डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

दि.13 जून 2020 च्या साधना अंकात कृष्ण चंद्र यांची भारत सासणे यांनी थेट उर्दूतून अनुवादित केलेली ‘उघडा, दरवाजे उघडा...’ ही नाट्यसंहिता वाचली. याच अंकातील त्यांचे मनोगतही वाचले. याच अंकातील कृष्ण चंद्र आणि ख्वाजा अहमद अब्बास यांचे दोन लेखही वाचले. हा अंक सासणे यांनी जणू एकहाती लिहिल्यासारखा झाला आहे. एका अर्थाने त्यांनी आणि साधनाने साने गुरुजी यांची आंतरभारती कल्पनेची खरीखुरी स्मृती जागविली आहे. सध्याच्या एकूणच भारतीय (सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक साहित्यिक) पार्श्वभूमीवर हे कालातीत नाटक वाचन महत्त्वाचे आहे. कृष्ण चंद्र यांची कालातीत आणि समकालीनत्व अधोरेखित करणारी नाट्यदृष्टी अचंबित करणारी आहे. अशा नाट्यसंहितेचा अनुवाद करून मराठी नाट्यसृष्टीत मौलिक अशी भर घातली आहे. या नाट्यवाचनाने मी समृद्ध झालो आहे. 


ठेच लागली, विखारी वाटले, मोठा विनोद, संशयास्पद विधान... 

दि.26 सप्टेंबरच्या साधना अंकात ‘आजच्या हिंदुस्तानाची घडण’ हा लेख उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली. लेखाची सुरुवात देशाच्या सीमांपासून होते. सध्या चीन-नेपाळबरोबर सीमांचा वाद चालू आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे. या संघर्षासंबंधाने लिहायचा लेखकाचा इरादा नसावा, असे वाटले. विषय एकूण भारताच्या किंवा हिंदुस्थानच्या घडणीचा आहे, असे लक्षात आले. इथेच पहिली ठेच लागली. लेखक ईशान्येकडील राज्यांबद्दल बोलताना काँग्रेसने 60 वर्षे केलेले दुर्लक्ष याचा शेरेवजा उल्लेख करतात, पण दुर्लक्षाचे तपशील देत नाहीत. लगेचच ‘सारे व्यवहार ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ताब्यात’ असे वाक्य येते. मला ते विखारी वाटले. या काळात लोकशाही निवडणुका झाल्या. प्रशासकीय निर्णय झाले. स्थानिकांची बंडे झाली. लष्कराला अतिरिक्त अधिकार देण्याच्या विरोधात शर्मिला इरोमचे दीर्घ काळ चाललेले उपोषण, अशा अनेक घटना आठवल्या. यासंदर्भात ‘सारे व्यवहार ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हातात’ हे वाक्य खटकले. तेही शेरेवजाच होते. ‘रा.स्व.संघाने 40 वर्षे काम करून परिस्थिती आमूलाग्र बदलली’, असेही भुवया उंचावणारे वाक्य आहे. नुकताच सीएएसंदर्भात या भागात मोठा असंतोष होता. आंदोलने झाली, हिंसाचार झाला. त्रिपुरात अनेक वर्षांनंतर सत्ताबदल होऊन भाजपचे सरकार आले. याला आमूलाग्र बदल म्हणायचा का? यादरम्यान या राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झालेच नाहीत आणि जे झाले ते रा.स्व. संघामुळे, हे विधान पुरेशा तपशिलांअभावी न पटणारे आहे. 

यानंतर लेखाचा आवाका विस्तारित होत जातो. नेहरूंच्या प्रदीर्घ कारकिर्दीत झालेल्या भारताच्या घडणीसंबंधी अवाक्षरही न काढता 1962 च्या पराभवाची जखम तेवढी लेखक कुरवाळतात. एका महान लोकशाही राष्ट्राची उभारणी करण्याचे नखाएवढेही श्रेय नेहरूंना द्यावेसे न वाटणे, हे खटकले. वल्लभभाई नररत्न होते कबूल; पण नेहरू आणि पटेल यांच्यात संघर्ष होतेच, असे म्हणून आपण पटेलांच्या बाजूचे असे सुचविणे करंटेपणाचे आहे. सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहे. नेहरुंनंतर लष्करी सत्ता न येण्याचे श्रेय जर लेखक रा.स्व.संघाला देत असतील तर तो मोठा विनोद आहे. 

गरिबी दूर होण्याचे आणि विषमता तीव्र होण्याचे श्रेय जागतिकीकरणाला आहे, हे सर्व जाणतात. पण याची चर्चा लेखकाने सोईस्करपणे टाळली आहे. सन 2014 नंतर भ्रष्टाचार बराचसा कमी झाला, हे विधानही संशयास्पद आहे. 

भारताला सांधणाऱ्या दुव्यांची मात्र त्यांनी केलेली मांडणी पटणारी आहे. इथेसुद्धा अहिंसेच्या तत्त्वावर आधारलेले सत्याग्रहाचे अभिनव शस्त्र देणारे सर्वसमावेशक राष्ट्रीय स्वातंत्र्याचे आंदोलन उभे करणारे महात्मा गांधी यांचा अनुल्लेख संतापजनक आहे. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांसारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज गांधीजींपासून स्फूर्ती घेतात. जगात आपली ओळख गांधीजींचा देश अशी आहे. स्वतः पंतप्रधानांनासुद्धा जागतिक व्यासपीठावर हे मान्य करावे लागते. पण लेखकाला ती परिदृष्टी नाही. पुढच्या भागात त्यांनी परस्परविरोधी विधाने सातत्याने केली आहेत. त्यामुळे ती एकमेकांना छेद देतात. भारताच्या घडणीसंबंधाने निरनिराळ्या विचारप्रवाहांच्या लोकांचे काय आकलन आहे, हे वाचकांसमोर आणण्याचा संपादकांचा हेतू असावा. त्यानिमित्ताने माझ्याही धारणा मला तपासता आल्या, ही उपलब्धी म्हणता येईल. 

देवधर म्हणतात की, त्यांना काळजी आहे ती देशात बखेडे निर्माण करणाऱ्या जातव्यवस्थेची. पुढच्या चार ओळींमध्ये जातव्यवस्थेमध्ये वरवर पाहता दिसणारे अन्याय, अलगता, तंटे यांचा ते उल्लेख करतात. पण एक षटकारही ठोकून देतात. तो म्हणजे, आता ब्राह्मणांनी (या व्यवस्थेतून)आपले अंग काढून घेतले आहे.  

अरे वा! असे अंग काढून घ्यायला तो काय खेळ किंवा कट आहे की काय? जात ही व्यवस्था आहे; तो काही वाढलेला अंत्रपुच्छ नाही, की केली शस्त्रक्रिया आणि झालो मोकळा! देवधरांनी थोडे आत्मपरीक्षण करावे. आजतागायत त्यांना जे मिळाले, ते केवळ त्यांच्या कर्तृत्वाने नाही. श्री.म.माटे यांच्या आत्मचरित्रात ब्राह्मण जातीत जन्मल्याचा फायदा ते प्रांजळपणे कबूल करतात. 

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘लढे आणि तिढे’ या पुष्पा भावे यांच्या मुलाखतवजा आत्मकथनाच्या पुस्तकातही हा मुद्दा नेमका आला आहे. पान 166 वर त्या म्हणतात की, ‘ज्या झपकन्‌ पुढे गेल्या, आणि ज्यांना वाटतंय की त्या त्यांच्या कर्तृत्वाने पुढे गेल्या त्यांचं कर्तृत्वसुद्धा परिस्थितीने निर्माण केले आहे.’ पुष्पाताई हे स्त्रियांबद्दल बोलतात. पण ते जातीय उतरंडीबाबतही खरेच आहे. किंबहुना, इंग्रजांच्या कारकिर्दीत- जेव्हा आपली प्रचंड लूट झाली, असे देवधरच म्हणतात- ब्राह्मण जातीचा भरपूर फायदाच झाला. त्याआधी तर ते सत्तेवर होतेच. जी प्रचंड उलथापालथ झाली, मंथन झालं, त्यातून निष्पन्न झालेले नवनीत अधिकतर ब्राह्मणांच्या वाट्याला आलं. अजूनही येत आहे. आता भरल्या पोटी त्यांना ही व्यवस्था चिंतेत पाडते काय? खरेच पाडत असेल, तर बदलाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करावी. सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीन टक्के ब्राह्मण असतील, असा आग्रह धरावा. 

ते म्हणतात त्याप्रमाणे देशात माणूस कुठल्याही जातीचा असला तरी स्वकर्तृत्वावर मोठा होऊ शकत नाही. जातीय बंधनांचा काच कमी झालाय खरे, पण तो गेलेला नाही. नुसत्या शिक्षणाने तो जाणार नाही, त्यासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ-प्रबोधन हवे. व्यवस्थेतून बाहेर पडून ब्राह्मण अंपायरगिरी करणार काय? उलट, त्यांनी या लढ्यात झोकून द्यायला हवे. फार काही नको; देवधरांनी लग्नाच्या जाहिरातीमधली ‘स्वजातीयच हवा’, ‘ब्राह्मणांचे वेगळे मेळावे’, ‘एससीएसटी क्षमस्व’ अशी अपमानास्पद भाषा काढून दाखवावी. निदान उघड निषेध करावा. 

सरिता आवाड, पुणे  

----

शेतीतज्ज्ञांनीही शहरवासीयांचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक! 

दि. 3 ऑक्टोबरच्या साधना अंकातील ‘बिगर शेतकऱ्यांनो, शेतीविषयीचे आकलन वाढवा’ हे संपादकीय आणि रमेश जाधव यांच्या ‘कृषी विधेयके : शेतकऱ्यांचे हित साधणार की माती करणार?’ याविषयी... 

वस्तुस्थिती अशी आहे की, तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की शेतकरीविरोधी आहेत, हे आम्हा शहरवासीयांना कळेनासे झाले आहे. भाजप आणि विरोधी पक्ष जे सांगत आहेत, ते त्यांच्या सोईप्रमाणे. म्हणूनच आम्हा शहरवासीयांना ‘कृषी-समस्या’ आणि ‘कृषी विधेयके’ यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे, हे संपादकीयात मांडलेले मत पटते. ते समजून घेताना कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता स्वतंत्र विचार करावा लागेल. 

गेल्या सत्तर वर्षांत केंद्रात व महाराष्ट्रात अनेक सरकारे सत्तेत होती आणि प्रत्येक सरकारने काही कृषिविषयक कार्यक्रम राबवले. त्याचा फायदा कोणत्या शेतकरी वर्गाला झाला? कृषी योजना राबवल्या, पण आम्हा शहवासीयांच्या लक्षात येणारी एक महत्त्वाची बाब अशी की- राज्य सरकारे शेतीच्या विकासासाठी जे काही कार्यक्रम राबवतात, त्यांचा फायदा कोणत्या वर्गाला मिळतो? या योजनांचा फायदा मोठे शेतकरीच घेतात, असा शहरवासीयांचा समज ‘खरा आहे की खोटा?’ 

शहरातील एखाद्या व्यवस्थापकाने सुचवलेली उपाययोजना- ज्याला इंग्रजीत ‘आऊट ऑफ बॉक्स’ म्हणता येईल, अशी कदाचित असणार नाही. पण त्यातून त्या समस्यांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळू शकतो. म्हणून माझे मत असे आहे की, शहरवासीयांनी शेती या विषयासंबंधी उदासीनता सोडून देणे जसे गरजेचे आहे; तसेच जे शेतीतज्ज्ञ आहेत, त्यांनीही शेतीसंबंधीचा शहरवासीयांचा निराळा दृष्टिकोन असेल, तर तो समजून घेणे आवश्यक आहे. 

सर्वसामान्यांना हे चांगले माहिती असते की, सगळे शेतकरी एकाच मापात बसणारे नसतात. म्हणूनच सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सरधोपटपणे विचार करणे, हे त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी फारसे शहाणपणचे नसते. हे जर आम्हा- तुम्हाला कळते, तर ते शेतकऱ्यांच्या तथकथित पुढाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना का बरे कळत नाही? परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा केवळ राजकीय फायद्यासाठी एक साधन म्हणून जे वापर करतात, त्यांच्याकडून आणखी वेगळी अपेक्षा करता येत नाही. माझ्या मते, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांचे विविध गट आणि उपगट केले, तरच विविध स्तरांतील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या अधिक चांगेल्या पद्धतीने समजून घेता येतील. प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेली शेती, त्याला उपलब्ध असलेली पाणीपुरवठा/सिंचनव्यवस्था यानुसार शेतकऱ्यांचे गट आणि उपगट करावे लागतील. ते गट असे 1. अल्पभूधारक, 2. छोटा शेतकरी, 3. मध्यम शेतकरी, 4. मोठा शेतकरी व 5. बडा जमीनदार. या प्रत्येक गटातील शेतकरी पुन्हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे की त्याला सिंचन व्यवस्थेचा लाभ मिळतो, त्याप्रमाणे उपगट करावे लागतील. 

या प्रत्येक गटात आणि उपगटात किती शेतकरी आहेत, यासंबंधीच्या आकडेवारीची छाननी करून काही निष्कर्ष नक्कीच काढता येतील. प्रत्येक गटाचे व उपगटाचे प्रश्न वेगळे असू शकतात आणि त्याप्रमाणेच ते समजून घेऊन त्याची उत्तरे शोधायला हवीत. आणखी काही निरीक्षणे/प्रश्न यांची नोंद घेणे आवश्यक आहे. 

कोणत्याही पक्षाचे सरकार असो- 1. शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. 2. शेतकऱ्यांच्या विविध गरजा भागवण्यासाठी स्थापन केलेल्या सहकारी संस्था राजकारण्यांच्या ताब्यात आहेत. शेतकऱ्यांसाठी त्या किती उपयुक्त आहेत? 3. आपले सहकारी साखर कारखाने कोणाचे हित साधतात? 4. ग्रामीण भागातील वीजपुरवठा बिनभरशाचा असतो आणि त्याबद्दल कोणालाही काहीही वाटत नाही. 5. छोट्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर आंदोलने केली जातात, पण या शेतकऱ्यांना सुखाचे दिवस कधीही येत नाहीत. 6. ग्राहक आणि भाजीचे उत्पादन करणारा छोटा शेतकरी या दोन्ही घटकांना मंडईतील आडते लुटतात आणि सरकार बघ्याची भूमिका घेत असते. 7. भाव दुधाचा असो वा कांद्याचा, छोटा उत्पादक लुबाडला जातो. शिवाय शहरी ग्राहकसुद्धा असमाधानी असतात. 

या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घेणे जरुरीचे आहे - 

- अल्पभूधारकांचे आणि अन्य शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न कोणते आहेत? ते कशामुळे निर्माण झाले आहेत? ते फक्त गेल्या चार-पाच वर्षांतील आहेत, की बरेच जुने आहेत? 

- अल्पभूधारक पूर्णवेळ शेती करत नाहीत, कारण त्यांची एकूण शेतजमीन मर्यादित असते. साहजिकच शेतीपासून मिळणारे उप्तन्न त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसे नसते, त्यामुळे त्यांना मजुरी करावी लागते. सत्य स्थिती अशी आहे की- अल्पभूधारकांचा सध्या कोणीही वाली नाही. म्हणूनच त्यांना रोजगार देणाऱ्या आणि शेतीतून अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना त्यांच्यासाठी राबवायला हव्यात. 

नरेंद्र महादेव आपटे, पुणे  

----

प्रत्येक भागाच्या अखेरीला टीप दिल्याने आश्चर्य वाटले... 

हमीद दलवाई व त्यांनी स्थापन केलेले ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ यांच्या कार्याविषयी साधना गेली काही वर्षे ठळकपणे दाखवत असलेल्या आस्थेबद्दल काही प्रतिक्रियात्मक लिहावे, असे वाटत असूनही मी ते केले नव्हते. परंतु अ.का.मुकादम यांचा साधनातील लेखाच्या प्रत्येक भागाच्या शेवटी जी टीप आपण दिली आहे, त्यामुळे या विषयाच्या आपल्या भूमिकेसंबंधात मी प्रतिक्रिया देतो आहे. 

सय्यदभाईंना चतुरंग संस्थेने त्यांच्या मंडळाच्या कार्याबद्दल दिलेला पुरस्कार व केंद्र शासनाकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराने विभूषित केल्यावर त्यांच्या मुलाखतीला साधनाने बारा-तेरा पाने दिली. त्या मुलाखतीत सय्यदभाईंना आपण काही अडचणीचे प्रश्न विचारले असले, तरीही सय्यदभाईंच्या उत्तरांतून केंद्र शासनाने तलाकपीडित स्त्रियांच्या प्रश्नासाठी केलेल्या कायद्याबद्दलचेच कौतुक दिसून आले असे नाही; तर पंतप्रधानांनी केलेल्या त्या कायद्यामुळे सय्यदभाईंच्या अनेक उत्तरांतून पंतप्रधानांविषयी त्यांना वाटणारा भक्तिभावच व्यक्त होताना दिसला. कदाचित पंतप्रधानांविषयीचा हा भक्तिभाव मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस (जे जनता पक्षाने त्यांच्या अधिकाराच्या काळात दाखवले नव्हते) सध्याच्या पंतप्रधानांनी दाखविल्यामुळे सय्यदभाईंच्या मनात निर्माण झाला असावा. परंतु त्याच पंतप्रधानांनी असेच धाडस 2002 मध्ये व अगदी अलीकडे 5 ऑगस्ट 2019 मध्येही दाखविल्याचे वास्तव सय्यदभाईंनी आपल्या मुलाखतीत नजरेआड केलेले दिसते. मु.स.मंडळाच्या प्रमुख अध्वर्यूची ही लघुदृष्टी तर नव्हे? 

अशा प्रकारच्या प्रदीर्घ मुलाखतीसाठी आपण 12 पृष्ठांची जागा दिली त्या वेळी मला जेवढे आश्चर्य वाटले नाही, तेवढे अ.का.मुकदाम यांच्या साधनातील लेखाच्या प्रत्येक भागाच्या अखेरीला आपण जी टीप दिली आहे, त्यामुळे वाटले. खरे तर साधनात लेखाच्या अखेरीला आपण अशा प्रकारची टीप लिहिल्याचे माझ्या कधीच पाहण्यात आलेले नाही. गेल्या पाच वर्षांत भारतामधील मुस्लिमांविषयी विद्वेषी वातावरण वाढत असताना ‘हमीद दलवाई यांचे विचार व कार्य यांची कालसुसंगतता अधोरेखित करण्याचे काम’ साधनाने त्याच पाच वर्षांत केले असल्याचा उल्लेख आपल्या टीममध्ये आपण आवर्जून केला आहे. अशा टीपेमुळे मुकादम यांच्या लेखाला साधनात स्थान दिल्याबद्दल अपराधित्वाची जाणीव निर्माण झाल्यासारखे टीपा वाचताना वाटले. 

मला स्पष्टपणे वाटते की, हमीद दलवार्इंच्या काळात व आजच्या परिस्थितीतही मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मुस्लिम समाजातील दोषांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजाने ती भूमिका स्वीकारण्याऐवजी हिंदुत्ववादी विचारालाच पाठबळ मिळत आले आहे. हेच वास्तव आहे. 

चंद्रकांत केळकर, मुंबई 

----

तो उद्देश फक्त वाचण्या-बोलण्यासाठी नसावा 

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ : अर्धशतकी वाटचाल’ अ.का.मुकादम यांचे तीनही लेख वाचले. (दि.29 सप्टें.26 सप्टें. 3 ऑक्टो.) त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांत महत्त्वाचे निरीक्षण आलेले दिसत नाही. आपल्या समाजात वैज्ञानिकता रुजावी, हे संविधानात म्हटले आहे. तसेच संविधानवादी मुस्लिम सत्यशोधकच्या उद्देशातही आहे. हा उद्देश फक्त वाचण्या-बोलण्यासाठी नसावा, तर त्याचे प्रतिबिंब समाजवास्तवात दिसले पाहिजे. गेल्या दहा वर्षांपासून मंडळामार्फत बकरी ईदनिमित्त रक्तदान आयोजित केले जाते. या उत्तम उपक्रमाला राज्यभर प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाबरोबर इतर धर्मीय बांधवसुध्दा बकरी ईदनिमित्त रक्तदान अभियानात सहभागी होतात. शमसुद्दीन तांबोळी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या मानवतावादी कार्याची नोंद व्हायला हवी होती. 

जावेद शाह, शिर्डी, जि.अहमदनगर 

----

हमीद दलवाईंच्या क्रांतिकारक स्वभावाचे हास्यास्पद अनुकरण 

अ.का. मुकादम यांनी उल्लेखित लेखांमधून हमीद दलवाईंच्या विचारांना उर्जितावस्था प्रदान केली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद... 

मुकादम हे दलवाईंच्या इतके निकटवर्ती असतानाही त्यांची विचारवल्ली हमीद दलवाईंच्या विचारांच्या जवळपासदेखील पोहोचू शकली नाही, यातच त्यांच्या मानसिकतेचा खुजेपणा दिसून येतो. 

मुकादमांचे तीनही लेख आणि त्यांची विचारसरणी मध्ययुगीन कालखंडाचा अवलंब करण्यासाठी उद्दीपित करते आणि फक्त विशिष्ट धर्मकेंद्रित म्हणजेच इस्लामप्रिय भासते; तर हमीद दलवाईंनी मानवतावादी, धर्मनिरपेक्ष, विकसित, विज्ञाननिष्ठ भारत देशाच्या निर्मितीवर सतत भर दिला. मुकादम यांनी हमीद दलवार्इंच्या क्रांतिकारक स्वभावाचे हास्यास्पद अनुकरण करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु त्यांचा सत्यशोधक चळवळीविरोधात वापर केला जात आहे, याची जाणीव त्यांना लवकरच होईल. 

अल्ताफहुसेन रमजान नबाब, पुणे 

----

त्या नाट्यवाचनाने मी समृद्ध झालो... 

दि.13 जून 2020 च्या साधना अंकात कृष्ण चंद्र यांची भारत सासणे यांनी थेट उर्दूतून अनुवादित केलेली ‘उघडा, दरवाजे उघडा...’ ही नाट्यसंहिता वाचली. याच अंकातील त्यांचे मनोगतही वाचले. याच अंकातील कृष्ण चंद्र आणि ख्वाजा अहमद अब्बास यांचे दोन लेखही वाचले. हा अंक सासणे यांनी जणू एकहाती लिहिल्यासारखा झाला आहे. एका अर्थाने त्यांनी आणि साधनाने साने गुरुजी यांची आंतरभारती कल्पनेची खरीखुरी स्मृती जागविली आहे. सध्याच्या एकूणच भारतीय (सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक साहित्यिक) पार्श्वभूमीवर हे कालातीत नाटक वाचन महत्त्वाचे आहे. कृष्ण चंद्र यांची कालातीत आणि समकालीनत्व अधोरेखित करणारी नाट्यदृष्टी अचंबित करणारी आहे. अशा नाट्यसंहितेचा अनुवाद करून मराठी नाट्यसृष्टीत मौलिक अशी भर घातली आहे. या नाट्यवाचनाने मी समृद्ध झालो आहे. 

अरुण कोळेकर, सासवड, पुणे  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात