डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तुमच्या इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याविषयीच्या ‘भारतीय संगीताच्या अवनतीचे एक कारण’ या मताशी मात्र सहमत होता येत नाही. किंबहुना, आज भारतीय संगीत अवनतीला लागलं आहे, हे मतही ‘नॉस्टॅल्जिया’ या प्रकारात मोडतं असं म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याच्या वापराला मोठ्या कलाकारांकडून प्रमाणपत्र मिळालं, हे तुम्हीही मान्य करता. त्यात मालिनी राजुरकर यांच्यासारख्या कलाकारांचाही समावेश आहे. या कलाकारांनी भारतीय संगीताच्या अवनतीला हातभार लावला, हे सुचवणं कितपत योग्य आहे? आता तुमचा तांत्रिक आक्षेप बघू या.

अर्थव्यवहारात स्पर्धा चालू ठेवणे शहाणपणाचे नाही! 

दि.24 ऑक्टोबरच्या साधना अंकात ‘चीन आणि भारत : स्पर्धा, संघर्ष की सहकार्य?’ या लेखात डॉ. सतीश बागल यांनी चीन व भारताच्या संबंधाबाबत भरपूर माहिती देऊन ‘चीनबाबत नावीन्यपूर्ण आणि दीर्घकालीन धोरण हवे’ असे म्हटले आहे, ते स्वागतार्ह नक्कीच आहे. पण सत्तासमतोल व भांडवलशाही तंत्रवैज्ञानिक  विकास यांच्या खानदानी संकल्पनांच्या आधारे एकंदर विवेचन केलेले दिसून येते. मानवजातीच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने त्या संकल्पनांबाबत फेरविचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. 1956 मध्ये तत्कालीन चिनी पंतप्रधान चौ एन लाय व भारताचे नेहरू यांनी पंचशील करार केला होता. 1. शांततामय सहजीवन, 2. जागतिक शांतता 3. विविध देशांनी स्वीकारलेल्या अर्थराजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप न करणे. 4. वादविषय वाटाघाटीने सोडवणे. 5. देशादेशात शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक सहकार्य वाढवणे. यांचा त्यात अंतर्भाव होता. या पाच तत्त्वांबाबत मतभेद होण्याचे कारण नाही. जगभर शांतता नांदावी, विविध देश-वंश-धर्म वगैरेंबाबत विविधता असली तरी सर्वच माणसांचे माणूस म्हणून मूल्य समान आहे, त्यांना सर्व मानवीय हक्क उपभोगता यावेत, अशा व्यवस्था चालाव्यात या संयुक्त राष्ट्रसंघाच्या भूमिकेनुसार जगभर व्यवहार चालावेत, यासाठी ती पाच तत्त्वे आजही मार्गदर्शक ठरणारी आहेत. 

आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत अर्थव्यवहारात स्पर्धा चालू ठेवणे शहाणपणाचे आहे, असे वाटत नाही. आपल्या देशातील सर्व लोकांना चांगले मानवी जीवनमान उपभोगता येईल, हा उद्देश समोर ठेवून आपले मनुष्यबळ व नैसर्गिक साधने यांच्या साह्याने (मात्र पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता) आवश्यक त्या वस्तू-सेवांचे उत्पादन व न्याय्य वितरण होत राहील, असे आर्थिक धोरण प्रत्येक देशाने स्वीकारणे श्रेयस्कर आहे. उत्पादन हे कार्यक्षम रीतीने करता यावे. मात्र खनिज इंधनाचा बेसुमार वापर करून पर्यावरणाला जे नुकसान पोचवले जात आहे, ते कसे थांबवता येईल, याचे भान ठेवूनच तंत्रज्ञान वापरावे. एकाला सगळ्या वस्तू चांगल्या रीतीने करता येत नाहीत. ज्याची-त्याची नैसर्गिक क्षमता व कौशल्य यांच्यामुळे ज्या वैविध्यपूर्ण वस्तू निर्माण होतात, त्यांचा एकमेकांना सुलभतेने व कुणाचेही नुकसान न होऊ देता लाभ घेता यावा, यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार व्हावा. आधीच्या तीन-चार शतकांत अविकसित जनसमूहांना लुटणे व आपले राजकीय वर्चस्व कायम करणे, यासाठी व्यापाराचा उपयोग केला गेला आणि त्याचे भयंकर परिणाम बहुतांश मानवजातीला भोगावे लागले आहेत. 

आजघडीला आपला नफा जास्तीत जास्त वाढवायचा व त्यासाठी जाहिरातीवर बेसुमार खर्च करून स्त्रीदेहाचे बीभत्स प्रदर्शन करून, अनेक सांस्कृतिक विकृती वाढवल्या जात आहेत. वाहतूक व जाहिरातबाजी यावरचा खर्च अगदी कमीत कमी करून व्यापार केला जावा असे आपण स्वत: आचरावे व इतरांनाही तसे वागायला प्रवृत्त करावे. जर्मन अर्थशास्त्रज्ञ शूमाकर यांनी ‘स्मॉल इज ब्यूटिफुल’ या ग्रंथात ऑप्टिमम म्हणजे पुरेसे किंवा श्रेयस्कर अर्थव्यवहार ही संकल्पना मांडली आहे. दुसऱ्या देशाकडे जे काही आहे तेवढे किंवा त्यापेक्षा अधिक आपल्याकडे असावे असे वाटणे, यापोटी स्पर्धा चालत राहते. आमच्या गरजा चांगल्या भागल्या म्हणजे झाले; दुसऱ्याकडे काय व किती आहे, यावर आपण किती मिळवायचे, असा विचार करण्याची गरज नाही. मात्र तसा विचार करत राहिले तर स्पर्धेला व त्यामुळे प्रत्येकाच्या धडपडीला अंतच राहणार नाही. हे तार्किक दृष्ट्या सहज समजण्यासारखे आहे. अलीकडे तंत्रवैज्ञानिक दृष्ट्या जे-जे शक्य आहे (टेस्ट ट्यूब बेबीपासून तो रासायनिक शस्त्रे) ते करत राहणे शहाणपणाचे आहे का याचा विचार केला नाही, तर मानवजात सुरक्षित राहू शकणार नाही. 

परराष्ट्र धोरण हा अंतर्गत धोरणाचाच विस्तार असतो, असे म्हटले जाते. आपण आपल्या देशापुरते ऑप्टिमम उत्पादनाचे धोरण ठेवले तर दुसरा देश काय व किती वाढवतो, याचा विचार करण्याची- म्हणजेच स्पर्धा करण्याची गरज नाही. ज्या-त्या देशाने असा शहाणपणाचा मार्ग अवलंबला म्हणजे शांततामय सहजीवनाचा करार पाळण्यासारखेच आहे. 

चीन आपल्याशी सीमावाद घालत असून मधून-मधून लष्करी खोड्या करीत आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपली संरक्षणसिद्धता तयार ठेवणे आवश्यक आहे. तरीही पायदल, नौदल व हवाईदल या सर्व बाबतीत त्यांच्या मागे पडू नये, शक्य तर पुढे जावे, असा हव्यास किंवा अट्टहास करण्याचे कारण नाही. 

आपण जगाचा पोलीसदादा व्हावे असे अमेरिका, रशिया व चीनला वाटत असले तर वाटू द्या. आपण त्याबाबत त्यांच्याशी स्पर्धा करायची ती कशासाठी? ‘हम भी कुछ कम नहीं’ असे दाखवण्यापुरतेच का?

ग्लोबल वॉर्मींग ही समस्या दिवसेंदिवस उग्र होऊ लागली आहे. असे ज्येष्ठ वैज्ञानिकांपासून तो 18 वर्षीय ग्रेटा थुनबर्ग सांगते आहे, ते या कानांनी ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे का? 

चांगले वागणे हे दुसऱ्यावर अवलंबून न ठेवता स्वत:च्या विवेकबुद्धीवर, खरे तर गावरान शहाणपणावर अवलंबून ठेवावे. आपण चांगले वागण्याने दुसरे देश आपल्याला ठेचूनच काढतील, अशी भीती बाळगायचे काय कारण आहे?

आपल्या देशात सध्या रोजगारनिर्मितीचा वेग वाढवणे हा मुख्य मुद्दा आहे. आपल्याकडे वर्षभर सूर्यप्रकाश, नियमित मॉन्सूनचा पाऊस, देशाच्या क्षेत्रफळाच्या निम्म्यापेक्षा अधिक सुपीक जमीन व बारमाही वापरता येणारा 7400 कि.मी.चा समुद्रकिनारा ही नैसर्गिक साधने उपलब्ध आहेत. आपल्या लोकसंख्येत युवाशक्ती भरपूर आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारलेल्या कारखानदारीसाठी दर श्रमिक चार-पाच कोटी रुपये भांडवल गुंतवणूक करावी लागते. तर शेती, पशुपालन, वनसंगोपन यात एका माणसाला वर्षभर रोजगार मिळण्यासाठी पाच लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करावी लागते. मग आपण त्याच मार्गाने जाणे श्रेयस्कर नाही का? गुंतागुंतीची यंत्रे, सुसाट धावणारी वाहने आदींचा सोस कशासाठी करायचा? वस्तूनिर्मितीक्षेत्रात चीन पुढे गेला आहे, पण त्यासाठी ते श्रमिकांचे खूप शोषण करत आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. आपण संसदीय लोकशाहीची चौकट स्वीकारली असून आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय स्थापन करणे, हे सर्वोपरी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामुळे काही निर्णय उशिरा होणे, श्रमिकाला वाजवी मोबदला मिळावा यासाठी उत्पादनखर्च वाढला तरी अनमान न करणे, या आपल्या मर्यादा आपण मनापासून स्वीकारल्या पाहिजेत. अन्य देशांशी स्पर्घा करता यावी यासाठी त्यातल्या काही गोष्टी टाळाव्यात, असे म्हणणे योग्य नाही. खरे सहकार्य करायचे तर स्पर्धा करायची नाही, ही पहिली पायरी मानली पाहिजे. डॉ. बागलसह सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी या दिशेने विचार करावा. 

पन्नालाल सुराणा, नळदुर्ग, जि.उस्मानाबाद

----

इलेक्ट्रॉनिक वाद्यांना विरोध करून तो प्रश्न सुटणार नाही!

साधना दिवाळी अंकातला ‘तंतुवाद्याचे अर्थगणित’ हा लेख महत्त्वाचा आहे. या विषयावर अभ्यासपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद. मिरजच्या कारागिरांच्या समस्या लोकांसमोर आणून तुम्ही एक मोठं काम केलं आहे.

तुमच्या इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याविषयीच्या ‘भारतीय संगीताच्या अवनतीचे एक कारण’ या मताशी मात्र सहमत होता येत नाही. किंबहुना, आज भारतीय संगीत अवनतीला लागलं आहे, हे मतही ‘नॉस्टॅल्जिया’ या प्रकारात मोडतं असं म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याच्या वापराला मोठ्या कलाकारांकडून प्रमाणपत्र मिळालं, हे तुम्हीही मान्य करता. त्यात मालिनी राजुरकर यांच्यासारख्या कलाकारांचाही समावेश आहे. या कलाकारांनी भारतीय संगीताच्या अवनतीला हातभार लावला, हे सुचवणं कितपत योग्य आहे? आता तुमचा तांत्रिक आक्षेप बघू या.

नीट जुळवलेल्या तानपुऱ्यातून सर्वच सूर उमटतात. हे इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याच्या बाबतीत करणं सहज शक्य आहे. गाणं शिकणारा त्यानुसार आपल्या गळ्यातून तसे सूर काढायचा प्रयत्न करू शकेल. तानपुरा छेडताना लयीत बदल करण्यासाठी एका स्वतंत्र बटणाची सोय गेली अनेक वर्षे उपलब्ध आहे. तानपुरा जुळवताना जे सूरांचं ज्ञान लागतं, तेच ॲनलॉग तानपुरा जुळवताना लागतं. अगदी डिजिटल ट्युनिंगची व्यवस्था असेल, तरी फाइन-ट्युनिंग करावंच लागतं. फक्त लाकडी खुंट्या पिळण्याऐवजी फिरणारे नॉब आणि पुश-बटण यामुळे ते सोपं होतं. शिवाय दौऱ्यावर जाणाऱ्या कलावंतांची फार मोठी सोय होते, ती वेगळीच. फार वर्षांपूर्वी प्रभा अत्रे यांनी एका लेखात, परदेश-प्रवासात तानपुरे घेऊन जाणं किती त्रासदायक आहे याचं वर्णन केलं होतं. त्या वेळी कोणी तरी भविष्यात ‘घडीचे तानपुरे’ तयार करतील, अशी आशा व्यक्त केली होती.      

एकूणच इलेक्ट्रॉनिक वाद्यांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये फार मोठी प्रगती झालेली आहे. बड्या जागतिक कंपन्यांच्या की-बोर्डमधून निघणारे वेगवेगळ्या भारतीय वाद्यांच्या आवाजांचं मूळ वाद्यांच्या आवाजांशी (संतूर, सनई वगैरे) असणारं साधर्म्य अक्षरशः थक्क करून सोडणारं आहे. तंतुवाद्यांच्या किंवा सनईच्या आवाजात की-बोर्डवर निघणारी मिंड ही तंत्रज्ञानाची कमाल आहे आणि यात सातत्याने सुधारणा होत आहे.

आज अनेक वादक आणि तबलजी आपली वाद्यं जुळवताना इलेक्ट्रॉनिक ट्युनरची मदत घेतात. एक प्रकारे ‘कानाने’ वाद्य जुळवण्याऐवजी ते ‘डोळ्याने’ वाद्य जुळवतात. त्यामुळे वादकाची सूरांची समज कमी होते, असं मानायचं कारण नाही. वाद्य सहजपणे, अचूक जुळल्यामुळे संगीताची अवनती होण्याचंही कारण राहत नाही.   
    
साठ-सत्तर वर्षांपूर्वी संवादिनीमुळे कसं भारतीय संगीताचं नुकसान होत आहे, अशी टीका झाली आणि काही दशकं आकाशवाणीवर संवादिनीवर बंदी होती. पण भीमसेन जोशींपासून सर्व मोठ्या गायकांनी संवादिनीचा स्वीकार केला. या वाद्याच्या मर्यादा होत्या, पण फायदेही होते. तशा सारंगीच्या किंवा प्रत्येकच वाद्याच्या काही वेगळ्या मर्यादा आहेत. पण ज्या वाद्यांच्या वापराने संगीत लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते, त्यांचा वापर करायला (विशेषतः त्यात सतत सुधारणा करत राहून) हरकत नसावी. राहिला प्रश्न कारागिरांच्या बेरोजगारीचा. तो महत्त्वाचा आहेच. पण इलेक्ट्रॉनिक वाद्यांना विरोध करून तो सुटणार नाही. आज एखाद्या गाणं शिकणाऱ्या मुलाला चाळीस हजारांचा तानपुरा परवडणार नाही. त्याला कदाचित दहा हजारांचा इलेक्ट्रॉनिक तानपुराही परवडणार नाही. पण मोबाईलवर दोन हजारांत तानपुऱ्याचं ॲप मिळू शकतं. त्यामुळे भारतीय संगीत अवनतीला जाईल, असं वाटत नाही. नव्या पिढीने पिढीजात व्यवसायात उतरायला अनुत्सुकता दाखवावी, हा प्रश्न फक्त मिरजच्या कारागिरांचा नाही. आज शेतकऱ्यांची मुलंसुद्धा शेती करायला अनुत्सुक असतात. तो एक वेगळाच प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं सोपी नाहीत.

विवेक गोविलकर, मुंबई

---- 

सक्तीचे धर्मांतर झालेच नाही, हे म्हणणे न पटणारे आहे!

दि. 26 सप्टेंबरच्या साधनातील प्रभाकर देवधर यांचा लेख वाचला. त्या लेखावर टीका करणारा प्रतिसादही 24 ऑक्टोबरच्या अंकात वाचला. पंडितांनी पत्रातील प्रथम परिच्छेदात लिहिले आहे, काश्मीरमध्ये संघ स्वयंसेवकांनी एक लाखापर्यंत मुस्लिमांची हत्या केली. हे आम्हाला एवढ्या वर्षांत कोणीही सांगितले नव्हते, ते प्रथमच कळाले. कोणतीही हत्या अत्यंत निषेधार्हच आहे. रियासतकार गो.स.सरदेसार्इंच्या ‘मुसलमानी रियासत - खंड 1’ मध्ये मुस्लिम आक्रमकांनी किती भयानक कृत्ये केली होती, याची माहिती आहे. त्यात येथील लोकांच्या क्रूर कत्तली, जबरदस्तीने धर्मांतरे, अनेक देवळे पाडून मशिदी बांधल्या, शहरांची नावे बदलली याबद्दल सविस्तर माहिती आहे. पंडितांनी कृपया तो ग्रंथ वाचावा. सवर्णांच्या जाचाला कंटाळून अनेक दलित मुस्लिम झाले हे खरे असू शकते; पण सक्तीचे धर्मांतर झालेच नाही, हे न पटणारे आहे.

दुसरे म्हणजे, अनेक मुस्लिम राजे येथे स्थिरावले व हा देश त्यांनी आपला मानला, असे पंडित म्हणतात. हे आक्रमक परकीय होते, हे तर त्यांना मान्य असावे. परकीय आक्रमकांबद्दल प्रेम दाखवावे, असे त्यांना म्हणायचे आहे का? (आपल्या सत्तेला विरोध न होता ती बळकट व्हावी, हाच त्यांचा या देशाला आपला मानण्यामागे उद्देश होता.) ‘खोटं बोलणार नाही, पण (गैरसाईचे) सत्य कदापि सांगणार नाही’ हे त्यांचे विधान उपरोधिक वाटते. पण त्यांच्या स्वत:च्या लिखाणाला हे विधान लागू पडू शकते. कारण दोन्ही लेखकांचे विचार पूर्णपणे भिन्न आहेत. शेवटी पंडित असे म्हणतात की, ‘स्थापण्या समता शांती’ असे ब्रीद असलेल्या साधनाने असे लेखन कसे छापले, हे त्यांना कळत नाही. हे विधान तर फारच वादग्रस्त वाटते. न पटणारे विचार छापणे म्हणजे साधनाच्या ब्रिदाला धक्का बसला, हा विचार साधनावर अन्याय करणारा आहे. विरोधी विचारसुद्धा छापून साधनाने अभिव्यक्तिस्वातंत्र्यच जपले आहे, नाही तर साधना एकांगी विचारांची पाठराखण करणारी वाटेल. पत्रातील शेवटचे वाक्य तर साधनावर चुकीचा संशय व्यक्त करणारे वाटते.

स्नेहलता रमेश गोसावी, पुणे

Tags: पन्नालाल सुराणा विवेक गोविलकर स्नेहलता रमेश गोसावी वाचक प्रतिसाद प्रतिक्रिया वाचक पत्रे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके