहे, ते वाचून मन शोकाकुल होते. माणुसकी काय असू शकते व ती कशी राबवली जाऊ शकते, हे भागलपूरचा मुन्नासिंह याने प्रत्यक्षात आचरणात आणले. सेक्युलर पाटर्या व स्वयंसेवी संघटना यांना पद्धतशीरपणे संपविण्याचा प्रयत्न या देशांत अखंडपणे चालू आहे. त्यात काही संघटना यशस्वीही होत आहेत, ही काळजी वाढवणारी व माणुसकीला शोभा न देणारी घटना आहे. बहुसंख्य लोकांच्या डोळ्यांवर एक पट्टी बांधलेली आहे. खैरनार यांनी कथन केलेल्या अशा घटनांमधून माणुसकीला जागणारी मुन्नासिंह यांच्यासारखी माणसे अगदी विरळपणे सापडतात. 

वस्त्या व आजूबाजूची खेडी यामध्ये राहणारी माणसे शेकडोंनी मारली. हजारो महिलांना मारण्यात आले. तलावात टाकणे, पुरणे अशा पद्धतीने एका जमातीचा नाश करण्यात येतो... किती भयावह दृश्य असेल याची कल्पना करवत नाही. आजही त्यांच्या वारसदारांना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आठवणे अवघड होत असेल. परिस्थितीचे यथार्थ वर्णन करून एका दाबून टाकलेल्या किंकाळीला वाचा फोडण्याचे काम लेखकाने केले आहे. एक साधा, अशिक्षित पण माणुसकी जतन करणारा आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, नि:स्वार्थीपणे काम करतो. धर्म ही अफूची गोळी आहे आणि तिच्यापुढे कधी कधी माणुसकीदेखील पराभूत होते, हेच लेखकाला यातून सांगावयाचे आहे का? 

चंद्रकांत गवांदे, पुणे 

----

मौलाना आझाद आधीचे आणि नंतरचे... 

दि. 10 एप्रिलच्या अंकातील ‘आणीबाणीच्या काळातील माझा तुरूंगवास’ हा सुरेश द्वादशीवार यांचा लेख वाचला. हैद्राबाद ऑपरेशननंतर नेहरू, पटेल, आझाद या भागात भेट द्यायला आल्यानंतर बिदरला पोहोचतात. तेव्हा रझाकारांनी हिंदू धर्माच्या स्त्रियांवर केलेले अत्याचार पाहून मौलाना आझाद म्हणतात, ‘कशाचा धर्म आणि कशाचा देश? असे अत्याचार शिकवतो तो धर्म कशाचा आणि त्यातील माणसे तरी माणसे कशी म्हणायची?’ मौलाना अबुल कलाम आझाद हे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील पहिले शिक्षणमंत्री. ते त्या स्थानावर सुमारे दहा वर्षे राहिले. ते मक्केहून आले होते, मुस्लिम धर्माचे विद्वान आणि प्रभावी वक्ते होते. 27 ऑक्टोबर 1914 रोजी कोलकत्याला मुस्लिमांच्या विशाल सभेत बोलताना ते म्हणाले होते, ‘का़िफरांशी वागताना अतिशय कणखर राहा; पण, आपापसात वागताना दया आणि सहानभूती बाळगा.’ हे संपूर्ण भाषण गुगलवर उपलब्ध आहे. 

संजय लडगे, बेळगाव

---- 

प्राथमिक शिक्षक हे ग्रासरूट डेव्हलपर आहेत! 

दि.10 एप्रिलच्या साधनातील डॉ. नंदकुमार मोरे यांनी दीपक मेंगाणे- शिक्षण विस्तार अधिकारी, भुदरगड; यांनी संपादित केलेल्या ‘आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण’ या पुस्तकावरील विचारमांडणी व भाष्य खूप आवडले. असं म्हटलं जातं की, प्राथमिक शिक्षक हे विद्यार्थिदशेतील मुलांचे ग्रासरूट डेव्हलपर आहेत. पेराल तसेच उगवेल. कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम, मजबूत असेल, तरच ती इमारत भविष्यात अनेक वर्षे मजबूत राहील. नेहमीच असे बोलले जाते की- डॉक्टर समाजाचे आरोग्य सांभाळतो, वकील समाजाचे मन सांभाळतो आणि शिक्षक हा समाजाची भावी पिढी व नागरिक घडवतो. यात दुमत नसावे. आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण या विषयावर शोधनिबंध स्पर्धेचा जो प्रयत्न केला, त्यासाठी आलेल्या 70 शोधनिबंधातून सर्वांत उत्कृष्ट 16 निबंध निवडून सदर पुस्तक तयार केले, हे थोडके नाही. हा आशावादाचा भाग होय. 

विलासराव भांदिर्गे, मु.पो.तारळे, जि.सातारा  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके