डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिंदू धर्माधिष्ठित राष्ट्रवाद हा गेल्या काही दशकांपासून ‘भारतीय राष्ट्रवाद’ म्हणून सातत्याने मांडण्यात येतो आहे आणि अधिकाधिक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी त्या राष्ट्रवादालाच भारतीय राष्ट्रवाद समजू लागले आहेत. पण मूळ भारतीय राष्ट्रवादाशी एकरूप झालेली आणि रुजलेली नीतिमूल्ये पद्धतशीरपणे बाजूला सारून ‘हिंदू राष्ट्रवाद’ अत्यंत आक्रमकपणे समोर मांडला जात आहे. हा मांडताना  मुख्यत्वे करून बहुसंख्यात्ववादाचा  सिद्धान्त पुढे केला जात आहे. हिंदू धर्मातील सहिष्णुता, सर्वसमावेशकता, सर्वधर्मसमभाव, उदारमतवाद, सहयोग आणि सदाचार या मूल्यांकडे सोईस्करपणे डोळेझाक करत  कट्टरतावादाला हेतुपूर्वक  खतपाणी घातले जात आहे.

आपण धर्म व संस्कृतीचे वारसदार आहोत की भारवाहक?

समाजात विवेकवाद वाढीस लागावा आणि समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्ताने प्रकाशित ‘धर्माने मला काय दिले?’ हा संग्राह्य अंक अधाशासारखा वाचून काढला. तेव्हा काही प्रश्न मनात आले. धर्म व्यक्तीचे आयुष्य सुकर बनवण्यासाठी निर्माण केला गेला आहे की व्यक्तीच्या अडचणींत वाढ करण्यासाठी? धर्मनिर्मितीमागील खरे प्रयोजन काय आणि मानवी आयुष्य आणि मानवतेशी निगडित संकल्पनांच्या पूर्ततेसाठी निदान त्या समीपतेकडे घेऊन जाणारे धर्मविचार प्रत्यक्षात मानव रुजवू शकला आहे का? उलटपक्षी धर्मामुळे जीवनकलह, समाजकलह, वाढीस लागत असतील, सार्वजनिक आरोग्य, कायदा सुव्यवस्था बाधित होत असेल तर धर्माची नैमिकता व गरज ताडून बघायला नको का?

सामाजिक विज्ञानाचा एक सिद्धान्त आहे. जसजसा एखादा देश आर्थिक-शैक्षणिक विकासात पुढे पुढे जातो, तसतशी त्या त्या देशातील जनता अधार्मिक व आधुनिक विचारांची बनत जाते. पण आपल्या देशातील नागरिक मात्र  या सिद्धांताला अपवाद ठरतात. कारण जे चिकित्सा करतात त्यांनाच आधुनिक विचार पचतात. आधुनिक कपडे, राहणीमान, जीवनशैली म्हणजे आधुनिकता नव्हे! आपल्या समाजाला तर चिकित्सेचेच वावडे! कार्ल मार्क्सने एका जागी नमूद करून ठेवलेच आहे की, कोणत्याही चिकित्सेची सुरुवातच प्रथम धर्मचिकित्सेतून होते. धर्म म्हणजे अफूची गोळी आहे.

विवेकानंदांना माणूस घडवणारा धर्म हवा होता. किमानपक्षी माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत- माणसाला माणूसपण देण्याच्या प्रयत्नात- धर्म फार महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा त्यांचा विश्वास होता. धर्माने हे करावयाचे तर सर्वप्रथम सर्वधर्म समभाव हवा हे त्यांनी आग्रहाने सांगितले. धर्मातील कालबाह्य रूढी नाकारल्या पाहिजेत. त्यानंतर धर्माबाबत शांतपणे, प्रामाणिकपणे, बुद्धी वापरून, विचार करून, आजच्या विज्ञानयुगात तर्कसंगत नसलेली धर्मातील मार्गदर्शक तत्त्वे बाजूला करा, हे त्याच्या मांडणीतील सूत्र होते. या प्रक्रियेत धर्माचे विज्ञान, वैज्ञानिक विचारपद्धती यांची मदत घेतली पाहिजे, असे सांगणारे ते पहिले ‘धर्मगुरू’ होते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ या पुस्तकात हिंदू धर्मात कालौघात आणि धर्ममार्तंडांच्या स्वार्थी मनोभूमिकेतून असंख्य अवैज्ञानिक, अनिष्ट, अमानवीय  रूढी-परंपरा व स्वधर्माविषयींचा कट्टरतावादी दृष्टिकोनाचा चंचुप्रवेश झाला आहे, या गोष्टींवर खास सावरकर शैलीतून समाचार घेतला आहे. तरीही तथाकथित हिंदू धर्माची ठेकेदारी मिरवणारे धर्ममनोरुग्ण आपल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे या दोघांवर अन्याय करीत असतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘धर्माविषयी चर्चा करून धर्माचे आचरण होत नसते. असे जीवन दाखवा की ज्यात त्याग, आध्यात्मिकता, तितिक्षा, प्रेम, बंधुभाव समूर्त झाले आहेत. हे सारे गुण असतील तरच तुम्ही धार्मिक आहात.’’ घटनाकार डॉ. आंबेडकरांनी, हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाही तत्त्वाविरुद्ध आहे. त्यामुळे मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, असे म्हणत मनुस्मृतीचे दहन केले. अखेर 14 नोव्हेंबर 1956 या दिवशी लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर केले. आजही हिंदू धर्माचा त्याग करून अनेक जण धर्मांतर करताहेत. यामागे हे तथाकथित हिंदुत्व कारणीभूत आहे.

हिंदू धर्माधिष्ठित राष्ट्रवाद हा गेल्या काही दशकांपासून ‘भारतीय राष्ट्रवाद’ म्हणून सातत्याने मांडण्यात येतो आहे आणि अधिकाधिक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी त्या राष्ट्रवादालाच भारतीय राष्ट्रवाद समजू लागले आहेत. पण मूळ भारतीय राष्ट्रवादाशी एकरूप झालेली आणि रुजलेली नीतिमूल्ये पद्धतशीरपणे बाजूला सारून ‘हिंदू राष्ट्रवाद’ अत्यंत आक्रमकपणे समोर मांडला जात आहे. हा मांडताना  मुख्यत्वे करून बहुसंख्यात्ववादाचा  सिद्धान्त पुढे केला जात आहे. हिंदू धर्मातील सहिष्णुता, सर्वसमावेशकता, सर्वधर्मसमभाव, उदारमतवाद, सहयोग आणि सदाचार या मूल्यांकडे सोईस्करपणे डोळेझाक करत  कट्टरतावादाला हेतुपूर्वक  खतपाणी घातले जात आहे.

धर्माशी निगडित जे काही आहे तेच अंतिम सत्य आहे, या मानसिकतेतून  हिंदू धर्म बाहेर पडू शकत नसेल, काही कारणांनी त्याला बाहेर पडू दिले जात नसेल तर बदलाची अपेक्षा काय ठेवणार? धार्मिक उन्माद, धर्मकर्मकांडांचा आग्रह यांना विवेकाच्या कक्षेतून विरोध करणारांचा टोकाचा द्वेष, या गोष्टी भविष्यात हिंदू धर्मातील अंतर्गत कलहाला कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.

या लादलेल्या विचारांच्या जोखडातून आपला समाज अजूनही बाहेर पडू शकत नाही. कारण आपल्याकडे धर्म चिकित्सा करणारा दुरात्मा, धर्मबुडवा आणि पाखंडी समजण्याची जी काही वैचारिक दिवाळखोरी साथीच्या रोगासारखी सर्वदूर पसरत चालली आहे आणि पुढील नवसुशिक्षित पिढ्यांत पाझरत चालली आहे, ही बाब बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा आग्रह धरणाऱ्या आणि प्रसार करणाऱ्या विचारवंतांची खचितच काळजी वाढवणारी आहे. धार्मिक श्रद्धास्थाने चुकीची असतील तर ती बदलण्याचे धाडस समाजाला कधी ना कधी दाखवावेच लागेल. पण याआधी आपला समाज एवढा प्रगल्भ आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. धर्माची प्रतीके भक्कम झाली की आपोआप श्रद्धा आणि श्रद्धेबरोबरच अंधश्रद्धादेखील संघटित नि बळकट होतात. परंपरा, संस्कृती, धार्मिक श्रद्धा नि अस्मिता जपण्याच्या नावाखाली अनेक खुळचट कल्पनांचे संचित एका पिढीतून दुसऱ्या पिढ्यांत पाझरत चालले आहे. हे सारे बघितले की प्रश्न पडतो, आपण परंपरा, संस्कृती आणि धार्मिक अस्मितांचे वारसदार आहोत की भारवाहक?

बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे

----

परिवर्तनशील असले पाहिजे हा त्या अंकाचा संदेश

28 ऑगस्ट 2021 चा ‘धर्माने मला काय दिले?’ या विषयावरील विशेषांक वाचला. धर्माबद्दल विविध विचारवंतांची वैचारिकता या निमित्ताने समजली. सर्व मान्यवरांचे विचार हे मानवतावादी दृष्टिकोनाच्या चौकटीत आहेतच असे मला वाटते. प्रश्न असा निर्माण होतो की, जर सर्वच धर्म मानवमूल्य केंद्रित आहेत तर मानवी जीवन इतक्या गुंतागुंतीचे का बनले आहे? एक धर्म दुसऱ्या धर्माबद्दल व दुसरा धर्म अन्य धर्माबद्दल आकस बाळगण्याचे काहीच कारण नाही. धार्मिक संस्कारातून मानवीय मूल्ये निर्माण झाली पाहिजेत. पण तशा प्रकारचे वर्तन धर्माचे संस्कार देणाऱ्यांकडून आज क्वचितच दिसतेय. एकमेकांबद्दल आक्रस्ताळेपणाने बोलण्यातच लोक धन्यता मानत आहेत.

साधनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अनेक  विषय घेऊन बुद्धिवंतांचे विचार विविध विषयांच्या माध्यमातून मानवीय मूल्ये, संवेदना, राष्ट्रीय अस्मिता, अनेक समस्या व जेव्हा जी समस्या मनुष्याच्या जीवन-मरणावर प्रश्न निर्माण करते, तेव्हा साधनाचे अंक त्या विषयावर खंबीरपणे भाष्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आपला देश विविध धर्म, जाती-संप्रदाय, विभिन्न संस्कृती जोपासणारा असला तरीही मानव जीवनकेंद्रित समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मूल्यांचा पाठराखण करणारा आहे. त्यामुळेच ‘धर्माने मला काय दिले’ या विषयावरील मान्यवरांचे विचार हे मूल्यांची अभिव्यक्ती करणारे आहेत. धार्मिक नीतीला मानवधर्मी नीतीने प्रभावित केले पाहिजे, या संबंधातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे या अंकातील विचार आज धार्मिक भेद करणाऱ्यांनी वाचले पाहिजेत, चिकित्सा करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मानवतावादी धर्माचे विश्लेषक होते.

‘धर्माने मला दया-क्षमा-शांती या मंत्राची दीक्षा दिली’, हा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा लेख धर्माबद्दल आस्था दाखवणारा व धर्माचे गुणगान गाणारा आहे. रेव्हरंड चित्रलेखा जेम्स यांचा ‘निर्भयता आणि सत्याची चाड ही तत्त्वे मला येशूने दिली’ हा लेख व फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा लेख या दोहोंमध्ये समानता दिसून आली आहे. फ.म. शहाजिंदे यांचा ‘धर्माने मला हिंमत आणि निर्भयता दिली आहे.’ हा लेख धर्माच्या विविध अंगांचे विश्लेषण करतो आहे, यात वर्तमान समस्यांचे चित्रण झालेले आहे. रझिया पटेल यांचा ‘धर्माच्या नावाने दडपशाही करणाऱ्यांशी पहिला संघर्ष करावा लागला’, हा लेख धर्माच्या शिक्षणाचे महत्त्व सांगून जातो. ‘जगातला कोणताही धर्म हिंसात्मकतेला थारा देत नाही. पण मनुष्याच्या प्रवृत्तीमुळे असे विषमतावादी प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपल्या देशात शोषणाचा आधार असलेल्या धर्मसंस्थेला महात्मा गौतम बुद्धांनी आव्हान दिले होते. महात्मा फुले यांनी पुरोहितशाहीवर आधारित धर्मसंस्थेला आव्हान दिले होते. प्रचलित धर्मसंस्था ही भारताच्या सामाजिक सांस्कृतिक अवनतीस कारणीभूत आहे. त्यामुळे या बुद्धिवंतांच्या युगात धर्माचे कोणतेही सूत्र जर सर्वमान्य व्हावयाचे असेल तर त्याला बुद्धीच्या आणि सार्वत्रिक न्यायभावनेच्या कठोर कसोटीवर पार पाडावे लागेल,’ असे त्या नमूद करतात.

शमसुद्दीन तांबोळी हे प्रगतीच्या आड धर्म येतो तेव्हा संघर्ष करण्याची प्रेरणा धर्मानेच दिली, असे नमूद करतात. आज जगभरात धर्माच्या नावाने अतिरेकी, दहशतवादी संघटना फोफावलेल्या आहेत. तालिबान, बोको हराम, अल्‌कायदा आणि अशा अनेक नावाच्या संघटना इस्लामच्या नावावर हिंसाचार करतात. महिलांचे अपहरण करून त्यांना सेक्स स्लेव्ह करतात. सन 2018 मध्ये नोबेलविजेत्या नादिया मुराद यांचा उल्लेख करता येईल. त्यांना इसिसच्या क्रूर हिंसाचाराला व शोषणाला बळी पडावे लागले. अशा समस्यावर मात करून धर्मातील उदारमतवादी विचारांची जगाला गरज आहे. आज या प्राचीन धर्मग्रंथांची उपयुक्तता आधुनिक संविधानात्मक निकषावर तपासली पाहिजे, मानवतावादी मूल्यावर आधारित समाज निर्माण केला पाहिजे, असे मार्मिक भाष्य तांबोळी करतात.

तारा भवाळकर यांचा लेख भविष्यात धर्म म्हटलं जावं म्हणून कर्मकांड व्रत-वैकल्ये असतात, हे शीर्षक प्राचीन परंपरांचा समाजावर  किती पगडा आहे हे नमूद करतो. दत्तप्रसाद दाभोळकर विज्ञान आणि धर्म यांच्या समन्वयाचे भाव व्यक्त करतात. धार्मिक माणसांना प्रथम एक गोष्ट समजावून घ्यावी लागेल. एक धर्म स्वीकारला तर तुम्हांला सारे धर्म स्वीकारावे लागतात आणि एक धर्म नाकारला तर तुम्हांला सारे धर्म नाकारावे लागतात, हे भाष्य आम्हांला विचार करण्यास प्रवृत्त करते. अशा प्रकारची विचारधारा माणसांना प्रामाणिक जीवन जगण्याची प्रेरणा देते. शेवटचा लेख डॉ. हमीद दाभोलकरांचा आहे. धर्माची शिकवण म्हणून जर कोणी स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि समता या गोष्टींविषयी बोलत असेल तर त्यांच्याशी आपले वैर असण्याचे काहीच कारण नाही. मेंदू, विज्ञान, मानसशास्त्र व उत्क्रांतीचे शास्त्र जसजसे अधिक पुढे जाईल तसतसे मानवी जीवन सत्याच्या जवळ जाईल. तेव्हाच मानवी जीवन मानवतावादी बनेल, अशी भावना ते व्यक्त करतात.

या सर्व मान्यवरांचे विचार धर्माच्या संकल्पनेची चिकित्सा करणारे आहेत. मानवतावादी विचारधारा जोपासणारी आहे. धार्मिक विषमता निर्माण करणाऱ्या वृतीला जबरदस्त हादरा देणारा हा विशेषांक आहे. हा विशेषांक इतका महत्त्वाचा आहे की, आपणच आपल्या धर्माची चिकित्सा करण्याची संकल्पना निर्माण करतो. आपण दहा रुपयांचा नारळ दुकानदाराकडे खरेदी करताना त्या नारळास हातात घेऊन हलवून बघतो की त्यात पाणी आहे की नाही. पण मानवी जीवनात धर्म, संप्रदाय, जाती या आणि अशा प्रवृतीबद्दलपण तशाच प्रकारचे निरीक्षण आपणांला करता आले पाहिजे. जे चांगले आहे ते घेतले पाहिजे, जे वाईट आहे ते टाकून दिले पाहिजे. माणसाने परिवर्तनशील जीवन जगणे आजच्या युगाचे संकेत आहेत. हा विशेषांक हाच संदेश आपणांस देतो आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ किशनराव भालेराव, लातूर

----

तुकोबांचे अभंग आणि कुराणातील आयत

28 ऑगस्ट 2021 चा ‘धर्माने मला काय दिले?’ या अंकात विविध धर्मांतील मान्यवरांची मते दिलेली आहेत. या सर्व लेखांत अनेक चांगल्या गोष्टींचा ऊहापोह केलेला आहे. अनेक जाणकारांनी असे म्हटले आहे की, धर्म हा घरात असावा, सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर नसावा. या सर्व लेखांत मला रझिया पटेल यांचा लेख खूप आवडला. अनेक थोर व्यक्ती, गांधीजी, साने गुरुजी, विनोबा भावे, सय्यद अमीन अशांच्या विचारसरणींचा त्यांच्यावर पगडा आहे. त्यांचे वाचन सखोल आहे व विचारात स्पष्टपणा आहे. साय व दही यांच्या मिश्रणातून त्यांनी वैचारिक लोणी बाहेर काढलेले आहे. त्यांचे विचार  हिंदू आणि मुस्लीम यांना एकात्मतेचा संदेश देणारे आहेत. जितक्या सहजतेने त्यांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ स्पष्ट केला आहे, तितक्याच सहजतेने कुराणातील काही आयतातील संदर्भ दिला आहे. धर्माच्या नावाने वाईट प्रवृत्ती कशा फोफावतात हे त्यांनी उदाहरणासहित दाखविले आहे. महात्मा गांधीजींचे वैश्विक विचार हा अनेक वाईट संकटांवर, अनिष्ट रूढींवर मात करणारा आहे हे या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

चंद्रकांत गवांदे, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके