डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विधायक वाटा सदरात राजा कांदळकर यांचा लेख वाचनीय आहे. राष्ट्र सेवादलाचे दैनंदिन काम गेली दहा-पंधरा वर्षे थंडावले आहे असे जाणवत असतानाच हा लेख वाचताना वाटते की, खरंच सेवादलाचे काम जोरात चालू आहे. असे जरी असले तरी शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चांगले चारित्र्यवान नागरिक बनवायचे काम कुठे तरी बाजूला पडत आहे. 22 राज्यांत सेवादल नेले, म्हणजे नक्की काय केले हे त्यांनी लिहिले असते तर बरे वाटले असते. ओडिशात राष्ट्र सेवादलाच्या विश्वस्त बानी मंजिरीदास कार्यरत आहेत, हे पूर्णपणे असत्य आहे. चार वर्षांपूर्वी सेवादलाचे  शिबीर केजोर जिल्ह्यात झाले होते, त्याशिवाय सेवादलाचे कोणतेही काम ओडिशा, बंगाल किंवा पूर्वेकडील राज्यांत नाही.  

कोरोनातही शेवटचा दिन गोड झाला...

दि. 15 मेच्या अंकात संजय स्वाती भावे यांनी आपल्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. स्वातीतार्इंना मी भेटलेय. आनंदाने स्वागत करणाऱ्या, साध्या, आनंदी-शांत स्वभावाच्या. सरळ रेषेत संसार करणारी मध्यमवर्गीय गृहिणी. आपल्या इच्छा, आकांक्षा, व्यक्त न करणारी, मुलांना संस्कारित, सुशिक्षित करण्यात व त्यांच्या यशात जीवनाचे सार्थक मानणारी आई.

संसारात थोडी थोडी बचत करून त्यांनी हौसेने एखादा दागिना केला असेल, त्यामागे किती आठवणी असतील! एखादा दागिना त्यांच्या पतीने त्यांना खास प्रसंगी भेट दिला असेल, तर एखाद्या दागिन्याशी माहेरच्या आठवणी जोडलेल्या असतील. सर्वसाधारणपणे वय झाले की, आपले दागिने सून, मुलगी यांना आपली आठवण म्हणून द्यायचे मनात असते. कारण आम्हां बायकांचा जीव संसारातल्या लहान-सहान वस्तूंतही गुंतलेला असतो. त्यामागे आठवणी लपलेल्या असतात, त्या जपायच्या असतात त्यांना...

बराच काळ आजारी असलेल्या स्वातीतार्इंच्या मनातही आपले दागिने कोणाला किती व कसे द्यावेत असे प्रश्न त्रास देत असतील. दागिन्यांतून आपल्या आठवणी सुनांनी जपाव्यात असेही वाटले असेल. म्हणूनच स्त्रीमनाचा विचार करता प्रश्न उभा राहिला तो आपले दागिने ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाला देणगी म्हणून देण्याच्या निर्णयावर स्वातीताई कशा आल्या असतील? या प्रश्नाचे उत्तर खरे तर संजय भावेंच्या लेखातच आहे. मराठी भाषेतील पुस्तक ‘प्रकाशवाटा’ संजय भावेंनी गुजरातीत आणले. मराठी, गुजराती दोन्ही भाषांतील पुस्तके स्वातीतार्इंनी वाचली. प्रकाशभाई, मंदाताई आमटे यांचा जवळून परिचयही झाला आणि स्वातीतार्इंना मनातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना उत्तर सापडले. मनावरचे मळभ दूर होऊन सारे निरभ्र, स्वच्छ झाले. मार्ग सुचला, विचार स्फुरला आणि निश्चय झाला. आयुष्यभर संसार केला, आता मुलेही स्थिरस्थावर झाली आहेत. तेव्हा आयुष्याच्या शेवटी जाता-जाता आपले स्त्रीधन ‘लोकबिरादरी’च्या सत्कार्याला द्यावे, मुक्त व्हावे साऱ्यांतून.

माझ्या मनात आले, एका दृष्टीने संजय भावे यांनी केलेल्या अनुवादाला मुलाच्या सामाजिक कार्याला, कर्तृत्वाला त्या थोर मातेने दिलेली ही दाद आहे. सलाम त्या मातेला व त्यांच्या दातृत्वाला! आणि त्यांच्या तीनही मुला-सुनांना, त्यांनी आईची आठवण जपलीच, त्याचबरोबर त्यांची शेवटची इच्छाही पूर्ण केली.

सुधा साने-बोडा, बडोदा

----

ते इतिहासाचे अतिसुलभीकरण झाले...

26 जून 2021 अंकातल्या आनंद करंदीकर यांच्या ‘असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन’ या लेखातील मूळ मुद्द्याशी कोणीही सुजाण नागरिक सहमत होईल. शासनाने सहिष्णू असणे हे लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. मात्र असहिष्णू शासनामुळे राष्ट्राचे पतन होते हे इतिहासातल्या सात धड्यांवरून सिद्ध करताना अतिसुलभीकरण झाले आहे. त्यासाठी आपल्याला फार लांबच्या इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही. लेनिन, स्टालिन यांच्यापासून ब्रेझनेव्ह यांच्यापर्यंत कोणाचेही शासन सहिष्णू म्हणता येणार नाही. पण त्यांच्या काळात सैन्यबळ आणि जनतेवरची पोलादी पकड यांमुळे रशियन शासनाला धोका निर्माण झाला नाही. शेवटी रशियन साम्राज्य कोसळले ते तुलनेने सहिष्णू असणाऱ्या गॉर्बचॉव्ह यांच्या काळात. दुसरे उदाहरण चीनचे. माओच्या क्रूर राजवटीनंतर चिनी सत्ता कोसळली नाही. उलट इतक्या वर्षांनंतर शी जिन पिंग यांच्या काळात ती अधिकच बळकट होताना दिसते आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात असहिष्णू हिटलरने तुलेनेने सहिष्णू असलेल्या फ्रान्सचा पाडाव केला होता.         

राष्ट्राचे पतन होण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. त्यात आर्थिक समस्या, परकीयांचे आक्रमण, स्वकीयांच्या आपसातल्या मारामाऱ्या, अशा अनेक गोष्टी असतात. इतिहासात असे दिसून येते की सहिष्णू शासनासाठी असहिष्णू शत्रूंपासून स्वतःचा बचाव करणे जास्त कठीण असते.

या लेखात असे म्हटले आहे की ‘चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू झालेले मौर्य साम्राज्य भारतभर पसरलेले सामर्थ्यवान साम्राज्य होते. जग पादाक्रांत करायला निघालेला अलेक्झांडर हे सामर्थ्य पाहून माघारी फिरला.’ यात एक तपशिलाची छोटी चूक आहे. पहिली गोष्ट म्हणजे अलेक्झांडरने पौरसाचा पराभव केला तो इ.पू. 326 मध्ये. आणि चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक झाला इ.पू. 324 ते 321 या काळात कधीतरी, म्हणजे अलेक्झांडर भारत सोडून परत गेल्यानंतर काही वर्षांनी. शिवाय भारतभर पसरलेले साम्राज्य अशोकाचे म्हणजे दोन पिढ्यांनंतरचे होते.       

करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे शासनपुरस्कृत असहिष्णुता टाळणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. पण आपले लोकशाही राष्ट्र टिकवून ठेवण्यासाठी इतरही काही गोष्टींची गरज आहे, याचे भान असावे.

विवेक गोविलकर, मुंबई 

----

ते समजून घेणे पुरोगामी विचारवंत टाळतात...

26 जून 21 च्या साधनामधील आनंद करंदीकर यांचा ‘असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे’ या लेखातील शेवटचा परिच्छेद.

हिंदू-मुस्लिम समस्येवर जे लिखाण झाले त्यात या समस्येला मुस्लीम मानसिकतेपेक्षाही, इतिहासकालापासून चालत आलेली ‘हिंदू मानसिकता’, जिचे ‘न्यूनगंड’ हे प्रधान वैशिष्ट्य आहे, जबाबदार आहे, याची दखल घेतली जात नाही. उलट या न्यूनगंडाचे सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव अशा शब्दांत उदात्तीकरण करण्यात येते. खरे तर ही तिन्ही तत्त्वे शूरांची वैशिष्ट्ये आहेत.  खरी धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता फक्त शिवाजीराजांच्या कारभारात होती. वरील तत्त्वे त्यांच्या स्वसामर्थ्यातून आली होती. त्यांनी हिंदवी साम्राज्य निर्माण केले होते. काँग्रेसची धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता ही मानसिक व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावात म्हणजे मतासाठीच्या लाचारीतून आलेली आहेत. किंबहुना हिंदुत्वाचे पारिपत्य आणि अल्पसंख्याकांच्या धार्मिक संवदनशीलतेची पाठराखण ही काँग्रेस राजवटीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत. ही पाठराखण करण्याचे बंद झाले म्हणजे असहिष्णुता नव्हे हे समजून घेण्याचे पुरोगामी विचारवंत टाळतात.

संजय लडगे, बेळगाव

----

त्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक

26 जून 21 च्या साधनामधील आनंद करंदीकर यांचा ‘असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे’ या लेखातील शेवटचा परिच्छेद.

देशात खरा सेक्युलॅरिझम विकसित व्हायचा असल्यास समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक आहे. भाजपा सरकारच्या जाहीरनाम्यात याचा समावेश आहे. इतर कोणतेही  तथाकथित सेक्युलर पक्ष या बाबत अळीमिळी गुपचिळी आहेत. शहाबानो केसमध्ये राजीव गांधी सरकारने सुप्रीम कोर्टाचा निकाल नवीन कायदा करून निष्प्रभ केला, म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आरिफ खान यांनी भाजपाच्या कार्यकाळात राज्यपालपद स्वीकारले आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, ‘ज्या दिवशी भाजपा जातीयवादी भूमिका घेईल त्या दिवशी मी राजीनामा देईन.’

मला वाटते, भारतातील सध्याची वाढती असहिष्णुता ही शासनपुरस्कृत आहे, या करंदीकर यांच्या मुद्द्याला व शेवटच्या परिच्छेदाला हे प्रत्युत्तर आहे.

किशोर काकडे, बेळगाव

----

त्या भूमिका जाणीवपूर्वक पुढे आणल्या पाहिजेत

मी साधनाचा नियमित वाचक, वर्गणीदार आहे. विविध प्रकारचे लेखन करीत असतो. ‘हमीद दलवाई यांच्या कथा’ हे विनोद शिरसाठ यांनी साहित्य अकादमीच्या परिसंवादात केलेल भाषण साधनाच्या 12 जूनच्या अंकात वाचले. हमीद दलवाई हे आजच्या आधुनिक काळातील पिढीसमोर नाहीत. त्यामुळे त्यांची वैचारिक भूमिका जाणीवपूर्वक समाजापुढे आणली पाहिजे. यासाठी साधना साप्ताहिकातून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत याचा आनंद वाटतो. प्रस्तुत भाषणसुद्धा याच भूमिकेचा अंश आहे असे म्हणावेसे वाटते.

या लेखामुळे हमीद दलवाई यांच्या कथा वाचनासाठी प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मिळवून वाचण्याचा व त्यावर लिखाण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत त्यांची वैचारिक भूमिका पोहोचावी हाच यामागील उद्देश आहे

राजेश वैरागडे, नागपूर

----

सर्वांचे डोळे उघडणारा लेख

दि. 26 जूनचा साधनाचा अंक नेहमीप्रमाणे वाचनीय आहे. प्रतापसिंह साळुंके यांचा तीन भागांतील ‘मराठा आरक्षण का रद्द झाले?’ हा लेख अतिशय समर्पक, वाचनीय, संतुलित व सर्वांचे डोळे उघडणारा आहे. सर्व आरक्षण मागणाऱ्या घटकांनी हा वाचलाच पाहिजे. इथून पुढे नवीन कोणत्याही जातीला आरक्षण न देता टप्प्या-टप्प्याने आरक्षण कमी करत गेले पाहिजे. नॉन क्रेमिलिअरची अट सर्वांना घातली पाहिजे. सध्या आरक्षण हा समाज उत्थानाचा भाग नसून राजकारणाचा आखाडा झाला आहे.

आनंद करंदीकर यांचा ‘असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे’ हा लेख उत्कृष्ट आहे. संपूर्ण लॉकडाउनमध्ये साधना नियमित येत होते. याबद्दल साधनाचे आभार.

संतोष निवृत्तीराव लिमकर, कळंब, जि. उस्मानाबाद

----

साशंक मनांना दिशा देणारे पुस्तक

सुरेश द्वादशीवार यांचे साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले ‘चार्वाक’ हे पुस्तक वाचले. अप्रतिम आहे. द्वादशीवार यांचा अभ्यास व व्यासंग दांडगा आहे. सहज, सरळ व मोजक्या शब्दांत त्यांनी देव, धर्म, श्रद्धा, पंरपरा, संत, बुवा यांविषयी नेमके समाजप्रबोधन केले आहे. मध्यंतरी साधनाचा ‘जीवनावर परिणाम करणारे पुस्तक’ हा चांगला विशेषांक आला होता. मला वाटते- ज्यांची देव, धर्म, श्रध्दा व परंपरा याविषयी मने साशंक आहेत, त्यांच्या जीवनात विचारांना योग्य दिशा देणारा परिणाम या पुस्तकाचे वाचन निश्चित करेल. हे पुस्तक प्रकाशित केले याबद्दल साधनाचे अभिनंदन व आभार.   

अरुण वि.कुकडे, नाशिक

----

ते काम मागे पडत आहे...

दि. 12 जूनच्या साधना अंकातील सर्वच लेख वाचनीय आहेत. कोरोना हा ‘मानमोडी’सारखाच जैविक आणि वैचारिक रोग आहेे. विधायक वाटा सदरात राजा कांदळकर यांचा लेख वाचनीय आहे. राष्ट्र सेवादलाचे दैनंदिन काम गेली दहा-पंधरा वर्षे थंडावले आहे असे जाणवत असतानाच हा लेख वाचताना वाटते की, खरंच सेवादलाचे काम जोरात चालू आहे. असे जरी असले तरी शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चांगले चारित्र्यवान नागरिक बनवायचे काम कुठे तरी बाजूला पडत आहे. 22 राज्यांत सेवादल नेले, म्हणजे नक्की काय केले हे त्यांनी लिहिले असते तर बरे वाटले असते. ओडिशात राष्ट्र सेवादलाच्या विश्वस्त बानी मंजिरीदास कार्यरत आहेत, हे पूर्णपणे असत्य आहे. चार वर्षांपूर्वी सेवादलाचे  शिबीर केजोर जिल्ह्यात झाले होते, त्याशिवाय सेवादलाचे कोणतेही काम ओडिशा, बंगाल किंवा पूर्वेकडील राज्यांत नाही.  

मधु तळवलकर, भुवनेश्वर, ओडिशा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके